जीवन…
जन्मची आहे अथांग सारा
कशास त्याचा अंत बघा
आनंदाने जगत रहावे
चिंता करूनी जगणे ना…
अनंतकाळी दुःख असे ते
मरणा वाचून संपे ना
सरणावरती गेल्यावरती
अंत कुणीही पाहे ना…
आनंदाने जगत रहावे
चिंता करूनी जगणे ना…
सुख दुःखाचे अवघे जगणे
रडतची येणे हासत जाणे
मागे कुठले पाश ठेवूनी
सोबत काही नेणे ना…
आनंदाने जगत रहावे
चिंता करूनी जगणे ना…
नियतीसुद्धा अचाट असते
ती न कुणाची वाट पाहते
ठरले सगळे घडून जाते
मोह कशाचा राही ना…
आनंदाने जगत रहावे
चिंता करूनी जगणे ना…
माझे माझे करून झाले
कितीच हरले किती जिंकले
खजिन्यापरी त्या जीवास जपले
शेवटास त्या स्मरले ना …
आनंदाने जगत रहावे
चिंता करूनी जगणे ना…
आयुष्य असते सुगंधापरी
सूर्य उगवत्या तेजापरी
हीच आपुली ठेव खरी रे
अंधारातून रडणे ना…
आनंदाने जगत रहावे
चिंता करूनी जगणे ना…
जन्म आपणा मिळे एकदा
जीवन आपले हिच संपदा
आयुष्य आणिल कधी आपदा
अपयशास कधी भीणे ना…
आनंदाने जगत रहावे
चिंता करूनी जगणे ना…
स्वाती काळे
२ तुमची यत्ता कंची?
आम्ही निवांत होतो
आम्ही समजत होतो
परिवर्तनाची लढाई
यशस्वी झालेली असेल
ज्यावेळी तुम्हाला
नामदेव ढसाळ
आणि त्यांच्या कविता
समजलेल्या असतील !
आता लक्षात आलंय
तुमची सुरुवात
करावयास हवी
मुळाक्षरांपासून
न ला काना
म्हणजे ना
हे समजावून देत !
— दत्तप्रसाद दाभोळकर

“आनंदाने जगत रहावे
चिंता करूनी जगणे ना…”
फार छान कविता. 👌