चिंता रोग…मनात उसळलेली दंगल
माझ्या पहिल्या लेखाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. मानसिक आजारांची ओळख तर आपली झालीच आहे. सध्या परीक्षांचा काळ असल्यामुळे यावेळी चिंतारोग म्हणजेच स्ट्रेस हा विषय घेत आहे.
“डॉक्टर मला खूप अस्वस्थ वाटतंय; काही सुचतच नाही; खूप टेंशन आलंय.” साधारणपणे ४५ वर्षे वयाचे जोशीकाका त्यांच्या पत्नीसोबत माझ्यासमोर बसले होते. सतत सुस्कारे सोडत होते. कपाळावर आठ्या डोळ्यांवर ताण स्पष्ट दिसत होता. मधूनच ठसका लागल्यासारखे घसा खाकरत होते. बसल्या जागी सतत चुळबुळ सुरू होती. उठत होते – बसत होते. त्यांची बेचैनी न सांगताही काळात होती. बरेच दवाखाने फिरून झाले होते. साध्या डॉक्टरांपासून ते स्पेशालिस्ट डॉक्टरांपर्यंत सगळ्यांचा सल्ला घेऊन झाला होता. परंतु जोशीकाकांचे समाधान होत नव्हते. त्यांना बरं वाटत नव्हतं आणि गंमत म्हणजे तपासण्या – अगदी रक्त, लघवीपासून EKG,सोनोग्राफी 2 D Echo पर्यंत – सगळ्या झाल्या होत्या पण कशातही दोष दिसला नव्हता.
जोशी काकूंनी बोलायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, “डॉक्टर सर्व काही व्यवस्थित सुरू होतं, कोणतीही समस्या, भांडण, संकट काहीही नव्हतं; पण गेल्या २ महिन्यांपासून हा त्रास सुरू झाला आहे. सुरुवातीला लहानसहान गोष्टींवरून चिडचिड करायचे, कामात लक्ष लागत नाही म्हणायचे, तोंडाला कोरड पडायची म्हणून सारखं पाणी प्यायचे पण आम्ही कोणीच मनावर घेतलं नाही. पण आता त्रासाचं प्रमाण वाढलंय. गेल्या १५ दिवसांपासून घरात बसून आहेत. भूक – झोप सगळं कमी झालंय. छातीची धडधड वाढली आहे. आम्ही खूप दवाखाने, डॉक्टर केले परंतु या त्रासातून बाहेर पडणं तर दूरच पण दिवसेंदिवस हा त्रास वाढतच चाललाय. शेवटी यांच्या ऑफिसमधल्या कोणीतरी मानसोपचारतज्ज्ञांकडे जा असा सल्ला दिला म्हणून आता तुमच्याकडे आलोय. काहीही करा पण यांना या त्रासातून बाहेर काढा.”
वर उल्लेख केलेलं हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. चिंता, काळजी सर्वांनाच असते. ठरावीक मर्यादेपर्यंत काळजी वाटणं किंवा ताण जाणवणं फायद्याचं असतं कारण त्यामुळे आपली कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. पण जेव्हा ही काळजी अवास्तव चिंतेचं किंवा भीतीचं रूप घेते तेव्हा त्या व्यक्तीला बऱ्याच त्रासांना तोंड द्यावं लागतं आणि ही काळजी किंवा चिंता न राहता चिंतारोग म्हणजेच Anxiety disorder या मानसिक आजाराचं रूप घेते.
उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, मेंदूचे काही विकार यांपासून ते पचनसंस्थेचे आजार, विशिष्ट त्वचारोगसुद्धा या चिंतारोगाने उद्भवतात. तलावात जलपर्णीचं एक पान असतं तेव्हा कोणी लक्ष देत नाही पण थोड्याच दिवसांत ती जलपर्णी तो संपूर्ण तलाव आपल्या जाळ्यात ओढून घेते. माणसाचं मनही असंच चिंतारोगामुळे झाकळून जातं. आजकाल सगळीकडे चर्चा असते ती म्हणजे धकाधकीच्या जीवनाची; मग ते लहान गाव असो किंवा स्मार्ट सिटी, शाळकरी मूल असो, नोकरदार असो, व्यावसायिक असो किंवा गृहिणी! प्रत्येकजण शर्यतीमध्ये भाग घेतल्याप्रमाणे जीव तोडून धावत असतो कशाच्यातरी मागे… सतत स्वतःच्या मनाला स्पर्धेत टिकून राहण्याची भीती घालत असतो. या स्पर्धेची जननी असते ती म्हणजे अवास्तव अपेक्षा! या अवास्तव अपेक्षांचं ओझं आपणच आपल्या डोक्यावर लादलेलं असतं आणि दिवसेंदिवस ते ओझं वाढत कसं राहील याची आपण पुरेपूर काळजी घेत असतो. एक दिवस हे सगळं आपल्या मनाला असह्य होतं आणि आपलं मन बंड पुकारतं.
