आयआयटीची ज्ञानगंगा आणि ब्रेनड्रेन

हल्ली बऱ्याच मोठ्या प्रमाणावर  मराठी माणसे परदेशी जात असतात.  प्रवासी कंपन्यांच्या मोठमोठ्या जाहिरातींवरून ते लगेचच लक्षात येते. 

ते स्वागतार्हच आहे; पण आपला मायदेश तरी त्यांतील किती जणांनी डोळसपणे बघितला असतो? 

ती उणीव लक्षात घेऊन ‘अंतर्नाद’कार भानू काळे सध्या भारतातील वेगवेगळ्या प्रांतांत प्रवास करत आहेत.  त्यांतील तमिळनाडूप्रवासावर आधारित दोन लेख आम्ही मागच्या दोन अंकांत प्रकाशित केले होते. 

त्याच मालिकेतील त्यांचा ‘आयआयटीची ज्ञानगंगा आणि ब्रेनड्रेन’ हा तिसरा प्रदीर्घ लेख या अंकात आम्ही प्रकाशित करत आहोत. 

केवळ प्रवासवर्णन नव्हे तर त्याच्या जोडीला असलेले समाजचिंतन ही या लेखनाची खासियत आहे – संपादक 

    चेन्नईला यायचे ठरवले तेव्हाच येथील आयआयटी बघायचे मनाशी नक्की केले होते. मद्रासचे नाव चेन्नई झाले तरी येथील आयआयटी मात्र आजही आयआयटी मद्रास म्हणूनच ओळखली जाते. एखाद्या ठिकाणी जायच्या आधी विस्तृत पत्ता जवळ असणे पूर्वी आवश्यक असायचे; पण हल्ली गुगल लोकेशन पुरते! त्याच प्रमाणे एखाद्या संस्थेबद्दल माहिती मिळवण्यासाठी हल्ली इंटरनेट हेच माध्यम सररास वापरले जाते; पण व्यक्तिशः मला एखाद्या संस्थेत स्वतः जाणे, एखाद्या स्थानिक माणसाला भेटणे हे नेहमीच अधिक उपयुक्त वाटत आले आहे. अर्थात त्या माहितीला नंतर तुम्ही इंटरनेटची जोड देऊ शकता. त्या दृष्टीने मद्रास आयआयटीच्या संदर्भात अंतर्नादच्या एका जुन्या वर्गणीदारांची चांगली मदत झाली. ते स्वतः गणिताचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत, आता पुण्यात राहतात; पण त्यांचे चिरंजीव आयआयटी मद्रास येथे आजही गणिताचे प्राध्यापक आहेत. आपल्या मुलाला फोन करून त्यांनी माझ्या संकल्पित भेटीविषयी सांगितले आणि त्यानुसार इथे प्रत्यक्ष आल्यावर त्या चिरंजीवांचेच बोट धरून मी मद्रास आयआयटी बघितली. प्रवास करताना कुठली ओळख कशी कामी येईल ते सांगता येत नाही. 

   चेन्नईच्या गिंडी नॅशनल पार्क या अभयारण्याजवळ, सरदार पटेल मार्गावर असलेल्या आयआयटी मेनगेटपाशी आम्ही ठरल्याप्रमाणे अकराच्या सुमारास पोचलो. सुरक्षा व्यवस्थेचे सोपस्कार पार पडून आत शिरलो. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असूनही इथला कॅंपस प्रचंड – म्हणजे ६२० एकर आहे. आम्ही गेलो त्याच्या आदल्याच दिवशी तेथील ‘सारंग फेस्टिवल’ संपला होता. आयआयटीमधला हा सांस्कृतिक महोत्सव पाच दिवस चालतो आणि खूप लोकप्रिय आहे. यंदा सत्तरहजार लोक तो बघायला आले होते! आम्ही पोचलो तेव्हा त्या परिसरात सामानाची हलवाहलव वगैरे सुरू होती. 

   साधारण १०,००० बहुभाषक विद्यार्थी इथे शिकतात. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी २१ वसतिगृहे आहेत. त्यांतली पूर्वी बांधलेली सगळी तीन मजली होती; पण नव्याने बांधलेली काही सात मजली आहेत. वाढत्या विद्यार्थिसंख्येमुळे ते आवश्यकच बनले होते. येथील वसतिगृहांना भारतातील वेगवेगळ्या नद्यांची नावे दिली आहेत – कृष्णा, ब्रह्मपुत्रा, गंगा, अलकनंदा, कावेरी, शरयू, नर्मदा, साबरमती, मंदाकिनी इत्यादी. ते बघून मला पुण्यातील पत्रकार नगर आठवले. तिथेही इमारतींना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नद्यांची नावे दिली आहेत – कृष्णा, कोयना, इंद्रायणी इत्यादी.

