रद्दीतील रत्ने भाग ६ : भारतीय ज्यू समाज

मलिद्याचे ताट नैवेद्य म्हणून दाखवताना एलियाज दांडेकर

मलिद्याचे ताट नैवेद्य म्हणून दाखवताना एलियाज दांडेकर

मराठी ज्यू कीर्तनकार


भारतीय ज्यू समाज

नागपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘हितवाद’  या वर्तमानपत्रात दिनांक १ डिसेंबर २००२ रोजी प्रसिद्ध  झालेला ‘बेने  इस्रायल इन महाराष्ट्र’ हा लेख व ‘आपले जग’ या पाक्षिकात नोहा मस्सील या मराठी भाषक बेने इस्रायली लेखकाने लिहिलेला लेख व इतर स्रोतांच्या मदतीने मी पुढील माहिती देत आहे.

     इ.स.पू.५८६ मध्ये बॅबिलोनच्या राजाने जेरुसलेमवर स्वारी करून ज्यू धर्मस्थळे उद्ध्वस्त केली. पुढे इराणच्या शहाने (दरायस पहिला असावा) जेरुसलेम जिंकून घेतले व ज्यूंना परत प्रार्थनास्थळे बांधण्यास परवानगी दिली. त्याच्या राज्यात ज्यू समाज सुखाने नांदला. इराणचा शहा त्या वेळी झोराष्ट्रीयन धर्माचा असल्याने हे घडले असावे असे माझे मत आहे. काही शतकांनंतर टायटस या रोमन सरदाराने जेरुसलेम जिंकले व त्याने ज्यूंची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली म्हणून  जीव वाचवण्यासाठी ज्यूंनी जेरुसलेममधून पलायन केले. काही युरोपमध्ये गेले, काही मध्यपूर्वेत पळाले. काही दर्यावर्दी ज्यूंना व्यापारामुळे भारत माहिती होता म्हणून ते छोट्या बोटीतून भारताकडे निघाले.  या प्रवासात अनेकजणांना जलसमाधी मिळाली.  शेवटी सात पुरुष व सात बायका अलिबागजवळील चौल (नौगाव) या बंदरात जिवंत पोहोचल्या. ही घटना इसवी सन पूर्व १७५ च्या आसपास घडली असावी असे समजले जाते. भारतभूमीवरती पाय ठेवणारे पहिले परधर्मीय कोण असतील तर ते ज्यू आहेत.

   भारतात जो अत्यंत मोजका असा ज्यू समाज होता (भारतात आता काही हजार ज्यू उरले आहेत)त्यांचे पाच गट  होते

 १) बेने इस्रायली (मराठी भाषक) २) कोचीन ज्यू (मल्याळी भाषक) ३) बगदादी ज्यू ४) बेने मनाशे

(हे मणिपूरमध्ये आहेत.)   ५) बेने इफ्राईम. 

या लेखात मी बेने इस्रायली या समाजाचीच जास्त माहिती देणार आहे कारण तो सर्वात मोठा ज्यू समाज आहे.

   ‘आपले जग’ या पाक्षिकात लिहिलेल्या लेखात श्री. नोहा मस्सील( खरे नाव नोहा म्हशीळकर)म्हणतात की ज्यूंना अजिबात त्रास न झालेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. दोन भिन्न समाजांचे सहजीवन कसे असावे याचे हे एक आदर्श उदाहरण आहे. बोट फुटल्यावर जी १४ माणसे चौल गावाच्या किनाऱ्याला लागली त्यांच्याबरोबर अनेक दुर्दैवी सहप्रवाशांचे मृतदेह सागराने चौलच्या किनाऱ्यावर आणून टाकले. स्थानिकांनी धर्मकर्तव्य म्हणून या मृतदेहांचे आपल्या पद्धतीने दहन करण्याचे ठरविले; परंतु या १४ जणांना त्यांच्या बांधवांचा  दफनविधी करायचा होता. कोणालाच एकमेकांची भाषा येत नव्हती. अशा वेळी खाणाखुणा करून त्यांनी त्यांची इच्छा स्थानिकांना सांगितली. स्थानिकांनी त्या इच्छेचा मान ठेवून त्यांचे दफन केले. ही दफनभूमी आजही आहे. बेने इस्रायली याचा अर्थ ‘इस्रायलचे पुत्र’. या लोकांनी आपली ओळख म्हणून या नावाचा उपयोग करण्यास सुरुवात केली. या समुद्र प्रवासात त्यांच्याकडचे धर्मग्रंथ,पंचांग वगैरे गोष्टी नष्ट झाल्या होत्या; त्यामुळे त्यांनी त्यांना माहीत होत्या तेवढ्या धर्मपरंपरा पाळण्यास सुरुवात केली. त्या म्हणजे 

१)इस्रायलमध्ये म्हटली जाणारी ‘शमा’ ही प्रार्थना चालू ठेवली. 

