विचार आणि भावना

 

       मानवी शरीर हे अत्यंत गुंतागुंतीचे, अजब यंत्र आहे असे म्हणतात. एखाद्या उत्पादनाची अचूक आणि अपेक्षित रूपात निर्मिती करण्यासाठी आधी एका यंत्राची निर्मिती होत असते. कापडाचे तुकडे एकत्र आणून कपडे शिवण्यासाठची बारीकशी सुई हे एक प्रकारचे यंत्र आणि असंख्य सुटे भाग एकत्र आणून अतिभव्य वस्तूचे उत्पादन करणारे साधनही यंत्रच. अशा लहानमोठ्या नवनवीन यंत्रांचा शोध लावत, त्यांत सुधारणा करत आज माणसाने अतिविराट यंत्रे बनविण्यात प्रावीण्य मिळवले आहे; तरीसुद्धा ज्या मानवाने स्वतःच्या प्रयत्नांनी अशी अजस्र यंत्रे निर्माण केली त्या मानवाचे, देवाने म्हणा वा निसर्गाने म्हणा, निर्माण केलेले मानवी शरीर हे सर्वांत गुंतागुतीचे यंत्र आहे यावर जगभरात एकमत आहे.

     माणसाच्या शरीरात लहान-मोठे अनेक भाग म्हणजे अवयव आहेत. त्यांची ठरावीक कार्ये आहेत. ते अवयव आपापल्या नेमून दिलेल्या कामांसाठी एकमेकांवर अवलंबून असतात. प्रत्येक अवयवाने स्वतःचे काम त्याच अचूक पद्धतीने केले, की शरीररूपी यंत्राची क्रमणा व्यवस्थित होत राहते. तसे न घडले तर एकूण व्यवस्थापनात अडथळे येतात, अडचणी निर्माण होतात आणि छोटे आजार वा मोठे रोग होऊन शरीराचे कार्य मंदावते.

     या लेखाच्या शीर्षकाशी या शरीरशास्त्रीय वर्णनाचा काय संबंध असा ‘विचार’ अथवा काहीशा नाराजीची ‘भावना’ वाचकाच्या मनात येणे स्वाभाविक आहे. इथेच ‘मन’ ह्या अमूर्त अवयवाची ‘एंट्री’ होते! डोळ्यांनी पाहून, हातांनी स्पर्श करून, बुद्धीचा आणि पूर्वानुभवाचा वापर करून शरीराच्या अवयवांचा, त्यांच्या नीट चाललेल्या अथवा न चाललेल्या कामाचा ‘विचार’ करता येतो; त्यावर मेंदू नावाच्या अवयवाचे नियंत्रण असते. शरीराच्या व्यवहारावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे परिणाम  करणाऱ्या ‘भावनां’चे उगमस्थान असलेले  मन मात्र प्रत्येकाकडे असले तरी ते कोणालाच दिसत नाही, केवळ परिणामांतूनच त्याचे अस्तित्व जाणवत राहते.

     बुद्धी विचारांना जन्म देते आणि भावना मनात निर्माण होतात असे म्हटले जाते. विचारांचे उगमस्थान बुद्धी  म्हणजे मानवी मेंदू असेल तर भावनेचे उगमस्थान  मन – ते कुठे असते? कोवळे हृदय, कठोर हृदय, पाषाणहृदयी या शब्दांचा अर्थ आपल्याला समजतो. स्पंदनांचे कार्य अविरत करणारे हृदय हा आपल्या शरीराचा दृश्य भाग आहे. हृदय म्हणजेच मन नाही. मन अदृश्य आहे; तरी आपण त्या अदृश्य शक्तीचा विचार का करतो? मनाला इतके महत्त्व का द्यायचे? त्याचे उत्तर असे, की माणसाच्या अस्तित्वासाठी आणि सुयोग्य, अर्थपूर्ण जगण्यासाठी विचार आणि भावना दोन्ही आवश्यक आहेत; एवढेच नव्हे तर त्यांच्यात समतोल असणे अनिवार्य आहे. माणसाने केवळ भावनाप्रधान असून भागत नाही –  त्याने विचारप्रधानही असावे लागते.

     एखादी व्यक्ती कितीही उदार, कनवाळू, प्रेमळ, संवेदनशील वगैरे असली तरी  तिच्या व्यक्तिमत्त्वाला विचारांचा भक्कम पाय लाभला नसेल तर ती व्यक्ती खंबीर अथवा परिपूर्ण असू शकत नाही. त्याउलट, केवळ बुद्धिवादी, तर्ककठोर, अतिविचारप्रधान माणूस रुक्ष आणि एककल्ली ठरतो म्हणूनच बुद्धिजन्य, तर्कसंगत विचार आणि संवेदनशील मन ह्या दोन खांबांवर माणसाचे जीवन आधारित असावे अशी सार्थ अपेक्षा असते. 

     तर्क म्हणजे तरी काय? आपण सहजच म्हणतो, “मी असा तर्क केला, की….” हा तर्क म्हणजे अनुमान; परंतु तर्कशुद्ध विचार किंवा तार्किक मांडणी म्हणजे ‘लॉजिकल थिंकिंग.’ लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र. यात ठरावीक शास्त्रशुद्ध सुसंगतता असते – असावी लागते. अनुमान कोणतेही, कोणत्याही दिशेने, कसेही असू शकते कारण ते शास्त्रावर आधारित असेलच असे नाही. शास्त्राचे पाठबळ असलेला सुसंगत विचार मांडला जातो, त्याचा प्रसार करता येतो, तो परिणामकारक होतो, त्यामुळे मान्य होतो आणि म्हणूनच तो टिकून राहण्याची शक्यता असते.

