कृत्रिम बुद्धिमत्ता = एक अवयव

आर्टिफिशियल इंटलिजन्स ए आय = कृत्रिम बुद्धिमत्ता = एक अवयव 

अगदी आदिम काळापासून माणूस नवनवीन शोध लावत आला आहे – दगडांच्या हत्याराचा, चाकाचा, आगीचा, शोध यांपासून चंद्रावर जाणाऱ्या रॉकेटचा शोध वगैरे. ही सगळी यंत्रे, उपकरणे, आयुधे माणसाने त्याच्यासाठी तयार केलेले नवे अवयव आहेत. स्वयंपाकघरात मिक्सर मोडला तर गृहिणी म्हणते, ‘आज मिक्सर चालत नाही, अगदी हात मोडल्यासारखे झाले आहे बाई.’ जेव्हा प्रयोगशाळेतील एखादे उपकरण बंद पडते तेव्हा वैज्ञानिकाला असेच वाटते. यंत्रे, उपकरणे नकळत आपले एक्सटेंडेड – विस्तारित अवयव झाले आहेत म्हणून तर आपल्या रोजच्या भाषेत असे शब्दप्रयोग अवतरतात. कृत्रिम बुद्धिमता = ए आय हासुद्धा माणसाने निर्माण केलेला नवा अवयव आहे. (या निबंधात कृत्रिम बुद्धिमत्ता / ए आय हे शब्द आलटून पालटून वापरणार आहे.)                    

ग्लास अर्धा रिकामा का अर्धा भरलेला                                          

ग्लासात अर्धा ग्लास पाणी ओतून ठेवले असेल तर तो अर्धा रिकामा का अर्धा भरलेला हा प्रश्न माणसाच्या मेंदूत अनेक शतके उड्या मारत आला आहे. परस्परविरोधी विचार मेंदूत सतत येत असतात त्यातून पुढची वाट सापडत असते. ए आय हा नवा अवयव उपयुक्त आणि गुणकारी आहे हे सगळ्यांना मान्य होईल असे नाही. काहींना वाटते ए आयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील, काहींना वाटते या नव्या तंत्रज्ञानामुळे मानव-प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येईल. काहींना ‘फ्रॅंकेन्स्टाइन’ ही मेरी शेलेनी १८१८ मध्ये एका कल्पित वैज्ञानिकाबद्दल लिहिलेली विज्ञान-भय-कथा = विज्ञानिका आठवेल. हा भस्मासुर स्वतःच स्वतःच्या  माथ्यावर हात ठेवून स्वतःला भस्मसात करेल अशी भीती वाटेल. (मेरी शेले—१७९७-१८५१ पर्सी शेले—१७९२-१८२२ या रोमॅंटिक कवी आणि तत्त्वज्ञाची बायको)

कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल असे वाटण्याला काही कारणे आहेत. ‘रिसेंट पास्ट’ – नुकताच घडलेला इतिहास अभ्यासून कल्पनेच्या आणि विचारांच्या इतिहासवंतांनी काही उदाहरणे मांडली आहेत.१८५० मध्ये ‘इलेक्ट्रिक टेलिग्राफ’ आला तेव्हा काही विज्ञानवंतांना वाटले होते याचा उपयोग जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी होईल. १९०० च्या सुमारास विमानाचा शोध, पुढे अणुशक्तीचा शोध – काय घडले तर – हिरोशिमा नागासाकी! १९९०च्या सुमारास ‘इंटरनेट’ सुरू झाले, ‘आता एकमेकांशी संपर्क साधू आणि अवघे धरू सुपंथ, अतिरेकी राष्ट्रवाद लयास नेऊ, जगातील विषमता, भेदभाव कमी करू’ असे आशावादी विज्ञानवंतांना वाटले होते. पण यापैकी काही घडले नाही. असेच ‘ए आय’चे  होईल असे ग्लास अर्धा रिकामा अशी दृष्टी असलेल्यांना वाटले तर चुकीचे नाही. 

