लग्न करून पंधरा वर्षांपूर्वी मी बेंगलोरमध्ये आले तेव्हा कन्नड आडनाव सोडले तर माझा आणि कन्नडचा काहीच संबंध नव्हता. हे शहर किती मोठे आहे याची जाणीव ही नव्हती. भरपूर तलाव, हिरवळ असलेले हे गाव मला आवडले होते. आम्ही राहतो तो भाग उपनगर आहे – खरे बेंगलोर नाही हेही माहीत होते; पण तरीही या उपनगरातून बेंगलोरच्या सगळ्या भागांत जाण्यासाठी बस आहे हे सुखसुद्धा मी अनुभवले. मेट्रोचा या शहरात झालेला प्रवास – सुरुवातीची एकच लाइन ती पुढे वाढत गेलेली – आता या शहरात उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम पसरलेली मेट्रो बघताना मला माझा या शहरातला प्रवास आठवतो. भाषा माहीत नसतानाही मी या शहरात फिरत होते; पण जेव्हा भाषा यायला लागली तेव्हा मी या शहराकडे, इथल्या माणसांकडे वेगळ्या नजरेने बघायला लागले; मग मला केळ्याच्याऐवजी पटकन बाळेहण्णूच यायला लागले, काकडीऐवजी सौतेकाई म्हणायला लागले, कोणत्याही भागाच्या शेवटी ‘हळ्ळी’ आले म्हणजे पूर्वी ते गाव होते; आता शहराचा भाग झाले आहे हे लक्षात यायला लागले. बसवाचे (बसवा-नंदी) देऊळ (गुडी) म्हणून वसलेले बसवनगुडी किंवा टेकडीवरचे शंकराचे मंदिर यावरून आलेले मलय+ईश्वर = मल्लेश्वरम, आणखी एक गंमत म्हणजे या दोन नावांवरून आलेले आणि भारतभर प्रसिद्ध झालेले गाव जे अस्तित्वात नाही; तरीही आपण सगळे त्या गावाला जाऊन आलो आहेत असे मालगुडी नावाचे गाव जन्माला आले मल्लेश्वरम+बसवनगुडी यांच्या नावांतून!
हे शहर मला आपलेसे वाटायला लागले याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्थानिक लोकांचे या शहरावरचे प्रेम, हे शहर आणखी चांगले करण्यासाठी त्यांचे प्रयत्न, धडपड मी बघितली, त्याबद्दल वाचले आणि मग मीही त्यांच्या चष्म्यातून या शहराकडे बघायला लागले. आपण ज्या शहरात राहतो तिथे आपल्या आठवणी गुंफतो आणि त्यांतूनच त्या शहराबद्दल आत्मीयता वाटायला लागते. क्वचित कधी कधी जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीशी नाळ जास्त जुळते. मुळात कोणतेही शहर चांगले ठेवणे ही त्या शहरातल्या प्रशासनाची जबाबदारी असतेच; पण त्याहून जास्त जबाबदारी असते त्या शहरातल्या नागरिकांची. माझे शहर उत्तम असावे, त्या शहरात नवीन सोई, सुखसुविधा मिळाव्यात, इथले सौन्दर्य अबाधित राहावे, या शहराचा इतिहास जतन करतानाच भविष्याचादेखील विचार व्हावा अशाच भावनेतून काम करणाऱ्या काही बेंगलूरीयन्सच्याबद्दल सांगणार आहे आजच्या बेंगलोर डायरीच्या शेवटच्या भागात.
