गाण्यांप्रमाणेच नृत्य हा भारतीय चित्रपटांचा अविभाज्य भाग आहे. भारतात कथ्थक, ओडिसी, मणिपुरी आणि भरतनाट्यम हे मुख्य ‘शास्त्रीय’ नृत्यप्रकार. केरळचे मोहिनीअट्टमही यांत धरायला हवे. हिंदी चित्रपटात लोकनृत्ये, पाश्चात्त्य नृत्यप्रकार यांशिवाय या प्रकारातील नृत्ये सादर झालीच. या लेखात काही उत्तम कथ्थक नृत्यांची ओळख करून घेऊ.
ज्या प्रमाणे चित्रपटगीते जरी एखाद्या रागात बांधलेली असली तरीही त्यांत स्वातंत्र्य घेतलेले असतेच, त्यामुळे त्यांना रागावर ‘आधारित’ असेच म्हटले जाते; तसेच नृत्याच्या बाबतीत. अगदी शुद्ध शास्त्रीय नृत्य चित्रपटात क्वचितच दिसते. चित्रपटातील प्रसंग, त्या गाण्यातील शब्द, सादर करणारे कलाकार आणि अर्थातच दिग्दर्शक यांवर बरेच काही अवलंबून असते.
एखाद्या कथ्थक कलाकाराचा रंगमंचावर झालेला आविष्कार आणि चित्रपटातील सादरीकरण यांत काही फरक आहेत. आताचे क्लोज सर्किट टीव्ही सोडले तर पूर्वी नृत्य बघताना त्या कलाकाराचे संपूर्ण शरीर डोळ्यांसमोर असे. चित्रपटात मात्र जर भावदर्शन असेल तर चेहऱ्याचा क्लोजअप, तत्कार असतील तर पायांचा क्लोजअप आणि अधूनमधून इतर कलाकारांच्या प्रतिक्रिया असे सर्व टिपले जाते; त्यामुळेच ते जास्त खुलते.
चित्रपट संगीतात गायक कलाकार हा एक महत्त्वाचा घटक असतो (रंगमंचावर दुय्यम असतो.) आणि जर लता मंगेशकर, आशा भोसले असतील तर गायनातूनच बराचसा ‘अभिनय’ करून झालेला असतो; तरीपण लताची काही गाणी अशी आहेत, की ज्यावर उत्तम कथ्थक नृत्य होऊ शकले असते; पण चित्रपटात तसे झालेले नाही. आठवतात ती दोन उदाहरणे म्हणजे, ‘अनुराधा’ चित्रपटातील ‘सांवरे सांवरे, काहे मोसे करे जोराजोरी’ (संगीत : पं. रविशंकर, राग : भैरवी) आणि ‘दस्तक’ चित्रपटातील ‘बैंया ना धरो, ओ बालमा’ (संगीत : मदनमोहन, राग : चारुकेशी)
चित्रपटात नर्तकीचे कौशल्य हादेखील एक महत्त्वाचा घटक आहे. आशा पारेख, पद्मा खन्ना, माधुरी दीक्षितसारख्या काही कलाकार मुळातच उत्तम कथ्थक नर्तकी होत्या; पण दुर्दैवाने पद्मा खन्नाला क्वचितच चित्रपटात कथ्थक सादर करायची संधी मिळाली. ती गोपीकृष्ण यांची शिष्या होती आणि आज प्रसिद्ध असणाऱ्या काही नर्तकी तिने त्यांना नृत्याचे धडे दिल्याचा आवर्जून उल्लेख करतात. दक्षिण भारतातून आलेल्या पद्मिनी, रागिणी, बी. सरोजादेवी, वैजयंतीमाला, मद्रास सिस्टर्स, हेमामालिनी, श्रीदेवी, जयाप्रदा, मधु, विद्या बालन वगैरे बहुतेक अभिनेत्री आधीच भरतनाट्यममध्ये पारंगत होत्या; पण प्रसंगानुरूप या सर्व जणींनी कथ्थक नृत्ये लीलया सादर केली आहेत.
