आठवणीतील प्राध्यापक निशिकांत मिरजकर

दिल्ली विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख, तौलनिक साहित्याभ्यासाचे प्राध्यापक आणि ख्यातनाम अनुवादक निशिकांत धोंडोपंत मिरजकर यांचे शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी निधन झाले. ते दिल्ली विद्यापीठात सहा वर्षे विभाग प्रमुख आणि तीन वर्षे कलाशाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. काव्यलेखनाने त्यांनी साहित्य निर्मितीला सुरुवात केली. संत साहित्य, आधुनिक मराठी साहित्य व तौलनिक साहित्याभ्यासातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्याबद्दल लिहीत आहेत त्यांचे एक ज्येष्ठ स्नेही, अलाहाबाद विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू राजन हर्षे, त्यांच्या पत्नी ललिता मिरजकर आणि त्यांच्या विद्यार्थिनी शीला शुक्ल .

निशिकांत मिरजकर यांना अंतर्नाद परिवारातर्फे ही शब्दसुमनांजली.

माझ्या आठवणीतील प्राध्यापक निशिकांत मिरजकर 

प्राध्यापक निशिकांत मिरजकर यांच्या दुःखद निधनामुळे मराठी साहित्य आणि तौलनिक साहित्याचा एक प्रगल्भ अभ्यासक, समीक्षक आणि विशेषज्ञ हरपला आहे. व्यक्तिशः मी आपला एक अतिशय सज्जन आणि मृदुभाषी ज्येष्ठ मित्र गमा

वला आहे. शैक्षणिक क्षेत्रात  प्रा.मिरजकर यांनी  एक शिक्षक, संशोधक आणि प्रशासक म्हणून वर्षानुवर्षे सातत्याने भरीव कामगिरी केली.  मी मराठी साहित्याचा अभ्यासक नसलो तरी एकंदर साहित्यातच मला रस असल्यामुळे आमच्या परस्परसंबंधांच्या तारा अगदी सहज जुळत गेल्या आणि त्यांच्याशी चर्चा करत असताना मी अनेक गोष्टी माझ्या न कळतच शिकून गेलो. या प्रसंगी माझ्या त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी मी या छोट्याशा लेखात श्रद्धांजलीच्या निमित्ताने  मांडायचा प्रयत्न करणार आहे. 

   माझे आणि प्रा.मिरजकरांचे संबंध  २००८ पासून सुरू झाले. मी त्या काळात अलाहाबादच्या केंद्रीय विद्यापीठाचा कुलगुरू होतो. त्या वर्षी प्रा.मिरजकर यांना तत्कालीन राष्ट्रपती आणि आमच्या विद्यापीठाच्या व्हिजिटर श्रीमती प्रतिभा पाटील यांनी विद्यपीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून निवडले होते. विद्यापीठाच्या संदर्भात कार्यकारी परिषद ही सर्वशक्तिमान आणि सर्वोच्च बॉडी असते त्यामुळे त्यांच्या अकादमीक क्षेत्रातील स्थानाप्रमाणे त्यांनी आपल्या  स्वकर्तृत्वावर ते प्रतिष्ठेचे पद प्राप्त केले होते.  आमच्या पहिल्याच पत्रव्यवहारात प्रा.मिरजकर यांनी माझ्याशी संपूर्ण सहकार्य करण्याचे मला आश्वासन दिले. त्यामुळे आमचा परिचय होताच अगदी लीलया ते माझ्या अलाहाबाद  विद्यापीठाच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी  बांधले गेले. तसेच  माझ्यासारखा एक मराठी माणूस उत्तरेतील एका नावाजलेल्या विद्यापीठात कुलगुरू म्हणून सक्षमपणे काम करत आपला मराठी बाणा दाखवत आहे या गोष्टीचे त्यांना कौतुक होते आणि अभिमान होता. 