बेंगलोर शहराच्या भौगोलिक रचनेमुळे इथे वर्षातले ८-९ महिने पाऊस पडतो; पण या आठ महिन्यांत पावसाचे दिवस-चार पाचच असतात. उत्तर-पूर्व आणि दक्षिण-मध्य मान्सूनच्या प्रभावाखाली इथे पाऊस पडतो; त्यामुळे इथे पावसाचे पाणी साठवून ठेवून वापरणे जास्त सोपे आहे. पावसाच्या पाण्यातला थेंब अन् थेंब आपण जपून साठवला पाहिजे या इच्छेतून झेन ‘रेनमॅन’ उर्फ एस. विश्वनाथ यांनी रेन वॉटर हारवेस्टिंगबद्दल जागृती करायला सुरुवात तर केलीच; पण त्याचबरोबर बायोम ट्रस्टच्या माध्यमातून विहिरींचे पुनर्जीवन करण्यास, नवीन विहिरी खणण्यासदेखील सुरुवात केली. आधी केले मग सांगितले या धर्तीवर त्यांनी स्वतःच्या घरात पावसाचे पाणी साठवून ठेवले आहे. हे साठवलेले पावसाचे पाणी पाईपद्वारे थेट त्यांच्या स्वयंपाकघरात येते. पाणी हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. बेंगलोरमधील केवळ तलाव, विहिरीच नव्हे तर विहिरी खोदणारे वडार समाजाचे लोक यांबद्दलसुद्धा त्यांना प्रेम आहे आणि ते कायम त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिसत असते.
गेल्या ३०, ४० वर्षांत बेंगलोर शहर कल्पनेपेक्षा जास्त वेगाने वाढले. जसे शहर वाढले तसे शहरीकरणाचे प्रश्न आणखी जास्त समोर यायला लागले; त्यांतलाच एक मोठा प्रश्न होता कचऱ्याचा आणि कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा. नलिनी शेखर यांचा जन्म आणि बालपण बेंगलोरमध्येच गेले होते; मात्र त्यानंतर काही वर्षे अमेरिकेत, पुण्यात काढल्यानंतर त्या जेव्हा परत आल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या कागद, काच कष्टकरी पंचायतीच्या अनुभवावरून बेंगलोरमधील कचरा, त्याचे व्यवस्थापन, तो गोळा करणारे कर्मचारी यांच्यासाठी काहीतरी करायचे ठरवले. अंस्लेम रोझारिओ यांच्या मदतीने २०१० मध्ये एका ग्रुपच्या माध्यमातून कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २०१३मध्ये त्यांनी हसिरू दला (हिरवी फौज) या नावाने ट्रस्ट करून त्यामार्फत कामाची व्याप्ती वाढवली. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करणे, कचरा जिथे टाकला जातो त्या जागांमधील प्रदूषण कमी करणे, लोकांमध्ये कचऱ्याबद्दलची जागरूकता निर्माण करणे अशा अनेक वेगवेगळ्या माध्यमांतून कचऱ्याचा आपल्या पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. हसिरू दलाच्या माध्यमातून काम करणार्यांची संख्यादेखील आता वाढली आहे. कचऱ्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी लढणारी मोठी फळी बेंगलोरमध्ये आहे. वर्मीकल्चर करणाऱ्या आणि म्हणून स्वतःला ‘वर्मराणी’ म्हणवून घेणाऱ्या वाणी मूर्ती आहेत; तसेच अनिरुद्ध दत्त याने ‘लेट्स बी द चेंज,’ म्हणत परिसरातील कचरा फक्त स्वच्छ करण्यापेक्षा कचरा होऊच नये म्हणून काय करता येईल किंवा कचऱ्याचे वर्गीकरण करून पर्यावरणाला कमीत कमी हानी होईल अशा पद्धतीने त्याचे विघटन करण्याचे प्रयत्न त्याच्या संस्थेमार्फत केले आहेत. साहस ही एनजीओदेखील रिसायकलिंगच्या क्षेत्रात त्यांचे वेगळेपण दाखवत आहे.
या शहरात केवळ दोनच मोठी नाट्यगृहे आहेत; त्यांतही कन्नड नाटकांना हक्काचे असे एक ठिकाण नाही. आपल्या दिवंगत पतीच्या स्मरणार्थ आपणच जर अशी एक वास्तू बांधली तर… याच भावनेतून उभे राहिले रंगशंकरा! शंकर नाग हे केवळ कन्नडमधील अभिनेते नव्हते – ते एक उत्तम दिग्दर्शक होते, त्याचबरोबर त्यांचे पहिले प्रेम होते नाटक, रंगभूमी. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी अरुंधती नाग आणि शंकर नाग यांची नाट्यसंस्था, इतर नाट्यकर्मी यांच्या सगळ्यांच्या प्रेमातून कन्नड नाटकांसाठीच नव्हे; तर इतर भाषांतील नाटकांसाठीदेखील ‘रंगशंकरा’ उभे राहिले. मुंबईतील पृथ्वी थिएटरच्या धर्तीवर आपल्या लोकांसाठी आपण काहीतरी करू या म्हणून सुरू झालेल्या रंगशंकराला या वर्षी २० वर्ष पूर्ण होत आहेत. कोणे एके काळी शहराच्या बाहेर वाटणारी ही वास्तू आता अगदी शहराच्या मध्यात वाटते. संगीत, कला, नाट्य यांचबरोबर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी, प्रदर्शने ठेवण्यासाठी, मुलाखती घेण्यासाठी अशा सगळ्या ‘वैचारिकमंथनासाठी जागा,’ या भावनेतून गिरीश कर्नाड, एस. सुंदर, एस. एल. राव, जे. फिलिप इत्यादींनी बेंगलोर इंटरनॅशनल सेंटर (bic) ची स्थापना २००५ मध्ये केली. आज BIC बेंगलोरचा एक मानबिंदू आहे.