     प्रत्यक्षात मात्र आपला सर्वांचा अनुभव असाच आहे, की विचारापेक्षा माणसे भावनेला अधिक महत्त्व  देतात. भावना विचारांवर स्वार होते. दीर्घकालीन परिणामांची क्षिती न बाळगता तात्पुरता स्वार्थ साधण्यासाठी आपणच आपल्या भावनांना आपल्याच विचारांचा ताबा घेऊ देतो. आधी म्हटल्याप्रमाणे भावना हा जीवनाचा अविभाज्य भाग आहेच; परंतु आयुष्यात कोणत्या भावनांना केव्हा आणि किती स्थान द्यायचे हा विचार त्याहून अधिक महत्त्वाचा आहे. कारण, अनेक व्यक्तींचे मन मिळून समाजमन बनते आणि समाजांचे मन मिळून राष्ट्रीय मन बनत जाते. 

     ‘भारतीय मन’ नामक चीज अशीच आहे. प्रांतोप्रांती पसरलेल्या कोट्यवधी भारतीयांच्या मनाचा एक समान धागा शोधू गेलो तर असे सापडेल, की भारतीय मनाला भावनांना हात घातलेला फार आवडतो. भारतीयांच्या भावनांना उत्तेजित करणे फार सोपे आहे. कोणत्याही फुटकळ कारणाने, प्रसंगाने, भारतीय मने ‘पेटून उठतात’ आणि तेवढीच पटकन ‘विझून थंड होतात.’ भारतीय मनाचा हा एक प्रकारचा आवडता खेळ आहे असे म्हटले तर ते धारिष्ट्याचे वा वावगे ठरू नये. विचारांवर शाश्वततेची जितकी जबाबदारी असते तितकी भावनांवर असेलच असे नाही. भावनांना रंग असतात. त्यांच्या भिन्न भिन्न छटा असतात त्यामुळे त्या एकमेकींत मिसळल्या जातात, क्वचित त्यांचा गुंतासुद्धा होऊ शकतो म्हणूनच त्या सहजच भडकावल्या जातात. त्यांचा उद्रेक होतो किंवा घडवून आणला जातो.

     विचाराचे तसे नसते. विचार कळायला, रुजायला, मान्य व्हायला, अंगीकारायला वेळ लागतो; पण तो एकदा ठसला की त्याचा कायमचा ठसा उमटतो. प्रासंगिक रांगोळीसारखा तो सहजच पुसला जात नाही.

     म्हणूनच ज्या देवाने अथवा निसर्गाने माणूस नावाचे ‘अजब’ यंत्र निर्माण केले त्या यंत्राची ‘आचार-विचार’ ही दोन चाके आहेत. आचार म्हणजे आपली वागणूक, आपण करतो ते व्यवहार आणि विचार म्हणजे ते आचार घडवून आणणारी प्रेरणा आणि ऊर्जा. मानवनिर्मित यंत्रे पाणी, वीज, सौरशक्ती, खनिज तेले अशा अनेकविध ऊर्जांद्वारे  चालवली जातात.  माणूस नावाचे यंत्र विचार आणि भावना या शक्तींद्वारे संचालित असते. या दोन्हींच्या समतोलावरच माणूस आपले जीवन नामक विहित-कार्य नेटकेपणाने करण्यात यशस्वी होतो.

     प्रतिभावान कवी गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी  ‘श्रीमहाराष्ट्र गीत’ या सुप्रसिद्ध, लोकप्रिय कवितेत महाराष्ट्राला प्रणाम करत म्हणतात… 

“राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा |

नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा| 

अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा |

बकुलफुलांच्या प्राजक्तीचा दळदारी देशा 

भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा| 

शाहीरांच्या देशा,कर्त्या मर्दांच्या देशा ||”

कोमलता अणि कठोरपणा यांचा इतका सुरेख संगम दुसरीकडे सापडेल का?

     गेल्या काही काळात मात्र हाच महाराष्ट्र आणि त्यातील महाराष्ट्रीय म्हणवणारे लोक संतांची भूमी, स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, टिळक-रानडे-गोखल्यांचा बुद्धिवादी महाराष्ट्र, शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र, सावित्रीच्या लेकी…अशी आणि असली अतिशय अर्थगर्भ उदाहरणे चलनी नाण्यांसारखी वारंवार, उठसूट, जिथेतिथे अक्षरशः ‘वापरून घेत’ गुळगुळीत, पोकळ करून टाकत आहेत. या काळात वारंवार ऐकू येणारा ‘मर्द असाल तर’ हा जप म्हणजे तर एक मोठा विनोदाचा भाग झाला आहे. 

 पुरोगामी विचारांवर सवंग भावनांनी ताबा मिळविल्याचेच हे चिन्ह नव्हे काय?

     आपल्या भोवताली घडलेल्या नजीकच्या भूतकाळातल्या घटनांचा ‘विचार’ करता, आपल्या नजीकच्या भविष्यकाळात काय वाढून ठेवले आहे अशी काळजीची ‘भावना’ मनात आल्यावाचून राहत नाही.

                                                                            ***** 

                                                                                                       

Author

Leave a Reply