   आत फिरताना पट्कन नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे इकडेतिकडे मुक्तपणे बागडणारी असंख्य लहानमोठी गोजिरवाणी हरणे. शाकुंतल केव्हातरी वाचले होते  त्यामुळे कण्वमुनींच्या आश्रमातील हरणे  माहीत होती; पण आधुनिक शैक्षणिक संस्थेत सामान्यतः हरणे अपेक्षित नसतात! इथे त्यांची संख्या तब्बल चार-पाचशे आहे. “इथे भटके कुत्रे बरेच यायचे. त्यांचा या हरणांना खूप त्रास होता; पण त्यांचा बंदोबस्त करणं आम्हांला जमेल ना. कायद्याने तसं करता येत नव्हतं; पण यांच्यात ब्लॅकबक जातीची काही हरणं आहेत जी खूप दुर्मीळ आहेत, कायद्यानुसार संरक्षित वन्यप्राणी प्रवर्गात आहेत – त्यांचं रक्षण करण्यासाठी म्हणून या कुत्र्यांचा बंदोबस्त करायची परवानगी आम्ही मागितली आणि सुदैवाने त्या युक्तीमुळे ती मिळाली! नाहीतर या हरणांची काही धडगत नव्हती!” प्राध्यापक म्हणाले.

   मोर हा पक्षी दिसायला खूप सुंदर असला तरी शेतातले उभे पीक मोर कसे उद्ध्वस्त करतात आणि कलेक्टरची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना कायद्याने मारताही येत नसल्याने शेतकऱ्यांची किती पंचाईत होते हे मी काही शेतकऱ्यांकडून ऐकले होते. परवानगी मिळावी म्हणून अर्ज दाखल केला तरी प्रत्यक्षात ती हाती येईतोवर आठ-दहा दिवस सहज जातात आणि तोवर कुठले मोर तिथे थांबणार आहेत! शेताची नासाडी करून ते तोवर दुसऱ्या कुठल्यातरी शेतात गेलेले असतात! वन्यप्राणी संरक्षण कायदा चांगल्या हेतूने केला असला तरी त्याच्यात काही त्रुटी आहेत आणि कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी करताना तारतम्य खूप आवश्यक असते. अशा वेळी आयआयटी मद्रासमधे शोधली तशी काहीतरी पळवाट शोधावी लागते!

ही आयआयटी १९५९ साली जर्मन सरकारच्या सहकार्याने उभारली गेली – जशी मुंबई आयआयटी रशियन किंवा दिल्ली आयआयटी ब्रिटिश सहकार्याने उभारली गेली. पहिली चार-पाच वर्षे वीस-बावीस जर्मन इथे शिकवायलाही होते. त्याची आठवण म्हणून येथील एका मुख्य रस्त्याला बॉन अव्हेन्यू हे नाव दिले आहे. ‘सिद्धिर्भवति कर्मजा’ (‘प्रत्यक्ष कृतीतूनच यश लाभते’) हे इथले ब्रीदवाक्य आहे. वसतिगृहांच्या नावांप्रमाणे हे ब्रीदवाक्यही कुठेतरी भारतीय संस्कृतीशी नाते साधणारे आहे याची नोंद घ्यावीशी वाटली. आयआयटीच्या उभारणीला पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खूप पाठबळ दिले हे जरी खरे असले तरी अशा एखाद्या व्यापक उभारणीचे श्रेय कुठल्या एकाच व्यक्तीला देणे योग्य होणार नाही; कारण भारतात उच्च तंत्रशिक्षण देणाऱ्या अशा संस्था उभारायची योजना ही ब्रिटिश काळातच तयार झाली होती. त्यासाठी अगदी १९४० साली ब्रिटिश सरकारने २२ तज्ज्ञांची एक समितीही स्थापन केली होती आणि त्या समितीच्या अहवालानुसार कार्यवाही सुरूही झाली होती. अर्थात खरगपूर आयआयटीपासून प्रत्यक्ष सुरुवात होईपर्यंत १९५१ साल उजाडले होते. आज अशा २३ आयआयटी देशात आहेत. ‘National Institutional Ranking Framework’ नावाची एक यंत्रणा आहे आणि तिच्या गुणांकनानुसार मद्रास आयआयटी गेल्या वर्षी देशातील पहिल्या क्रमांकाची आयआयटी होती.

