गांधारी 

  चिंता ही वैशाखातल्या वणव्यासारखी असते. वणव्यात अर्धेअधिक जंगल खाक होते. झाडे, वेली, जनावरे, पक्षी, रानवासी सगळे भस्म होतात. शिकारीला गेलेला असताना एकदा देवव्रत भीष्म वणव्यात सापडला; त्याचे सर्वांग भाजून गेले; केवळ नशीब बलवत्तर म्हणून भीष्म वाचला. ह्या ग्रीष्मातली ही अंगाची लाहीलाही करणारी दुपार आणि मनाला जाळणाऱ्या चिंतेचा वणवा! माता सत्यवतीच्या महालात येताना भीष्म गर्भगळीत झाला होता.

   पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य – भारतवर्षाच्या सर्व दिशांना भीष्माने पाठवलेले दूत परतले होते; कोणालाच राजकुमार धृतराष्ट्राला योग्य अशी वधू सापडली नव्हती. जन्मांधळ्या राजकुमाराशी  विवाहबद्ध व्हायला कुठलीच राजकन्या तयार नव्हती. देवव्रत भीष्म आता प्राग्ज्योतिषपूर, मणिपूर आणि त्याही पुढच्या नागलोकांमध्ये पाठवलेल्या दूतांची वाट पाहत होता. नागलोकांपर्यंत धृतराष्ट्र आंधळा आहे ही खबर पोचली नसेल अशी त्याला आशा होती. नागवंशीय कन्या कुरूंची सून झाल्यास कुरूंचा दुहेरी फायदा होता : एक – कुरूंना राणी मिळणार होती आणि दुसरे कुरू आणि नागांचे सनातन वैर संपणार होते… 

पण ईशान्येकडून परतलेल्या दूतांनीही भीष्माची निराशा केली. आता फक्त वायव्येकडल्या मद्र व गांधार देशांतले दूत तेवढे आले नव्हते.

चैत्र संपत आला होता. वैशाख लागला होता. मद्र देशाच्या राजाचा नकार घेऊन दूत परतले.

वैशाख संपेपर्यंत गांधार देशातले दूत हस्तिनापुरात आले. त्यांनी आनंदाची बातमी आणली होती. रानमेव्याने, रानमधाने आणि सोमरसाने भरलेले प्रत्येकी अठरा बुधले गांधार राजाने हस्तिनापूरला नजराणा म्हणून पाठवले होते. गांधार राजा सुधर्माचा संदेश घेऊन गांधार दूत भीष्माकडे पोचले. भीष्माने संदेश वाचला. गांधार राणी सुबला व राजा सुधर्मा यांनी आपली कन्या गांधारीचा विवाह राजकुमार धृतराष्ट्राशी करण्यास संमती दिली होती. त्यांची एकच अट होती : गांधारचे राजकुमार शकुनी ह्यांना कुरूंच्या दरबारात मानाचे स्थान द्यायला हवे. भीष्माला ही अट मान्य होती.

माता सत्यवतीच्या महालात येऊन देवव्रत भीष्माने ही खूशखबर तिला कळवली. सत्यवतीला अत्यानंद झाला.

शुभस्य शीघ्रम्, अशुभस्य कालहरणम् | 

चांगल्या गोष्टी करायला वेळ लावू नये; अप्रिय गोष्टी मात्र पुढे ढकलाव्या. 

भीष्माने विलंब केला नाही. वर्षा ऋतूनंतर येणाऱ्या कार्तिकात धृतराष्ट्र व गांधारीचा विवाहमुहूर्त भीष्माने ठरवला.

धृतराष्ट्र व गांधारीचा विवाह थाटाने व्हावा अशी महाराणी सत्यवतीची इच्छा होती. भीष्माने यमुनेच्या तीरी विवाहासाठी खास महाल बांधायला सुरुवात केली.

अठरा घोड्यांच्या रथदळात बसून राजा सुधर्मा, राणी सुबला, राजकुमार शकुनी आणि राजकन्या गांधारी हस्तिनापूरला येऊन पोचले. अठरा हत्तींच्या गजदळाने पुष्पवर्षाव करून हस्तिनापूरच्या वेशीवर त्यांचे स्वागत केले.

