संत, पंत, तंत – काव्यविषयक लेखमाला : पंतकवी रघुनाथ पंडित भाग १

दमयंती स्वयंवराच्या एका प्रतीवर लिहिलेलं नाव ‘चंदावरकर रघुनाथ’ 

म्हणजे ते चंदावरचे राहणारे असावेत! 

काहींच्या मते तंजावरला पूर्वी चंदावर म्हणत;  म्हणजे रघुनाथ पंडित तंजावरच्या मराठी मंडळींपैकी असावेत.  

काहींच्या मते  शिवरायांच्या अष्टप्रधानांमधील पंडितराव म्हणजेच न्यायशास्त्री, राजव्यवहारकोशकर्ते अशी  राजकीय पदे भूषवत असतानाही आंतरिक काव्यप्रेरणा टवटवीत राखणारे हे रघुनाथ पंडित!

काहींच्या मते त्यांचे गाव रायगड जिल्ह्यातील चौल! आडनाव मनोहर. चौलच्या फफे मनोहर घराण्यातही याची माहिती नाही.  मग पंडितांचे मूळ कुठलं? व्यवसाय कोणता? 

रघुनाथ पंडितांच्या आवडत्या दिंडी वृत्तातून (चाल : गाइ पाण्यावर) हे कोडं गुंफून म्हणायचं झालं तर

गाव कळणे हे कठिण महा लोकीं

ठाव  त्यांचा हो कुठेचि   इहलोकी |   

अशी त्यांचा शोध घेणाऱ्यांची अवस्था! 

अर्थात या लेखांचा उद्देश साहित्यमूलक  असल्याने  त्यांचे मूळ ठिकाण, त्यांचा व्यवसाय याऐवजी त्यांच्या काव्याचं रसग्रहणच या लेखमालेत करणार आहोत.  पंडित कवींमधील कमी काव्यसंपदा आणि सघन काव्यमूल्य असलेला हा कवी.  संस्कृत महाकाव्याच्या धर्तीवर रचना करणारे कवी म्हणून रघुनाथ पंडितांना विशेष महत्त्व आहे. 

त्यांनी विठ्ठलाप्रमाणे  वेगवेगळी नावीन्यपूर्ण वृत्तं उपयोजिलेली नाहीत. त्यांचं काव्यही मोठं नाही; पण त्यांची शब्दकळा, शब्दांचा आवाका, बौद्धिक विलास  पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा आहे.

नलदमयंती आख्यान शाळकरी वयापासून सर्वच मराठी वाचकांच्या नुसते परिचयाचे नव्हे तर त्यातील कित्येक वेचे मुखोद्गत असलेले आहे.  नलदमयंती आख्यान, श्रीरामदास वर्णन, गजेन्द्रमोक्ष अशी त्यांची अल्प पण मौलिक काव्यसंपदा आहे. या लेखमालिकेत या रचनांमधील अलंकार, वृत्ते, चमत्कृती, नाट्य यांचा विचार केला आहे. 

(शार्दूलविक्रीडित) 

पुण्यश्लोकनृपावळींत  पहिला होवोनि जो राहिला|

जो राजा असता समस्त महिला विश्रांती शेषाहिला|

व्यासोक्तें अवगाहिला बुधजनीं नानागुणीं गाइला|

जो नामें नल तत्कथौघ लिहिला तो पाहिजे पाहिला| १

यमकांची कसरत हा विशेष पंडित कवींच्या रचनेत असतोच! तो वाचताना मौजही येते पण काव्यदृष्ट्या आणखी प्रगल्भता येण्यासाठी आशय आणि अभिव्यक्ती हातात हात घालून यायला हवेत.  नलराजाचं वर्णन करताना ‘हिला’च्या कसरतीपेक्षा  अधिक रम्य वाटते  ‘विश्रांति शेषाहिला’ ही कल्पना.  शेषाने महीचा म्हणजे पृथ्वीचा भार आपल्या फण्यावर  तोलून धरलेला आहे अशी कथा पुराणात येते. या संदर्भाची नलराजाच्या कनवाळूपणाशी, सच्छीलतेशी सांगड घालत ते म्हणतात,  ‘यथा राजा तथा प्रजा.’ राजा असा  उदार  तर प्रजाही तृप्त, समाधानी.  त्यामुळे प्रजेच्या भांडणांचा, कावेबाजपणाचा भारच नाही. त्यामुळे महीला ( पृथ्वीला) हे पापांचे, दुराचाराचे वजन पेलावे लागत नाही; त्यामुळे महीला धारण करणाऱ्या शेषाहिला – शेषालाही विश्रांती मिळत असे. गुणवान राजाच्या कारभारामुळे शेषही आनंदात राहतो असे मूल्य आणि मूलतत्त्व मांडणारी काव्यरचना. 

