भारतीय समाजात असलेली जातिव्यवस्था नष्ट केली पाहिजे, जातिव्यवस्था हा भारतीय समाजावरचा कलंक आहे वगैरे वैचारिक प्रहार जातिव्यवस्थेवर गेली अनेक वर्षे होत आहेत; परंतु ‘जात काही जात नाही’ ही एक वस्तुस्थिती आहे. जातिव्यवस्था हजारो वर्षे टिकून आहे हेसुद्धा एक वास्तवच आहे. कोणतीही व्यवस्था उपयोगी नसेल तर ती गोष्ट किंवा व्यवस्था नष्ट होते हा निसर्गाचा नियम आहे. ज्या अर्थी जातिव्यवस्था टिकून आहे त्या अर्थी ही व्यवस्था कधीकाळी उपयुक्त होती असा निष्कर्ष काढला तर तो चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. आजच्या परिस्थितीत ती उपयोगी आहे का? हा वादाचा मुद्दा आहे. या वादातून काही उपयुक्त निष्कर्ष काढायचा असेल तर मुळात जातिव्यवस्था निर्माण कशी व का झाली, याचा मुळात जाऊन विचार होणे गरजेचे आहे.
आपल्याकडे समाजात ज्या जाती आहेत त्यांपैकी ९० ते ९५% जाती व्यवसायातून निर्माण झाल्या आहेत. जातिव्यवस्थेच्या पूर्वी असलेली वर्णव्यवस्था हीसुद्धा व्यवसायनिष्ठ व्यवस्थाच होती. त्या व्यवस्थेत माणसाला आवडीप्रमाणे व्यवसाय निवडीची मुभा होती. ती मुभा काळाच्या ओघात संकुचित होत गेली व ती जाचक होत गेली ही गोष्ट खरी आहे.
जातिव्यवस्थेचा विचार करताना आपण मुळात काही नैसर्गिक असलेल्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत :
१) माणसाची स्वभावतः गट करण्याची प्रवृत्ती असते.
२) प्रत्येक माणसाच्या आवडी व कार्यक्षमता भिन्न असतात. त्याचाच शास्त्रीय अंगाने विचार करून माणसात दहा प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात हे सिद्ध केले गेले आहे.
३) आनुवंशिकतेच्या नियमातून माणसात गुण व अवगुण संक्रमित होत असतात.
४)परिस्थितीप्रमाणे माणूस आपली वर्तणूक बदलत असतो. केवळ माणूसच नाही; तर प्राणीसुद्धा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आपल्या वर्तणुकीत बदल करतात याची अनेक उदाहरणे देता येतील.
५) घरातील किंवा परिसरातील संस्कारांतून माणसात काही आवडीनिवडी, कौशल्ये सहजगत्या निर्माण व विकसित होत असतात.
जात व जातिव्यवस्था निर्माण होण्यामागे वरील घटक कारणीभूत आहेत असे माझे मत आहे. या घटकांना टाळून जातिव्यवस्थेचा विचार करणे चुकीचे होईल. जात किंवा गट निर्माण होण्याची प्रक्रिया समाजात सतत चालूच असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आजसुद्धा डॉक्टर्स, वकील, कलाकार, समव्यावसायिक यांच्या असोसिएशन्स किंवा संघटना निर्माण होत आहेतच. ही जात निर्माण होण्याच्या आधीची स्टेज आहे. वैचारिक समानतेतून समाजवादी, साम्यवादी, हिंदुत्ववादी, सेक्युलरवादी, सुधारणावादी, परंपरावादी वगैरे अनेक वैचारिक गट आपल्या समाजात आहेतच आणि गंमत अशी की अस्पृश्यतेचा निषेध करणारे हे गट एकमेकांत स्पृश्य-अस्पृश्यतेच्या भावनेतून एकमेकांशी व्यवहार करताना दिसतील. या एका गटातील माणूस दुसऱ्या गटात जाऊ शकत नाही; मात्र राजकीय स्वार्थापोटी वैचारिक बांधिलकी शालीसारखी सहजगत्या भिरकावली जाते. त्याला सुधारणा – उपरती – काय म्हणायचे हा एक मोठा प्रश्नच आहे. असो!