आजन्म ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा पाळणारा भीष्म तिन्हीसांजेनंतर सोमरस घेऊन धुंद व्हायचा.

अश्विनातल्या अमावास्येच्या संध्याकाळी काळे तोंड करून आलेल्या दूताला पाहून भीष्म खिन्न झाला. ही बातमी वाईट होती. राजा सुधर्मा गांधारीला घेऊन आपल्या राज्यात परतणार होता.

“देवव्रत भीष्माकडून आमची ही अपेक्षा नव्हती, कुरूंकडून आम्हांला हे अपेक्षित नव्हते. राजकुमार धृतराष्ट्र आंधळा आहे हे कुरूंनी आमच्यापासून लपवले होते. राजकुमारी गांधारीचा जन्मांधळ्या धृतराष्ट्राशी विवाह करण्यास नकार होता.”

तप्त विषबाणासारख्या शब्दांनी भीष्माचे हृदय विदीर्ण केले. देवव्रत भीष्म सत्यवतीच्या महालात गेला. महाराणी सत्यवतीला तिच्या गुप्तहेराकडून ह्या बातमीचा सुगावा लागला होता.

दुसऱ्या दिवशी चीन देशातून आणलेल्या साखरेच्या पाकात केलेल्या अठरा प्रकारच्या मिठाईच्या पराती घेऊन माता सत्यवती व देवव्रत भीष्म यमुनेच्या तीरी बांधलेल्या इंद्रमहालात पोचले.

“देवी मत्स्यगंधे, सत्यवती, गांधार राणी सुबला तुझे सहर्ष स्वागत करीत आहे.”

“देवव्रता भीष्मा, गांधार राजा सुधर्मा तुझे हार्दिक स्वागत करीत आहे.”

यापुढे काय बोलावे ते कोणालाच कळे ना. एवढ्यात राजकुमार शकुनीने तिथे प्रवेश केला. शकुनी म्हणाला,  “तुम्हां सर्वांना खूशखबर आहे.”

“तुझ्या तोंडात तूपसाखर पडो.”

“माझी प्रिय बहीण राजकुमारी गांधारी कुरूंचे राजकुमार धृतराष्ट्राशी विवाह करायला तयार आहे; पण… तिची एकच अट आहे…”

“शकुनी, ती अट तर आम्ही आधीच मान्य केली आहे. कुरूंच्या दरबारात तुला मंत्र्याचे पद मिळणार आहे,” भीष्म म्हणाला.

“ते झालेच; पण गांधारीची अट वेगळी आहे. ज्या दिवशी आपला धृतराष्ट्राशी विवाह होईल त्या दिवसापासून गांधारी आपल्या डोळ्यांवर कापडाची पट्टी बांधेल. जे आर्य पाहू शकत नाही ते आर्यभार्याही पाहणार नाही.”

सत्यवती आणि भीष्म ती विचित्र अट ऐकून अचंबित झाले; पण ते काहीच बोलले नाहीत.

मग सत्यवती म्हणाली, “देवव्रत भीष्मा, तुझ्या आजन्म ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेशी स्पर्धा करणारी ही गांधारीची प्रतिज्ञा. ह्यापुढे सारे भारतवर्ष गांधारीला महापतिव्रता मानेल. सीता, सावित्री, तारा, मंदोदरी, अरुंधती, अनसूया, दमयंती ह्यांच्या पंगतीत कुरूंची भावी राणी गांधारी बसेल.”

“कुरूंचा जय हो!”

“गांधारीचा जय हो!”

“कौरवांच्या शत्रूंचे शत्रुत्व कृष्णपक्षातल्या चंद्रकलेसारखे क्षीण होओ!” 

“कुरू-गांधारांची मैत्री शुक्लपक्षातल्या चंद्रकलेसारखी वृद्धिंगत होओ!”