 काव्याचा  एक महत्त्वाचा गुण म्हणजे रसाळता. रघुनाथ पंडित स्वतःच सांगतात, इथे शृंगारासह करुणरसालाही स्थान आहे. 

( दिंडी – चाल गाइ पाण्यावर) 

रस, गुण, वृत्त, नाट्य, बोध यांनी अलंकृत अशा या काव्यातील महत्त्वाचे विशेष आपण पाहू या. 

त्याच्यासारखा दुसरा कोण? असं म्हणत रघुनाथ पंडित प्रश्नालंकार मांडतात… उत्तर अर्थातच त्याच्यासारखा – नलराजासारखा तोच! 

भान (संस्कृत) म्हणजे  प्रकाश. त्याला मराठीचं वळण देऊन अंत्यानुप्रासासाठी (वानू, मानू) भानू केलं आहे.   (भानु – सूर्य हा अर्थ इथे अभिप्रेत नाही.) शीतभानू म्हणजे मंद प्रकाशणारा. 

यातली आणखी एक मजा म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राच्या कळा सोळा आणि नळाच्या त्याच्या चौगुणी म्हणजे चौपट – हा चौसष्ट कळांचा अधिपती! 

आणखी एक विशेष म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी म्हणावे तरीही त्याला उणेपण येईल. सूर्य संध्याकाळी मावळतो. नलाचा प्रतापसूर्य कधीही मावळत नाही. थेट सूर्याला कमी मानत यात उपमानगत अपकर्ष नोंदवला आहे. 

ज्याची उपमा दिली आहे त्याच्यापेक्षा उपमेय म्हणजे ज्याला उपमा दिली आहे तो श्रेष्ठ! चंद्र-सूर्यापेक्षा नळ मोठा! रघुनाथ पंडितांच्या पूर्वसुरींच्या काव्यात अलंकारांचे हे सूक्ष्म कंगोरे क्वचितच आढळतात. 

सृष्टिसौंदर्याचं वर्णन करताना रघुनाथ पंडित रंगून जातात. 

पनस (फणस) जंबू जंबीर विविध निंबें,

 कुंद  चंदन, माकंद (आम्रवृक्ष) सुदाडिंबे (डाळिंब – दिंडी वृत्तात बसवण्यासाठी सुदाडिंबे)

तुंग नारिंगें विकसली कदंबें

वसति तेथें शुक-सारिका-कदंबें||२९||

अशा फळफुलांनी बहरलेल्या ‘सानुनासिक’ वनराईत ‘वसति तेथें शुक-सारिका-कदंबें’ मध्ये एक कदंब असताना परत वसति  तेथें… कदंब शब्द कसा?

 इथे अर्थ आहे थवे.  असे द्व्यर्थी शब्द योजून रघुनाथ पंडित विचारात टाकतात.   

इथेही दोन कालवे येतात. नाजूकशा वेलींच्या मुळांशी झुळझुळणारे कालवे आणि त्यांत  गर्द बहरलेल्या फळाफुलांचा गळणारा, मिश्रित होणारा मध! 

परागही सांद्र तयांत रंगती

फुलांसवे भृंगतती तरंगती||३०||

सहजस्फूर्त चतुराक्षरी यमक काव्यसौंदर्यात भर घालतं. ओढाताण नसलेलं बुद्धी आणि कल्पनाप्रधान काव्य  मधुरा वृत्ती अनुप्रासाने आणखी गेय होतं. एक गोष्ट खटकते : याच पंक्ती रघुनाथ पंडितांनी गजेंद्रमोक्षातही घेतल्या आहेत.  त्यांच्यासारख्या जातिवंत कवीने तीच कल्पना अथवा कडवे दुसऱ्या काव्यात चिकटवणे आश्चर्यकारक आहे. 

