नवी दिल्ली साहित्यसंमेलन : लोकसाहित्याचा गौरव 

मराठी संस्कृतीचा ठसा देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्ली येथे पुरेसा उमटत नाही अशी आज अनेकांची भावना आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अठ्ठ्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२ आणि २३ फेब्रुवारी या काळात नवी दिल्ली येथे कुठलेही गंभीर वादंग निर्माण न होता पार पडले आणि त्याचे उद्घाटन खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी केले ही आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. तारा भवाळकर लाभल्या होत्या याचाही आनंद आहे.
लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती आहे. सांगलीसारख्या काहीशा बाजूला पडलेल्या छोट्या शहरात राहून गेली पन्नास वर्षे त्या आपले संशोधन व लेखन मनोभावे करत आहेत. डॉ.भवाळकर यांचा जन्म एप्रिल १९३९ सालचा. म्हणजेच त्या आज ८६ वर्षांच्या आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी हा सन्मान त्यांचा वाट्याला आला; जे खरेतर पूर्वीच घडायला हवे होते. असो. त्यांचे अध्यक्षीय भाषण अपेक्षेप्रमाणे सुरेख झाले. ‘भांगेतील तुळस’ या शब्दांत ‘लोकसत्ता’सारख्या प्रमुख दैनिकाने केलेला त्यांचा गौरव यथार्थ आहे.
डॉ. भवाळकर यांचे शालान्त परीक्षेनंतरचे सर्व शिक्षण बहिःस्थ (एक्स्टर्नल) विद्यार्थी म्हणून झाले. १९५८ ते १९७९ ही एकवीस वर्षे त्यांनी माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. त्याच काळात त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, ‘मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण – प्रारंभ ते १९२०.’ पुढे त्यांनी सांगली येथील चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात शिकवले. त्यांना साहित्याची गोडी लहानपणापासूनची. हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या गाजलेल्या काव्यसंग्रहाचा मराठी अनुवाद त्यांनी, त्या शिकत होत्या त्याच काळात केला होता. इंडिया बुक हाऊस या नामांकित प्रकाशन संस्थेने तो प्रसिद्ध केला होता. ‘मधुशाला’चे पुढे इतरही काही अनुवाद प्रकाशित झाले; पण तो मान सर्वप्रथम डॉ. भवाळकर यांच्या वाट्याला आला. तेव्हापासून सुरू झालेली त्यांची साहित्ययात्रा आजवर अथक चालू आहे. त्यांचे अलीकडचे पुस्तक म्हणजे ‘सीतायन’ – सीतेची वेदना आणि विद्रोह व्यक्त करणारे. आजवर त्यांची ३५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
डॉ.भवाळकर यांच्या संदर्भात एक व्यक्तिगत आठवण हे लिहीत असताना मनात जागी झाली; तिचा इथे उल्लेख केला तर ते अनुचित ठरू नये. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधव दरवर्षी स्वतःच्या पुढाकारातून आणि कुठल्याही शासकीय अनुदानाशिवाय वेगवेगळ्या गावांमध्ये साहित्यसंमेलने आयोजित करत असतात. रविवार, २३ डिसेंबर २००७ रोजी बेळगावजवळच्या सांबरा या गावी याच संमेलन-मालिकेतील दुसरे संमेलन झाले होते. ‘माय मराठी संघ, सांबरा’ ही आयोजक संस्था होती. अध्यक्षस्थानी डॉ. भवाळकर होत्या. त्या संमेलनात भाषण करण्याची मलाही आयोजकांनी संधी दिली होती. संमेलनाच्या सकाळी नेहमीप्रमाणे ग्रंथदिंडी निघाली होती आणि तिचे वेगळेपण म्हणजे त्या वेळी बराचसा रस्ता एका बैलगाडीतून पार करावा लागला. त्या बैलगाडीत त्या वेळी डॉ. भवाळकर आणि मी एकत्र बसलो होतो. भोवतालचे सगळेच वातावरण अगदी अस्सल ग्रामीण होते. लोकांचा सहभाग खूप मोठा आणि उत्स्फूर्त होता. रस्त्यावर दुतर्फा पताका आणि भगवे ध्वज लावलेले होते. वाटेतल्या प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून रस्ता सजवण्यात आला होता. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. ग्रंथदिंडीला टिपरी, वाजंत्री, ढोल, तुतारी यांची साथ होतीच. बहुतेक सर्व आयुष्य शहरात वास्तव्य केलेल्या माझ्यासारख्या लेखकाला ते सगळे खूप आकर्षक वाटले होते. लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या एका ज्येष्ठ अभ्यासिकेच्या सोबत त्या लोकजागरात सहभागी होणे हा माझ्या दृष्टीने खरोखरच एक दुर्लभ योग होता. तो प्रवास, त्या वेळी त्या गावात झालेले दोन दिवसांचे वास्तव्य, त्या दरम्यान झालेल्या अनौपचारिक गप्पा आणि मुख्य म्हणजे डॉ. भवाळकर यांचे संमेलनातील प्रासादिक पण अभ्यासपूर्ण भाषण यांची आठवण आजही ताजी आहे.