बेंगलोर शहरातील जुने शिलालेख शोधून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने जतन करणारे उदयकुमार हेही असेच एक अवलिया. आपल्या इतिहासाचा शोध घेत घेत त्यांनी आजवर बेंगलोरमधील ३००हून अधिक शिलालेख शोधून ते जतन केले आहेत. इतिहास हा काही फक्त कोणी कोणाविरुद्ध, कोणत्या साली लढाई केली इतकाच नसतो. इतिहास हा देवळांमधले, वास्तूंमधले लेखदेखील असतो. त्यामुळेच एक इंजिनियर गावाच्या नावाचा उल्लेख असलेला दगड शोधायला काय जातो आणि त्या शिळालेखांमध्ये हरवून जातो. बेंगलोरच्या इतिहासाबद्दल अतिशय प्रेमाने माहिती देणारे धर्मेंद्रकुमार, अरुण पै हेदेखील असेच काही खंदे शिलेदार आहेत – बेंगलोरचा गतकाल नवीन पिढीसमोर मांडणाऱ्यांतले. या दोघांचा Instagramवरील प्रत्येक व्हिडिओ हा माहितीपूर्ण, रंजक असतो.
खूपजण आहेत, खूप संस्था आहेत. ही फक्त एक झलक आहे. यांतल्या अनेकांनी आताच सुरुवात केली आहे; तर काहींचे काम आता फक्त बेंगलोरपुरते सीमित नाही. काहींची दखल सरकार दरबारी घेतली आहे; तर काही त्यांच्या कामामुळे लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. एक गोष्ट या सगळ्यांमध्ये सामाईक आहे ती म्हणजे या सगळ्यांना जेव्हा काही खटकले तेव्हा ते तिथेच थांबले नाहीत, त्यांनी त्यावर त्यांच्या परीने उत्तर शोधायचा प्रयत्न केला, तो पुढे रेटला. हे असे तळमळीने काही करणारे फक्त माझ्याच गावात आहेत असे नाही; ते तुमच्याही गावात असतील किंवा तुम्ही स्वतःच त्यातले असाल. बेंगलोर – बेंगळुरू या माझ्या गावावर माझे तर प्रेम आहेच आणि त्यामुळे या शहराचे वेगळे रंग मी माझ्या लेखांतून दाखवायचा प्रयत्न गेले अकरा महिने केला. फिरायला जाताना आपली नजर पर्यटकाची असते; मात्र जेव्हा आपण त्या शहरात राहतो तेव्हा ते आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग असते; मग असा रोजचा भाग असलेल्या गोष्टीकडेपण जेव्हा कुतूहलाने बघतो तेव्हा कितीतरी न जाणवलेल्या गोष्टी सुद्धा जाणवतात आणि शहराबद्दल प्रेम वाटायला लागते. जर हे लेख वाचताना तुम्हांला तुमच्या गावाबद्दल, शहराबद्दल प्रश्न पडायला लागले असतील, त्यांची उत्तरे शोधावीशी वाटायला लागले असेल तर माझ्या या लेखमालेचा उद्देश सुफल संपूर्ण झाला असे म्हणता येईल.
(ही एक त्रयस्थाच्या नजरेतून केलेली मुशाफिरी आहे. शहर, माणसे समजून घेताना मी सामान्य व्यक्ती म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.)