अनुगुण अलंकार सुरेल दिंडी वृत्तात योजत राजहंसाचं महत्त्व रघुनाथ पंडित सांगतात. 

साधा हंसही मिळणे दुर्मीळ असताना सुवर्णहंस हातात येणं हा विलक्षण योग आहे. एखाद्या गोष्टीचा गुण दुसऱ्या गोष्टीच्या मिलाफामुळे  वाढतो तेव्हा अनुगुण अलंकार होतो. 

दूध साखर आवडते, त्यात केशर वेलची घातली की अधिक आवडते… अधिकस्य अधिकं फलम् | असं सांगणारा हा अनुगुण अलंकार. आधीच हंस दुर्लभ – त्यात सोन्याचा! 

या क्वचित उपयोजिल्या जाणाऱ्या अलंकाराला आणखी एका दागिन्यांची जोड दिली आहे : विभावना! 

कोणतेही कारण नसताना अचानक काम होणे याला विभावना म्हणतात. 

पाऊस नाही तरी मोर नाचले,  याच पठडीत सुवर्णहंस हातात सापडला असताना, त्याला नळराजाने चक्क सोडून दिले… एकदा पकडल्यावर पुन्हा मोकळे केले… काहीही कारण नसताना!

 दिंडी, विभावना, अनुगुण आणि महीलोकीं, विलोकी, तुवां की, झांकी असा अंत्यानुप्रास अशी अलंकारांची मांदियाळी अनुभवायला मिळते. 

काव्यातील शब्दखेळ कनिष्ठ प्रतीचा मानला जात असला तरी तो वैचित्र्य आणि वैविध्य निर्माण करणारा ठरतो. अन्यथा काव्य निरस वाटू शकते.  हा रा या वर्णांची विशिष्ट यतीवरील आवृत्ती आणि प्रत्येक

 हा – रा चा अर्थ वेगळा… 

शार्दूलविक्रीडित 

हा राहे शरयूसमीप नगरीं हा राजसे आदरीं

हा राजीवदलाक्ष सद्गुणनिधी फारा जनांचा महा २०१

 कंधरी म्हणजे गळ्यात, हारावली म्हणजे हार… असा ‘हारा’चा अर्थपूर्ण शब्दसुमनहार  ओवला आहे . 

सुवर्णहंसावर नेम धरतानाचं वर्णन करताना शिखरिणी वृत्त आणि मध्ययमक यांची कलाकुसर केली आहे. 

 कदा नेणो वोढी शरधिंतुनि काढी शर कदा

कदा धन्वीं जोडी वरिवरिहि सोडी तरि कदा

विपक्षाच्या वक्षावरि विवरलक्षास्तव रणीं

कळे राजेंद्राची त्वरित शरसंधान करणी||९||

निमिषार्धात बाण जोडून  बाण सोडण्याचं इतकं कौशल्य  नलाकडे होतं, की शत्रूच्या छातीवर जखमा झाल्या आहेत हे बघितल्यावरच लक्षात येते, नळानेच शरसंधान केले आहे — असा अत्यंतातिशयोक्ती अलंकारही काव्यावर चढवला आहे. 

 कोण तुम्ही कवणाचे कोठुनि एथें कां 

लां हो

काय निमित्तें दिधला मजला हा निज-दर्शन-लाहो ||१७५||

क आणि लच्या अनुप्रासासह  आलाहो आणि लाहो या यमकाने साकी वृत्ताची गेयता वाढते. 

जादूगाराने पोतडीतून थक्क करणाऱ्या चिजा काढाव्यात तसे रघुनाथ पंडित वर्णमालेतून विलक्षण अक्षरसुमने काढत राहतात.  

माल्यभारा (ससजगग, सभरय) हे अर्धसम वृत्त, श्लेष, अंत्यानुप्रास, आशय आणि चमत्कृती असा मनोहर संगम त्यांनी योजला आहे. 

नलराजकथा सुधाचि साजे|

दमयंती वरवर्णिनी विराजे

मिळणी उभयांशि होय जेथें

अधिकारी अधिकानुराग तेथें //१९||

यातील श्लेष असलेले शब्द आधी पाहू. 