त्या वेळी केलेल्या त्या भाषणात डॉ. भवाळकर म्हणाल्या होत्या, “माणसांच्या मनाचे पावित्र्य राखून मने जोडण्याचे काम साहित्याने करावे अशी अपेक्षा आहे. साहित्याचा हा मूळ विचार संत साहित्यातून व्यक्त होतो. अध्यात्म किंवा योगांचे वर्ग माणसाला उंची देत नाहीत; तर साहित्याची प्रेरणा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त करून देते. साहित्य संमेलन हे सामान्यांच्या मनाचे पावित्र्य राखण्यासाठी असते आणि याचा पाया संतसाहित्यात आढळतो. संतसाहित्याचा पिंड हा माणसाच्या जगण्याशी बांधलेला आहे. परंपरेतील साहित्य हे लिहिता-वाचता न येणाऱ्यांचे साहित्य आहे. म्हणूनच परंपरेने चालत आलेल्या ओव्या, भारुडे ही सर्व परंपरा अपौरुषेय (व्यक्तींच्या नावाचा शिक्का नसलेली) आहेत. लोकसाहित्याने माणसांची मने जोडली जातात.”
दुसऱ्या दिवशीच्या बेळगावातील सर्व मराठी वृत्तपत्रांत त्यांच्या या वक्तव्याला ठळक प्रसिद्धी दिली गेली होती. हे सर्व आठवताना आज जाणवलेली एक विशेष बाब म्हणजे दिल्ली येथील संमेलनात त्यांनी व्यक्त केलेले विचारही त्यांच्या उपरोक्त विचारांशी मिळतेजुळते होते.
“जो मराठी समाज उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि ज्याची आकांक्षा सर्व स्तरांवर जागतिकतेशी स्पर्धा करायची आहे त्याची संख्या आजच्या यंत्रयुगात वेगाने वाढत आहे. या अस्वस्थ करणाऱ्या भोवतालात मला मराठीच्या भवितव्याबद्दल चिंता वाटते.” डॉक्टर भवाळकर यांचे हे परखड उद्गार आत्मतृप्त असलेल्या सर्वच मराठीप्रेमींनी विचारात घ्यायला हवेत.
हे संमेलन दिल्ली येथे भरत आहे आणि तब्बल सत्तर वर्षांनंतर हा योग येत आहे याचा, तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिल्यानंतरचे हे पहिलेच संमेलन आहे याचा उल्लेख करायला हवा.
नवी दिल्ली येथील या साहित्यसंमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले हीदेखील महत्त्वाची बाब आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी अनेक चांगले मुद्दे मांडले. भाषणादरम्यान ते म्हणाले, “एका मराठी भाषक महापुरुषाने शंभर वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज पेरले होते. आज तो संघ वटवृक्षाच्या रूपात शताब्दी वर्ष साजरे करत आहे. वेदांपासून विवेकानंदांपर्यंत भारताची महान परंपरा व संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संस्कारयज्ञ संघ शंभर वर्षे करत आला आहे. माझ्यासारख्या लाखो लोकांना संघाने देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली. संघामुळेच मराठी भाषा व मराठी परांपरेशी जोडण्याचे मला सौभाग्य मिळाले.” पंतप्रधानांचे हे जाहीर उद्गार इथे मुद्दाम नमूद केले कारण आजवरच्या कुठल्याच मराठी साहित्यसंमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असा गौरवपूर्ण उल्लेख झालेला नव्हता.
