लेखन अनुभव

एका सांस्कृतिक इतिहासाची शतकोत्तर वाटचाल

पुणे भारत गायन समाज

एक सुरेल स्वरयात्रा – ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास (भाग १)

२०१७-१८ सालची गोष्ट आहे. गायिका पंडिता शैला सुधीर दातार यांचा फोन आला. “अगं! एक सप्टेंबर १९११ रोजी देवगंधर्व भास्करबुवा बखले – माझे आजेसासरे – यांनी ‘किर्लोस्कर भारत गायन समाजा’ची स्थापना केली. २०२२ साली गुरुवर्यांचं स्मृतिशताब्दीवर्ष आहे. त्या निमित्तानं संस्थेचा इतिहासवजा सांगीतिक प्रवास लिहिण्याची कल्पना आहे. ‘राजहंस प्रकाशन’चे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर पुस्तक प्रकाशित करणार आहेत. तू पुस्तकाचं लिखाण करशील का?”

शैला दातार या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. पुस्तकाची कल्पना माजगावकरसरांची होती; पण त्यांची फार मोठी अट होती की, भरपूर संदर्भांसह पुस्तक वाचनीय झालं पाहिजे.

लेखनापूर्वी ‘पुणे भारत गायन समाजा’शी माझा फारसा संबंध आला नव्हता आणि एकशे दहा वर्षांच्या कालखंडाचं आव्हान समोर होतं. मी संस्थेत गेले होते तेव्हा अहवाल, कात्रणं, परीक्षणं, फोटो… असं बरंच काही जतन करून ठेवलेलं पाहिलं. ती सर्व कागदपत्रं एकावर एक रचून ठेवली असती, तर माझ्या उंचीपेक्षाही अधिक भरली असती. (मराठी स्त्रियांची सर्वसाधारण उंची पाहता, मी बुटकी नव्हे.) कागदपत्रांचा पसारा पाहून, ‘हे लिखाण मला झेपणार नाही,’ असं सांगून मोकळं व्हावं, असंही वाटलं; परंतु ‘नाही’ हा शब्द माझ्या तोंडून उमटलाच नाही.

संस्थेशी सुरुवातीपासून जोडलेल्या ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री – पंडिता निर्मलाताई गोगटे आणि शैलाताई या दोघींनीही सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. प्रत्यक्ष लेखनासाठी निर्मलाताईंचं बहुमोल मार्गदर्शन मिळालं. मला आठवतंय की, त्या क्षणी ‘हो – नाही’ असं काहीही उत्तर न देता मी घरी आले आणि दुसऱ्या दिवशी एका अनावर ओढीनं माझे पाय ‘समाजा’कडे वळले.

संस्थेच्या स्थापनेसाठी घटना घडली, ती केवळ निमित्तमात्र ठरली. किर्लोस्कर नाटक मंडळींच्या नानासाहेब जोगळेकरांची इच्छा होती की, आपल्याकडील नव्या नटवर्गाला योग्य सांगीतिक शिक्षण मिळावं. त्याकरिता भास्करबुवांनी किर्लोस्कर नाटक मंडळींच्या मदतीनं ही संस्था सुरू केली. नंतर नानासाहेब जोगळेकरांच्या अकाली निधनामुळे किर्लोस्कर नाटक मंडळींशी असलेला संबंध संपला पण ‘भारत गायन समाज’ या नावानं संस्था चालत राहिली. एखाद्या तात्कालिक घटनेतून चमत्कार वाटावा, असा गौरवशाली सांगीतिक इतिहास निर्माण होण्याचा शुभयोग संस्थेच्या कुंडलीत लिहिला होता; कारण कुंडलीतला एक जबरदस्त ग्रह होता ‘भास्करबुवा बखले.’ पुढे १९४० मध्ये ‘पुणे गायन समाज’ आणि ‘भारत गायन समाजा’चं विलीनीकरण झालं. तेव्हापासून ‘पुणे भारत गायन समाज’ या नावानं संस्था कार्यरत राहिली आहे.