पण हिंदी चित्रपटांत भरतनाट्यमपेक्षा कथ्थक जास्त वापरले गेले कारण भरतनाट्यम प्रकाराला भक्तीचे वलय आहे, तसे कथ्थकला नाही. राधा-कृष्णाची गाणी जरी या प्रकारात सादर होत असली तरीही शृंगाररस प्रामुख्याने जास्त दिसतो. तसेच दरबारी नृत्य, मुजरा यालाही कथ्थकचाच पाया असतो आणि हे नृत्यप्रकार तर चित्रपटात हवेच. भरतनाट्यमपण वापरले गेलेच; पण ओडिसी, मणिपुरी आणि मोहिनीअट्टम तर अगदीच क्वचित. माझ्या आठवणीत तर अगदी एकेकच गाणे आहे. (‘आये सूर के पंछी आये’ चित्रपट : सूरसंगम, नर्तकी : जयाप्रदा, ओडिसी), (‘झनक झनक पायल बाजे’ शेवटचे गीत, नर्तकी: संध्या, मणिपुरी) (‘मुकाबला हम से ना करो,’ चित्रपट : शतरंज, नर्तकी : वैजयंतीमाला, मोहिनीअट्टम) या तिन्ही गाण्यांतील काही भागांतच हे नृत्यप्रकार आहेत. मीनाक्षी शेषाद्री, इशा देओल या दोघीही निष्णात ओडिसी नर्तकी होत्या, तरी चित्रपटात त्यांना तशी संधी मिळाली नाही.
याशिवाय त्या काळातील अनेक अभिनेत्री उदा. नर्गिस, मीनाकुमारी, मधुबाला, माला सिन्हा, सुचित्रा सेन, नूतन, नंदा, शर्मिला टागोर, राखी नृत्यकुशल नव्हत्या, तरीही त्यांनी उत्तम नृत्ये सादर केली. पहिल्या भागात आपण यांतील काही गीते पाहिली. आता अशीच आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण गाणी पाहू या.
१)साध रे मन सूर को साध रे (चित्रपट : सूरसंगम, गायक : पंडित राजन मिश्रा, संगीतकार : लक्ष्मीकांत प्यारेलाल, नर्तकी : जयाप्रदा)
जयाप्रदा म्हणजे सौंदर्य आणि ग्रेसफुल नृत्य यांचा अनोखा संगम आहे. या चित्रपटात तिची अनेक अप्रतिम नृत्ये आहेत. मूळ शंकराभरणम चित्रपटात मंजू भार्गवीनेही सुंदर नृत्ये सादर केली आहेत. या गाण्यात जयाप्रदाने सुरुवातीला ओडिसी शैलीत आणि शेवटी कथ्थक शैलीत नृत्य सादर केले आहे. खरेतर प्रत्येक शैलीत पूर्ण नृत्य असायला हवे होते असे वाटल्याशिवाय राहत नाही. या लेखाचा हा विषय नाही तरीही ओडिसी शैलीबद्दल दोन शब्द लिहितोच. ही शैली पूर्णपणे दगडी शिल्पांवर आधारित आहे. दगडी शिल्पाच्या नैसर्गिक मर्यादेमुळे त्या शिल्पातील नर्तकींचे हात फारसे बाहेर येऊ शकत नाहीत त्यामुळे या शैलीत बहुतेक मुद्रांत हात फार समोर येत नाहीत. त्या अर्थाने हे नृत्य द्विमिती असते. आता हे लक्षात ठेवून हे नृत्य पहा. अर्थात यातले कथ्थकदेखील तितकेच सुंदर आहे.
२)हम तुम्हारे हैं (चित्रपट : चलती का नाम गाडी, गायिका : आशा भोसले,
सुधा मल्होत्रा, संगीतकार : सचिन देव बर्मन, नर्तकी : हेलन आणि कुक्कू)
हेलन आणि कुक्कू या दोघींना आपण नेहमीच पाश्चात्त्य शैलीतील नृत्यात बघितले आहे; पण इथे या दोघींनी कथ्थक शैलीतील नृत्यदेखील तितक्याच नजाकतीने सादर केले आहे. या गाण्यात फुटवर्क तर आहेच पण त्यापेक्षा त्या दोघींनी केलेल्या हस्तमुद्रा अवश्य पाहा. या चित्रपटातील इतर गाण्यांच्या तुलनेत हे गाणे थोडेसे दुर्लक्षित राहिले, हे मात्र खरे.
३)रात भी है कुछ भीगी भीगी (चित्रपट : मुझे जीने दो, गायिका : लता मंगेशकर, संगीतकार : जयदेव, नर्तकी : वहिदा रेहमान)
चित्रपट संगीतात अगदी मोजक्या गाण्यांत वापरलेला राग धानी हा या गाण्याचा आधार आहे. लय आणि चाल दोन्हीही खूप वेगळ्याच आहेत. श्वेतश्याम असूनही या गाण्यात सौंदर्य आहेच. साधारणपणे नृत्य सादर करताना चेहऱ्यावरचे हावभाव हे थोडे ठळक (लाउड) केले जातात कारण दूरवर बसलेल्या प्रेक्षकाला पण ते दिसावेत अशी अपेक्षा असते. इथे मात्र अगदी टाईट क्लोजअप्स असल्याने वहिदाने अगदी संयतपणे मुद्राभिनय केला आहे. गाण्यातील गूढ सुरावटी प्रसंग अधिक गडद करतात.