२) शनिवार हा पवित्र दिवस (शब्बाथ)पाळणे म्हणजे उद्योगधंदा बंद ठेवून देवाची आराधना करणे.

३) मुलांची सुंता करणे (ब्रीथमीला)

४) जन्म मृत्यू वेळच्या प्रथा पाळणे.

५) ज्यू  धर्मात सांगितल्याप्रमाणे खाण्यापिण्याची बंधने पाळणे – याला ‘कोशेर’ म्हणतात. ही बंधने काय आहेत हे समजून घेणे मनोरंजक ठरेल.

 १) मांस आणि दुग्धजन्य पदार्थ एकत्रित करून खाऊ नयेत. हे पदार्थ साठवण्याची भांडीसुद्धा स्वतंत्र ठेवली पाहिजेत.

२) ज्या प्राण्यांचे खूर (hoof)दुभंगलेले असतात व जे फक्त गवतच खातात अशा प्राण्यांचेच मांस खाणे; त्यामुळे डुक्कर व घोडा यांचे मांस त्यांना वर्ज्य आहे. 

३) खवले व फिन्स  असलेले मासे त्यांना चालतात, शिंपल्यातील प्राणी त्यांना वर्ज्य आहेत. 

 ४) मांसाहारी पक्षी त्यांना वर्ज्य आहेत.

५) प्राणी हलाल पद्धतीनेच कापला पाहिजे; कारण मांसातील रक्त पूर्णपणे निघून जायला हवे.

माझ्या ओळखीचा एक मुलगा इस्रायली कंपनीत काम करतो. तो पूर्ण शाकाहारी आहे. त्याला मधूनमधून त्याच्या कंपनीच्या इस्रायलमधील हेड ऑफिसमध्ये जावे लागते. तो मला सांगत होता, की त्याच्या खाण्याच्या डिशेस, काटे, चमचे, बाऊल्स वेगळे ठेवले जातात.  इतर कोणीही त्या वस्तू त्याच्या गैरहजेरीत वापरत नाहीत.  याचे मूळ त्यांच्या खाण्याच्या नियमांत आहे. तो हेही सांगत होता, की त्यांच्या कंपनीची ज्यू आणि भारतीय हिंदूंना नोकरी देण्याची पॉलिसी आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा इस्रायलला गेले होते त्या वेळी एका भारतीय पत्रकाराने इस्रायलमध्ये स्थायिक भारतीय ज्यूला प्रश्न विचारला की तुम्ही भारतात येता का? त्या वेळी भारतीय ज्यूने दिलेल्या उत्तरात सर्व इतिहास दडलेला आहे. तो भारतीय ज्यू म्हणाला की मी दर दोन ते तीन वर्षांनी माझ्या भारतीय मित्रांना भेटायला भारतात येतो. आम्ही इस्रायलला स्वखुशीने आलो आहोत. आम्हांला भारतातून हाकलून दिलेले नाही. भारत ही आमची मातृभूमी आहे व इस्रायल ही आमची   पितृभूमी आहे. 

भारतीय ज्यूंची संख्या जास्तीत जास्त ५० हजारांच्या आसपास होती. असे असतानासुद्धा ते दोन हजार वर्षे सुखात राहिले हे भारतीय म्हणजेच हिंदू संस्कृतीचे मोठेपण व वेगळेपण आहे. गोव्यातील पोर्तुगिजांनी मात्र भारतीय ज्यूंचा धर्मांतरासाठी छळ केला म्हणून गोव्यामध्ये ज्यू समाज नाही.