सुधा म्हणजे अमृत हे माहीत आहेच; पण संस्कृतात ‘चुना’ असाही आणखी एक अर्थ आहे. 

‘वरवर्णिणि’ म्हणजे ‘सुंदर’ पण याच शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे हळद! 

अधिकानुराग म्हणजे प्रगाढ प्रेम आणि 

आणि अधिक लालिमा. (चेहऱ्यावरची  लाली) 

साधा अर्थ 

नळराजाची कथा अमृततुल्य आहे. दमयंतीही सुंदर आहे. या दोघांचं मिलन प्रेमाचा कळस गाठेल. काव्यरसिकांनी सांगावं,  कोणत्या कवितेत हळद, चुना यांचा उपयोग काव्यात्म प्रेम रंगवण्यासाठी झाला असेल? रघुनाथ पंडितांनी अगदी चपखलपणे संस्कृतासह चक्क रसायनशास्त्राचं ज्ञान जोडलं आहे! 

श्लेष असलेल्या शब्दांचा अर्थ एकत्र केला की काय अर्थ निष्पन्न होतो

चुना (सुधा) आणि हळद(वरवर्णिणि) एकत्र आले की – चुना आणि हळद मिसळली लाल रंग येतो! (रसायन शास्त्राचा नियम) 

अधिकानुराग म्हणजेच अधिक लालिमा येतो. दमयंतीच्या गालावरील लालीचे कारण अशा द्व्यर्थी शब्दांतून मांडत एक काव्यकूट माल्यभारा वृत्तातून रेखाटलं आहे. 

असंबंधित अतिशयोक्ती अलंकार हा एक मजेशीर प्रकार.( २७) 

नलाचा घोडा आकाशापर्यंत उडाला. हीच  पहिली अतिशयोक्ती! पुढे घोड्याचा खूर चंद्राला लागला आणि चंद्रावर डाग पडला! हे केवळ कल्पित चित्र आहे. हे कधीही घडणं शक्य नाही आणि घोड्याचा खूर आणि चंद्र यांचा संपर्कही अशक्य आहे. ही निव्वळ असंबंधित अतिशयोक्ती आहे.

अतिशयोक्ती अलंकारातून रघुनाथ पंडितांनी अशी अनेक स्तुतिसुमने उधळली आहेत. नळाच्या  औदार्याची कीर्ती ऐकून अनेक लोक त्याच्याकडे काही ना काही मागायला येतात. इतकं सांगून कवीचं समाधान होत नाही. तो पुस्ती जोडतो… नळाचं दातृत्व इतकं की –  जे लोक त्याच्याकडून काही मिळेल या आशेने येत असत त्यांना वाटेत नळाकडून द्रव्यादी गोष्टी घेऊन संपन्न झालेले आधीचे याचक भेटत. हे आधीचे याचक त्यांच्याजवळचं द्रव्य आताच्या याचकांना देतात. फुलाचा सुगंध हाताला, हाताचा सुगंध वस्त्राला दिला जावा तशी ही दानशूरता. कवीने मनात एक आदर्श ठरवलेला असून  आदर्शाचा परमोत्कर्ष रचनेत  रेखणे हा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे ही अतिशयोक्ती हास्यास्पद होत नाही. नळराजाची दानशूरता ठसवण्याचा प्रयत्न सफल होतो. 

रघुनाथ पंडितांचं काव्यविश्व  फक्त अतर्क्य गोष्टी सांगत नाही.  माणसाच्या स्वतःपुरतं पाहण्याच्या  स्वभावाचं वर्णन ते हंसांच्या माध्यमातून करतात. 

अर्थान्तरन्यास 

जगाचा न्याय सांगणाऱ्या या पंक्तींत जनस्वभावदर्शन घडवले आहे. आपला एक बंधू मागे राहिला आहे हे कळूनही हंस उडून गेले. कोणीही त्याच्याजवळ थांबले नाही… थांबत नाही ही वस्तुस्थिती! 