एकदा कार्यपरिषदेची बैठक  होण्यापूर्वी माझ्या अलाहाबादच्या घरात ते रात्री जेवायला आले. आमच्या अगदी मनसोक्त गप्पा काही तास झाल्या आणि पुढच्या प्रत्येक  भेटीत तशा गप्पा होतच राहिल्या. त्यामुळे त्याबद्दल लिहिण्यासारखे खूप काही असले तरीही मी आमच्या काही जिव्हाळ्याचे विषय इथे अगदी थोडक्यात  मांडणार आहे. 

आम्ही दोघे प्रा.सदाशिव शिवराम भावे यांच्याबद्दल अनेकदा बोललो. भावे सर मी फर्ग्युसन महाविद्यालयात असताना माझे प्राध्यापक होते. ते फार उत्तम समीक्षक होते. मराठीतील नवकविता कशा  समजून घ्यायच्या हे मी त्यांच्याकडून शिकत गेलो. प्रसंगी मी स्वतःच्या कवितासुद्धा त्यांना वाचून दाखविल्या आणि त्यांनी त्या कवितांचे रसग्रहण अथवा टीकात्मक विश्लेषण केले. भावे सर हे प्रा.मिरजकर  यांच्या डॉक्टरेटच्या  प्रबंधाचे परीक्षक होते. त्यामुळे मी आणि मिरजकर भाव्यांच्या चिकित्सक सौंदर्यदृष्टीवर आणि वेगळे आणि अगदी स्वतंत्र विचार निर्भीडपणे मांडण्याच्या प्रवृत्तीबद्दल मनापासून बोलत असू. 

स्वातंत्र्यपूर्वकाळात लिहिला गेलेला कविवर्य कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह प्रा.मिरजकर यांना खूप आवडत असे.   मलाही तो पाठच होता. त्यातील ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ या कवितेवर आम्ही सहचिंतन केले. तसेच कुसुमाग्रजांच्या ‘स्वप्नाची समाप्ती’  या कवितेतील खालील एका कडव्यावर आम्ही खूपदा बोललो. 

  त्या अशा आहेत

 “ध्येय,प्रेम,आशा  यांची होतसे का कधी पूर्ती, वेड्यापरी पूजितो आम्ही या भंगणाऱ्या मूर्ती” प्रा. मिरजकर यांना विंदा करंदीकर आणि मर्ढेकर यांच्या कवितासुद्धा खूप आवडत असत. त्यामुळे करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा ते खूप सुखावले  होते. 

   आधुनिक कवितांच्याखेरीज  संत कवींमध्ये मिरजकर यांना रस होता. एकदा संत तुकाराम यांच्याबद्दल बोलताना त्यांनी तुकाराम महाराजांचे दोन मूड्स उलगडून दाखविले :  एका निराश मनःस्थितीत ते म्हणतात 

“तुका झाला सांडा विटंबिती पोरे रांडा” 

तर दुसऱ्या एका मनःस्थितीत तुकाराम म्हणतात? “अणुरेणिया थोकडा तुका आकाशाएवढा”

आजूबाजूच्या समाजजीवनात जगताना त्यांना होणाऱ्या आध्यात्मिक साक्षात्कारावर आणि त्यांच्या एकंदर आध्यात्मिक चैतन्यावर  आम्ही बोलत  असू. 

आमच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून प्रा.मिरजकर मला नेहमीच भरघोस पाठिंबा देत असत. माझ्या गंभीर आजारपणात प्रोत्साहन देणारी अतिशय हृदयस्पर्शी पत्रे 

प्रा.मिरजकर  यांनी मला लिहिली होती. माझा अलाहाबाद येथील कार्यकाळ संपल्यावर मी दिल्लीला साऊथ एशियन युनिव्हर्सिटीत शिकवायला लागलो. आम्ही परस्परांच्या संपर्कात होतो पण गेल्या काही वर्षांत आमची प्रत्यक्ष भेट मात्र झाली नाही याची मला खंत वाटते. त्यांच्या जाण्यामुळे आज माझा मनाला  एक रितेपणाची जाणीव होत आहे. ते माझ्या स्मृतीत कायमच राहतील. 

Author

Leave a Reply