४)साक़िया आज मुझे नींद नाही आयेगी (चित्रपट : साहब बीबी और गुलाम, गायिका : आशा भोसले, संगीतकार : हेमंतकुमार, नर्तकी : मिनू मुमताज)
या गाण्यात कथ्थक तर आहेच पण त्याशिवाय दोन बाबी मुद्दाम लक्ष देण्यासारख्या आहेत. एकतर पूर्ण गाण्यात सहनर्तकींचे चेहरे कायम अंधारात आहेत आणि यात दोन ताल वापरले आहेत : मुखड्यासाठी केहरवा तर अंतऱ्यासाठी दादरा. प्रत्येक वेळी हे असेच आहे आणि ही सांधेजोड इतकी बेमालूम आहे की मुद्दाम लक्ष देऊन ऐकले तरच लक्षात येते.
५)नाचे मन मोरा मगन (चित्रपट : मेरी सूरत तेरी आँखें, गायक : रफी, संगीतकार : सचिन देव बर्मन, नर्तकी : आशा पारेख)
आशा पारेख एक कुशल कथ्थक नर्तकी आहे. तिची स्वतःची नृत्यशालाही आहे. चित्रपटात मात्र तिला क्वचितच अस्सल कथ्थक नृत्य करण्याची संधी मिळाली. हे नृत्यदेखील शुद्ध कथ्थक नसले तरीही शैली कथ्थकचीच आहे. आशा पारेखचे नृत्य, रफीचे गायन, अशोककुमारचा अभिनय हे सगळे या गाण्यात आहेच; पण सर्वात कडी केली आहे ती पंडित सामता प्रसाद यांनी वाजवलेल्या तबल्याने! सचिन देव बर्मन तबल्याचा सुंदर उपयोग करून घेत असतच; पण या गाण्यात बहुधा त्यांनी पंडित सामता प्रसाद यांना स्वातंत्र्य दिले असावे. तबल्यातील ‘बाया’ वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता आणि या गाण्यातही तुम्ही तो ऐकालच.
६)मुरली मनोहर कृष्ण कन्हैया (चित्रपट : झनक झनक पायल बाजे, गायक : उस्ताद आमीर खॉंसाहेब, लता मंगेशकर, मन्ना डे, संगीतकार : वसंत देसाई, नर्तक : गोपीकृष्ण, संध्या)
शास्त्रीय नृत्य या विषयाला वाहिलेला हा चित्रपट यशस्वी होईलच अशी शांताराम बापूंना खातरी होती. गोपीकृष्ण एक नर्तक म्हणून नुकतेच उदयाला येत होते. संध्या नृत्यकुशल असली तरी तिला शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण मिळालेले नव्हते. वसंत देसाईंनाही आत्मविश्वास नव्हता; पण तरीही हा चित्रपट सुंदर तर बनलाच; शिवाय यशस्वीदेखील ठरला. यात अनेक गाण्यांत कथ्थक नृत्य आहे. अस्सल अथ्थक नृत्यासाठी मी या चित्रपटातील रागमालिका (गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः) निवडणे योग्य झाले असते; तरीही मी हे गाणे निवडतो आहे; कारण या नृत्यावर प्रख्यात कथ्थक नर्तकी सितारादेवी यांनी टीका केली होती की हे काही अस्सल कथ्थक नव्हते. यावर त्यांचाच भाचा असलेल्या गोपीकृष्ण यांनी उत्तर दिले होते, की हे गाणे राधाकृष्णांचे आहे, त्यामुळे त्यात ‘उछल कूद, छेडछाड’ असायलाच हवी. हे गाणे निवडायचे आणखी एक खास कारण म्हणजे हे पूर्ण गाणे तबल्याच्या बोलांच्या अंगाने जाते, शब्दही असे योजले (लिहिले) आहेत की ते त्या त्या तुकड्यासोबत गाता येतील किंवा ते शब्द तबल्यावर वाजवता येतील. या गाण्यात नृत्याचा विचार आधी झाला असावा, नंतर गाणे लिहून चाल लावली असावी. यात केशवराव दाते यांच्या तोंडचे जे शब्द आहेत, ते उस्ताद आमीर खॉंसाहेब यांनी गायले आहेत असे नेटवर सर्वत्र लिहिले आहे; पण मला शंका आहे की ते खुद्द केशवराव दाते यांनी गायले असावेत. (रागमालिकेत कथ्थकचे तोडे गोपीकृष्ण यांनीच गायले आहेत.) काही ठिकाणी लच्छू महाराज यांचेही गायक म्हणून नाव आहे. ‘झनक झनक पायल बाजे’ हे शीर्षकगीत मात्र उस्तादांच्याच आवाजात आहे. पुढे खासगी मैफिलीत ते अडाणा रागातील हीच रचना विस्ताराने गात असत. (चित्रपटात ही रचना लताच्या आवाजातही आहे.) पुढे गोपीकृष्ण यांनी आणखी काही गाण्यांवर नृत्य केले होते. उदा : न मुँह छुपा के जियो चित्रपट : हमराज,