गुरुवर्य भास्करबुवा बखले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक अडचणींना तोंड देत संस्था उभी केली. साहित्यसम्राट न. चिं. केळकर आणि डॉ.गद्रे यांच्या सह्यांचं प्रसिद्धिपत्रक काढण्यात आलं. शास्त्रीय संगीताचा प्रसार करणं, विद्यार्थी घडवणं, रसिकांना संगीतसाक्षर करणं, संगीतातील उदार दृष्टिकोन जपणं, शास्त्रीय संगीत श्रेष्ठ व इतर संगीतप्रकार कनिष्ठ या विचारापासून कलावंतांना आणि श्रोत्यांना दूर ठेवणं… अशी अनेक उद्दिष्टं बाळगून संस्थेचं कार्य निश्चित करण्यात आलं. भास्करबुवांनी अनेक थोर कलावंतांना संस्थेत आमंत्रित करून त्यांचे कार्यक्रम घडवून आणले, त्यांना बिदागी देऊन त्यांचे सन्मान केले. प्रसंगी पत्नीचा एखादा दागिना मोडायलाही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. गरीब विद्यार्थी फुकट शिकत असत. फार थोड्या विद्यार्थ्यांकडून फी मिळत असे. त्यातून संस्थेचा खर्च भागत नसे. मग भास्करबुवा, गोविंदराव टेंबे, संस्थेतील शिक्षक, कधी एखादा बाहेरचा सुप्रसिद्ध कलावंत आणि बुवांचे पट्टशिष्य बाल कृष्ण फुलंब्रीकर जलसे करून संस्थेच्या खर्चाची तूट भरून काढत असत. अर्थात जलशांचं मुख्य आकर्षण भास्करबुवांचं गाणं हेच असायचं; तरीही काही वेळा शिक्षकांचे पगार देणंही शक्य होत नसे. या काळात संस्था विंचवाचं घर पाठीवर घेऊन चालत राहिली. त्या काळात संगीतसंस्था चालवणं म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखं होतं. सर्वसाधारणपणे कलेला घरात किंवा समाजातही फारशी मान्यता नव्हती. कलेचा ‘नाद’ असणं म्हणजे ‘भिकेचे डोहाळे!’ परंतु या काळात काही श्रीमंत ,द्रष्ट्या रसिकांमुळे, धनिकांमुळे आणि राजाश्रयामुळे कलावंत जिवंत राहिले.

मी लिखाण करते आहे ही बातमी समजल्यावर अनेकांची प्रतिक्रिया नकारात्मक होती. ‘हा संस्थेचा इतिहास कोण वाचणार?’ ते खरंही होतं. एरवीही लोकांचं वाचन खूप कमी झालं आहे. त्यात हा एका संस्थेचा इतिहास! तोही मराठीत! या सर्व नकारात्मक विचारांना बाजूला ठेवलं आणि जुनी जीर्ण झालेली कागदपत्रं अलगद हातानं उलगडू लागले. ‘करोना काळ’ वगळता दोन-अडीच वर्षं असंख्य कात्रणं, अहवाल माझ्या आवतीभोवती पसरलेले होते. ते सारं माझ्या जिवाभावाचं ‘मैत्र’ कधी होऊन गेलं, ते मलाही कळलं नाही. वाचकांना असं वाटू शकेल की, ‘यामध्ये जिवाभावाचं वाटण्यासारखं काय आहे? नीरस, रुक्ष अशा ह्या गोष्टी!’ लेखनाला सुरुवात करेपर्यंत मलाही वाटलं होतं की, ‘या कागदपत्रांमधून पुस्तक, तेही वाचनीय कसं काय होऊ शकेल?’ परंतु जसंजसं मी वाचत गेले, तसंतसं मनानं मी हळूहळू या कालखंडात उतरत गेले. नीरस वाटणारे अहवाल जिवंत माणसासारखे बोलू लागले. मग मात्र घसघशीत शतकाहूनही मोठा सांस्कृतिक कालखंड माझ्यासमोर उलगडतो आहे याची जाणीव झाली.