   बेने इस्रायली समाज हळूहळू येथे स्थिरावला. शेतीवाडी करू लागला. त्यांनी मराठी भाषा आत्मसात केली. त्यांना त्याचा अभिमान ही आहे. ‘आपले जग’ या पाक्षिकात ‘बेने इस्रायली’ हा लेख लिहिणारे लेखक श्री. नोहा मस्सील हे कवी आहेत. त्यांचे  ‘काव्यनाद’ व ‘माझी मराठी मायबोली’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. १९८५ पासून ते इस्रायलमधून ‘मायबोली’ हे त्रैमासिक मराठीत चालवतात. रेवदंडा, म्हसळा,  किहीम ही गावे असलेला आत्ताच्या रायगड जिल्ह्याचा जो किनारी भाग आहे ज्याला अष्टागरे असेही म्हणतात –  तिथे यांची वस्ती होती. तेथील जवळजवळ सर्व लोक आता इस्रायलला स्थलांतरित झाले आहेत. तेलबियाणांपासून तेल काढणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. शनिवारी त्यांचा तेलघाणा बंद असे म्हणून स्थानिक लोक त्यांना ‘शनिवार तेली’ म्हणत असत. त्यांनी कोकणातील प्रथेप्रमाणे  आपल्या नावात गावावरून तयार झालेले आडनाव जोडले. पुरुषांच्या नावात जी व बायकांच्या नावात बाई हे उपसर्ग सहजपणे जोडले गेले. पारशी समाजातही ही प्रथा दिसून येते : जसे जमशेदजी रतनबाई वगैरे. आडनावे जोडली गेल्यामुळे त्यांची नावे आयझॅक दिवेकर, डेव्हिड शालोम  तळेगावकर अशा स्वरूपाची झाली. काही बायकांनी दोन नावे लावायला सुरुवात केली – एक ज्यू व एक मराठी अशी : जसे फ्लोरा सॅम्युअल उर्फ माणिक अष्टमकर किंवा लीला सॅमसन.

  हितवाद या वर्तमानपत्रात लेख लिहिणारी साडिया शेपर्ड म्हणते, की बेने इस्रायली सेनेगॉगमध्ये पाळल्या जाणाऱ्या प्रथा एकमेव अशा आहेत. 

उदाहरणार्थ :

 १) भडक रंगाची फुले देवाला अर्पण करणे.

 २) प्रॉफेट इलिजाहच्या खुर्चीला फुलांचा हार घालणे किंवा 

३) मलिदा सेरीमनीमध्ये गोड पोहे, नारळ व फळे यांचा प्रसाद वाटणे. 

या गोष्टी जगात फक्त बेने इस्रायली  सिनेगॉगमध्येच होतात. माझ्या मते हे सांस्कृतिक अभिसरणाचे उत्तम उदाहरण आहे. बेने इस्रायली समाजाच्या विवाहप्रसंगात सुद्धा ही सांस्कृतिक देवाणघेवाण दिसून येते. सिनेगॉगमधील विवाहाच्या वेळी वधू पांढरी साडी नेसून येते; पण रिसेप्शनला हीच वधू लाल रंगाची साडी नेसते. लग्नात हळद लावण्याचा व मेंदी लावण्याचा प्रोग्रॅम असतो. साडीया शेपर्ड जी अमेरिकेत म्हणजे युएसएमध्ये रिसर्च स्टुडंट आहे, तिची  आजी महाराष्ट्रातील बेने इस्रायल समाजातील असल्याने ती महाराष्ट्रात बेने इस्रायली समाजासंबंधी रिसर्च करण्यासाठी आली. ती म्हणते,  की बेने इस्रायली समाज हा वेश व चव याबाबतीत पूर्ण मराठी असला तरी त्याचा आत्मा मात्र ज्युईश आहे. तो ‘ओ शालोम’ हे गाणे जितक्या तन्मयतेने म्हणतो तितक्याच आवडीने तो ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हेही गाणे म्हणतो.

   मी काही वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रात एक बातमी वाचली ती अशी – एक इस्रायलमध्ये जन्मलेला तरुण जो कोचीन किंवा मलबारी ज्यू समाजापैकी होता. तो भारतात आला होता; कारण आपले वाडवडील कुठे राहत होते हे पाहण्याची त्याला उत्सुकता व ओढ होती. भारतात येण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याला मसाले घेऊन जायचे होते कारण त्यांच्या रोजच्या जेवणात हेच मसाले वापरले जातात.  त्याच्या आईला हेच मसाले लागतात. वर केलेल्या विधानाला या उदाहरणाने पुष्टी मिळते. असो. 

