ज्येष्ठ मार्गदर्शक भानू काळे यांच्याबरोबर नुकताच हैदराबादला जायचा योग आला. हैदराबादचे नाव ऐकले की सर्वात प्रथम आठवतो तो हैदराबादचा निजाम आणि लगेच आठवतात चंद्राबाबू नायडू आणि त्यांनी निर्माण केलेले सायबराबाद. या दोन टोकांच्या मध्ये हैदराबादने कसा समतोल साधला आहे आणि आंध्र प्रदेश ते तेलंगण ही वाटचाल कशी झाली आहे हा कुतूहलाचा विषय होता. हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्याला यश येऊन १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा भाग स्वतंत्र भारतात सामील झाला. एक नोव्हेंबर १९५६पर्यंत या भागाला हैदराबाद स्टेट म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर या भागाचे व आंध्र प्रदेशाचे विलीनीकरण होऊन आंध्रप्रदेश या नावाने राज्य निर्माण झाले; परंतु तेलंगण राज्य स्वतंत्र व्हावे म्हणून एक चळवळ झाली आणि तिला यश येऊन तेलंगणा राज्याचा जन्म दोन जून २०१४ ला झाला. सुरुवातीला हैदराबादचे काय करायचे हा एक वादाचा विषय होता; परंतु अंतिमतः हे ऐतिहासिक शहर तेलंगणा राज्याचा भाग होणार हे उघड होते. हैदराबादची सायबर सिटी हे चंद्राबाबू नायडू यांचे कर्तृत्व आहे हे निःसंशय. एका बाजूला – म्हणजे प्रशस्त रस्त्यांच्या पुढच्या बाजूला बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अतिशय देखण्या इमारती व त्यांच्याच मागच्या भागात तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासी जागा. ऐसपैस रस्ते, मुबलक पाणी व अखंडित व स्वस्त वीज; त्यामुळे या कंपन्या व त्यांत काम करणारे कर्मचारी हे दोन्हीही समाधानी. यामुळे शहरात झालेली विदेशी भांडवलाची गुंतवणूक, त्यातून निर्माण झालेले उद्योगधंदे व रोजगार यांमुळे स्थानिक जनताही खूश अशी ही विन – विन सिच्युएशन.
हैदराबाद आणि महाराष्ट्र यांचा एक विशेष अनुबंध आहे. विद्यमान महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे पूर्वी या निजामशाहीत होते; त्यामुळे हैदराबाद मुक्ती आंदोलनात मराठी माणसांचा मोठा सहभाग होता. या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. रझाकारांचे अत्याचार हा या आंदोलनातील अत्यंत क्रूर व दुर्दैवी भाग. रझाकारांचे पाशवी व अनन्वित अत्याचार इथल्या लोकांनी सहन केले. स्टेट काँग्रेसने अधिकृतरित्या सशस्त्र लढ्याची, प्रतिकाराची भूमिका घेतली होती. या सशस्त्र लढ्यात आर्य समाजी लोकांचा पुढाकार होता. त्यानुसार रझाकारांना यथाशक्ती सशस्त्र प्रतिकारही झाला. या लढ्याचा सबंध इतिहास मुळातून समजून घेण्यासारखा आहे. सातवा निजाम मीर उस्मान अली याच्या कारकिर्दीत हे सत्तांतर झाले. रझाकारांचे नेतृत्व करणारा सय्यद कासिम रजवी हा या निजामाच्या हातचे बाहुले होता. हा सातवा निजाम हा अत्यंत कृपण व भंपक होता असा सार्वत्रिक समज आहे; परंतु तो फारसा योग्य नाही. हैदराबादचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचे या भावनेने प्रेरित होऊन या निजामाने अनेक गोष्टी केल्या. हैदराबादची स्वतःची रेल्वे होती, महसुली व्यवस्था होती, विमानतळ होता, सैन्य होते, विद्यापीठ होते आणि या विद्यापीठात उर्दू भाषेतून अगदी वैद्यकीय शिक्षणसुद्धा दिले जात होते. येथील निजाम कॉलेज चेन्नई विद्यापीठाशी संलग्न होते; तर आणखी एक कॉलेज केंब्रिज विद्यापीठाशी. राज्य चालते ते नोकरशाहीवर हे निजामाला पक्के ठाऊक होते त्यामुळे त्यांनी स्वतःची मुलकी सेवा सुरू केली होती व त्यातून अलियावर जंग यांसारखी अत्यंत प्रतिभावान मंडळी बाहेर पडली. आलियावर जंग हे नंतर महाराष्ट्राचे राज्यपालदेखील होते; त्यामुळे ते आपल्या सर्वांना परिचित आहेत. निजामाचे अनेक देशांशी सलोख्याचे संबंध होते व अनेक देशांत त्याने गुंतवणूक केली होती. अर्थात यामागे त्याचा स्वार्थ होता. इंग्रज गेल्यानंतर हैदराबाद हे स्वतंत्र राष्ट्र व्हावे व आपण राष्ट्रप्रमुख व्हावे अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती व त्या दृष्टीने त्याने हैदराबाद राज्य चालवले. यातून जे संस्था व सेवा यांचे जाळे निर्माण झाले त्याचा फायदा सर्वसामान्यांनादेखील झाला.