असेही इतिहासवंत आहेत जे नुकत्याच घडलेल्या भूतकाळातील सकारात्मक उदाहरणे देतात, ज्यामुळे युगप्रवर्तक घडामोडी घडल्या. १७व्या शतकातील सूक्ष्मदर्शकाने सूक्ष्म निसर्ग माणसाला उघडून दिला तर दूरदर्शकाने – टेलिस्कोपने अंतरिक्षाचे दरवाजे उघडले. अणूपासून ब्रम्हांडापर्यन्त माणसाची दृष्टी आणि सृष्टी सूक्ष्म आणि विशाल होत गेली. पुढे सायंटिफिक जर्नल्स = विज्ञानपत्रिका सुरू झाल्या. ज्ञानाची, माहितीची देवाण घेवाण जगभर सुरू झाली. माहिती, ज्ञानावरील मक्तेदारी मोडीत निघाली. औद्योगिक उत्क्रांतीची मालिका सुरू झाली. ही मालिका थांबणारी नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगभर संशोधन प्रयोगशाळा सुरू झाल्या, विज्ञानाचे लोकशाहीकरण होऊ घातले, शोध पडताळता येऊ लागले, नवीन कल्पना, नवीन माणसे, नवीन ‘मटेरियल्स’ एकत्र येऊ लागली – अशी सरमिसळ पूर्वी कधी झाली नव्हती – यातून निर्माण झाली रासायनिक खते, फार्मास्यूटिकल्स, संगणक बांधण्याच्या विटा म्हणजे ‘ट्रान्झिस्टर्स’ तयार झाले आणि संगणकीय उत्क्रांतीला गती आली. त्याचा महत्त्वाचा अंक म्हणजे ए-आय – कृत्रिम बुद्धिमत्ता. आपल्याला आवडो वा नावडो ए-आयचे तंत्रज्ञान थांबणारे नाही. ‘तंत्रज्ञानाणू’ ‘टेक्नियम’ याला स्वतःचे जीवन – लाइफ ऑफ इट्स ओन असते – ते वाढतच असते. तंत्रज्ञान समजून वापरणे हा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा एक मार्ग असतो. कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घेण्याचा यत्न येथे केला आहे.                                                                                                          कृत्रिम-बुद्धिमत्ता एक यंत्र                                                    

‘मेंदू जे करतो ते करण्याचा प्रयत्न म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता,’ अशी या यंत्राची, यंत्रणेची, तंत्रज्ञानाची सुलभ व्याख्या करता येईल. थोडक्यात मेंदूची नक्कल करण्याचा हा मानवी प्रयत्न आहे. यासाठी मेंदू कसे काम करतो हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. मेंदूतील न्यूरॉनल कनेक्शन्स म्हणजे न्यूरॉन्स-चेतापेशींचे जाळे कसे काम करत असावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला तो  मांडण्याची उठाठेव येथे केली आहे. विज्ञानातील नोबेल दरवर्षी मानवी बुद्धिमत्तेचा सन्मान करतात; पण या वर्षी जणू ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा’ सन्मान नोबेल समितीने केला आहे. मानवी जीवनाचे परिवर्तन करू शकणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्यता आणि क्षमता यांची दखल नोबेल समितीने घेतली आहे, हे महत्त्वाचे आहे. या वर्षी भौतिकविज्ञानाचे नोबेल John Hopfield (जन्म १९३३) – प्रिन्स्टन विद्यापीठ अमेरिका आणि Geoffrey Hinton (जन्म १९४७) – टोरांटो विद्यापीठ कॅनडा या दोन वैज्ञानिकांना देण्यात आले आहे. आज जी प्रभावी ‘ए-आय मॉडेल्स’ विकसित होत आहेत त्याचा संगणकीय पाया होपफील्ड आणि हिंटन यांच्या संशोधनाने घातला त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. या दोन संशोधकांनी ‘न्युरल नेटवर्क्स’ म्हणजे काय यांचे आकलन करणारी ‘टूल्स’ – उपकरणे विकसित केली. म्हणजे काय केले ते यात शिरून पाहिले पाहिजे. 