सांस्कृतिक अभिसरणाचे आणखी एक आश्चर्यकारक उदाहरण म्हणजे बेने इस्रायली समाजाने निर्माण केलेली कीर्तन परंपरा. इसवी सन १८८० च्या सुमारास त्या वेळचे प्रसिद्ध कीर्तनकार रावसाहेब शंकर पांडुरंग पंडित यांची रसाळ कीर्तने डेविड हाईन दिवेकर व बेंजामिन अष्टमकर वगैरे मंडळींनी ऐकली. ते त्यांच्या कीर्तनाने प्रभावित झाले. येथे एक महत्त्वाची गोष्ट मला वाचकांच्या लक्षात आणून द्यावयाची आहे ती म्हणजे ही मंडळी मोकळ्या मनाने देवळात कीर्तन ऐकायला गेली व गावातील हिंदू समाजाने ते परधर्मीय असून त्यांना मोठ्या मनाने देवळात येऊ दिले. असो. रावसाहेब पंडितांची कीर्तने ऐकून त्यांना अशी एक कल्पना सुचली की आपल्या धर्मातील पौराणिक गोष्टी, त्यातील आचारधर्म या विषयीची माहिती आपण अशा कीर्तनाद्वारे सांगू शकतो व समाजाची धर्मासंबंधीची आस्था वाढवू शकतो. यासाठी डेविड दिवेकर बेंजामिन अष्टमकर, साम्युएल माझागावकर राहमिम तळकर, हन्नोक तळकर यांनी कीर्तनोत्तेजक मंडळाची स्थापना केली. या समाजाचे मराठीवर प्रभुत्व असल्याने त्यांनी कीर्तन करण्यासाठी मराठीत अभंग, ओव्या, श्लोक त्यांच्या धर्माला धरून  तयार केले. कीर्तनकाराचा  पांढरा ड्रेस व त्यावर निळी शाल असा ड्रेस कोड तयार केला ( ज्यू धर्मात निळ्या रंगाला महत्त्व आहे. इस्रायलच्या ध्वजातसुद्धा निळा रंगच आहे.)   इस्रायलमध्ये ही परंपरा छोट्या प्रमाणात जिवंत ठेवली  गेली आहे.

हा समाज अनेक शतके   ज्यू धर्माच्या मूळ प्रवाहापासून वंचित राहिल्यामुळे इस्रायलमध्ये १९६४ सालापर्यंत त्यांना ज्यू म्हणून मान्यताच मिळत नव्हती.  त्यासाठी त्यांना खूप झगडावे लागले.  या समाजाने भारतीय समाजासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे. डेव्हिड ससून जो बगदादी ज्यू  होता. त्याने ससून डॉक,  ससून हॉस्पिटल, ससून लायब्ररी वगैरे वास्तू निर्माण केल्या.  तुम्हांला ऐकून आश्चर्य वाटेल की पुण्याच्या हुजूरपागा शाळेच्या तीन मुख्याध्यापिका बेने  इजरायली समाजातील होत्या १)अबिगेल मोझेस, २)रॅचेल वेरूळकर ३) मोझेला आयझॅक .

या समाजातील काही महत्त्वाच्या व्यक्ती पुढील प्रमाणे

  १) बेंजामिन सॅमसन (१९१६ ते २००८) इंडियन नेव्हीमध्ये ऍडमिरल होते. 

२) त्यांची मुलगी लीला सॅमसन ही  प्रसिद्ध भरतनाट्यम्  नृत्यांगना   आहे. 

३) सॉलोमन मोझेस  हे बॉम्बे फिल्म लॅबचे १९४० ते १९९० पर्यंत प्रमुख होते.

४) एडविन मायर्स (१९०३ ते १९९३) फिल्म्स डिव्हिजनचे पहिले प्रमुख  होते. 

५) रिबेका रुबेन ( १८८९ ते १९५७ ) मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत पहिल्या आल्या व पुढे शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध झाल्या.

६) फ्लोरा सॅम्युअल उर्फ माणिक अष्टमकर या हिब्रू युनिव्हर्सिटीत  संस्कृत शिकवत होत्या.

७)रॅचेल रुबेन (१९३४ते२०१०) शास्त्रज्ञ, मेडिकल

 एंटॉमॉलॉजी, मलेरिया व डेंग्यूवर काम केले.

८)एस्थर सॉलोमन संस्कृत स्कॉलर, गुजराथ विद्यापीठात प्राध्यापक.

ही यादी खूप मोठी आहे.  सिनेमाक्षेत्रात तर या समाजाने अनेक नट-नट्या दिल्या. खऱ्या अर्थाने भारतीयांशी एकरूप झालेला हा समाज आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इस्रायलमध्ये स्थायिक झालेल्या एका मराठी भाषक ज्यू माणसाने त्याला माहीत असलेले शेतीचे तंत्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कळावे म्हणून बळीराजा या मासिकात लेख लिहिले. जून व जुलै २००९च्या बळीराजा मासिकांत श्री.डॅनियल रुबेन यांनी  शेतीतील एका  नवीन तंत्राची माहिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हावी म्हणून लेख लिहिले. ते इस्रायल येथील लूद या ठिकाणी राहतात.

मला आश्चर्य एका गोष्टीचे वाटते की भारतातील सुखाचे व सुरक्षित वातावरण सोडून आपल्या मूळ भूमीच्या ओढीने असुरक्षित व कष्टप्रद वातावरणात ते स्थलांतरित झाले. या कट्टरपणाच्या जोरावरच आजचा  इस्रायल टिकून आहे. याच्या उलट आपली परदेशात गेलेली मुले परत येत नाहीत.  हे चूक का बरोबर हे  ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. 

Author

Leave a Reply