   येथील लेक्चर हॉल्स अशा नामांकित संस्थेला साजेसे भव्य आहेत. वेळेच्या मर्यादेमुळे फक्त एक-दोन डिपार्टमेंट्स आम्ही बघू शकलो – तीही बाहेरून. सुवर्णपदक विजेत्यांची एक मोठी थोरली यादी एके ठिकाणी लावलेली होती. “यांतले किती जण आज भारतात असतील?” असे विचारले असता, “अगदी थोडे. कदाचित पाच टक्के” असे उत्तर प्राध्यापकांनी दिले. चेन्नई आयआयटीमधून सर्वांत जास्त इंजिनीअर्स गेल्या साठेक वर्षांत अमेरिकेला वा अन्य देशांत गेले आहेत आणि आजही जात आहेत हे वास्तव आहे.

   ‘आयआयटी’ हा प्रगत जगात आज भारताचा एक ब्रॅंड बनला आहे, अनेक बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील इंजिनीयर उच्चपदी आहेत, भरपूर पैसे कमवत आहेत, थोडेफार भारतातही गुंतवत आहेत, महत्त्वाचे संशोधन करत आहेत, आपली संस्कृती जपायचा मनापासून प्रयत्न करत आहेत हे सगळे खरे आहे; पण आयआयटी स्थापन झाल्याने देशातील एकूण तांत्रिक ज्ञानाचा दर्जा उंचावेल, देशाच्या प्रगतीला येथील पदवीधर हातभार लावतील ही अपेक्षा मात्र पूर्ण झालेली नाही. त्यांच्या शिक्षणाचा सर्वाधिक लाभ भारताला न मिळता इतर प्रगत देशांनाच मिळत आहे हे कटू सत्य आहे. एकदा तिकडे गेलेले तरुण व्हिसाबाबत काही गंभीर अडचण निघाली तरच भारतात परततात; अन्यथा तिथेच स्थायिक होतात म्हणूनच येथील ब्रेनड्रेन हा मलातरी खूप काळजीचा विषय वाटतो.

आपण खूप प्रगती करत आहोत असे आपल्याला वाटत असले तरी जोवर आपले बुद्धिमान तरुण भारत सोडून परदेशी जाणे पसंत करत आहेत तोवर आपली प्रगती ही जगाच्या तुलनेत खूपच अपुरी आहे असेच म्हणावे लागेल. देशातील विविध शेतकी विद्यापीठांचा अनुभवदेखील असाच काहीसा निराशाजनक आहे. तिथे शिकलेल्या तरुणांनी देशातील शेती सुधारावी म्हणून फारसे प्रयत्न केल्याचे दिसत नाही; किंबहुना, त्यांच्यातील क्वचितच एखादा आपल्या घरची शेती आज उत्तम प्रकारे सांभाळताना दिसेल. बहुतेकांना कॉर्पोरेट जगाचे आकर्षण असते किंवा स्पर्धापरीक्षा देऊन सरकारी अधिकारी बनण्याचे.

 इथे आवश्यक त्या सर्व सोयी आहेत. तीन देवळे आहेत, क्लब्ज आहेत, क्रीडांगणे आहेत, दुकाने व बँका आहेत, सर्व प्रकारचे जेवण मिळू शकेल अशी रेस्टोरंट्स आहेत. स्टाफ क्वार्टरमधल्या त्या प्राध्यापकांच्या घरीही आम्ही गेलो. त्यांची पत्नी इथेच शिकवते. मुलगा इथल्याच शाळेत जातो. त्यांच्याकडे जाताना एक गमतीदार अनुभव आला. हरणांप्रमाणे इथे माकडेही भरपूर आहेत आणि त्यांचा भलताच त्रास होतो. हातात काहीही खाद्यपदार्थ दिसला तर ती माकडे पटकन उडी मारून तो पळवतात. विरोध केला तर चक्क अंगावर येतात! ही एक अत्याधुनिक तंत्रशिक्षण देणारी संस्था आहे; पण या माकडांचा बंदोबस्त करणे काही इथल्या व्यवस्थापनाला जमलेले नाही! सानेंच्या घरी नेण्यासाठी म्हणून आम्ही काही खाऊ घेतला होता आणि त्यांच्या क्वार्टरच्या पायऱ्या चढताना तो अगदी कसोशीने लपवून ठेवावा लागला होता! त्यांच्या घरात शिरेपर्यंत कसाबसा आम्ही तो आजूबाजूच्या माकडांपासून सुरक्षित ठेवला! 