अरे बापरे!! मन बंड पुकारतं? मग ते आपल्याला समजत कसं नाही? स्वतःच्या मनाला त्रास होतोय हे निदान स्वतःला तरी समजलं पाहिजे ना? जरा विचार करा, आपण आपल्या मनाचा खरंच गांभीर्याने विचार करतो का? स्पर्धा, महागाई, महिना-अखेर, रिझल्ट, प्रमोशन, प्रगती या सगळ्यात आपण इतके गुंतून पडतो की मन नावाचं काहीतरी आपल्या शरीरात आहे हेच आपण पूर्णपणे विसरून जातो.
आपलं मन सुरुवातीला मूक मोर्चा काढतं. आपल्याला अस्वस्थ बेचैन वाटू लागतं. नक्की काय होतंय ते काही कळत नाही; पण काहीतरी बिनसलंय असं वाटायला लागतं. परंतु आपल्या तब्येतीवर आणि परिणामाने आपल्या कार्यक्षमतेवर काही दुष्परिणाम होत नसल्याने आपण सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष करतो.
मूक मोर्चाचंसुद्धा असंच काहीसं होतं ना? रस्त्यावरून जेव्हा हा मूक मोर्चा किंवा Candle March निघतो तेव्हा इतर नागरिक, सुरक्षा व्यवस्था आणि शासनकर्ते जसा कानाडोळा करतात अगदी तसंच! मग मन काही दिवस धीर धरतं; वाट पाहतं; पण आपली जीवनशैली, स्वभावदोष बदलायला आपण तयारच नसतो. मग मन पुढचं पाऊल उचलतं. घोषणाबाजीला सुरुवात होते. छे! काहीतरीच! मन कशा काय घोषणा देईल? मनाच्या घोषणा म्हणजे राग…संताप…! पण मन लगेच टोकाची भूमिका घेत नाही बरं का…
प्रथम अस्वस्थतेची तीव्रता वाढते आणि ती चिडचिडीचे रूप घेते. कोणत्याही कामात लक्ष लगत नाही; एकाग्रता कमी होते; वारंवार बारीकसारीक चुका व्हायला लागतात. चिडचिड हळूहळू रागामध्ये बदलते आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडायला लागतात.
थोडासाही गोंधळ सहन होत नाही… टीव्हीचा आवाज, मुलांचा आवाज, मोबाईलची रिंग – कशाचाही आवाज सहन होत नाही. डोकं दुखायला लागतं… डोक्याला झिणझिण्या येतात. झोप आणि भूक दोन्हीमध्ये बिघाड होतो. आपल्यापैकी काहीजण या बदलांकडे लक्ष देतात. थोडे दिवस विश्रांती घेतात; पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या.जेव्हा घोषणा देणारा मोर्चा निघतो त्या वेळी असंच होतं ना… एक – दोन दिवस चर्चा, मिडिया कव्हरेज इ. इ. पण काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे! आता मात्र मनाचा हा मोर्चा मवाळवादाकडून जहालवादाकडे वळायला लागतो… पुढची पायरी म्हणजे मोडतोड, जाळपोळ वगैरे. म्हणजेच अत्यंत नुकसानदायक… तेव्हा मनात उसळलेली दंगल दिसायला लागते.