एकीकडे निजामाला हे राष्ट्र त्याच्या स्वतःच्या ताब्यात ठेवायचे होते; तर रिझवीला ते मुस्लीम राष्ट्र बनवायचे होते. हैदराबादचा पाडाव होण्यात या अंतर्गत दुभंगाचाही थोडाफार वाटा होता.
हैदराबादमध्ये खूप मोठ्या संख्येने मराठी माणसे आहेत. या मराठी माणसांसाठी महत्त्वाच्या अशा दोन संस्था हैदराबाद येथे कार्यरत आहेत. १९२२ साली स्थापन झालेले मराठी ग्रंथ संग्रहालय आणि विद्याताई देवधर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेली मराठी साहित्य परिषद, तेलंगण, हैदराबाद – इसामिया बाजार येथे मुख्य ठिकाणी ग्रंथसंग्रहालयाची स्वतःची वास्तू आहे आणि या वास्तूच्या पहिल्या मजल्यावर साहित्य परिषद काम करते. परिषदेच्या वतीने पंचधारा या नावाचे त्रैमासिक मुखपत्र चालवले जाते. गेली ६७ वर्षे या मुखपत्राचे अव्याहत प्रकाशन होत आहे. परिषदेने समग्र सेतू माधवराव पगडी व समग्र ना. गो. चांदापूरकर ही दोन महत्त्वाची प्रकाशने प्रसिद्ध केली आहेत. याशिवाय नरहर कुरुंदकर यांच्या ‘गोदातटीचे कैलास लेणे’ या स्मृतिग्रंथाचे पुनर्प्रकाशनदेखील तेलंगण साहित्य परिषदेने केले आहे. या साहित्य परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परिषदेमार्फत मराठीचे वर्ग चालवले जायचे आणि बी ए आणि एम ए (मराठी) या पदव्या हा शिक्षणक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मिळायच्या. स्थानिक राज्य शासनाच्या धोरण बदलामुळे हे अभ्यासवर्ग आता बंद पडले आहेत. मराठी भाषा व भाषाविषयक व्यवहार परराज्यांत जिवंत ठेवणाऱ्या अशा संस्थांना महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे.
या दोन्ही संस्थांनी आयोजित केलेल्या एका अनौपचारिक कार्यक्रमात भानू काळे यांनी काही विचार मांडले; त्यात महत्त्वाचे असे दोन मुद्दे होते :
१ . नवोदितांच्या पुस्तकांच्या संपादनाचे काम परिषदेने करावे. त्यामुळे नव्याने प्रकाशित होणाऱ्या साहित्याचा दर्जा सुधारेल आणि परिषदेलादेखील त्यातून काही उत्पन्न मिळू शकेल.