साधारण गेल्या शंभर वर्षांपर्यंत भारत हा शेतीप्रधान देश होता. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा होता. दळणवळणाची साधने अपुरी असल्याने स्वयंपूर्ण गाव किंवा पंचक्रोशी असणे आवश्यक होते. शेती व गावातील लोकांना लागणाऱ्या सर्व गोष्टी गावातच तयार केल्या जात. त्यातूनच बारा बलुतेदार व बारा अलुतेदार ही व्यवस्था निर्माण झाली. या सर्व व्यवसायांच्या जाती निर्माण झाल्या. गावाला प्रत्येक व्यवसायाची गरज असल्याने तो व्यवसाय साहजिकच वंशपरंपरेने चालू ठेवण्याकडे माणसांचा कल निर्माण होणे स्वाभाविक होते; शिवाय त्या त्या व्यवसायाचे शिक्षण घरीच होत असल्याने दुसऱ्या व्यवसायाचे शिक्षण मिळणे अशक्य जरी नसले तरी कठीण होते; शिवाय या व्यवस्थेत व्यवसायाची शाश्वती होती; त्यामुळे जातिव्यवस्था बळकट होत गेली. प्रत्येक व्यवसायाच्या घरातील चालीरिती, खाणे -पिणे व गरजा वेगळ्या असल्याने जातीतच लग्न करून देणे सोयीचे होते. त्यातूनच जातीतच लग्न करण्याची प्रथा निर्माण झाली असली पाहिजे. त्यातून वंशपरंपरेच्या न्यायाने व संस्काराने प्रत्येक व्यवसायाला लागणारे कौशल्यगुण व शारीरिक क्षमता त्या त्या जातीत निर्माण झाल्या. याशिवाय व्यवसायाच्या अनुभवातून काही विशिष्ट तंत्रे किंवा तंत्रज्ञान निर्माण झाले. त्यातून पोटजाती निर्माण झाल्या.
उदाहरणार्थ : काही लोहारांना शस्त्रांना धार कशी चांगल्या तऱ्हेने लावता येते ते कळले; त्यातून लोहारांची सनगर ही पोटजात निर्माण झाली. आज जसे प्रत्येक व्यवसायात स्पेशालिस्ट आहेत तसेच प्रत्येक जातिव्यवसायात स्पेशलिस्ट निर्माण होऊन पोटजात निर्माण होणे हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्याला माहिती असणारी व्यावसायिक कौशल्ये, गुपिते आपल्या घरापुरती मर्यादित ठेवण्याच्या प्रवृत्तीतून पोटजात निर्माण होते. उदाहरणार्थ : समजा एका माणसाने मडकी भाजण्याची एक पद्धत शोधून काढली आणि त्याला तीन मुलगे असतील तर तो ती पद्धत आपल्या तिन्ही मुलांना सांगेल. तीन ते चार पिढ्यांनंतर ती पद्धत वापरणारे अनेक जण तयार होतील व त्यांची एक पोटजात निर्माण होईल. जातीतच लग्न करण्याचा एक फायदा त्या काळी असा होता की मुलीच्या घरातूनसुद्धा काही नवीन गोष्टी समजण्याची शक्यता होती. सोनाराची मुलगी लोहाराच्या घरी आली तर तिच्या अनुभवाचा लोहाराला काय फायदा?