कुठल्याही साहित्य संमेलनात अनेक परिसंवाद होतात आणि हे संमेलन हा अपवाद नव्हता. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या शीर्षकाचा परिसंवाद आणि त्यातील बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांचे भाषण यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. अवघ्या आठ लोकांपासून सुरू झालेल्या त्यांच्या कंपनीत आज एक लाख कर्मचारी काम करतात. नवी दिल्ली येथील संसद भवन, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवासस्थान तसेच मध्यपूर्व व अमेरिका येथील अनेक महत्त्वाच्या आस्थापनांची देखभाल त्यांची कंपनी करते. “मी स्वतः पुढील दहा वर्षांत दहा लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवून काम करत आहे,” हे त्यांचे विधान म्हणजे या संमेलनातील एक सर्वाधिक प्रेरणादायी विधान होते.
मी स्वतः या संमेलनाला उपस्थित नव्हतो व त्यामुळे माझी प्रतिक्रिया ही वृत्तपत्रांत जे वाचायला मिळाले त्यावर आधारित आहे. वाचनात आलेली काही विधाने पुढीलप्रमाणे होती —
*“संमेलनाच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले गेले पण त्या जाहिरातींमध्ये राजकीय नेत्यांचेच फोटो होते, संमेलनाच्या अध्यक्षांना स्थान नव्हते.”
*“साहित्य संमेलनातील राजकारण्यांच्या सर्वाधिक सहभागाचा विक्रम दिल्लीत नोंदवला गेला.”
*“तीन दिवसांत मंचावरून पंधरा राजकीय नेत्यांची भाषणे झाली. हे राजकारण्यांचे वर्चस्व आक्षेपार्ह वाटले.”
*“मांडव परिसंवादाचा असो की प्रकट मुलाखतीचा, प्रत्येक पाचव्या मिनिटाला पत्रकार एकमेकांशी धडकायचे. जे वृत्तांकनासाठी आले त्यांची डोकी यात धरलेली नाहीत. जास्तीत जास्त पत्रकारांना निमंत्रण ही या संमेलनाच्या आयोजकांची गरज असावी.”
*“पूर्वीच्या साहित्य संमेलनांत दिग्गज साहित्यिक भेटत, त्यांच्याशी गप्पा मारता येत. आता त्या उंचीचे साहित्यिकही राहिले नाहीत अन् त्यांच्या भेटीही दुरापास्त झाल्याने साहित्य संमेलनात पूर्वीइतके समाधान लाभत नाही,” ही आजवर तब्बल ५८ साहित्य संमेलनांना हजेरी लावणाऱ्या डोंबिवली येथील प्रवीण कारखानीस यांची खंत आयोजकांनी विचार करावा अशी आहे.
माझा साधारण अनुभव असा आहे की संमेलनात ज्यांना मंचावर मानाचे स्थान मिळाले किंवा ज्यांचा संमेलनाच्या आयोजनात थेट सहभाग होता ती मंडळी संमेलन किती यशस्वी झाले हे सांगतात तर ज्यांना तसे कुठले स्थान मिळाले नाही ती मंडळी संमेलनावर टीका करताना दिसतात. अर्थात हे मानवी स्वभावाला धरूनच आहे.

दरवर्षी थंडीचे दिवस सुरू झाले की महाराष्ट्रात साहित्यसंमेलनाचे वारे वाहू लागतात. शंभरीकडे वाटचाल करणारा वाङ्मयीन पर्यावरणाचा तो एक महत्त्वाचा घटक आहे. अशा आठ-दहा साहित्यसंमेलनांना मी उपस्थित राहिलो आहे. साहित्य संमेलनाबाबतचे काही सर्वसाधारण विचारही या निमित्ताने मांडले तर ते अनुचित ठरू नये.