निद्रानाश, विचित्र आणि अनेक शारीरिक दुखणी, छातीतील धडधड वाढणे, कोणत्यातरी गंभीर आजाराची भीती वाटणे, थोडं काही मनाविरुद्ध झालं की डोकेदुखी, चक्कर येणे इ. इ., पित्ताचे लघवीचे अगदी शौचाचेसुद्धा विचित्र त्रास सुरू होतात. लघवी/ शौचास सारखे सारखे जावे लागते… (माझ्याकडे आलेल्या एक चिंतारोग असणाऱ्या मुलीला दिवसातून १५-२० वेळा शौचास जावे लागायचे… आणि चिंतारोगावरील औषधोपचार सुरू करताच तिचे हे प्रमाण आठवड्याभरात दिवसात १५-२० वरून २-३ वेळापर्यंत कमी झाले. खरे उदाहरण – अतिशयोक्ती नाही.)
तोंडाला, घशाला कोरड पडते,चहा/कॉफी/तंबाखू/मिश्री याचं सेवन वाढतं. चेहरा सतत तणावाखाली असल्यासारखा दिसू लागतो… सगळ शरीर आखडून गेल्यासारखं वाटत. हे सर्व त्रास होत असताना आपण त्यातल्या त्यात फक्त शारीरिक दुखण्याकडेच लक्ष देतो. उदा.: पोटाचे त्रास, पित्ताचे त्रास, छातीमधील धडधड वाढणे, घाम येणे, जुलाब इ. इ. आणि त्यासाठी शरीरशास्त्रावरील तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातो. तक्रारींनुसार शरीराची वैद्यकीय तपासणी होते. परंतु विशिष्ट निदान करण्यास आवश्यक लक्षणे आढळून येत नाहीत. त्यामुळे मग आवश्यक – अनावश्यक तपासण्या कराव्या लागतात… बहुतांश वेळा डॉक्टरांपेक्षा रुग्णच मागे लागून उपलब्ध असणाऱ्या सगळ्या तपासण्या करून घेतात आणि शारीरिक आजार नसल्यामुळे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात. अशा वेळी डॉक्टर तक्रारींप्रमाणे तात्पुरती औषधे देतात. काही दिवस बरे वाटते; पण पुन्हा त्रास सुरू होतो मग सुरू होते दवाखान्याची वारी. सतत डॉक्टर बदलले जातात; पुन्हा पुन्हा तपासण्या केल्या जातात. कुठेच पक्कं निदान होत नाही. भरपूर वेळ, शक्ती आणि पैसा खर्च करूनही त्रासातून मुक्तता मिळत नाही. मन आतून म्हणत असतं, की अरे आतातरी माझ्याकडे लक्ष द्या… पण नाही! आपण जातो देवऋषी किंवा पत्रिका पाहणाऱ्याकडे… साडेसाती, नजरदोष, गंडेदोरे, शांती इ. इ. नाना प्रकारांत वेळ- पैसा सगळं वाया घालवतो. मग कोणीतरी हितचिंतक आपल्याला सुचवतो, ‘अरे एकदा मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊन ये.’ मग चर्चा सुरू होते, “मला काय वेड लागलाय का वेड्याच्या डॉक्टरकडे जायला? जे मोठ्या मोठ्या डॉक्टरांना जमलं नाही, ते या वेड्यांच्या डॉक्टरला काय समजणार? मला झोपेच्या गोळ्या देतील…मला तसल्या गोळ्यांची सवय लागेल… तसल्या गोळ्या खाऊन मी वेडा होईन, माझी किडनी खराब होईल, लोक मला हसतील. माझी बदनामी होईल…” इ. इ. तरीसुद्धा लपत छपत जेव्हा मानसोपचारतज्ज्ञाकडे आपण जातो तेव्हा आपली नकारघंटा सुरू असते.
