पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ अप्पासाहेब वझे(पु.रा.वझे) यांचे १ ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ इ.स.१९६३पासून या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा चालू केल्या आणि त्या स्पर्धांमधून विजयी होणाऱ्या संघाच्या कॉलेजला पुरस्कार म्हणून, पुरुषोत्तम करंडक देण्यास सुरुवात केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असल्याने एक प्रकारे नाट्यसृष्टीचे भविष्य काय व कसे असणार आहे त्याचे सूचन करणारी अशी ही स्पर्धा म्हटली पाहिजे. या स्पर्धेचा एकंदरीत दर्जा गेली काही वर्षे खालावत आहे असे अनेक ज्येष्ठ रंगकर्मी बोलून दाखवतात. गेल्या काही वर्षांत एकदा पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक त्या दर्जाची एकांकिका न मिळाल्याने दिले गेले नव्हते.
चं. प्र. देशपांडे हे ज्येष्ठ मराठी नाटककार आणि विचारवंत आहेत. आतापर्यंत अनेक कविता आणि तीसहून अधिक नाटकांचे लेखन देशपांडे यांनी केले असून नाट्यलेखनासाठी त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा दातार पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा राम गणेश गडकरी पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. देशपांडे यांनी लिहिलेल्या विविध नाटकांचे प्रयोग मराठी आणि इतर भारतीय भाषांमधूनही होत असतात.या वेळी पुरुषोत्तम करंडक पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी अध्यक्षीय भाषण करताना देशपांडे यांनी काही प्रस्थापित संकल्पनाबद्दल खूप वेगळे विचार मांडणारे एक भाषण केले; ते अंतर्नाद वाचकांसाठी देत आहोत : संपादक.
पुरुषोत्तम करंडक २०२४ – पुणे केंद्रातल्या अंतिम फेरीचे पारितोषिक वितरण
( अध्यक्षीय भाषण )
– चं. प्र. देशपांडे.
कै. राजाभाऊ नातूंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. सुरुवातीला त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. खानोलकर माझे मित्र होते. त्यांच्या नाटकांच्या निमित्ताने मी एक-दोनदा राजाभाऊंना भेटलो होतो; त्यामुळे त्यांचे नाटक-प्रेम मी जवळून पाहिलेले आहे. महाराष्ट्रातला हा एक खूपच महत्त्वाचा सांस्कृतिक उपक्रम त्यांनी सुरू केला हे मोठे काम आहे. त्याचप्रमाणे ही धुरा वाहून पुढे नेत राहणाऱ्यांचेही महाराष्ट्रावर मोठे ऋण आहे.
महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, इतर सदस्य, कार्यकर्ते, कलाकार तसेच या स्पर्धेचे मान्यवर परीक्षक, उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनो, सर्वांना सप्रेम नमस्कार.
खूप मोठे भाषण करायचा माझा विचार नसला तरीही, माझ्यासारख्या, नाट्यक्षेत्रात ५०-६० वर्षे काम केलेल्या लेखकाला तुमच्यासारख्या ऊर्जायुक्त नव्या पिढीशी संवाद साधायची अशी संधी मिळते तेव्हा काही विचार वा मुद्दे मांडले जाणे अस्थायी ठरणार नाही. मराठी नाटकाची काय अवस्था आहे? नवरा-बायको संबंधांतली काही विनोदी नाटके किंवा मग रहस्यमय नाटके. अशा नाटकांनी करमणूकही मिळते आणि जगण्यातल्या प्रश्नांना सामोरे जाणे टाळताही येते. आपण मराठी लोक सांस्कृतिक दृष्ट्या डल – मद्दड आहोत. काही विनोदी लेखकांनी आपल्याला सांगितलेले आहे की ‘बाबा, दिवासभरचे व्यापताप आणि ताणतणाव यांनी तू थकलेला असतोस, नाटक बघायचे तर एखादे विनोदी नाटक बघ आणि एरवी घरी पोचल्यावर एखादी मालिका बघ, जेवण कर आणि झोप!’ आणि हे मराठी समाजाला पटलेले आहे. जगात जणू फक्त यांनाच असतात ताण! प्रायोगिक नाटकाला तर मुळातच प्रेक्षक कमी असतो. आता ते नाटक बदललेही असून एकूणच खर्चीकही झालेले आहे. प्रायोगिक नाटकाला स्वतः इंटरेस्ट घेऊन जाणारे काही असतील पण मुख्यतः भीक मागितल्याप्रमाणे त्यांना नाटक पाहायला बोलवावे लागत आहे. व्यक्तिगत विनंत्या कराव्या लागत आहेत. नाटक, साहित्य, कला ही जगणे समजून घेण्याची माध्यमे वा प्रक्रिया आहेत असे गंभीर महत्त्व मराठी माणूस या गोष्टींना देत नाही. हे एकूण स्वरूप जरा जास्तच बिघडलेले असले; तरी गेली अनेक वर्षे आपले नाटक आणि साहित्य हे खुजेच राहिलेले आहे. असे का झाले असावे या बाबतीतल्या माझ्या चिंतनातले काही मुद्दे मी तुमच्यासमोर मांडणार आहे. माझे आकलन तुम्ही स्वीकारावे असे नाही पण हे मुद्दे तुमच्याही चिंतनात असायला हवेत असे मला वाटते; त्याशिवाय ही कोंडी फुटणार नाही.
‘वास्तववाद’ या मराठीतल्या सिंहासनाधिष्ठित मुद्यापासून सुरुवात करू. काय असते वास्तव म्हणजे? ती वस्तुनिष्ठ अशी काहीही गोष्ट नसते. प्रत्येकाचे व्यक्तिगत वास्तव वेगवेगळे असते. वेळोवेळी आणि वर्तमानात दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांचा तो एक साठा असतो. ‘बिढार’मधल्या रत्नागिरीकर या पात्राकडे तो लेखक जसे पाहतो तसेच इतर कुणी पाहतील असे नसते. या अर्थाने एकच एक ‘सत्य’ वास्तव असे मुळात अस्तित्वातच नसते. तरीही, मराठीत याला ‘अवास्तव’ महत्त्व आहे. स्वतःच्या प्रतिक्रिया या फार मौल्यवान आहेत असे समजणारे लेखक स्वतःचे वास्तव ‘आहे तसे’ अभिव्यक्त करत राहतात. हुशारी असेल, विद्वत्ताही असेल पण त्यामुळे कुणाच्याही प्रतिक्रियांना तौलनिक महत्त्व येऊ शकत नाही. या अर्थाने, मुळात अस्तित्वातच नसलेल्या तथाकथित वास्तवावर आधारित ही प्रणाली वा मूल्यधारणा निरर्थक ठरते. एकजण म्हणाले की आता वास्तव इतक्या वेगात बदलत आहे की ते समजून घेऊन कलेत व्यक्त करेपर्यंत ते जुने होते आहे. मला ही समस्या खोटी दिसते. कोणतेही वास्तव जर ‘सत्य’ असूच नाही शकत तर ते समजणे वगैरे निरर्थक ठरते. कोणत्याही लेखकाने त्याचे वास्तव अभिव्यक्त करणे हे दुसऱ्या कुणाच्याही जगण्यात कशासाठी मौल्यवान ठरेल? प्रत्येकाचा वास्तवाचा दर्जा वा मूल्य कोण कसे ठरवणार? सारांश, हे असले वास्तववादी साहित्य वा कला ही वाचकाला वा प्रेक्षकाला जमल्यास करमणुकीपेक्षा काही देऊ शकत नाही. असल्या वास्तववादाचा पुरस्कर्ता लेखक हा इतर सर्व माणसांपासून तुटलेला असतो. मराठी साहित्य आणि कला वर्षानुवर्षे या असल्या बालिश कल्पनेला बांधलेली असणे हे तिच्या खुजे असण्याचे एक कारण आहे. अशा वास्तववादाला जखडलेला लेखक वा कलाकार इतर सर्वांबरोबर काही समजून घेण्याची वा आकलनाची प्रक्रिया घडवू शकत नाही. त्याच्याकडे जे आहे ते मांडणे एवढेच तो करत असतो.