यथावकाश कार्तिक नवमीला धृतराष्ट्र गांधारीचा विवाह संपन्न झाला. पुढच्या वैशाख तृतीयेला राजकुमार पांडूचा विवाह कुंती आणि माद्रीशी झाला. त्यापुढील मुहूर्तावर कुरूपुत्र विदुराचे लग्न सुलभेशी झाले.

धृतराष्ट्र आणि गांधारीला दुर्योधन, दुःशासन ह्यांसह शंभर पुत्र व दुःशीला ही कन्या झाली.

राजकुमार पांडूला एका ऋषीचा शाप होता. समागम केल्यास पांडूचा तत्काळ अंत होणार होता; त्यामुळे पांडूच्या संमतीने नियोग पद्धतीने कुंतीला युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे तीन पुत्र; तर माद्रीला नकुल, सहदेव हे दोन पुत्र झाले.

पाच पांडव लहान असतानाचा प्रसंग : वसंत ऋतू बहरला होता. सगळे रान फुलाफळांनी डवरून  गेले होते. राजकुमार पांडू कुंती, माद्रीसह वनविहाराला गेला होता. नदीत सुस्नात होऊन येणाऱ्या वस्त्रओल्या मद्रसुंदरी माद्रीचे सौंदर्य पाहून पांडू कामातुर झाला. माद्री झिडकारत असतानाही पांडूने तिच्याशी समागम केला. ऋषीच्या शापाप्रमाणे पांडू तत्काळ गतप्राण झाला. 

धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे हस्तिनापूरचा कारभार पांडू पाहत होता. 

धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र – दुर्योधन – हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसायला आतुर झाला होता. हस्तिनापूरच्या प्रजेला मात्र पांडूच्या ज्येष्ठ पुत्राने – युधिष्ठिराने – धर्माने – राजा व्हावे असे वाटत होते. 

राजा कुणी व्हावे हा गहन प्रश्न सुटला नाही. कौरव-पांडवांमध्ये अठरा दिवसांचे महायुद्ध झाले. दुर्योधनासहित सर्व कौरव युद्धात गतप्राण झाले. अठरा अक्षौहिणी सैन्य मृत झाले. महाभारताच्या युद्धानंतर कृष्ण, पाच पांडव, सात्यकी व युयुत्सु हे आठ पांडववीर व अश्वत्थामा, कृपाचार्य व कृतवर्मा हे तीन कौरववीर असे फक्त अकरा वीर जिवंत राहिले. 

युधिष्ठिर – धर्म हस्तिनापूरचा राजा झाला. युद्धाआधीच महाराणी सत्यवतीने अंबिका आणि अंबालिका ह्या आपल्या सुनांना घेऊन वानप्रस्थ पत्करला होता. काही वर्षांनी धृतराष्ट्र, गांधारी, विदुर आणि कुंती ह्यांनीही वनात जायचे ठरवले. 

हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात एका नदीकाठी पर्णकुटी बांधून ते राहू लागले.

एके दिवशी विदुर आणि कुंती पाणी आणायला नदीवर गेले. अचानक धृतराष्ट्राला धुराचा वास आला. आंधळा असलेल्या धृतराष्ट्राचे घ्राणेंद्रिय तीव्र होते.

“गांधारी, आग्नेयेकडून मला धुराचा वास येत आहे. खचित रानाला वणवा लागला आहे. हा वणवा अल्पावधीत आपल्या पर्णकुटीकडे पोचेल. आगीत आपण भस्म होऊ. गांधारी, त्यापूर्वी तू तुझ्या डोळ्यांवरची पट्टी सोड व आम्हांला घेऊन वायव्य दिशेकडे जा. आपल्या सगळ्यांचा जीव वाचेल,” धृतराष्ट्र गांधारीला म्हणाला.

गांधारी काही क्षण काहीच बोलली नाही.

“गांधारी, विलंब लावू नकोस. तुझ्या डोळ्यावरची पट्टी सोडव.”

“आर्य, तुम्हीच आपल्या हातांनी माझ्या डोळ्यांवरची पट्टी सोडवा.”

थरथरत्या हातांनी चाचपडत धृतराष्ट्राने गांधारीच्या डोळ्यांवरची कापडाची पट्टी सोडवली.

