गुरु असावा परमगुणी

शनिवारी दि. १० जानेवारीला सर गेल्याची बातमी वाचली आणि मन उदास झाले. त्यांच्या सहवासातील आठवणींनी अंतःकरण व्याकूळ केले. एक गुरू, शिक्षक, मार्गदर्शक म्हणून त्यांचे माझ्या जीवनात अनन्यसाधारण स्थान आहे. त्यांच्या विचारांचा, संस्कारांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. त्यांचा जो सहवास मला मिळाला त्यामुळे माझे जीवन समृद्ध झाले आहे. त्या आठवणी माझा अमोल ठेवा आहेत. त्या सांगाव्यात तरी किती आणि कोणाला? 

   माझे कराडचे कॉलेज जीवन संस्मरणीय झाले ते माझ्या आदरणीय प्राध्यापकांच्यामुळेच. त्यातही सर्व आयुष्याला व्यापून उरलेले, आज माझ्या पंचाहत्तरीतही ज्यांच्या शिकवणु‌कीचा आधार वाटतो आणि वाट शोधण्यासाठी ते मार्गदर्शन आठवावेसे वाटते ते माझे ‘सर’ – मिरजकर सर. कॉलेजची तीन वर्षे त्यांच्या अध्यापनाचा मनमुराद आनंद घेतलाच; पण त्यानंतरच्या पन्नास वर्षांत त्यांचे माझ्या आयुष्यात ‘असणे’ जसेच्या तसे राहिले – भेटींच्या रूपाने, आठवणींच्या रूपाने.

   ते साल होते इ.स.१९६९. बत्तीस शिराळ्यासारख्या खेड्यातून येऊन मी कराडसारख्या  शहरात स्थिरावले होते. मैत्रिणींबरोबर मजा करत  पहिले वर्ष संपले आणि सुटीतच मराठीचे बिडवेसर प्राचार्य म्हणून अन्यत्र गेले आहेत असे कळले. त्यामुळे नवीन सर कोण येणार, ते कसे असतील याची  थोडी काळजीच वाटत होती; पण असेही कळले की, पुणे विद्यापीठात प्रथम आलेले, सुवर्णपद‌क विजेते, अगदी तरुण असे प्राध्यापक येणार आहेत. आम्ही त्यांना पाहायला, ऐकायला खूप उत्सुक होतो. पहिल्याच दिवशी परिचयसत्रात प्राचार्यांनी ओळख करून दिली तेव्हा त्यांचे प्रथमदर्शन झाले. मध्यम अंगकाठी, त्या काळच्या प्रथेप्रमाणे अंगावर कोट आणि थोडा जाड चष्मा यांची मनाने खास नोंद घेतली. 

वक्ता, लेखक, वाचक, समीक्षक, कवी, अनुवादक, अध्यापक असे त्यांचे बहु‌आयामी व्यक्तिमत्त्व   हळूहळू   उलगडत गेले. नियमित वर्ग सुरू झाले आणि त्यांच्यातील या सर्व पैलूंचे एकत्वाने दर्शन होऊ लागले. त्यांच्या व्याख्यानाची शैली, त्यांचा अभ्यास, मुद्देसूद विवरण करताना खोल तपशिलात जाऊन विषय उलगडणं, भरपूर संदर्भ देणं, अधिक माहितीसाठी संदर्भग्रंथांची सूची या आवश्यक पण दडपण वाढवणाऱ्या गोष्टी ते अशा पद्धतीने सांगत की ज्यामुळे अभ्यास हा आनंद वाटेल. शब्दकळा तर इतकी प्रसन्न की ज्ञानदेवांच्या भाषेत तो रस चाखण्यासाठी ‘कानांना जिभा यायच्या.’ आमचा १०० ते १५०  मुलांचा वर्ग अगदी शांत असे. आम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन जात असू. सायंसची मुलेही त्यांच्या व्याख्यानाला येऊन बसत.