२ ग्रंथालय हे नुसते पुस्तक देवाण-घेवाण केंद्र न राहता ते सांस्कृतिक केंद्रदेखील व्हावे. या कार्यक्रमात कार्यवाह सतीश देशपांडे आणि अध्यक्ष विवेक देशपांडे यांनी आपले विचार मांडले व हैदराबादमधील मराठी संस्कृतीची काही वैशिष्ट्ये विशद केली. हैदराबादचे वर्णन करायचे झाल्यास ‘मेहमान-नवाजी’ या शब्दाने ते अतिशय योग्य पद्धतीने करता येईल असा विचार प्रकाश धर्म यांनी मांडला. ते हैदराबाद येथील एक ख्यातनाम वास्तुरचनाकार आहेत. हैदराबादमध्ये आलेली माणसं कायमची हैदराबादचीच होतात असा आमचा अनुभव आहे असे त्यांनी सांगितले. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पहिल्याच भेटीत लोकांना आपलेसे करून घेण्याची हैदराबादी पद्धत. त्याचेच उर्दू नाव ‘मेहमान नवाजी’ आहे अशी त्यांची मार्मिक टिप्पणी होती.
तेलंगण पर्यटन महामंडळाच्या बेगम पेठ येथील एका भव्य हॉटेलवर आम्ही उतरलो होतो. त्यांच्यामार्फत आयोजित शहर-दर्शन सहलीत आम्ही सामील झालो. एक सहल होती रामोजी फिल्म सिटीची तर दुसरी होती हैदराबाद शहर स्थलदर्शनाची. रामोजी फिल्म सिटी ही पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. रामोजीराव या सुप्रसिद्ध तेलगू चित्रपट निर्मात्यांनी वसवलेले हे शहर. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी एका छताखाली मिळण्याचे खातरीचे ठिकाण. एकीकडे चित्रपट निर्मिती आणि दुसरीकडे पर्यटकांसाठी आकर्षक अशा गोष्टी यांचे सुंदर मिश्रण या ठिकाणी आहे. एक दिवस अतिशय आनंदात जाईल अशी सर्व व्यवस्था आहे. एका विशिष्ट वयोगटातील लोकांना समोर ठेवून याची रचना केली आहे.आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना त्यातल्या सर्व गोष्टींत रस वाटण्याची शक्यता नसली तरी एक दिवसाचा बदल म्हणून या शहराला भेट देणे हा एक वेगळा अनुभव होता. चित्रपट निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी एक-दोन ठिकाणी खास व्यवस्था केली होती. या भेटीदरम्यान चारमिनार पाहणे हे ओघाने आलेच. तिथे पोचल्यानंतर तेथील सुप्रसिद्ध ‘निमराह’ बेकरीला भेट देऊन तेथील इराणी चहा व उस्मानिया बिस्किटांचा आस्वाद घेतला. मालक असलम भाई यांनी अगत्यपूर्वक त्यांच्या निर्मिती केंद्रात आम्हांला नेले; सर्व निर्मिती प्रक्रिया दाखवली व आपण सर्वजण एक आहोत असे आवर्जून नमूद केले. सहल मार्गदर्शक हसन माहितगार होता. वेगवेगळ्या महालांची , किल्ल्यांची माहिती ऐतिहासिक संदर्भ देत सफाईने सांगत होता. उर्दू ही पूर्णपणे भारतीय भाषा आहे. तिचे मुख्यतः दोन प्रकार : एक लखनवी आणि दुसरी दख्खनी. ऐसपैस बोलायचे असेल तर लखनवी वापरावे आणि थोडक्यात मुद्दा मांडायचा असेल तर दख्खनी असे सांगताना त्याने मेहमूद यांनी लोकप्रिय केलेले ‘हम काले है तो क्या हुआ दिलवाले है, हम तेरे तेरे तेरे चाहनेवाले है…’ हे गाणे साभिनय म्हणून दाखवले. निमराह या शब्दाचा अर्थ काय असे मी असलम भाईंना विचारले. त्याचा अर्थ ‘पावित्र्य’ असा होतो असे त्यांनी सांगितले.
आमच्या या हैदराबाद भेटीवेळी माझा डॉक्टर मित्र अरुण हरके हा सर्व दिवस आमच्या सोबत होता. तो मूळचा महाराष्ट्रातला परंतु सध्या हैदराबादेत वास्तव्य करून असतो.त्याच्यामुळे आमचा हैद्राबाद येथील मुक्काम अतिशय सुखकर झाला. त्याच्या मूळच्या चांगुलपणात पडलेली ही हैदराबादी मेहमान नवाजीची भर आमच्या चांगल्याच पथ्यावर पडली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक वेगळा अध्याय लिहिले गेलेले शहर. त्याचा एक वेगळाच ठसा मनात नोंदवून आम्ही परतलो.