काही प्रसंगी आनुवंशिकतेने आलेले कसब किंवा कौशल्य वेगळ्या व्यवसायात कसे उपयोगी पडते त्याचे एक प्रत्यक्ष उदाहरणच देतो : माझ्या ओळखीचा एक शिल्पकार आहे. प्रसिद्ध व्यक्तींची देहयष्टी, चेहरेपट्टी या सर्वांचा अभ्यास करून तो सुंदर पुतळे बनवतो. माझा तो चांगला मित्र असल्याने मी त्याला त्याची जात विचारण्याचे धाडस केले. तेव्हा तो म्हणाला मी पांचाळ समाजातील लोहार जातीचा आहे. मी त्याला पुढे विचारले की तुझे पूर्वज नक्की काय बनवत होते? शेतीची अवजारे का आणखी काही? तेव्हा तो म्हणाला की चिलखते बनवणे ही आमची स्पेशालिटी होती. तेव्हा मी त्याला म्हणालो की तुम्ही शिल्पकार का झालात ते मला आत्ता कळले; कारण उत्तम चिलखत बनविण्यासाठी जशी धातुशास्त्राची माहिती असणे आवश्यक आहे तसेच मानवी शरीररचनेची जाण असणे ही महत्त्वाचे आहे. आनुवंशिकतेने तुम्हांला शरीररचनेची जी जाण मिळाली आहे तिचा उपयोग तुम्ही शिल्प घडविण्यासाठी करत आहात. असेच दुसरे उदाहरण म्हणजे एक शिंपीकाम करणाऱ्याचा मुलगा ॲटोकॅडचा उपयोग करणारा उत्तम मेकॅनिकल ड्राफ्ट्समन आहे; कारण कोणता पार्ट कसा बसणार आहे ह्याची कल्पना करण्याची शक्ती त्याला आनुवंशिकतेने दिली आहे. धाडस, बेडरपणा हे रामोशी बेरड जातीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच इंग्रजांविरुद्ध उठाव करणारे अनेक क्रांतिकारक या जातीतून निर्माण झाले; म्हणूनच इंग्रजांनी गुन्हेगार जाती असा त्यांंच्यावरती शिक्का मारला. याच्या उलट ज्या जाती धाडसी व बेडर आहेत पण ज्यांनी इंग्रजांना मदत केली त्या जातींना इंग्रजांनी ‘मार्शल रेस’ म्हणून गौरवले. उदाहरणार्थ : कुर्ग व शीख.
मराठ्यांना हा दर्जा दिला नाही. असो! याबाबत जातवार अनेक उदाहरणे देता येतील.
समाज सुरळीतपणे चालण्यासाठी निरनिराळी गुणवैशिष्ट्ये असणारी माणसे समाजात असावी लागतात. अशी माणसे तयार करण्याचे काम अनेकविध जाती करत असतात म्हणून जात वाईट नसते; परंतु माझी जात वरची व तुझी जात खालची हा जो भाव आहे तो वाईट आहे. समाज चालण्यासाठी सर्व जातींची सारखीच आवश्यकता आहे हे समजून घेऊन जातींतील उच्चनीचतेचा भाव आपण नष्ट केला पाहिजे – जात नव्हे – असे माझे मत आहे. खरे म्हणजे मध्ययुगीन काळी अस्पृश्य ठरवलेल्या जातींनी त्यांचे काम करण्याचे थांबविले असते तर समाजव्यवस्था ताबडतोब कोलमडून पडेल हे त्या वेळच्या समाजधुरिणांना माहीत होते त्यामुळे त्यांनी जातीनिहाय व्यवसाय करणे सक्तीचे करणे हा अघोरी मार्ग स्वीकारला. त्याऐवजी सरसकट अस्पृश्यता न पाळता त्या जातींना योग्य तो मान देऊन त्यांना समाजात सामावून घेता आले असते. या बाबतीत ब्राह्मणांनी कर्मकांडाच्या हव्यासापोटी विवेक सोडून काही जातींचाच नव्हे तर संत ज्ञानेश्वरांसारख्या ब्राह्मणांचा व समर्थ रामदासांची शिष्या बालविधवा संत वेणाबाई हिचाही छळ केला हे मान्य करावेच लागेल. पुढे संत एकनाथांनी अस्पृश्य वस्तीत जाऊन जेवून, गाढवाला गंगेचे पाणी पाजून या प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला परंतु रूढिप्रिय समाजाने त्यांचे अनुकरण केले नाही हे आपले दुर्दैव. विवेक सोडला की चांगली गोष्टसुद्धा वाईट होते हे जाणून समर्थ रामदासांनी त्यांच्या उपदेशात विवेकाला महत्त्वाचे स्थान दिले आहे.
इंग्रजी राजवट आल्यानंतर परिस्थितीत बदल झाला. हा बदल तीन ते चार प्रकारांचा आहे.
१) बरेचसे जुने व्यवसाय संदर्भहीन झाले आहेत किंवा होत आहेत. नवीन व्यवसाय निर्माण होत आहेत. त्यांचे शिक्षण घेण्याची सोय अनेक शिक्षणसंस्था करत आहेत. कोणालाही कोणतेही शिक्षण अगदी सहज नसले तरी मार्क चांगले असतील तर घेता येते; परंतु आजच्या शिक्षणव्यवस्थेत अनुभवजन्य शिक्षणाची उणीव असल्याने विशिष्ट शिक्षण घेतलेला माणूस नोकरीयोग्य असतोच असे नाही.