प्री-डिग्रीच्या वर्षापेक्षा प्रथमवर्षाचा अभ्यास खूप विस्तृत होता. एखादी कविता, निबंध किंवा कथा अभ्यासणं वेगळं आणि पूर्ण कादंबरी, संपूर्ण काव्यसंग्रह, ज्ञानेश्वरीतला एखादा अध्याय अभ्यासणं वेगळं! त्यामुळे एकदम  एवढा अभ्यास गोंधळवून टाकणारा होता; पण सरांनी इतक्या कुशलतेने सारा आशय  समजून सांगितला, की सारे काही स्वच्छ  दिसायला लागले. ही पद्धत मला ड्रोन कॅमेऱ्याच्या चित्रणासारखी वाटते. वरून एकदम विहंगम नजारा दाखवून मग एकेका भागाचा क्लोजअप दाखवावा अशी त्यांची व्याख्याने असत. त्या वेळी आजच्याएवढी दृक्श्राव्य माध्यमे नसल्यामुळे शिक्षणाचा सारा भार पुस्तकांवरच होता. विषयाला पूरक माहिती कोणत्या पुस्तकात, कोणत्या प्रकरणात मिळेल, हे ते वेळोवेळी सांगत. कादंबरीत काय शिकायचं आणि संपूर्ण काव्यसंग्रहावर मोजके प्रश्न कसे विचारणार अशा शंका मनात यायच्या. संपूर्ण काव्यसंग्रहाचा विचार किती विविध पातळ्यांवरून करता येतो हे त्यांच्या व्याख्यानातून समजले आणि कोणत्याही पुस्तकासंबंधी असा विचार आपण करू शकू याचा विश्वास वाटू लागला. हे सांगण्याची भाषा तर इतकी श्रीमंत, नेमकी आणि बंदिस्त होती की त्याचीच मोहिनी वाटायची. काय सांगतायत त्यापेक्षा कसे सांगतात याचं आकर्षण वाटायचं. त्यांचा आवाज किंचित जाड असलेला, स्वच्छ मोकळा होता. उच्चार स्पष्ट होते आणि कुठेही कृत्रिम चढउतार, नाटकीपणा नसायचा. बोलणं सहज, नैसर्गिक, ऐकत राहावं असं. मेजवानीच असायाची ती.  आम्ही इतके भाग्यवान, की आम्हांला ती रोज मिळायची.

त्यांच्या उच्चारांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातून शब्दात दडलेला अर्थ सहज कळायचा. पाडगाव‌करांच्या कवितेतील एक ओळ होती ‘सहलीच्या वेळी आणिक आम्ही दोघे… 

चालता चालता नकळत उरलो मागे’ 

यातल्या ‘नकळत’ चा अर्थ ‘मुद्दाम’ हे  त्यांच्या वाचनातूनच कळायचं.

‘आज टपोरले पोट । जैसी मोगरीची कळी’ 

मर्ढेकरांच्या या ओळीतील ‘टपोरले’ या शब्दाच्या उच्चारातून तो फुगीरपणा, सर्व बाजूंचा ताण जाणवायचा.

या आनंददायी शिक्षणाचा अनुभव आम्ही दररोजच घेत होतो. आनंदाबरोबर आमच्या अभ्यासाला, वाचनाला त्यांनी शिस्त लावली. अभ्यासातला रुक्ष कंटाळवाणा भाग ऑप्शनला टाकायचा विचार करत असू. सरांना ते बिलकूल आवडायचे नाही. ते म्हणायचे, “अभ्यास हा करण्यासाठी असतो. ऑप्शनला टाकण्यासाठी नाही. पानातला नावडता पदार्थ जसा आधी संपवतो तसा नावडता भाग आधी करायचा.” ‘अभ्यासाला मूड नाही,’ असे म्हणणे म्हणजे ‘स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रकार आहे,’ असं ते म्हणत. अभ्यासावर त्यांचा दृढ विश्वास होता. कोणत्याही विषयाचा विस्तार ते जेव्हा करत त्या वेळी तो अभ्यास त्यांच्या स्वतःच्या चिंतनासह प्रकट होई. अध्यापन, ग्रंथलेखन, मोठ्या लोकसमुदायाच्या समोरची व्याख्याने या साऱ्याला असा अभ्यास, चिंतन, कविवृत्ती आणि अभिव्यक्तीच्या भारदस्त शैलीची बैठक होती. 