   अनेक विलक्षण बुद्धिमान व्यक्ती या तमिळ समाजातून पुढे आल्या आहेत. विश्वनाथन आनंदपासून कालच्या डोमाराजू गुकेशपर्यंतचे जागतिक कीर्तीचे अनेक बुद्धिबळपटू इथलेच. देशातील गणिताची सर्वांत मोठी राष्ट्रीय संस्था चेन्नईमध्येच आहे. गणितज्ञ रामानुजम किंवा शकुंतलादेवी, पहिले भारतीय नोबेलविजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन, संगणकक्षेत्रातील एच.सी.एल. कंपनीचे शिव नाडर इत्यादी अनेक तमिळ नावे पटकन आठवतात. भारतरत्न पुरस्कार द्यायला सुरुवात १९५३ साली झाली आणि पहिल्या वर्षी राजागोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी. व्ही. रामन यांना ते दिले गेले. योगायोग म्हणजे हे तिघेही तमिळ होते.   

   आयआयटीचा मुंबई आणि दिल्ली येथील कॅंपस मी पूर्वी बाहेरून बघितला होता, पण आत सगळीकडे फिरून एखादी आयआयटी बघायचा हा माझा पहिलाच योग होता. साहजिकच इथून बाहेर पडताना एक आंतरराष्ट्रीय दर्ज्याची भारतातील शैक्षणिक संस्था बघितल्याचे समाधान होते.

   संध्याकाळी माझा जुना तमिळ मित्र कार्तिक डोरे याच्याबरोबर आम्ही हॉटेल राज पार्क नावाच्या हॉटेलात चहा घ्यायला गेलो. अलवार पेठ येथे टीटीके रोडवर हे मध्यम आकाराचे पण खूप जुने हॉटेल आहे. पूर्वी यालाच ओबरॉन इन म्हणत. “आमचं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा एकदा मी आणि स्वाती इथेच कॅन्डल लाइट डिनर घ्यायला आलो होतो!” आत शिरताशिरता अण्णांनी (म्हणजे आशुतोष आपटे यांनी) आठवण काढली. ‘बदलता भारत’ लिहिताना कार्तिक हाच माझा चेन्नईमधील मुख्य मार्गदर्शक होता आणि त्याच्याविषयी मी त्या पुस्तकात लिहिलेही होते. आज वीस वर्षांनंतर इथल्या परिस्थितीबद्दल त्याची काय निरीक्षणे होती ते जाणून घ्यायला मी उत्सुक होतो. त्याची निरीक्षणे साधारण पुढीलप्रमाणे होती —  

    ‘तमिळनाडूचा बहुतेक सर्व भाग सतराव्या शतकापासून थेट इंग्रज अंमलाखाली राहिला; संस्थाने अशी तिथे फारशी नव्हती. अपवाद फक्त तंजोरचा. त्यामुळे संस्थानी अंमलात जो एक ढिलेपणा असायचा तो इथे नव्हता. त्यामुळे खूप पूर्वीपासूनच इथले प्रशासन कार्यक्षम आहे. राजकीय स्तरावर काहीही उलथापालथ होत असली तरी राज्यातील प्रशासन सुरळीत चालू राहते. जयललिता यांच्या काळात झालेले विकासाचे एक मोठे काम म्हणजे चेन्नईपासून जवळच असलेला ओरागडम परिसरातील साठ किलोमीटर लांबीचा प्रचंड ऑटोमोटिव्ह कॉरिडोर. ज्याला ऑटो हब म्हणतात. १९९५ साली फोर्ड कंपनीने इथे आपला मोटारी बनवायचा भारतातील पहिला प्लांट टाकला. नंतर आली दक्षिण कोरियाची हुंदाई (Hyundai) ही कंपनी. त्यानंतर इतरही कंपन्यांनी आपापले प्लांट टाकले. नंतर टायर व इतर ऑटो पार्ट्स बनवणार्‍या प्रचंड कंपन्या आल्या. भारतातील चाळीस टक्के ऑटो पार्ट्स इथे बनतात व आज एशियाचे डेट्रॉईट म्हणून हा भाग ओळखला जातो. हुंदाईपाठोपाठ सॅमसंग, एलजी अशा इतरही अनेक कोरियन कंपन्या इथे आल्या. 