छायाचित्र: डावीकडून उजवीकडे
डॉक्टर अरुण हरके, अस्लम भाई,अस्मादिक व भानू काळे

छान लेख आहे…
हैदराबादी ” मेहमान नवाजी” हे अनिल चे छोटेखानी संपादकिय छानच! लेखात उल्लेख केल्याप्रमाणे हैदराबाद हे शाही विरासत आणि प्रगतिशील महानगरीय संस्कृती चे एक मिश्रणआहे.
प्रतिथयश लेखक श्री भानु काळे व उदयोन्मुख लेखक डाॅ अनिल जोशी यांच्या सहवासातील तीन दिवसांचे ते हैदराबाद- भ्रमण माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय होते.
एक तर अनिल ची खूप वर्षांनी गाठ-भेट झाली व दुसरे म्हणजे त्याच्यामुळे आदरणीय भानु काळे यांची ओळख झाली. एखाद्या लेखकाचा सहवास आपणास लाभावा अशी खुप वर्षांपासूनची असलेली मनोकामना त्यानिमीत्ताने पूर्णत्वास आली. त्यांच्या प्रसन्न व्यक्तीमत्वाने प्रथमदर्शनीच तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होता. त्याबरोबरच सलग तीन दिवस त्यांचे विचार ऐकणे ही माझ्यासाठी एक पर्वणीच होती. केवळ साहित्य प्रेमापोटी मुंबईतील आपला सुस्थापित व्यवसाय सोडून पुण्यात येऊन साहित्य सेवेस वाहून घेणे हे केवळ आदरणीय भानु जी काळे च करोत! त्यांनी भेट केलेले भानु काळे लिखित ” अंतर्नाद ! एका मासिकाचा उदयास्त !” हे पुस्तक मराठी साहित्यातील एक अनोखा ठेवा आहे.
अनिल व्यवसायाने डाॅक्टर असला तरी साहित्य क्षेत्रात त्यास विशेष रूची आहे. वेगवेगळ्या विषयांवरील त्याचे भाष्य व ब्लाॅग्ज वाचनीय असतात.
पंचविशीतच लिहिलेलं त्याचं “अपार्थिव” हे आगळ्या- वेगळ्या विषयावरील पुस्तक लक्षवेधक ठरलं होतं. आताही जानेवारी महिन्यात त्याचे एका वेगळ्याच विषयावर नवीन पुस्तक येत आहे..
भानु काळे यांना ” अंतर्नाद ” हे मासिक ( प्रिंट आवृत्ती) जरी बंद करावे लागले तरी, अंतर्नाद चा एक निस्सीम चाहता म्हणून अनिल ने त्याची e – आवृत्ती नेटाने चालू ठेवली आहे. त्याच्याशी चर्चा करताना त्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात व प्रसंगी आर्थिक झळ सोसावी लागते हे उमगले. त्याच्या या साहित्य सेवेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
अशा या दोन साहित्यिकां समवेत व्यतीत केलेले क्षण हा माझ्यासाठी अतीव आनंदाचा ठेवा होय.
( अनिल ने लेखाचे शेवटी केलेला माझा उल्लेख अवाजवी!)
वाह,फारच सुंदर आढावा घेतला आहे हैदराबाद भेटीचा. एकानंतर एक परिच्छेद वाचताना write up ची डेव्हलपमेंट किती सुंदर केली आहे हे अगदी प्रकर्षाने जाणवलं.
आम्हाला दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने संपादकीय खूप आवडले.
प्रकाश उत्तर लिहिलंच.
हैदराबादविषयी माझं फार वेगळं मत होतं.लेख उत्तमच .हैदराबादेत काही ठिकाणी टॅक्सी ड्रयव्हरही पर्यटकांना न्यायला तयार नसतात असं ऐकून होते.पण ही दुसरी बाजूही यालेखाच्या निमित्तानं समजली.