मराठीत ‘सत्यकथा’, ‘अभिरुची’, ललित’ ही वाङ्मयीन मासिके निघतात याचा आम्हांला पत्ताच नव्हता. एकदा लायब्ररीत जाताना त्यांनी विचारले, की ही मासिकं वाचता की नाही? तेव्हापासून मासिकाच्या स्टँडकडे जायचे वळण पडले. लायब्ररीचा वापर कसा करायचा, टिपणे कशी काढायची यांच्या सूचना त्यांच्या बोलण्यातून मिळत. वाचनातून मुद्दे काढण्याची सवय त्यांनी लावली. पाठांतरापेक्षा आपल्या भाषेत मुद्द्यांचा विस्तार करणं सोपं आहे हे सांगून आमची अभ्यासाची पद्धत   पार बदलून टाकली. 

ते स्वतः मोठ्या आशयाचा अर्क अगदी बीज स्वरूपात, काही शब्दांतच काढत असत. एम.ए.च्या शंभर गुणांच्या पेपराचे मुद्दे त्यांनी बस तिकिटाच्या मागे काढले होते असं ते सांगत. स्वतः अभ्यास करतानाची त्यांची एक आठवण म्हणजे त्यांनी ‘संत नामदेव’ असा ‘स्पेशल ऑथर’  घेतल्यावर सारे संतसाहित्य झपाटल्यासारखे वाचले होते. 

एखादा विषय समोर आला की त्यावर विचार कसा करायचा, का करायचा, साध्या, सोप्या तर्काने प्रश्नांची उत्तरं कशी मिळवायची हे त्यांच्या व्याख्यानातून आपोआप समजत गेलं. त्याचा उपयोग आयुष्यातल्या समस्यांना सामोरे जाताना झाला. वर्गात ते कधी नोट्स, वही असे काही घेऊन येत नसत. डोक्यातले विचार शब्दरूप घेऊन  यंत्रवत बाहेर पडत. प्रश्नांची उत्तरे लिहून देतानाही फक्त पुस्तक समोर असे.

शब्दांवर रेघा न देणे, रेघेच्या वर लिहिणे असे चाळे आम्ही कधी कधी करत असू.  तेव्हा ते ‘मराठीची ही पद्धत नाही’ एवढेच सांगून विषय संपवत. मराठीत चांगले शब्द उपलब्ध असताना इंग्रजी शब्द वापरणे त्यांना आवडत नसे. लगेच ते चांगला मराठी प्रतिशब्द सांगत. तो लक्षात येण्यासाठी तो शब्द  आपल्या भाषेत कसा आला हेही सांगत. आम्ही साक्षात चालत्या बोलत्या ज्ञानकोशाच्या सहवासातच होतो.

शुद्धलेखन अगदी काटेकोर तपासत. चुकलेल्या शब्दावर गोल करून बरोबर शब्द समासात लिहलेला असे. एकदा ‘बोरकरांच्या प्रेयसीचे व्यक्तिमत्त्व लाघवी आहे’ हे वाक्य लिहिताना ‘ल’ चा काना विसरला. तो त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे दुरुस्त केला. पुढे महिनाभर त्यांच्यासमोर येण्याचे धाडस झाले नाही.

एकदा मुलींची बसस्टॉपवरची तावातावाने चाललेली चर्चा त्यांनी ऐकली. ‘सर एकदा कुसुमाग्रज म्हणतात, तर एकदा शिरवाडकर म्हणतात. आम्ही समजायचे तरी काय?’ दुसरे दिवशी डझनभर टोपणनावांच्या कुळकथा सरांनी ऐकवल्या. असं ठाकून ठोकून घडवणं चालू होतं. खूप आनंदाचा, चैतन्यदायी असा तो काळ होता.