यालाच जोडून आता ‘समकालीनता’ ही कल्पना पाहू. घड्याळाचा काळ फक्त समकाल असू शकतो, बाकी प्रत्येक व्यक्तीचा समकाल वेगळा असतो; त्यामुळे ‘समकालीन’ लेखन असा काही पदार्थ असू शकत नाही. ही फारशी महत्त्वाचीही बाब नाही, हे अनेक उदाहरणांवरून दाखवता येते. हॉपकिन्सच्या कविता त्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी प्रकाशित झाल्या आणि त्या महत्त्वाच्या ठरल्या. काफ्काची ‘ट्रायल’ ही कादंबरीही त्याच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी प्रकाशित झाली आणि ती कोणत्याही समकालात नव्हे तर सर्व काळात मानवजातीला महत्त्वाची वाटते. समकालीन या खोट्या तत्त्वाचे महत्त्व कोण माजवते? – तर तात्कालिक समस्यांवर किंवा सामाजिक, राजकीय समस्यांवर लेखकांनी भूमिका घेऊन स्वमतयुक्त लिहिले पाहिजे असा आग्रह धरणारे लोक. इथे एक पाहायला हवे की विभूतिपूजक वा नायक-खलनायक टाईपचे लेखन हे फारसे महत्त्वाचे ठरत नाही – त्यातली पात्रे – मग छ. शिवाजी महाराज असोत की आंबेडकर की फुले की टिळक वा तसे कुणीही; कारण त्यात आधीच वैचारिक निष्कर्ष तयार असतात. जगण्यातला जिवंत प्रवाह नसतो. मानवी नात्यांतली गुंतागुंत, अटळता, त्यातल्या अनपेक्षित रचना यांचा आवाका घेणे हे तिथे घडत नाही. तशा एका भूमिकावाल्या नाटकाचे उदाहरण द्यायचे झाले तर
‘उद्ध्वस्त धर्मशाळा’चे देता येईल. ते भूमिकावाले नाटक आहे. विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी फुगवत नेलेला तो एक फुगा आहे; शिवाय मराठीत डॉ.लागूंनी आणि हिंदीत ओम पुरींनी काम केल्यामुळे त्याला एक ग्लॅमर प्राप्त झालेले आहे. सर्व मानवांना महत्त्वाचे ठरावे अशा सांस्कृतिक दृष्टीने ते नाटक नापास ठरते. जगातले अनेक कलावंत, लेखक, कलाकार, चित्रकार यांनी कलेतले व्यक्तिगत घटक टाकून त्या अवधानात कलाकृती निर्माण होतात असे म्हटले आहे; परंतु आहे त्याच डबक्यात डुंबत राहू इच्छिणारे आत्मतुष्ट लोक हे फेटाळून लावतील, हे उघडच आहे. त्यांच्या दृष्टीने त्या थापा ठरत असल्याने आणि ते लौकिक ताकदवर असल्याने मराठीवर त्यांचा सतत प्रभाव पडत राहिलेला आहे. समकालीनतेच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. एखाद्या नाटकात फक्त लँड लाइन फोन आहे आणि मोबाईल नाहीत म्हणून ते नाटक जुने वा कालबाह्य ठरत नाही. कोणत्याही नाटकातल्या वास्तवाशी प्रेक्षकाने स्वतःला जोडून घ्यायचे असते. ही तर कलेतली प्राथमिक अट आहे. नाटकात आकलनाची जिवंत प्रक्रिया नसेल तरच ते कालबाह्य होते. ती प्रक्रिया असेल तर ते कधीच कालबाह्य होत नाही. यामुळेच नाटकातले वास्तव आपल्या काळाशी फारसे मॅच होत नसूनही जगातल्या मोठ्या कलाकृतींच्या आपण संपर्कात येतो.
