ते १९६१-६२ चे वर्ष होते. मी नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे येथे बी. ए.च्या प्रथम वर्षाच्या वर्गात शिकत होते. दरवर्षी कॉलेजचे (Miscellaneous) ‘मिसलेनियस्’ नावाचे एक नियतकालिक प्रसिद्ध होत असे. त्यात मराठी, हिंदी, इंग्लीश अशा तिन्ही भाषांमधून विद्यार्थ्यांचे साहित्यिक लेखन प्रसिद्ध होत असे. लेखनाची आवड असल्यामुळे मीही त्यात माझी एक कविता, एक प्रवासवर्णन आणि कथास्पर्धेसाठी कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे आवाहन केल्यानुसार एक कथा असे माझे लेखन पाठवले होते. हे तीनही प्रकारचे लेखन त्या वर्षीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते; शिवाय माझ्या ‘गुढीपाडवा’ नावाच्या कथेला स्पर्धेतील पहिले बक्षीस मिळाले होते.
दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या आवारात मैत्रिणींबरोबर चालत असताना किरकोळ शरीरयष्टीचा परंतु तेजस्वी डोळ्यांचा एक तरुण मुलगा सायंस बिल्डिंगकडून आमच्याकडे आला आणि ‘कथास्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन,’ असे म्हणाला. त्या वेळी तो आमच्या कॉलेजमधील मराठी वाङ्मय मंडळाचा सेक्रेटरी होता हे मला नंतर समजले. त्या मासिकात मराठी वाङ्मय मंडळाच्या अहवालाखाली सेक्रेटरी म्हणून त्याचे ‘निशिकांत मिरजकर’ हे नाव छापलेले होते. ते मासिक चाळत असताना कवितांच्या विभागामध्ये त्याची ‘नवाकाळ’ या मासिकाच्या दिवाळी अंकात पहिले बक्षीस मिळालेली ‘पश्चात्ताप’ नावाची कविता होती. त्याचे ते वाडिया कॉलेजमधील बी. एससीचे शेवटचे वर्ष होते. वाङ्मयाची आत्यंतिक आवड असूनही घरच्या मंडळींच्या आग्रहाखातर त्याने सायंस विभागात प्रवेश घेतला होता. मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम वर्गात प्रथम येऊन त्याने अनेक पारितोषिके मिळवली होती.
मराठी विषयात प्रथम आल्याबद्दल चार पारितोषिके पटकावली होती. त्यामुळे कॉलेजात सायंस शाखेत त्याचे मन रमले नाही. वाङ्मयाच्या अभ्यासाची ओढ स्वस्थ बसू देई ना. बी. एससी. पास झाल्यानंतर त्याने बी.ए. साठी आर्ट्स शाखेत प्रवेश घेण्याचे ठरवले. त्या वेळी एक डिग्री मिळाली असल्यास दुसऱ्या डिग्रीसाठी आर्ट्सच्या विषयात एकदम दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेता येत होता, त्यामुळे त्याने बी. ए. च्या दुसऱ्या वर्षाला मराठी विषयासाठी प्रवेश घेतला. माझेही मराठी विषयातील बी.ए. चे दुसरे वर्ष सुरू झाले होते.
त्या वेळी मराठी विषय घेऊन बी. ए. करणारे थोडेच विद्यार्थी वाडिया कॉलेजात होते. आम्ही सहा मुली आणि दोन मुले – त्यांपैकी एक मिरजकर. मराठीतील महत्त्वाच्या लेखकांच्या साहित्याचे त्यांचे वाचन आधीच झाले होते. कुठलाही संदर्भ वाचनात आला की ते त्याचे मूळ पुस्तक वाचून काढीत. मराठी विषयात निशिकांत मिरजकर बी.ए. ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन विद्यापीठात प्रथम आले. त्यांना सुवर्णपदक आणि अनेक पारितोषिके मिळाली. त्यानंतर आमच्या बी.ए.च्या वर्गातील विद्यार्थ्यांपैकी फक्त आम्ही दोघांनीच एम.ए. च्या अभ्यासासाठी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याच वर्षी आमच्या बी.ए.चा पदवीचा पदवीदान समारंभ भारताच्या राजदूत आणि पं. जवाहरलाल नेहरूंच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांच्या हस्ते झाला. त्या समारंभात त्यांनी स्वहस्ते मिरजकरांच्या झग्यावर सुवर्ण पदक लावले. दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर तो फोटो छापून आला. एम. ए. च्या वर्गातही निशिकांत प्रथम श्रेणीत पहिल्या क्रमांकाने पास झाले. त्यानंतर आमचे मराठीचे एम. ए. चे प्राध्यापक डॉक्टर रा. शं. वाळिंबे यांच्याकडे त्यांनी पीएच. डी. चे मार्गदर्शक म्हणून नाव नोंदवले. ‘आधुनिक मराठी काव्यातील प्रतिमांचे बदलते स्वरूप’ या विषयात त्यांनी पीएच. डी. चा प्रबंध लिहून डॉक्टरेट (विद्यावाचस्पती) ही पदवी मिळवली.