सरांचे लेखन हा खरंतर एका स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांत  त्यांनी सारख्याच प्रभुत्वाने आणि अधिकाराने लिहिले आहे. आम्ही कॉलेजात असताना त्यांचे लेख, कविता ‘आलोचना’, ‘अभिरुची’, ‘सत्यकथा’ इत्यादी  नियतकालिकांतून येत असत. लेख बहु‌धा समीक्षात्मक असत. या लेखांचेच संकलन पुढे ‘कवितेची रसतीर्थे’ ‘साहित्यगंगा : प्रवाह आणि घाट’ ‘साहित्य : रंग आणि अंतरंग’ या नावाने प्रसिद्ध झाले. प्रा.रेळेकर आणि डॉ. हे. वि. इनामदार यांच्या सहकार्याने संपादित केलेला ‘श्रीनामदेवदर्शन’ हा ग्रंथ निर्माण होत असताना ते किती नामदेवमय झाले होते हे मी पाहिले आहे. ‘तुम्ही नामानिराळे झालात की नाही?’ हा त्यांना कोणाचाही पहिला प्रश्न असे. ‘तौलनिक साहित्य’ आणि ‘भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा’ खंड एक आणि दोन हे अभ्यासकांसाठी दीपस्तंभ असलेले ग्रंथ त्यांच्या दिल्लीमधील वास्तव्यात निर्माण झाले. त्यांनी सावरकरांच्या कवितेचा काव्यरूप हिंदी अनुवाद केला आहे; तसेच प्रा. गंगाधर गाडगीळ यांच्या ‘एका मुंगीचे महाभारत’ या आत्मचरित्राचा ‘महाभारत एक चींटी का’ या नावाने अनुवाद केला आहे. हे दोन्ही ग्रंथ त्यांची चिंतनशीलता आणि संशोधनातील अधिकार दर्शवणारे आहेत. साहित्य अकादमीसाठी कुसुमाग्रजांचा परिचयग्रंथ लिहिताना ‘चंद्र आकाशात आहे तिथेच आहे; आम्ही फक्त तो पाहण्यासाठी खिड‌की उघडली.’ हीच त्यांची भावना होती. देशात आणि परदेशांत तसेच आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत त्यांनी संशोधनपर निबंध वाचले आहेत. ‘मराठी काव्यातील बदलती प्रतिमासृष्टी’ हा त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध मराठीमधील एक भारदस्त ठेवा आहे; मात्र तो पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला नाही.

त्यांच्या या उदंड साहित्यसेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांना ‘डॉ.गं.ना.जोगळेकर’ पुरस्काराने सन्मानित केले. ‘साहित्यिक कलावंत संमेलनाचे’ अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. 

सरांचे वक्तृत्व हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विलोभनीय पैलू होता. गणेशोत्सवातील परिसंवाद, अभिरूप न्यायालयासारखे कार्यक्रम, शारदीय नवरात्रातील व्याख्यानमाला अशा मोठ्या लोकसमुदायात तरुण अभ्यासू रसिक आवर्जून येत. त्या वेळी त्यांना महाराष्ट्रातून आणि नंतर परदेशातूनदेखील व्याख्यानासाठी सन्मानाने बोलावले गेले. 

कराडहून सांगलीला ते महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून गेले.  प्रशासकीय कामामुळे शिकवायला वेळ कमी मिळतो यांची खंत त्यांना वाटे. तथापि व्यवस्थापनातही त्यांचे गुण, त्यांची शिस्त, निर्णयक्षमता, प्रसंगावधान हे गुण उजळून निघाले. १९७५ – ७६ ची गोष्ट असेल – परीक्षा सुरू होती.  पेपरवाटपाच्या वेळी  एका विषयाची प्रश्नपत्रिका आलेलीच नाही हे लक्षात आले. त्या वेळी संगणक, इंटरनेट नव्हतेच. फोनदेखील डायलने फिरवून लावायचे होते. त्या वेळी ट्रंककॉल लावताना त्यांनी फारसा परिचित नसणारा, अतिप्राधान्य मिळणारा लाईटनिंग ट्रंककॉल लावण्याचे प्रसंगावधान दाखविले. फोनवरून प्रश्नपत्रिका उतरवून घेऊन मुलांना अर्ध्या तासात छायाप्रती उपलब्ध करून दिल्या. 

 माझा आणि त्यांचा व्यक्तिगत संबंध आला तो त्यांच्या प्रबंधलेखनामुळे. लेखनिक म्हणून मी त्यांच्याकडे काही काळ जात होते.  ते सांगत असत आणि मी लिहीत असे. तोच अभ्यास, तोच प्रवाह, तोच अखंडपणा याचा पदोपदी अनुभव येत असे.  एखादे वाक्यच काय एखादा शब्दही कधी बदललेला मला आठवत नाही. लिहिता लिहिता मलाही विषय थोडाफार कळत असे. लिखाण संपल्यावर ते लगेच शुद्धलेखनाच्या चुका काढून मला दाखवत असत. त्यांचे गुरू प्रा.रा.शं. वाळिंबे यांचा प्रबंध पानशेतच्या पुरात वाहून गेला होता. त्यांनी तो पुन्हा लिहिला. त्या वेळी सरांनी त्यातले एक प्रकरण लिहून त्यांना मदत केली होती. ‘तू मला तशीच मदत कर,’ असे ते मला म्हणत असत; पण माझा तेवढा आवाका नव्हता.