“आर्य, मला काहीच दिसत नाही. माझ्या डोळ्यांसमोर केवळ काळोख आणि काळोखच आहे.”

“आर्ये, खूप वर्षे डोळे बंद असल्याने तुझे डोळे उजेड पाहू शकत नाहीत. हळूहळू तुला दिसू लागेल गांधारी.”

“नाही आर्य, मला काहीच दिसणार नाही. आर्य, हस्तिनापूरचा राजकुमार जन्मांधळा आहे हे गांधारांना माहीत नव्हते असे तुम्हांला वाटले, कौरवांनी गांधारांना फसवले,असे तुम्हांला वाटले; पण आर्य, तू आंधळा आहेस हे आम्हांला माहीत होते;  राजा, ऐक, तू जन्मांधळा तशी ही गांधारकन्या गांधारीही जन्मांधळी. गांधारांनीही कौरवांना फसवले. शकुनीच्या बुद्धीने माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधायचे नाटक आम्ही केले.”

आर्य, सत्यमेव जयते न अनृतम्| 

नेहमी सत्याचा विजय होतो. असत्याचा विजय होत नाही. त्यामुळे जीवनाच्या अखेरीस हे सत्य तुला सांगावे लागले.”

“आर्य, मलाही धुराचा वास येतोय. रानवणवा काही वेळात इथे पोचेल. आपण इथेच पर्णकुटीत बसू आणि अग्नीत भस्मसात होऊ.”

मरण येण्यापूर्वी सद्गदित झालेल्या धृतराष्ट्राने गांधारीला आलिंगन दिले. 

“आर्ये, तू खोटे बोललीस पण तू महापतिव्रता आहेस हे त्रिकाल सत्य आहे. हा धृतराष्ट्र जन्मांधळा आहे हे माहीत असूनही तू माझा स्वीकार केलास. गांधारी, तू जन्मांधळी आहेस हे आधीच मला कळले असते तर मी तुझ्याशी विवाह केला नसता.

गांधारी, तू आणि मी दोघेही जन्मांधळे. देव आणि दैव हेदेखील आंधळेच असते. केवळ मृत्यूला सहस्र डोळे असतात. चल, मृत्यूला सामोरे जाऊ.”

रानवणव्यात गांधारी आणि धृतराष्ट्र भस्मसात झाले. गांधारीचे गुपित धृतराष्ट्राखेरीज कोणालाच कळले नाही.

00000

महाभारताचे शब्दांकन करायला बसलेल्या गणराय गणपतीने आपली लेखणी थांबवली. महर्षी व्यास गणपतीकडे पाहत म्हणाले,  “हे गणांच्या अधिपती, गणराया, महाभारत सांगणाऱ्या व्यासालाही गांधारीचे हे गुपित कळले नाही; पण गणपती, तू तर बुद्धीची देवता! तुलाही हे गुपित कसे कळले नाही?”

गणपती हसत हसत म्हणाला, “महर्षी खरे काय आणि खोटे काय हे कोणालाही कळत नाही. हा तुझा जय नावाचा इतिहास आहे. ह्या इतिहासात गंगा शंतनुला फसवते, दासराज देवव्रत भीष्माला फसवतो, भीष्म अंबेला फसवतो, दुर्वास कुंतीला फसवतो, कुंती कर्णाला फसवते, कर्ण परशुरामाला फसवतो. द्रुपद द्रोणाला फसवतो, द्रोण एकलव्याला फसवतो.

कुणी कोणाला फसवले? कौरवांनी गांधारांना की गांधारांनी कौरवांना? धृतराष्ट्राने गांधारीला की गांधारीने धृतराष्ट्राला?”

“महर्षी, हा युगान्त आहे सत्ययुगाचा. आता असत्ययुग येईल. अनृतमेव जयते न सत्यम्| ह्यापुढे केवळ असत्याचा जय होईल. सत्याचा कधीच जय होणार नाही.”

——————————————————-

Author

One thought on “गांधारी 

Leave a Reply