एकाच महाविद्यालयात शिकल्यामुळे पुढे पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेताना आमची मैत्री दृढ झाली. त्यानंतर एका वर्षाने आमचा विवाह झाला. पुढच्याच वर्षी कऱ्हाडच्या ‘सायंस कॉलेज’मध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांची प्राध्यापक पदावर नियुक्ती झाली. एक वर्ष विठामाता हायस्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी करून झाल्यावर मीही त्याच कॉलेजात चार वर्षे प्राध्यापिका म्हणून अध्यापन केले. या चार-पाच वर्षांच्या काळात मिरजकरांनी कऱ्हाडात आणि त्याच्या पंचक्रोशीतील अनेक छोट्या गावांमध्ये भरपूर व्याख्याने दिली. गणपती, नवरात्र, काही विशेष प्रसंग अशा अनेक वेळी त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रणे येत. मग वेळ, काळ, अंतर, दळणवळणाच्या सोयी-गैरसोयी अशा कशाचाही विचार न करता ते निमंत्रणांचा स्वीकार करीत. एकदा कऱ्हाडातील नामांकित वकील धोपाटे यांच्याशी अभिरूप न्यायालयाच्या खटल्यात उत्स्फूर्तपणे वादावादी करण्याचा कार्यक्रमही त्यांनी लोकप्रिय केला होता. कऱ्हाडच्या अर्बन बँकेच्या प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ता म्हणून संत वाङ्मयापासून इतर अनेक विषयांवर तशा लहान वयातही त्यांनी उत्तम व्याख्याने दिली.
अशातच एकदा अचानकपणे सांगलीच्या ‘चंपाबेन वालचंद शहा महिला महाविद्यालय’ ह्या मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजच्या मॅनेजमेंटचे अधिकारी लोक आमच्या घरी आले. त्यांनी मिरजकरांना त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारण्याची विनंती केली. मराठी विभाग प्रमुख म्हणून पाच-सहा वर्षे काम केल्यानंतर प्राचार्य म्हणून काम करण्याचा अनुभव अधिक आव्हानात्मक असल्यामुळे त्यांनी येण्याची तयारी दर्शवली. त्या प्रमाणे त्या कॉलेजात त्यांनी प्राचार्य म्हणून चांगली कामगिरी केली. अर्थातच मीही त्या कॉलेजात अध्यापनाचे कार्य सुरू ठेवले.
आता मिरजकरांना आणि मला प्रगतीची क्षितिजे खुणावू लागली. दिल्ली विद्यापीठातील ‘आधुनिक भारतीय भाषा’ (Modern Indian Languages) या विभागात (आत्ताच्या ‘आधुनिक भारतीय भाषा आणि साहित्याभ्यास’ या विभागात) मराठीसाठी प्राध्यापकांची नियुक्ती करावयाची होती. त्या विभागातून करंदीकर पती-पत्नी निवृत्त झाले होते म्हणून त्याची जाहिरात आलेली आम्ही पाहिली. सांगलीसारख्या छोट्या शहरातून राजधानीच्या ठिकाणी असलेल्या विद्यापीठात अध्यापन करण्याची संधी मिळणार होती; शिवाय दोन जागा असल्यामुळे त्या दोघांना मिळू शकत होत्या. त्यामुळे आम्ही सर्व सोपस्कार पार पाडून दिल्ली विद्यापीठाला आमची कर्मभूमी बनवली.