आमंत्रित वक्ता असूनही संमेलनस्थळी स्वागतासाठी कोणी जबाबदार व्यक्ती हजर नसणे, आवश्यक ती माहिती मिळण्याची नीट सोय नसणे, त्याच-त्याच विषयांवर चर्चा असणे, प्रत्यक्ष परिसंवादाला फारच कमी श्रोते हजर असणे, उद्घाटनाला आलेले राजकीय नेते निघून गेल्यावर लगेचच मांडव ओस पडणे, आमंत्रणपत्रिकेत नाव छापलेले वक्ते प्रत्यक्षात गैरहजर असणे असेच एकूण चित्र जवळजवळ प्रत्येक साहित्यसंमेलनात मी बघितले होते. तरीही अनेक साहित्यप्रेमी दरवर्षी नित्यनेमाने साहित्यसंमेलनांना हजेरी लावतात. कुठल्याही औपचारिक आमंत्रणाशिवाय, स्वतःच्या खर्चाने, केवळ एक साहित्यप्रेमी म्हणून. अशांचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. निदान त्यांच्यासाठी तरी साहित्यसंमेलने होत राहावीत असे वाटते.
‘अमुक अमुक संमेलनात अमुक अमुक कोटी रुपयांची पुस्तके विकली गेली’ अशा बातम्या सररास छापल्या जातात. खरेतर पुस्तकांची इनवर्ड-आऊटवर्ड एंट्री असा काहीच प्रकार इथे नसतो. प्रत्येक स्टॉलवर जाऊन किती विक्री झाली त्याचीही माहिती जमा केली जात नाही आणि तसा प्रयत्न कोणी केला तरी त्या स्टॉलवरची प्रकाशकाची माणसे खातरीलायक आकडे देतील याची काहीच खात्री नसते. खूपदा सगळा हिशेब तेही आपापल्या गावी परतल्यावरच करणार असतात. तरीही अंदाजपंचे आकडे ठोकून दिले जातात. त्यांची शहानिशा करायच्या फंदात कोणीच पडत नाही. आयोजकांनादेखील विक्रीचे मोठे-मोठे आकडे प्रसारित करायला आवडते. त्यांचे संमेलन खूप यशस्वी झाले याचाच जणू तो एक पुरावा असतो. नवी दिल्ली येथील संमेलनात एकूण ३५ लाख रुपयांची पुस्तके विकली गेली अशी बातमी मी आजच्याच (५ मार्च तारखेच्या) वृत्तपत्रात वाचली. या पूर्वीच्या साहित्य संमेलनातील पुस्तकविक्रीचे आकडे एक ते चार कोटीच्या दरम्यानचे होते हे लक्षात घेतले तर हा आकडा खूपच कमी आहे. अर्थात विकल्या गेलेल्या किंवा सप्रेम भेट म्हणून वाटल्या गेलेल्या पुस्तकांपैकीदेखील प्रत्यक्षात किती पुस्तके वरवर चाळली जातात आणि किती पुस्तके पूर्ण वाचली जातात हाही एक संशोधनाचा विषय आहे. समाजातील वाचनाचे प्रमाण किती कमी होत चालले आहे हे आपल्या आवतीभोवती बघितल्यावर सहज लक्षात येते.
साहित्यसंमेलने सुरू झाली आणि ती ऐन भरात होती त्या वेळचा समाज आणि आताचा मोबाइल-ओटीटीच्या काळातील समाज यांत खूपच फरक पडला आहे. या बदलत्या पर्यावरणात साहित्याचे नेमके स्थान काय आहे त्याचीही चर्चा संमेलनांत व्हायला हवी. दरवर्षी संमेलनाचे अध्यक्ष साहित्यविश्वापुढील काही प्रश्नांची मांडणी करतात. पुढच्या वर्षी दुसरी कोणी व्यक्ती अध्यक्ष असते आणि तीही पुन्हा आपल्या परीने त्याच प्रश्नांची मांडणी करते. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, राजकीय नेत्यांना मंचावर स्थान देऊ नये वगैरे मुद्देही तेच असतात. पुनःपुन्हा तोच-तो बेकंबेचा पाढा. गाडी पुढे सरकतच नाही आणि ती सरकणार तरी कशी; कारण आदल्या अध्यक्षांनी समस्यांवर उपाययोजना म्हणून ज्या गोष्टी सुचवलेल्या असतात त्यांची काहीच अंमलबजावणी वर्षभरात झालेली नसते. उदाहरणार्थ, एका संमेलनाध्यक्षांनी नवे वाङ्मयीन मासिक सुरू करायचा संकल्प सोडला होता. तत्पूर्वी कोणीतरी महाकोषाची कल्पना मांडली होती. कोणीतरी सीमाप्रश्नावर आंदोलन छेडले होते. कोणीतरी महत्त्वाची पुस्तके स्वस्तात उपलब्ध करून देणार होते. खरेतर अशी एकही कल्पना नसावी, की जी साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून पूर्वी कधी मांडली गेलेली नाही! पण प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही. सर्वात दुःखद बाब म्हणजे आजवर ती कार्यवाही का झाली नाही याचे परखड विश्लेषणही कधी होत नाही. मध्यंतरी सत्यकथा मासिकाचे जुने अंक चाळताना १९४४ सालातील ऑक्टोबर महिन्याचा अंक हाती आला. साहित्यसंमेलने किती व्यर्थ आहेत हे सांगणाऱ्या त्या अंकातील संपादकीयाचे शीर्षक आहे : ‘ही संमेलने बंद करा.’ हे सत्यकथेचे संपादकीय होते आणि तेही ऑक्टोबर १९४४ सालातले हे इथे अधोरेखित करतो! साहित्यसंमेलनांवर आजही होणारी टीका ही किती पूर्वीपासून सुरू आहे याची त्यावरून कल्पना यावी!