लोकांची मला फार गंमत वाटते, इतर डॉक्टरांसमोर त्यांचा रुग्ण त्याच्या शरीराच्या कुठल्या कुठल्या भागाचे त्रास सविस्तर सांगत असतो… पित्त, उलटी, शौच इ. इ.चे रंग, त्यामधील घटक, त्यांचा वास…सगळं अगदी सविस्तर कौतुकाने आणि डॉक्टरांनी न विचारता सांगत असतात; पण मानसिक त्रास मात्र एखाद्या वाक्यातच सांगितला जातो. मनाला होणाऱ्या क्लेशांबद्दल बोलताना विनाकारण कमीपणा वाटतो; पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की सगळे खरे न सांगितल्याने त्यांचेच नुकसान होत आहे. आम्हांला म्हणजे मनोविकार आणि मानसोपचारतज्ज्ञांना रुग्णाने जरी प्रत्येक प्रश्नाचे नाही असे उत्तर दिले तरी त्याच्या त्रासाची कल्पना आलेली असते; पण रुग्णाने स्वतः मोकळेपणाने सगळे सांगावे याची आम्ही वाट पाहत असतो. आमच्याकडे येईपर्यंत रुग्णाच्या त्रासाला ४-५ महिन्यांचा काळ लोटलेला असतो. त्यातच मानसिक आजारांवरील औषधांचा अपेक्षित परिणाम दिसायला जरा वेळ लागतो. बरेच महिने त्रास सहन करत असल्यामुळे रुग्णाचा धीर सुटत चाललेला असतो; पण जे धीर धरतात ते तरतात!
मनोविकार आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधोपचार आणि शास्त्रोक्त समुपदेशन घेतल्यामुळे मन सावरतं आणि बहरतंसुद्धा! मनाच्या दंगलीने जर जाळपोळ आणि तोडफोड करायला सुरुवात केली तर दीर्घकाळ चालणारी औषधे अथवा क्वचित प्रसंगी दवाखान्यात admit करण्याशिवाय पर्याय राहत नाही!
मागच्याच आठवड्यात एक उच्चशिक्षित आणि बहुश्रुत व्यक्ती ताणताणाव जाणवत असल्याने तपासणीस आली होती. खरं म्हणजे त्याचा मित्र त्याला घेऊन आला होता. दोघे केबिनमध्ये आले, बसले. औपचारिक बोलणे झाल्यानंतर मी म्हणाले, “बोला काय झालंय?” तो म्हणाला, “काही नाही.”
“डॉक्टर स्ट्रेस आहे थोडासा; सकाळपासून जरा बेचैन वाटायला लागलं म्हणून हृदयरोग तज्ज्ञांकडे जाऊन आलो. माझा मित्रच आहे ना तो , शाळेत एकाच वर्गात होतो. त्याने सगळी शारीरिक तपासणी केली ECG काढला; पण कशात काही दोष नाही. तो म्हणाला, ‘एकदा उत्पात madam चा सल्ला घे, म्हणून आलो.’ मी म्हणाले, ‘जेव्हापासून बेचैन, अस्वस्थ वाटतंय तेव्हापासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून सगळे सविस्तर सांगा.’ त्याची जरा टाळाटाळ सुरू होती; पण सोबत आलेल्या मित्राने त्याला खडसावलं आणि सगळं खरंखरं सांगायला लावलं. मग त्याचे एकेक त्रास आणि त्यामागच्या घटना बाहेर यायला लागल्या. घरात बायको आणि आईची भांडणं, हा कामानिमित्त बाहेर असल्याने नवरा-बायकोमध्ये आलेला दुरावा, व्यवसायात आलेलं अपयश, आर्थिक फसवणूक इत्यादी इत्यादी. बोलताना चिंतारोगाची मी वर लिहिलेली सर्व लक्षणे होती; पण मन मोकळं करत असताना कधी त्याचे अश्रू वाहायला लागले हे त्यालादेखील कळलं नाही. त्याच्या बोलण्यात नकारात्मक विचार दिसून येत होते. मनात निराशा दाटली होती. एकटेपण जाणवत होते. कामातील एकाग्रता जवळजवळ नाहीशी झाली होती. अनेक गोष्टी विसरत होता.
आम्ही जेव्हा उपचारांकडे वळलो तेव्हा तो म्हणाला, “डॉक्टर मी आर्ट ऑफ लिविंगचे सर्व कोर्स केले आहेत. मी ध्यानधारणा, ताणतणाव नियोजन, सकारात्मक विचारपद्धती यांवरील पुस्तके सतत वाचतो. मनावरचा ताण कमी करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सगळं करतोय पण त्याचा मला फायदा का होत नाही? मी यातून कधी बाहेरच पडणार नाही का?”
