दोन जास्त ९८ नंबरी भाषण
प्रतिवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेतले जाणारे साहित्य संमेलन हे वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. मुळात अशा संमेलनाची गरज आहे का आणि असल्यास त्याचा अध्यक्ष कसा निवडला जावा व या अध्यक्षाचे मराठी साहित्य विषयातले नेमके स्थान काय हे चर्चेचे काही मुद्दे. या वेळी हे संमेलन नवी दिल्ली येथे भरले आणि त्याच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड झाली. तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण मुळातून ऐकण्यासारखे आहे. त्यात त्यांनी उपस्थित केलेले काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे होते :
१ अशा प्रकारची साहित्य संमेलने ही मुळात आर्थिक स्तरावर वरच्या वर्गात असलेल्या लोकांची होतात आणि त्यात श्रमजीवी वर्गाचे प्रतिनिधित्व जवळपास नसतेच. महात्मा फुले यांनी ‘घालमोडे दादा यांचे साहित्य संमेलन’ अशी त्याची संभावना केली होती.
२ सर्वसाधारणपणे लोकसंस्कृतीबद्दल दोन अपसमज असतात. पहिला म्हणजे लोकसंस्कृती ही जुनी आणि खेड्यातली असते. दुसरा अपसमज ज्याला त्यांनी ‘उमाळा संप्रदाय’ असे म्हटले आहे. त्यांचे असे म्हणणे असते की, आमच्या लोकसंस्कृतीत सगळेच आहे. या दोन्हीही अपसमजात तारतम्य बाळगण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
३ या सर्व विवरणाच्या केंद्रस्थानी ‘लोक’हा शब्द आहे त्याला फोक हा इंग्रजी प्रतिशब्द आहे. हा शब्द अनेकवचनी आणि आदरार्थी आहे. लोकांचे स्वतःचे असे एक कलेक्टिव्ह अनकॉन्शियस असते. ते नेहमी शेतीनिष्ठच असते किंवा असायला पाहिजे असे नाही. काही लोक आपल्या लिखाणाद्वारे या सामुदायिक भावना लिखित शब्दांद्वारे प्रकट करतात. ही क्षमता सर्व लोकांच्यात नसते. ज्यांच्यात असते त्यांना आपण लेखक समजतो. प्रायःअभिजन वर्ग नवनवीन कल्पना या लोकांकडून म्हणजेच जनांकडून घेतात. या स्वीकाराचे अभिजनांचे तीन टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे हे विचार तुच्छ समजायचे. दुसरा टप्पा म्हणजे अशा प्रकारचे विचार बाळगल्याबद्दल शिक्षा करायची आणि तरीही या विचाराचे प्राबल्य कायम राहिले तर त्याचा स्वीकार करून आपल्या मांडणीत त्याला गौण स्थान द्यायचे. गौतम बुद्धांना नववा अवतार मानणे हे या प्रक्रियेचे एक उत्तम उदाहरण आहे. लोककला हा आयुष्याचा समग्र उत्सव दर्शविणाऱ्या कला आहेत. आपण साहित्य हा शब्द फक्त लिखित साहित्यापुरता मर्यादित ठेवतो परंतु त्यामध्ये उत्पादनाची साधने, संगीत आदी सर्व गोष्टी येतात. तो एक साधनवाचक शब्द आहे. स्त्रीवाद ही आधुनिक काळाची देणगी नसून आपल्या लोकपरंपरेत काही हजार वर्षांपासून या प्रश्नाकडे स्त्रिया जागरूकपणे बघत आहेत असे त्यांनी लोकपरंपरेतील अनेक ओव्या, गीते सांगून सोदाहरण स्पष्ट केले. स्त्रियांवर अन्याय करण्याची परंपरा ही हजारो वर्षांची आहे हेही त्यांनी दाखवून दिले.
मराठी भाषेला अभिजातता मिळाली याचा आनंद जरूर आहे पण त्यातून काय निष्पन्न होणार ते आपण सजगपणे पाहिले पाहिजे. जी वित्तीय मदत मिळणार आहे त्याचा उपयोग कशासाठी करायचा ते ठरवले पाहिजे. शिक्षणातून मराठी भाषा कमी कमी का होते आहे त्याचा विचार केला पाहिजे. शाळा बंद पडत आहेत, अनुदान, पगार वेळेवर मिळत नाही, शाळेत असणाऱ्या सुखसुविधा चांगल्या नाहीत. इयत्ता दहावीपर्यंत दिले जाणारे शिक्षण मातृभाषेतूनच म्हणजे मराठीतूनच पाहिजे आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळातून शिकवला जाणारा मराठी हा विषय उच्च दर्जाचा असला पाहिजे हे त्यांनी ठासून सांगितले. अभिजातता मिळाल्याचा उत्सव जरूर करा पण तो करत असताना व्यवहारदेखील पहा हा त्यांचा संदेश होता.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचा उल्लेख करताना त्यांनी नेहमीपेक्षा थोडा वेगळा विचार मांडला. सीमा प्रदेशात द्वैभाषिक शाळा हव्यात असे सांगितले. सीमावर्ती प्रदेशांमध्ये भाषिक, सांस्कृतिक समरसता आहे त्याला उत्तेजन मिळाले पाहिजे. थोडक्यात संघर्षापेक्षा सामंजस्याने हा वाद मिटेल असे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
विद्यापीठांमध्ये व उच्चशिक्षणामध्ये मराठीला वाव नाही. मराठी शिकणारे आणि शिकवणारे दोन्ही पुरेशा संख्येने मिळत नाहीत.
विद्यापीठांचा एकंदरीत कारभार सुधारण्यासाठी कुलगुरूंना स्वायत्तता दिली पाहिजे. खूप मोठ्या संख्येने सध्या प्रादेशिक साहित्य संमेलने भरत आहेत; त्या ठिकाणी चालणारा ग्रंथ व्यवहार व लेखन व्यवहार हा महत्त्वाचा आहे.
अशा विचार करायला लावणाऱ्या अध्यक्षीय भाषणाकरता तरी असे वार्षिक साहित्य संमेलन झाले पाहिजे असे वाटून गेले.