   या लिखाणामुळे आमचे घरगुती संबंध वाढले. चहा-खाणे, जेवण यापासून सर कुठे मीटिंगला, व्याख्यानासाठी बाहेर गेले की वहिनींच्या सोबतीला राहायला जाण्यापर्यंत जवळीक वाढली. ते सांगलीला गेले तेव्हा मीही तिथे बी.एड. करत होते. मग शनिवार-रविवार किंवा सुट्टी आली की माझा मुक्काम त्यांच्याकडेच असे. त्यांच्या कुटुंबाशी मी चांगलीच समरस झाले होते.

त्यांचा कुटुंबातला वावरही  प्रेमळ, जबाबदार आणि आश्वासक होता. पती-पत्नींचे संबंध किती हृद्य असतात  हे मी नित्य पाहत होते. मीही एका सुशिक्षित, मध्यमवर्गीय कुटुंबात वाढत होते; परंतु छोट्या-मोठ्या प्रसंगांतू‌न स्त्रीचा सन्मान कसा राखायचा, कसा राखता येतो हे त्यांच्या सहवासात मला समजले. कराडच्या  घरात दोन खोल्या वर तर दोन खाली होत्या. तेथे वहिनींसाठी ‘ ये ‘  असे म्हणत दार उघडत तेव्हा त्यांच्या  शब्दातील ऊब मला जाणवत असे. मुले लहान असल्यामुळे वहिनींना खूप वेळा पेपर वाचायलाही वेळ मिळायचा नाही, तेव्हा त्यांचे काम सुरू असताना सर त्यांना ठळक बातम्या वाचून दाखवत. कधी कधी मुलांना स्वतः सांभाळून ते आम्हां दोघींना फिरायला, सिनेमाला पाठवत. आपल्याबरोबर त्यांचेही करिअर कसे बहरेल याची काळजी घेत. ‘घरात बायको फक्त माझ्या आवडीची आहे. बाकी सर्व तिच्या आवडीचे.’  या म्हणण्यातला गमतीचा भाग सोडला तरी दोघांतले दृढ आणि मधुर बंध कळत.

शिक्षणाबाहेरच्या व्यावहारिक जीवनातही त्यांचा सल्ला मला मिळत राहिला. आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या वादळांना सामोरे जाताना साध्या सोप्या तर्काने प्रश्नांची उत्तरे कशी मिळवायची याचे मार्गदर्शन त्यांनी मला वेळोवेळी केले. आपल्या मनालाच कठोर प्रश्न विचारून स्वतःचा शोध घेता येतो. आयुष्याचा खरेपणाने स्वीकार करणं हेदेखील शौर्य आहे हे त्यांचं सांगणं मला वेळोवेळी बळ देत राहिले आहे. 

  सर दिल्लीला गेले आणि आमच्या भेटीगाठींत खंड पडला – पण विसर काही पडला नाही. त्यांची शिकवण कायम सोबत करत राहिली. दिल्ली विश्वविद्यालयात पती- पत्नी उभयतांची क्षितिजे विस्तारत राहिली. तीनही मुले उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदांवर गेली. त्यांचा साहित्याचा वारसाही ती पुढे चालवत आहेत.

आम्ही त्यांचे पहिले-वहिले विद्यार्थी. महाविद्यालयातील नवीन कला शाखेचेही पहिल्या बॅचचे विद्यार्थी.  हे आमचे खास नाते. माझ्यासाठी तर ते महाविद्यालयातल्या आणि नंतर जीवनातल्या अनेक परीक्षा पार पडताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मार्गदर्शक राहिले. त्यामुळे त्यांच्या आठवणींचा पूर आणि आणि रिक्तपणाची भावना ओसरणे सोपे नाही. माझे खिन्न झालेले मन या लेखातून आठवणी लिहिता लिहिता थोडेसे हलके झाले आहे एवढेच. 

आणखी काय लिहावे? अखेरीस ज्ञानदेवांच्या भाषेत एवढेच म्हणते :

“यालागी आता । स्तुती सांडुनी निवांता l

चरणी ठेविजे माथा । हेचि भले॥”

Author

Leave a Reply