मी म्हणाले तुम्ही यातून नक्की बाहेर पडाल आणि पुन्हा एकदा एक अगदी निरोगी आयुष्य जगाल! फक्त थोडा धीर धरा. सर्वप्रथम इरेला पेटल्यासारखे हे जे तुमचे प्रयत्न आहेत ते थांबवा. ताणतणावामधून बाहेर पडण्याचा जो अवाजवी हट्ट तुम्ही धरला आहे तो सोडा.
जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी ताणतणाव निर्माण करणारी परिस्थिती तयार होते तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काळजी, चिंता, भय, चिडचीड अशा नकारात्मक भावना असणारी विचारप्रणाली सुरू होते आणि सध्या तुम्हांला होणारे मानसिक शारीरिक त्रास जाणवायला लागतात आणि हळूहळू या सर्वांचं एक दुष्टचक्र तयार होतं. कोणत्याही मानसिक त्रासाची जेव्हा सुरुवात असते किंवा तो अगदी सौम्य स्वरूपाचा असतो त्या वेळी व्यायाम, योग, ध्यानधारणा, वाचन, संगीत, हवाबदल अशा औषधेतर उपायांनी कधीकधी फरक पडतो; पण जेव्हा मानसिक त्रासाची तीव्रता वाढते त्या वेळी या उपायांचा फारसा फायदा होत नाही. चिंता, ताणतणाव, निराशा यांचा मनावर आणि पर्यायाने मेंदूच्या काही ठरावीक कार्यक्षमतेवर दुष्परिणाम झालेला असतो. मनाची सहनशीलता कमी झाली असते. मन एकाग्र होत नाही आणि त्यामुळे आपल्या लक्षात काही राहत नाही. अशात आपण आणखी मनावर या सगळ्यांचा मारा केला तर मानसिक त्रासाची तीव्रता आणखीनच वाढायची शक्यता असते. त्यामुळे मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचा ताणतणाव, चिंतारोग ज्या वेळी जाणवतो त्यावेळी मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याने शास्त्रोक्त औषधोपचार घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणेच योग्य असते.
योग्य वेळी आम्ही रुग्णांचा दिनक्रम आखून देतो, त्यामध्ये आवश्यक ते बदल करतो, ध्यानधारणा, योग कधी सुरू करायचा तेसुद्धा सांगतो. आहाराचेदेखील पथ्य असते. सात्त्विक आहार , नियमित फळे आणि पालेभाज्या यांचा समावेश महत्त्वाचा असतो. तंबाखू खाल्ल्याने, सिगारेट ओढल्याने किंवा दारूचे सेवन केल्याने कोणताही स्ट्रेस कमी होत नाही; फक्त काही वेळासाठी आपण बेफिकीर होतो, त्यामुळे आपल्याला हलके-हलके वाटते; त्यामुळे कोणत्याही अमली पदार्थाचे सेवन करणे पूर्णपणे निषिद्ध आहे.
बरं तुम्ही म्हणाल, ‘डॉक्टर तुमचं सगळं आम्हांला मान्य आहे, पण स्ट्रेस जाणवूच नये यासाठी काय करायचं? जशी काही आजारांना रोगप्रतिबंधक लस असते तसं चिंतारोगाला काही लस नाही का?’
आहे ना! नियमित व्यायाम, योग्य आहार यांसोबतच चांगल्या सवयी, एखादा चांगला छंद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला विश्वासाने मनमोकळं बोलता येईल आणि आपल्याला योग्य सल्ला देईल असा खरा मित्र / मैत्रीण असणं या गोष्टी प्रत्येकाने आत्मसात करायला हव्यातच; पण त्याहीपेक्षा आणखी महत्त्वाचे म्हणजे अवास्तव अपेक्षांचे ओझे घ्यायचे नाही. अवास्तव अपेक्षांबद्दल आपण पुन्हा कधीतरी चर्चा करू या! आज इतकेच!
जाता जाता मानसिक स्वास्थ्य या वैद्यकीय शास्त्राची विद्यार्थिनी म्हणून एक विनंती वजा सल्ला देते :
आपलं मन खूप हुशार आणि समजूतदार असतं. म्हणूनच मनाचा सिग्नल पिवळा असतानाच ओळखावा आणि तो सिग्नल लाल होण्यापूर्वीच मनोविकार अन् मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी. शेवटी मन निरोगी तरच शरीर निरोगी आणि आयुष्य रंगीबेरंगी.
