डिप्रेशन – नैराश्य
गेल्या काही वर्षांपासून प्रगतीचा वेग सैराट झाला आणि आपल्या आयुष्यातील सगळ्याच गोष्टींचा वेग बेफाम वाढला. शाळकरी मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्याच तोंडी स्पर्धा, टेंशन असे शब्द परवलीचे झाले आहेत. धावाधाव फक्त शरीराची न राहता मनाचीसुद्धा होते आणि त्याबरोबर कुचंबणाही होते. बदलती जीवनशैली राहणीमान यांमुळे मधुमेह, उच्चरक्तदाब यांसारख्या जशा शारीरिक व्याधी जडतात तसेच चिंता, नैराश्य, ओसीडी असे विविध मानसिक आजारही जडतात. त्यांपैकी नैराश्य म्हणजेच डिप्रेशन या मानसिक आजाराची आपण आज ओळख करून घेणार आहोत.
काही दिवसांपूर्वी एक आजी त्यांच्या ४०-४५ वर्षे वय असणाऱ्या मुलास घेऊन माझ्या दवाखान्यात आल्या होत्या. त्यांच्या मुलाला होणारे त्रास आणि तक्रारी त्या सांगू लागल्या. त्याची झोप कमी झाली होती, भूक मंदावली होती. तो एकटाच बसायचा, त्याचे बोलणे कमी झाले होते, शारीरिक हालचाली मंदावल्या होत्या.
आजींचं आणि माझं बोलणं सुरू असताना मी त्यांच्या मुलाचं निरीक्षण करत होते. आमच्या दोघींच्या चर्चेमध्ये त्याला काही रस नव्हता. तो खाली मान घालून बसला होता. चेहरा काळवंडला होता. प्रत्यक्ष त्याच्याशी बोलताना लक्षात आलं की, तो नजर टाळतो आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एखाद्या शब्दातच देत होता. आवाजही खोल गेला होता. तो स्वतः सगळ्या तक्रारी धुडकावून लावत होता. सविस्तर मानसिक तपासणी केल्यावर त्याचं डिप्रेशन हे निदान पक्कं झालं होतं.
डिप्रेशन हा सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सररास वापरला जाणारा शब्द आहे; पण ह्या आजाराचं खरं स्वरूप किती गंभीर आहे याची कल्पना मात्र सामान्य लोकांना नसते. कधीतरी एखाद्या दिवशी आपला मूड वाईट असतो; कोणाशी जास्त बोलावेसे वाटत नाही; कामात, खाण्यात लक्ष लागत नाही; विनाकारण चिडचिड होते; कधीकधी काहीही झालेलं नसताना उगाच रडू येतं. एखाद्या वेळीच असं काही झालं तर आपण फारसं मनावर घेत नाही; परंतु सतत सलग १०-१५ दिवस जर आपली मनःस्थिती अशीच बिघडलेली राहिली तर त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात होते. आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्यातील फरक जाणवायला लागतो. मग कोणीतरी विचारपूस करतात किंवा डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतात. पण बऱ्याच वेळा शारीरिक स्थिती बरी असल्यामुळे मनाच्या बिघडलेल्या स्थितीकडे सर्वसामान्यपणे दुर्लक्ष केलं जातं.
वर उल्लेख केलेली लक्षणे डिप्रेशन या मानसिक आजाराची आहेत. याच आजाराची आणखी काही महत्त्वाची लक्षणे पाहू या.
१.सतत उदास वाटणे, दुःखी वाटणे
२.दैनंदिन कामातील इच्छा कमी होणे
३.सतत मरगळ आल्यासारखे वाटणे
४.सतत शारीरिक थकवा जाणवणे, सारखा कंटाळा आल्यासारखे वाटणे
५.झोपेच्या तक्रारी- निद्रानाश किंवा अती झोप
६.भूक कमी होणे किंवा सतत खात राहणे
७.एकाग्रता कमी होणे; कामात लक्ष न लागणे. सतत लहानसहान चुका होणे
८.एकटेपणा जाणवणे. आपल्याला कोणी मदत करू शकत नाही असे वाटणे.