२) दळणवळणाच्या साधनांमुळे स्वयंपूर्ण गाव किंवा पंचक्रोशी ही संकल्पनाच कालबाह्य झाली आहे.
३) आज बहुसंख्य माणसांची राहणी एकसारखी होत चालली आहे. त्यामुळे जातीनिहाय राहणीतील फरक संपत चाललेला आहे.
४) मुली शिक्षण घेऊन नोकऱ्या करू लागल्याने व मुलामुलींच्या भेटीगाठी सहजतेने होत असल्याने गेल्या २५ वर्षांत प्रेमविवाहाचे प्रमाण लक्षणीय वाढलेले आहे. हे सर्व बदल अगदी खेडेगावांत पोहोचलेले नाहीत हे जरी मान्य केले तरी शहरी लोकसंख्येची ज्या प्रमाणात वाढ होत आहे त्यावरून वरील सर्व बदल काही वर्षांत खेडेगावांत पोचतील. या बदलांमुळे जातिव्यवस्था खिळखिळी होत आहे हे नक्की; परंतु जात काही जात नाही हेही तेवढेच खरे.
जात न जाण्यामागे दोन कारणे आहेत
१) जातिनिष्ठ मतांचे राजकारण आणि
२) आरक्षणाचे धोरण
या दोन कारणांनी जातीला परत अवाजवी महत्त्व प्राप्त झाले आहे. समाजातील फरक कमी होत असला तरी जातीचे प्रेम अजून कमी झालेले नाही. त्यामुळे जातीनिहाय मत दिले जाते. त्याचा फायदा राजकीय पक्ष व त्यांचे नेते घेणारच. जातीबद्दल प्रेम वाटणे जरी मानवी स्वभावाला धरून असले तरी सर्वांगाने भ्रष्ट असलेला नेता फक्त आमच्या जातीचा आहे म्हणून जर मतदान होत असेल तर आपण विवेकशून्य आहोत हे मान्य करावे लागेल. समाजातील विचारवंतांना व्यापक समाजहित व राष्ट्रहित याचे संस्कार समाजावर करावे लागतील. लोकशाहीत लोकांची विचारसरणी बदलली तरच राजकीय नेते बदलतात. नेते समाज प्रबोधन करतील या वेड्या समजुतीतून आपण जेवढे लवकर बाहेर येऊ तितकी लोकशाही सुदृढ होईल व जात दुर्बल होईल.
आरक्षणाचे धोरण मूलतः चुकीचे नाही असे माझे मत आहे. ज्या वेळी हे धोरण ठरविले गेले त्या वेळी ते जातीनिहाय ठेवले गेले यातही मोठी चूक होती असेही नाही; परंतु गेल्या ७० वर्षांत शिक्षण खालपर्यंत पाझरलेले असताना, सर्व जातींतील कमीत कमी दोन पिढ्या शिक्षित झालेल्या असताना जातीवर निर्धारित आरक्षण असणे चुकीचे आहे. आता ते आर्थिक निकषावर आधारित असायला हवे. आता गरज आहे ती शैक्षणिक दर्जा उंचावण्याची. हा दर्जा वाढवायचा असेल तर सरकारने आरक्षणात गुणांची जी सूट दिली आहे ती रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना श्रीमंत मुलाला ज्या सोयी सुविधा मिळत असतात त्या उपलब्ध करून द्यायला हव्यात. उदाहरणार्थ : त्यांच्यासाठी निवासाची,अल्प दरात जेवण मिळण्याची, पुस्तके मिळण्याची, खास कोचिंग करण्याची सोय करून द्यायला हवी; त्यामुळे आरक्षण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याची शक्यता वाढेल. आज जागतिकीकरणाच्या जमान्यात गुणवत्तेला प्रचंड महत्त्व आलेले आहे त्यामुळे शैक्षणिक दर्जा वाढविणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी गुणांची सवलत रद्द व्हावी असे माझे मत आहे.
वरील सर्व उपाय केले तरी जातिव्यवस्था हळूहळूच लोप पावेल कारण सुंभ जळला तरी पीळ कायम राहतो हे वास्तवही आपण लक्षात घेतले पाहिजे. बदल एकदम होत नसतात.