यानंतरचा मुद्दा आहे ‘अनुभव.’ अनुभव म्हणजे प्रत्येकाचा स्मृतीसाठा आणि त्यातून होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया. हा वास्तववादाचाच भाऊ. त्यामुळे, तेच स्पष्टीकरण पुन्हा इथे देत बसत नाही. एकमेकांचे अनुभव एकमेकांवर थोडेफार प्रभाव पाडू शकतील पण त्यात सांस्कृतिक म्हणावे असे काही असणार नाही. सांस्कृतिक म्हणजे जगण्याचे जंजाळ समजण्याची प्रक्रिया. ती निव्वळ अनुभव व्यक्त करण्यातून घडत नाही. असे असूनही, काही लोक – मराठीत तर बरेच लोक, अनुभव कोणता आहे यावरून कलेचा दर्जा ठरवतात. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष राहून गेलेला एखादा विचारवंत जेव्हा, ‘ग्रामीण साहित्याचे अभिजन साहित्याला आव्हान’ असे बावळट मारामारीचे विधान करतो तेव्हा तो कलेकडे कोणत्या दृष्टीने पाहतो ते कळून येते. धारावीतल्या जीवनाचा अनुभव वा वेश्यावस्तीतला अनुभव हा फ्लॅटमध्ये राहणाऱ्या वा रेल्वे कॉलनीतल्या अनुभवापेक्षा श्रेष्ठ असतो अशी काहींची धारणा असते. इथे दु:ख, दैन्य वा अन्याय यांबाबत संवेदनशील असण्याचा वा असंवेदनशील असण्याचा प्रश्न नाही. जगण्याकडे पाहण्याचा एक मतयुक्त, ‘नैतिक’ साचा ठरवल्यामुळे अशी कला संकुचित ठरते – परिपक्वतेच्या, प्रगल्भतेच्या दिशेने जात नाही. इथे ती न्यूटनच्या मांजरांची गोष्ट आठवावी. मोठ्या मांजराला जायला मोठे भोक आणि छोट्यासाठी छोटे भोक ! ते हास्यास्पद ठरते कारण मोठ्या भोकातून ते छोटे पिल्लूही जाऊ शकते, हे लक्षात घेतलेले नसते. मतहीन पद्धतीने जगण्याचा अ-व्यक्तिगत आवाका घेत जाणारी कला न्याय, समता, सौहार्द यांचीच चाहती असते आणि हीच समज वाचकांत निर्माण होण्याची संधी निर्माण करत असते हे भूमिकावाल्यांना आणि अनुभवांचे दर्जे मानणाऱ्यांना कळत नाही. अनुभव हे मूल्य नाही असू शकत. त्याला स्वायत्त महत्त्व नसते; तरीही अभिव्यक्तीचे माध्यम तेच असते. त्याला जेव्हा अव्यक्तिगत आकलनाच्या प्रक्रियेची जोड असते तेव्हाच कला मौल्यवान होते. नुसताच अनुभव व्यक्त करणारी कला खुजी असते.
यानंतर असाच एक खोटा, भ्रामक मुद्दा घेऊ. तो आहे ‘इथली माती’ हा अति-कडक मुद्दा. इथला प्रत्येक माणूस स्वतःचा स्मृतीसाठा, स्वभाव, प्रतिक्रियांच्या पद्धती यांमुळे इथल्या इतर सर्वांपासून स्वतःला वेगळा पाडतच असतो; पण याला एक फसवे, गोंडस, गौरवास्पद रूप देण्यासाठी तो ही इथल्या मातीची कल्पना काढतो. त्यामुळे त्याला इथल्या अनेकजणांना त्याच्या टोळीत सामील करून घेता येते. खरेतर या कल्पनेत काहीच तथ्य नाही. जगभर माणसाचे मन एकाच प्रकारे वागते, त्याच्या सुखदु:खांच्या प्रक्रिया त्याच असतात. अमुक वास्तवाला वा अमुक काळाला महत्त्व देण्यासारखेच हे एक खोटे रचित असते. आतातर जग खूप जवळ आलेले असल्याने या कल्पनेतली हवा आपोआपच जाते आहे. डीन आर्निश इथे येऊन योग-प्राणायाम शिकून जातो आणि त्याचे प्रयोग करून ‘रिव्हर्सल ऑफ हार्ट डिसीझ’ हे जागतिक महत्त्वाचे पुस्तक लिहितो. तिकडच्या कवीच्या कवितेत इकडचा शांतिमंत्र वा बुद्ध येतो, हे लक्षात घ्यायला हवे. आपल्याला वाटते की नथिंगनेस हा तिकडच्या मातीतला आहे, इथे तुकारामाच्या शंभर अभंगांत ‘ रिकामीक’ हा शब्द आहे. जगभर अनुभवाच्या रचना वेगवेगळ्या असल्या तरी आकलनाच्या शक्यता या अ-व्यक्तिगत, समावेशकच असतात, हे समजून घ्यायला हवे. त्यामुळेच तर जगातले साहित्य, नाटके यांची देवाण-घेवाण होऊ शकते. कलाविचार असो की प्रत्यक्ष कलेचे चलनवलन असो, देवाण-घेवाण होत राहणे हे नुसतेच अटळ नसून हितावहही आहे. सर्व तऱ्हेच्या संकुचित कल्पना गोंजारत बसल्याने मराठीचे खूप नुकसान झालेले आहे!