अशोभना विनोक्ती हा फारसा परिचित नसलेला अलंकार. १७९

एखाद्या वस्तुविना एखादी गोष्ट रिती वाटत असेल तर तिला अशोभना विनोक्ती (विना+उक्ती) म्हणतात. चंद्राशिवाय रात्र, कमळाविना पुष्करिणी, मोदकाविना गणपती… ही अशोभना विनोक्ती. या अलंकाराचा उपयोग नळराजाचं तेजस्वी व्यक्तिमत्त्व रंगवण्यासाठी रघुनाथ पंडितांनी केला आहे; तोही दमयंतीच्या मुखातून! 

 जर क्षीरसिंधूत दूधच नसेल तर तो क्षीरसमुद्र राहणार नाही; किंवा उद्यानात वसंतच नसेल तर उद्यान रुक्ष होईल. चंद्रोदय झाला नाही तर  रात्र भीषण भासेल या अगदी साध्या ओळींनंतर पुढे ते एक विलक्षण कलाटणी देतात… 

दमयंती नळाला विचारते, तुम्ही आज तुमचा देश सोडून इथवर आला आहात, मग तुम्ही नाही म्हणून कोणत्या देशाला तुमचा विरह होत आहे? 

‘कोठून आला आहात?’ हा साधा प्रश्न विचारण्यासाठी केलेला हा आडमार्गी प्रयत्न ही बौद्धिक आणि कलात्मक मेजवानी आहे. 

२२/३६ स्वभावोक्ती अलंकार यथातथ्य वर्णन करणारा! 

शृंगारला हय त्यावर भूप वेंघे ३६

गंगेच्या रंगासारखी शुभ्रधवल कांती असलेला, या धवल रंगावर कानापाशी भुंग्यासारखा काळेभोर रंग ल्यालेला घोडा. याचा विशेष म्हणजे हा वाऱ्याला संगतीला घेऊन दौडतो.  अशा विलक्षण घोड्यावर बसणारा स्वारही तसाच हवा हे अध्याहृत…  तो कोण हेही अध्याहृत – नळराजा!  तो बसत नाही… तो  त्या चपळ घोड्याच्याच वेगाने त्याच्यावर वेंघतो म्हणजे मांड टाकतो. केवळ शब्दांच्या माध्यमातून नळराजाची चैतन्यमय व्यक्तिरेखा सजीव करणारा हा स्वभावोक्ती अलंकार. 

गजेंद्रमोक्षातील सहजसुंदर वर्णनही स्वभावोक्ती अलंकारातून  मनःपटलावर उमटत जाते. 

हत्तीचा पाय मगरीने पकडला आहे… तो आपलं जाड आणि जड पाऊल मगरीवर चेपतो. 

जें ग्रस्त तें पद सुटूं गज युक्ति दावी

नक्रावरी पद दुजे उचलोनि रोवी

पण मगरीचे खवले पायाला रुपायला लागल्यावर… 

काटे टोचल्याने नाकातून पाणी येऊ लागले. 

रघुनाथ पंडितांच्या काव्यातील शब्दखेळ, अलंकार  वैचित्र्य आणि वैविध्य निर्माण करणारे ठरतात. पात्रे त्यांच्या वैशिष्ट्यांसह समोर उभी राहतात.  त्या  काळाचा विचार करता व्यक्तिरेखा तरल असण्यापेक्षा ठोस  होत्या.  त्यामुळे खलनायक बटबटीत असणे, नायक मृदू असणे आणि या दोन व्यक्तिरेखांमधून सुष्ट दुष्ट प्रतिमा स्पष्ट करणे हा हेतू होता.

रसिकांचे मन वेधून घेण्याचा हा त्या त्या काळातील कवीचा प्रयत्न असतो. तसाच पंतकवींच्या काळातही केला गेला. रघुनाथ पंडितांच्या काव्याचा आस्वाद घेत असताना अशी अनेक वैशिष्ट्ये, अलंकार, नाट्यमयता आपल्याला जाणवत राहते, डोळ्यांसमोर घटना दिसत राहते.  रघुनाथ पंडित कवींच्या जिवंत शब्दाचं  हे वैशिष्ट्य आहे. 

क्रमशः

संदर्भ : १) अलंकार चंद्रिका (गणेश मोरेश्वर गोरे)

२)नल- दमयंती स्वयंवराख्यान
(सिताराम विष्णु सरवटे)

Author

Leave a Reply