संमेलन भरवण्यासाठी काही एक ठरावीक कार्यप्रणाली – स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतात तसे – एखादे मॅन्युअल तयार करायची नितांत गरज आहे. साहित्य महामंडळाने त्यात पुढाकार घ्यायला हवा. या बाबतीत गेली काही वर्षे दरसाल भरत आलेल्या जयपूर लिटफेस्टचा अभ्यास करणे उपयुक्त ठरू शकेल. जगभरातून त्या संमेलनाला भरभरून प्रतिसाद मिळत असतो. पण मराठी साहित्य संमेलनांच्या आयोजकांनी या लिटफेस्टची फारशी कधी दखल घेतल्याचे दिसत नाही.
दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनांचे प्रामाणिक मूल्यमापन करून त्यांच्या आयोजनात काय काय बदल करता येतील हाच खरेतर एखाद्या संपूर्ण संमेलनाचा विषय होऊ शकतो. त्यातून अनेक बदल सुचवले जाऊ शकतील. कदाचित संमेलनाध्यक्षपदाची मुदत एका वर्षाऐवजी तीन वर्षे ठेवावी किंवा संमेलन दरवर्षी भरवण्याऐवजी तीन वर्षांनी एकदा भरवावे अशाही सूचना पुढे येऊ शकतील. त्यासाठी साहित्य महामंडळाच्या नियमांचा बागुलबुवा उभा करू नये; देशाच्या घटनेतही वेळोवेळी दुरुस्ती केली गेली आहे; मग साहित्य महामंडळाची नियमावली का बदलता येऊ नये?
अभिजात दर्जा देताना भाषेची प्राचीनता हा एक निकष लावला जातो हे खरे आहे; आणि मराठी भाषेची प्राचीनता स्वयंस्पष्ट आहे. पण त्याचबरोबर त्या भाषेत सातत्याने उत्तम साहित्य निर्माण होत राहणे अत्यावश्यक आहे. ते मराठी भाषेत कसे निर्माण होत राहील यादृष्टीने ठोस उपाययोजना व्हायला हवी. कसदार साहित्याचा आक्रसलेला स्रोत हा साहित्यसृष्टीपुढील आजचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. भविष्यातील साहित्य आणि म्हणून साहित्यसंमेलनेदेखील त्यावरच अवलंबून राहतील.
एरव्ही एकेकट्याने एकान्तात वाचन करणारे अनेक साहित्यप्रेमी संमेलनाच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा एक उत्साही वातावरण आपोआपच तयार होते. आपल्या आवडत्या लेखकांना पाहणे, त्यांचे विचार ऐकणे, शक्य झाल्यास त्यांना भेटणे, त्यांची पुस्तके त्यांच्या स्वाक्षरीसह विकत घेणे हा सगळ्या साहित्यप्रेमींसाठी एक आनंदसोहळाच असतो; पण त्या निमित्ताने थोडे आत्मपरीक्षणही झाले, साहित्यविषयक काही मूलभूत प्रश्न ऐरणीवर आले तर (आणि तरच) आनंदाचा हा ठेवा आपण पुढच्या पिढीपर्यंतही टिकवू शकू.

Author

Leave a Reply