आणि आता घेऊ या सगळ्या संकुचितपणाचा मूळ स्वामी – ‘बुद्धिप्रामाण्यवाद.’ शास्त्र, तंत्रज्ञान, अंधश्रद्धानिर्मूलन या क्षेत्रांत आहे याला स्थान पण मानवी जगण्यात – जो भाग मोजता येणार नाही इतका तुलनेने मोठा आहे – त्यात काय आहे बुद्धीचे कार्य? संघर्ष आणि समस्या निर्माण करणे आणि त्या सोडवण्यात कुचकामी असणे! मानवी जगण्यात बुद्धी ही एक अपयशी आणि हिंसक बाब आहे. मराठीत काही हुशार लोकांनी बुद्धिप्रामाण्यवादाचे इतके स्तोम माजवलेले आहे की बुद्धीच्या वैगुण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष व्हावे. घटस्फोटाच्या टोकावर आलेले पति-पत्नी पाहा. हिच्याकडे ढीगभर तपशील असतात आणि त्याच्याकडेही असतात! काय निघणार यातून निराकरण ? तडजोड वेगळी आणि समस्यामुक्त होणे वेगळे, हे इथे लक्षात घ्यायला हवे. आजच मी पाहिले – नेतान्याहू म्हणत होते की आमचा पूर्ण विजय होईपर्यंत आम्ही थांबणार नाही! ये है बुद्धि की करतूत! सर्व विनाश, युद्धे, छळ यांची शिल्पकार बुद्धीच असते, हे पाहायला हवे. इतर सर्व संकुचित कल्पना जोपासण्यासाठी बुद्धिप्रामाण्यवाद हे जणू काही एक मूल्य आहे अशा भ्रमात राहावे लागते. आपले लेखक, विचारवंत या बुद्धिरोगाने ग्रस्त आहेत. कशी होणार इथे दर्जेदार, मौल्यवान कलानिर्मिती? मराठी कलाक्षेत्र हे निष्कर्षातून सुरू होते आणि त्यातच संपते. ॲब्सर्डिटी वा मृषा हे तत्त्व जगात का आले या प्रश्नाचे इथे कुणाला देणे-घेणे नाही. ते सगळे इथल्या मातीतले नसून त्याचा काळ आता संपलेला आहे अशी आत्मतुष्ट निर्बुद्ध भूमिका घेऊन पडून राहावे हे इथले सुख आहे आणि कलेचे प्रगाढ ज्ञान आहे!
सारांश, वास्तववाद, समकालीनता, अनुभव, इथली माती आणि बुद्धिप्रामाण्यवाद – ही इथल्या कलेच्या खुजेपणाची प्रमुख कारणे आहेत. आता यावर, ही कारणे नसून अमुक दुसरी कारणे आहेत – या अंगाने तरी काही बोलावे लागेल किंवा कुठे आहे खुजेपणा? मराठी कला मोठी आणि समावेशकच आहे – या अंगाने तरी. नुसतीच नकारघंटा वाजवण्याची हुशारी काही कामाची नाही.
— ००० —