   ‘या कोरियन कंपन्यांमुळे चेन्नईमध्ये एक मोठाच फरक पडला. विशेष म्हणजे या कंपन्यांत काम करणारे कोरियन भारतात येताना एकटेच आले नाहीत तर बरोबर आपल्या बायको-मुलांनादेखील घेऊन आले. कारण त्यांचे येथील वास्तव्य साधारण चार ते पाच वर्षे असते. त्यामुळे आज जवळजवळ पाच हजार कोरियन माणसे आज चेन्नईमध्ये राहतात. गोल्फ हा उच्चभ्रू खेळ त्यांच्यामुळेच इथे अनेकांना ठाऊक झाला. इतक्या मोठ्या संख्येने एखाद्या परदेशातील लोक भारतातल्या अन्य कुठल्याच शहरात येऊन राहिले नसतील. भारतातील सर्वांत चांगले कोरियन खाणे त्यामुळे चेन्नईमध्ये मिळते!

   ‘इतरही औद्योगिक क्षेत्रात तमिळनाडूने भरारी घेतली आहे. सुगुणा चिकन फूड्सचा एक उदाहरण म्हणून इथे उल्लेख करता येईल. लोकांना वाटते त्याप्रमाणे सगळे तमिळ लोक शाकाहारी नसतात; किंबहुना मांसाहार करण्याचे प्रमाण चेन्नईत सर्वांत जास्त आहे. येथील पशुपालन व्यवसाय खूप मोठा आहे आणि त्याच्याशी निगडित असे चामडी कमवायचे कामही इथे फार मोठ्या प्रमाणावर होते. भारतातून होणाऱ्या चामडी वस्तूंच्या एकूण निर्यातीत तमिळनाडूचा वाटा चाळीस टक्के आहे. येथील सेंट्रल लेदर इन्स्टिट्यूट केवळ भारतातच नव्हे तर जगात सर्वांत मोठी आहे. (कार्तिक हे सांगत असताना मुंबईतल्या धारावीत येणारा चामड्याचा उग्र वास मला आठवत होता. तिथे तमिळ वस्ती बरीच होती आणि त्यातले बरेच जण चामडे कमावण्याचे काम करत. चामड्याच्या पर्सेस, पाकिटे, चपला, पट्टे वगैरे वस्तू तिथे खूप उत्तम मिळायच्या आणि त्या खरेदी करण्यासाठी लांबून लांबून उच्चभ्रू वस्तीतले लोक धारावीच्या झोपडपट्टीत चक्कर मारायचे.) कोईम्बतूरजवळच्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील दोघा भावांनी कुक्कुटपालन क्षेत्रात पदार्पण केले आणि कॉंट्रॅक्ट पद्धतीने व्यवसाय करून खूप मोठे यश संपादन केले आहे. त्यांची सुगुणा चिकन फूड्स ही या क्षेत्रातील सर्वांत मोठी भारतीय कंपनी मानली जाते.

    ‘येथे हिंदी भाषेला जो विरोध होतो त्याबद्दल माध्यमांमधून सतत चर्चा होत असते आणि त्यांनाही काहीतरी खळबळजनक विषय हवाच असतो; पण त्याचा खूप बाऊ करायचे कारण नाही. मी स्वतः तीस-पस्तीस वर्षे जमशेदपूर येथेच नोकरी करत होतो आणि त्यामुळे माझे हिंदी चांगले आहे; पण आज तमिळनाडूमध्ये अनेक परप्रांतीय नोकरीनिमित्त राहतात, उत्तर भारतात नोकरीसाठी राहिलेले अनेक तमिळही निवृत्तीनंतर आज इथे राहायला आले आहेत. त्यांच्या सहवासामुळेही स्थानिक लोकांना हिंदी बऱ्यापैकी समजते. इथले लोकही हिंदी सिनेमे बघतात, हिंदी गाणी ऐकतात. मी नोकरीला होतो त्या झारखंडमधील हिंदीभाषक महेंद्र सिंग धोनी इथे तमिळ तरुणांमध्येही अफाट लोकप्रिय आहे. तथाकथित हिंदीविरोध आता फक्त राजकीय पातळीवर आढळतो.

