माझा मुलगा आणि सूनबाई न्यूयॉर्कमधील ब्रूकलीन भागात राहतात. त्यांच्या परसदारी अचानक एक काळ्या मांजराचे छोटे पिल्लू आले. माझी सून आत्यंतिक प्राणिमित्र आहे. तिने पाहिले की हे पिल्लू थोडेसे आजारी वाटते आहे आणि डोळ्यांवर आणि कानामागे जखमा झालेल्या आहेत. त्या पिलाची दया येऊन तिने त्याला जवळच्या जनावरांच्या दवाखान्यात नेले आणि पुढे काय काय झाले ते सारे एका बाजूने आश्चर्यचकित करणारे आहेत तर दुसऱ्या बाजूने विचारात पाडणारे आहे. ती या पिलाला एका खासगी दवाखान्यात घेऊन गेली. त्याचे नाव आहे ‘Bond Vet’/२०१९ सालच्या जून महिन्यात न्यूयॉर्कमधल्या कौबल स्ट्रीटवर ही शाखा सुरू झाली आहे. त्यांचे स्वतःचे संकेत स्थळ आहे व त्यावर रीतसर भेटीची वेळ घेता येते. त्यांच्या दवाखान्याची माहिती देणारा एक लघुपट उपलब्ध आहे. त्याचा दुवा खालील प्रमाणे :
Friendly, Compassionate Primary & Urgent Care For Pets | Bond Vet
आता काही छायाचित्रांद्वारे या दवाखान्याची अधिक माहिती घेऊ या. हे आहे दवाखान्याचे प्रवेशद्वार. प्राण्यांसाठी अत्यावश्यक सेवादेखील उपलब्ध आहेत हे दर्शनी द्वारावर नमूद आहे. खासगी सेवा असल्यामुळे ग्राहक आकर्षित करणे हे त्यांचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे; त्यासाठी दिला जाणाऱ्या मोफत सेवांचा उल्लेख करणारी पाटी दारात आहे. त्यामध्ये ‘बेली रब’ नावाच्या एका मालीशचा उल्लेख आहे. ते मुख्यत्वे कुत्र्यांच्या पोटाला केले जाते आणि कुत्र्यांना ते अतिशय आवडते. त्यात नुसते शारीरिक सुख नसून मनुष्यप्राणी व प्राणी यांच्यात भावनिक संबंध निर्माण करण्याचा तो एक शास्त्रीय मार्ग आहे. फ्री ट्रीट्स म्हणजे प्राण्यांना उपलब्ध वेगवेगळे आहार आणि तेदेखील मोफत !
https://www.facebook.com/share/v/A4Sb6myuxLxBawn5
आता हे दुसरे छायाचित्र आहे या दवाखान्यातील प्रतीक्षागृहाचे. प्राणी व त्यांचे मालक या दोहोंच्या आरामाकडे पुरेसे लक्ष देण्यात आले आहे. भिंतीवर लावलेली चित्रे अतिशय आनंददायी आहेत.
मांजराचे वजनयंत्र :
मांजराला लावली जाणारी चिप
वरील दृक्श्राव्य फीत पाहिल्यानंतर तेथील उपलब्ध सेवा काय काय आहेत त्यांची व्यवस्थित माहिती मिळते. दवाखाना किती स्वच्छ व टापटिपीचा आहे तेही लगेच जाणवते. आपल्या चर्चेतील पिल्लू हे भटके असल्याने त्याचे बारसे झालेले नाही. ते काळ्या रंगाचे आहे व आपली संस्कृती अजूनही पुरुष प्रधानच आहे त्यामुळे आपण त्याला ‘काळू’ म्हणू या. दवाखान्यात गेल्यानंतर काळूची कागदोपत्री नोंद झाली. पालक म्हणून सूनबाईंचे नाव घेतले गेले. पिल्लाची संपूर्ण शारीरिक तपासणी होऊन काही रक्ताच्या तपासण्या सांगण्यात आल्या व त्यासाठी रक्त घेतले गेले. पिल्लाचे वय तीन महिनेच आहे व ‘तो’ काळूच आहे याची खात्री डॉक्टरांनी केली व तसे सांगितले. त्यानंतर त्याला रेबीज प्रतिबंधक व आणखी एक FVRCP vaccine या नावाची लस तातडीने दिली गेली. हे FVRCP vaccine मांजरांचे तीन प्राणघातक विषाणूंपासून संरक्षण करते. पुढील लसीकरणाचे वेळापत्रक काय असेल त्याची सविस्तर कल्पना दिली गेली. राज्यात व एकंदरीत अमेरिकेत प्राणी पाळायचा असल्यास त्याबद्दल अत्यंत कडक कायदे आहेत. स्थानिक प्रशासनाकडे त्यांची नोंद करावी लागते. या पाळीव प्राण्यांना एक मायक्रोचिप लावली जाते. त्या द्वारे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे पालकांना सोपे जाते व त्यांच्या वैद्यकीय उपचारांची नोंदणीही व्यवस्थित होते. काळूला रिंगवर्म नावाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली तसेच अंगावरच्या जखमा या याच फंगल इन्फेक्शनमुळे झाल्या असल्याचे निदानही करण्यात आले. पाजण्यासाठी थेंब व जखमेला लावण्यासाठी मलम व मांजरांसाठी खास तयार केलेला आहार असा एक संच देण्यात आला. लिहून दिलेल्या औषधांपैकी काही औषधे लगेच तिथल्या तिथे मिळाली. त्यांचे पॅकिंग व त्यावरील सूचना किती स्वयंस्पष्ट होत्या ते खालील चित्रफितीतून स्पष्ट होईल.
अर्थात हे सर्व औषधोपचार दवाखाना खासगी असल्यामुळे फुकट नव्हते. भूतदयेची भरभक्कम किंमत द्यावी लागली. आपल्याकडे माणसांना ज्या प्रकारचे औषध उपचार मिळतात ते पाहिले की मोठे वैषम्य वाटते. सुबत्ता असली की काय काय होऊ शकते त्याचे हे एक उदाहरण आहे. अर्थात माणसांसाठी चालणाऱ्या अमेरिकन आरोग्य सेवेचेही स्वतःचे असे प्रश्न आहेत. तिथल्या गोरगरिबांनाही औषधोपचारासाठी आपल्यासारखेच झगडावे लागते. विषमता म्हणजे काय आणि त्याचे काय परिणाम असतात ते या टिपणावरून स्पष्ट होते.
ताजा कलम : काळूने आता रीतसर गृहप्रवेश केला असून त्याचे’ पिंटू” असे बारसेही झाले आहे.

खुप छान.
भूतदया अंगी असणारी व्यक्ती ही सर्वांसाठी आदरयुक्त असते