परंतु १९२७ पर्यंत संस्थेकडे स्वतःची वास्तू नव्हती. त्या काळातील किती कागदपत्रं गहाळ झाली असतील, किती गोष्टींची नोंदच झाली नसेल – सांगता येणार नाही. १९२८ साली म्हणजे भास्करबुवांच्या निधनानंतर – १९२२ नंतर – संस्थेला स्वतःची इमारत मिळाली. इमारत खरेदीसाठी कर्ज कसं घेतलं आणि ते किती प्रचंड प्रयत्नांनी फिटलं यावर एक स्वतंत्र लेखच लिहायला हवा. तूर्तास एवढंच सांगता येईल की, गोविंदराव टेंबे, बालगंधर्व, मास्तर कृष्णा अशा कलावंतांनी जलसे करून, काही गायक नटांनी ‘समाजा’च्या नाट्यशाखेतर्फे संगीत नाट्यप्रयोग करून, सरदार आबासाहेब मुजुमदार, रावसाहेब केळकर अशा द्रष्ट्या धोरणी अध्यक्षांच्या प्रयत्नांतून कर्ज फिटलं. त्यामुळे संस्थेचे अनेक कार्यक्रम, उपक्रम, बापूराव केतकर सभागृह, भास्कर संगीत विद्यालय, सुसज्ज ग्रंथालय, दुर्मीळ ध्वनिमुद्रणं ऐकण्यासाठी स्वतंत्र कक्ष … अशा अनेक उद्दिष्टांना मूर्त स्वरूप देणं संस्थेला शक्य झालं.

पुण्यात शनिपाराजवळ आपल्या जुन्या खुणा जपत आज संस्थेची वास्तू उभी आहे. हिंदुस्तानातील पहिल्या महिला डॉक्टर कै. आनंदीबाई जोशी यांचा जन्म आणि मृत्यू ‘समाजा’च्या मूळ वाड्यात झाला होता. तेव्हा हा वाडा संस्थेच्या मालकीचा नव्हता. पुढे संस्थेच्या गरजेप्रमाणे मूळ वाड्यात थोडाफार फरक करण्यात आला आहे. त्या काळात पुण्यात स्वतःची वास्तू असणारी ही एकमेव संगीत शिक्षण संस्था होती. १९९७ साली इमारतीच्या दर्शनी भागावर ‘पुणे ऐतिहासिक वास्तुस्मृती’ या संस्थेतर्फे आनंदीबाई जोशी यांच्या नावाचा नीलफलक लावण्यात आला. दुसऱ्या मजल्यावर पं. बापूराव केतकर सभागृह आहे. संस्थेचे सर्व कार्यक्रम इथेच होत असतात. सभागृहाच्या चारही भिंतींवर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत परंपरेतील थोर कलावंतांच्या प्रतिमा आहेत. व्यासपीठाच्या मागील भिंतीवर ऋषितुल्य भास्करबुवा बखले यांचं भव्य तैलचित्र आहे. ते सारं सांगीतिक वैभव पाहताना, जणू एक सांस्कृतिक संपन्न कालखंड माझ्याभोवती आहे असं वाटलं. कलाकारांसाठी तर ते ‘स्वरमंदिर’ आहे. अगदी ख्यातकीर्त पै. उ. झाकीर हुसेन यांना जेव्हा ‘समाजा’च्या वतीनं ‘पं. राम मराठे’ यांच्या नावाचा पुरस्कार दिला तेव्हा त्यांनी आग्रहानं हा सोहळा भास्करबुवांच्या स्वरमंदिरात करा, पं. बापूराव केतकर सभागृहातच करा, असं सांगितलं होतं, यातच सारं काही आलं.

संस्था-स्थापनेपासूनच भास्करबुवांनी कार्याचा पैस विस्तृत ठेवला होता. पुढे तो त्याच पद्धतीनं वर्धिष्णू होत राहिला. त्यामुळे संगीत विद्यालय ते संगीत विद्यापीठ ते काही प्रमाणात सांस्कृतिक दस्तऐवज या पद्धतीनं संस्था कार्यरत राहिली आहे.

कुठल्याही क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्री-पुरुषांचा इतिहास समाजाला प्रेरणादायी होत असतो. त्या प्रमाणे एखाद्या कार्यसिद्ध संस्थेचा इतिहासही पुढल्या पिढ्यांना दिशादर्शक ठरू शकतो. पुण्याचं उदाहरण घेऊन सांगायचं तर, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि त्यांची ‘हिंगणे स्त्री-शिक्षण संस्था, पुणे.’ महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी ज्या संस्था उभ्या आहेत, त्यांपैकी ‘हिंगणे स्त्री-शिक्षण संस्था’ ही एक महत्त्वाची संस्था आहे. त्याच प्रमाणे, तुलना न करता, ‘पुणे भारत गायन समाज’ ही महाराष्ट्राच्या संगीतविश्वातील एक प्रमुख संस्था आहे. आणि म्हणून या संस्थेचा इतिहासवजा प्रवासही महाराष्ट्राच्या सांगीतिक-सास्कृतिक वाटचालीचा काही प्रमाणात दस्तऐवज आहे.

Author

Leave a Reply