९.पुन्हा पुन्हा मृत्यूचे किंवा आत्महत्येचे विचार मनात येणे.
१०. शारीरिक क्रिया मंदावणे, बोलण्याचा वेग, आवाज कमी होणे, चालण्याचा वेग मंदावणे.
११.स्वतःकडे दुर्लक्ष करणे. आवडत्या गोष्टींमधून आनंद मिळेनासा होणे.
१२.आवाज सहन न होणे. विनाकारण रडावेसे वाटणे.
ही सर्व डिप्रेशनची लक्षणे आहेत. यांपैकी कोणतीही ५ किंवा अधिक लक्षणे किमान सलग १५ दिवस जाणवत असतील तर डिप्रेशन हा मानसिक आजार जडला असण्याची दाट शक्यता असते.
डिप्रेशन किंवा नैराश्य हा मानसिक आजार लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो. स्त्री-पुरुष सुशिक्षित – अशिक्षित, सर्व धर्मजाती यांमधील कोणालाही होऊ शकतो.
आयुष्यात झेललेला एखादा आघात – उदा. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, विरह, आर्थिक नुकसान, अपेक्षाभंग, बदली, एखादी वाईट घटना, अचानक जडलेला मधुमेह, हृदयविकार, कर्करोग किंवा एड्ससारखा मोठा आजार, एखादे व्यसन अशा अनेकविध कारणांमुळे डिप्रेशन जडू शकते.
जेव्हा कोणत्याही कारणामुळे मनाला धक्का बसतो तेव्हा सिरोटोनिन या मेंदूमधील एका रसायनामध्ये बिघाड होतो. त्यामुळे विचार, भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूमधील विशिष्ट केंद्रामध्ये बिघाड होतो. त्यामुळे डिप्रेशनची लक्षणे दिसायला लागतात.
आतापर्यंत आपण डिप्रेशनची लक्षणे आणि कारणे पहिली. डिप्रेशन हा एक गंभीर मानसिक आजार आहे. केवळ समुपदेशन किंवा योगोपचार म्युझिक थेरपी अशा उपायांनी तो पूर्णपणे बरा होत नाही. तात्पुरते बरे वाटते परंतु काही काळाने पुन्हा त्रास सुरू होतो. काही केसेसमध्ये डिप्रेशनची तीव्रता आणखी वाढते.
जर योग्य वेळेत मानसिक उपचार घेतले नाही तर डिप्रेशन तीव्र मानसिक आजाराचे रूप धारण करू शकते. उदा. : मॅनिया कॅटाटोनिया किंवा आत्महत्येचे विचार येणे सुरू होते. डिप्रेशनमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. डिप्रेशनमुळे नातेसंबंधांत गैरसमज निर्माण होऊन दुरावा येण्याची शक्यता निर्माण होते. लैंगिक समस्या निर्माण झाल्यामुळे डिप्रेशनची तीव्रता अधिकच वाढते. एकटेपणा आणखी वाढतो.
असो! हे सगळं सांगण्यामागे घाबरवण्याचा हेतू नाही. फक्त एवढेच म्हणणे आहे की, डिप्रेशनकडे दुर्लक्ष करू नये. काट्याचा नायटा होण्यापूर्वीच योग्य मदत घ्यावी. मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत.
या लेखाच्या सुरुवातीला ज्या रुग्णाचे वर्णन केले होते त्याने नियमित औषधोपचार घेतले आणि जो माणूस गेली २-३ वर्षं घरात एका कोपऱ्यात मान खाली घालून बसायचा तो आता परगावी एकटा राहून नोकरी करत आहे.
म्हणूनच कोणत्याही मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊन योग्य औषधोपचार घ्यावेत.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे मन आनंदी तर शरीर निरोगी आणि जीवन रंगीबेरंगी.