शुभ घड़ी आयी रे चित्रपट : रझिया सुलतान)
https://www.youtube.com/watch?v=-hrgZCE2rEY
७) हमें दम दैके सौतन घर जाना (चित्रपट : ये दिल किस को दूँ , गायिका : आशा भोसले, मुबारक बेगम, संगीतकार : इक्बाल कुरेशी, नर्तकी : जयश्री गडकर, मधुमती)
मराठी लावणी नृत्यावर कथ्थकची छाप आहे. त्यातल्या मुद्रा आणि हावभाव कथ्थकची आठवण करून देणाऱ्या असल्या तरी त्यात वेगळेपणदेखील आहे. कसे, ते या गाण्यात स्पष्ट होईल. लावणी नर्तकी नृत्याचे प्राथमिक धडे कथ्थकचेच घेतात. मधुमतीने या गाण्यात कथ्थक तर जयश्री गडकरने लावणीनृत्य पेश केले आहे. गाणे सुरुवातीला दोघींसाठी एकाच चालीत असल्यामुळे नृत्यशैलींची तुलना सहज करता येते. पुढे आशाने वरच्या पट्टीतील ‘जी जी रं जी’ गाऊन बाजी मारली आहे.
८)सलाम करने की (चित्रपट : उमराव जान, गायिका : अलका याज्ञिक, संगीतकार : अन्नू मलिक, नर्तकी : ऐश्वर्या राय)
उमराव जान नाव घेतले की अनेकांना रेखाचाच चित्रपट आठवेल; पण याच नावाचा आणि साधारण याच कथानकावर आधारित दुसरा एक चित्रपट आला होता. त्यात ऐश्वर्या रायने उमराव साकारली होती. रेखाच्या चित्रपटातली गाणी उत्तम होती यात वादच नाही; पण रेखाचे नाच हे क्लासिकल म्हणण्यापेक्षा जास्त सेन्सुअल होते. (अर्थात माझे मत !) ऐश्वर्याचे नाच मात्र जास्त क्लासिकल होते. ती कमालीची सुंदर दिसली आहे यात आणि तिचा कपडेपटही सुंदर होता; पण अलका याज्ञिकने गायलेली गाणी मात्र प्रभावहीन होती. (अर्थातच माझे मत!) रेखाच्या उमराव जानसाठी आशा अर्धा सूर खाली गायली होती तर या चित्रपटात अलका जरा चढ्या सुरात गायली आहे. (अर्थात श्रेय संगीतकारांचेच!)
९)जगावे सारी रैना (चित्रपट : डेढ़ इश्क़िया, गायिका : रेखा भारद्वाज, बिरजू महाराज, संगीतकार : विशाल भारद्वाज, नर्तकी : माधुरी दीक्षित)
चित्रपटात यायच्या आधीदेखील माधुरी कथ्थक नर्तकी होती. चित्रपटात तिला बहुतांशी ‘फिल्मी’ पद्धतीचे नाच करावे लागले; पण हे नृत्य म्हणजे तिच्यातील अस्सल कलाकारीचा नमुना आहे. मला स्वतःला तिच्या ‘देवदास’मधील नृत्यापेक्षा हे जास्त आवडते. अत्यंत ग्रेसफुल !
१०) तराणा (चित्रपट : किनारा, गायक: पं. गिरीश वाझलवार, संगीतकार: राहुल देव बर्मन, नर्तकी : हेमामालिनी )
हेमामालिनी एक कुशल भरतनाट्यम नर्तकी आहे यात वादच नाही. चित्रपटात तिने बहुतांशी ‘फिल्मी’ नाच केले पण खासगीरित्या ती भरतनाट्यमचे कार्यक्रम करत असे. दूरदर्शनवरदेखील तिने असे कार्यक्रम सादर केले होते. त्या शैलीत ती जास्त खुलते. तिचा चेहरा जास्त बोलका होतो. किनारामधला हा तराणा तिने कथ्थक शैलीत पेश केला आहे. तिचा पदन्यास, हातवारे यांत तांत्रिकदृष्ट्या काहीही चूक काढता येणार नाही; पण चेहऱ्यावर मात्र कथ्थक शैलीतील भाव नाहीत.
या लेखाच्या निमित्ताने ही नृत्ये परत पाहिली गेली. या गाण्यांशिवाय इतरही गाणी – ज्यामध्ये उत्तम कथ्थक सादर झाले आहे – नक्कीच आहेत; पण कुठेतरी थांबायलाच हवे.