न्युरल नेटवर्क्स = न्युरॉन्स-चेतापेशींचे जाळे                                              

मेंदूत चेतापेशींचे जाळे पसरलेले असते. या जाळ्यांचे वरून खाली असे एकावर एक बसणारे स्तर असतात. या चेतापेशींच्या जाळ्यातून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे, तसेच वरून खाली आणि खालून वर असे त्रिमितीय संदेशवहन सतत चालू असते. यावर माणसाची बुद्धिमत्ता उभी आहे असे सुलभतेने म्हणता येईल. वर सांगितलेल्या दोघां संशोधकांनी मूलभूत विचार केला : जर विज्ञानाला कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करायची असेल तर मेंदूत जसे न्यूरॉन्सचे संदेशवहनाचे जाळे आहे तसे संगणकीय जाळे आपण तयार केले पाहिजे. थोडक्यात मेंदूची नक्कल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे – म्हणजे संगणकाच्या मदतीने आभासी जाळे विणले पाहिजे. अशी या संशोधनाची सुरुवात झाली. होपफील्ड यांनी १९८०च्या दशकात संशोधनास आरंभ केला तेव्हा संगणकाच्या ‘हार्डवेअर’ची क्षमता अविकसित होती. असे असूनसुद्धा ‘केल्याने होत आहे रे  ते आधी केलेची पाहिजे’ या नियमाने संशोधन सुरू ठेवले. त्यांनी जो कृत्रिम न्युरल नेटवर्क्सचा प्रोग्रॅम लिहिला त्याला ‘होपफील्ड नेटवर्क्स’ म्हणतात. हे पहिले एकमेकांना जोडणारे आभासी कृत्रिम न्युरल जाळे होते. हे जाळे सुविकसित करण्याची गरज होती. ते काम हिंटन यांनी केले. हिंटन यांच्या संशोधनामागचा विचार काय होता ते पाहू.                                         

मेंदूच्या बुद्धिक्षमतेचा गाभा                                                       

मेंदूतील चेतापेशींच्या – न्यूरॉन्सच्या जाळ्यात स्मृती साठवण्याची क्षमता असते. स्मृती साठवणे म्हणजे ‘डेटा’ साठवणे हा ‘लर्निंग’ – शिकण्याचा महत्त्वाचा भाग असतो. माणसाच्या पंचेंद्रियांकडून ‘डेटा’चा ओघ सतत चालू असतो. त्याला आपण अनुभव म्हणतो. या मिळालेल्या अनुभवातून म्हणजे स्मृतीतून मेंदू सतत शिकत असतो म्हणून मेंदू ‘प्लॅस्टिक’ – लवचीक आहे असे म्हणतात. कृत्रिम आभासी जाळ्यात ही क्षमता निर्माण करता आली पाहिजे हे हिंटन यांनी ताडले. म्हणजे कृत्रिम जाळे प्लॅस्टिक – लवचीक असले पाहिजे. या कृत्रिम न्युरल जाळ्याकडे सतत माहिती – डेटा येत राहणार. या डेटाचे प्रोसेसिंग हे जाळे करणार. नवीन डेटाचे प्रोसेसिंग करताना जुना डेटा लक्षात ठेवून नवीन डेटाचे प्रोसेसिंग केले पाहिजे. ही क्षमता असलेले जाळे हिंटन यांनी तयार केले. या जाळ्यात शिकण्याचा लवचीकपणा आहे. शांतपणे बसून आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल, हे ‘शिकणारे जाळे’ आहे. ‘मशीन लर्निंग’ची ही सुरुवात आहे.                        हिंटन यांनी जो अल्गोरिदम-नियत – रिती म्हणजे एक रीत तयार केली त्यामुळे जाळ्याला त्रिमितीत संदेशवहन करण्याची क्षमता प्राप्त झाली. म्हणजे मेंदूत जसे सर्व थरांत वरून खाली आणि खालून वर तसेच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे संदेशवहन होते तसे संदेशवहन या जाळ्यात होऊ लागले. ‘म्हणजे हे जाळे मेंदूसारखे आहे असे समजू नका, ॲपल आणि प्लॅनेट यांत जसा फरक आहे तसा फरक मेंदू आणि हे संगणकीय जाळे यांत आहे हे लक्षात घ्या, ’ असे हिंटन यांनी मुद्दाम सांगितले आहे. (नेहमीच्या भाषेत जमीन अस्मानातील फरक)  या जाळ्याच्या निर्मितीसाठी हिंटन यांनी स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्समधील Boltzmann machines या प्रणालीचा उपयोग केला. (ज्या वाचकांना या विज्ञानशाखेत रस असेल त्यांच्यासाठी ही माहिती दिली आहे) ‘औद्योगिक क्रांतीने जसे शारीरिक श्रमाला साहाय्य केले, मदत केली त्या प्रमाणे ए-आय बौद्धिक श्रमाला मदत, साहाय्य करेल’ असे हिंटन यांनी म्हटले आहे; पण त्याबरोबर त्यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. ते म्हणतात ‘ए-आय ची computational ability मानवी मेंदूपेक्षा अफाट आहे तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.’ 

Author

Leave a Reply