आमच्या विभागात अकरा भाषा शिकवल्या जातात. लवकरच मिरजकर या विभागाचे प्रमुख बनले. त्यांनी आमच्या ह्या विभागातर्फे अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक चर्चासत्रे घडवून आणली. केवळ आपापल्या राज्यांच्या भाषा आणि त्यांतील साहित्य शिकवत बसल्याने विभागातील अध्यापनाला मर्यादित स्वरूप प्राप्त होईल आणि त्याची वाढ खुंटेल… कदाचित विभागाला भविष्यही उरणार नाही असे वाटून प्रो. शिशिर कुमार दास आणि प्रो. मिरजकर यांनी मिळून ‘तौलनिक भारतीय साहित्य’ असा विषय एम.ए. आणि पुढे एम. फिल. व पीएच. डी. ह्या वर्गांचा विषय असावा असे ठरवले आणि त्याचा अभ्यासक्रम तयार केला. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
हळूहळू या विभागाची चांगली भरभराट झाली. ह्या तौलनिक साहित्याभ्यासावर मराठीत चांगली सखोल माहिती देणारी पुस्तके नव्हती. त्यामुळे हा विषय महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये शिकवण्यात अडचण येऊ लागली. हे लक्षात आल्यावर मिरजकरांनी ‘तौलनिक साहित्य’ हे पुस्तक लिहून ते २०१६ साली प्रसिद्ध केले आणि प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची अडचण दूर झाली. अध्यापन काळातच त्यांची अकरा मराठी, सात हिंदी आणि तीन इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध झाली. महाविद्यालयात शिकत असल्यापासून अलीकडेपर्यंत लिहिलेल्या काही कवितांचे ‘निशिगंध’ हे त्यांचे पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले. दिल्ली विद्यापीठाच्या आर्ट्स फॅकल्टीचे डीन म्हणूनही तीन वर्षे त्यांनी उत्तम काम केले.
अत्यंत सहृदय, मितभाषी आणि मृदुभाषी, प्रसंगी कठोर निर्णय घेणारे, उत्तम वक्तृत्व असलेले, विद्वान, व्यासंगी आणि एक उत्तम प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. कुणालाही न दुखावता बोलणे आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे ह्यांमुळे कऱ्हाडपासून दिल्लीपर्यंतच्या त्यांच्या अध्यापन काळात ते विद्यार्थी आणि सहकारी यांना अत्यंत प्रिय होते. स्वतःपेक्षा ते नेहमी दुसऱ्यांचा विचार करीत. दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात तीस वर्षे घालवूनही त्यांनी स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी कधीच केल्या नाहीत. त्यांच्या विद्वत्तेमुळे अनेक पदे त्यांच्याकडे आपोआपच चालून आली. विश्वविद्यालय अनुदान आयोग, लोकसेवा आयोग, सरस्वती सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. अलाहाबाद विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचेही ते सन्माननीय सदस्य होते.
गेल्या वर्षा-सव्वा वर्षात त्यांना थोडा डिमेंशिया आणि शेवटी काही प्रमाणात पार्किंसंसचा त्रास झाला. शेवटच्या महिन्यात – म्हणजे डिसेंबर – जानेवारीत त्यांना न्युमोनिया झाला आणि दहा जानेवारी २०२५ रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
सुमारे साठ वर्षांच्या आमच्या सहजीवनाचा हा दीर्घ प्रवास त्यांच्या अखेरच्या श्वासाबरोबर थांबला! शेवटच्या काळात त्यांना मी सतत जवळ असलेली हवी असे. १० जानेवारीच्या पहाटे जेव्हा त्यांना ऑक्सिजन घेतानाही त्रास होऊ लागला तेव्हा मी त्यांच्या जवळच आहे आणि सोबतीला आहेच… असणारच आहे असे आश्वासन देत त्यांच्या छातीवर हात ठेवला आणि त्यांनी प्राण सोडला!
कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून दिल्ली विद्यापीठातून निवृत्त होईपर्यंत आम्ही कधीच एकमेकांची साथ सोडली नाही; परंतु शेवटच्या मार्गावर मात्र प्रत्येकाला एकट्यानेच जावे लागते हे एक कटुसत्य आहे. शेवटच्या काळात त्यांना साधारण वर्षभर केअरटेकरची गरज भासत होती. घरात केअरटेकर होते; परंतु अधिक चांगली सेवा मिळण्यासाठी आम्ही एका चांगल्या संस्थेत राहायला गेलो. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही कधीच एकमेकांची साथ सोडली नाही; परंतु शेवटच्या मार्गावर मात्र एकट्यानेच जावे लागते हे एक कटुसत्य आहे. जीवनात आलेल्या सर्व कटू घटनांना त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिले. शेवटच्या काही महिन्यांत मी थोडीजरी दृष्टिआड झाले तरी मला ‘ललिता, ये ना, ‘ अशी हाक मारीत… आताही ते मला बोलावत असतील का? आता त्या सर्व कडूगोड अनुभवांना किनारा उरला नाही. शेवटी त्या सर्व एकमेकांत मिसळून गेल्या. शुभ-अशुभाचा किनारा आता फिटून गेला!





लेखन सुंदर हुबेहूब आहे
डॉ’ सुमंगला बाकरे