   ‘माझ्या वयाच्या माणसासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इथली उत्तम वैद्यकीय सेवा. इथले शंकर नेत्रालय आणि त्याचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर बद्री यांचे कार्य जगप्रसिद्ध आहे. ते देशातील सर्वांत मोठे डोळ्यांचे हॉस्पिटल आहे . डोळ्याची कुठलीही ऑपरेशन्स तिथे अत्यंत स्वस्तात आणि उत्तम होतात. केवळ डोळ्यांचे नव्हे तर सगळ्याच शाखांचे उत्तम डॉक्टर्स इथे उपलब्ध आहेत. शिक्षणाप्रमाणेच येथील सरकारने प्रथमपासून आरोग्याकडेही लक्ष पुरवले. त्यामुळे केवळ चेन्नईमधे नव्हे तर राज्यात सगळीकडेच  चांगली हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे मला इथे तसे काही टेंशन नाही.’ 

   हळूहळू हॉटेलातली वर्दळ वाढत चालली तसे आम्ही आमचे संभाषण आटोपते घेतले. मला हवी होती तशी माहिती तोवर त्याच्याकडून मिळाली होती. शिवाय त्याला जवळच कुठल्यातरी डॉक्टरची अपॉइंटमेंटदेखील होती. 

   चेन्नई ही तमिळनाडूची राजकीय तसेच आर्थिक राजधानी असल्याने साहजिकच राज्यातील घटनांचे पडसाद चेन्नईमध्ये हमखास उमटतातच. त्यामुळे या भेटीत चेन्नई हा मी केंद्रबिंदू ठेवला होता. व्यावहारिकदृष्ट्यादेखील ते खूप सोयीचे होते. पण इथे हे नमूद करायला हवे की यापूर्वीदेखील काही वेळा मी तमिळनाडूत आलो होतो. पिच्छावरम, चिदम्बरम, शिवकाशी, वेलांकणी, तंजावर, सुचिंद्रम, कोइंबतूर, तिरूपूर, सेलम, तिरूचिरापल्ली, श्रीरंगम, मदुराई, नागरकॉइल, कोडाइकनाल, ऊटी, कुन्नूर, रामेश्वरम, कन्याकुमारी अशा अनेक लहान-मोठ्या शहरांमधून पूर्वी फिरलो होतो. साहजिकच त्यावेळच्या आठवणी या प्रवासातदेखील अनेकदा मनात जाग्या होत होत्या. उदाहरणार्थ, ममल्लापूरची मंदिरे बघताना पूर्वी विविध ठिकाणी जी सुंदर आणि भव्य मंदिरे बघितली तीही मला आठवत होती. या सगळ्याच स्थळांविषयी बरेच काही लिहिण्यासारखे आहे. स्थळाअभावी केवळ  एक झलक म्हणून काही आठवणी इथे नमूद कराव्याशा वाटतात. 

   अगदी पहिली विशेष आठवण म्हणजे कन्याकुमारीची. भारताच्या सर्वांत दक्षिणेला असलेले भूशिर-बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंद महासागर हे तीन समुद्र जिथे एकत्र येतात. तिन्ही समुद्रांच्या पाण्याचा रंग थोडा-थोडा वेगळा आहे. पूर्वी कन्याकुमारी त्रावणकोर संस्थानातच समाविष्ट होते, पण राज्यपुनर्रचनेनंतर ते केरळऐवजी तमिळनाडूमध्ये समाविष्ट झाले. आजही कन्याकुमारीत मल्याळी लोक मोठ्या संख्येने आहेत. इथे स्वामी विवेकानंदांचा विख्यात पुतळा बघितला. कन्याकुमारी मंदिराच्या शेजारीच असलेला. त्याच्या निर्मितीची सगळीच कहाणी रोमांचित करणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रचारक एकनाथजी रानडे यांनी अगणित अडचणींवर मात करत, देशभर प्रवास करून, आपल्या विरोधकांशीही संवाद साधून हा भव्य पुतळा १९७० साली उभारला. ज्या खडकावर बसून विवेकानंदांनी तपश्चर्या केली होती त्या खडकावर. इथे उभे राहिले आणि क्षितिजावर नजर रोखली की मनात भावनांचा अगदी कल्लोळ उसळतो. हे भारताचे सर्वांत खालचे टोक, इथे आपला देश संपतो या जाणिवेने एक हुरहूर मनात दाटून येते. तिथे रानडे यांनी स्थापन केलेले विवेकानंद स्मारक केंद्र आजही सेवाव्रती तयार करायचे काम देशभर आणि परदेशातही करत आहे. आज देशात वेगवेगळ्या ठिकाणी असे थोर व्यक्तींचे पुतळे उभारायचे काम होत आहे. पण ते सारे पुतळे सरकारी पैशातून उभारले जातात. विवेकानंदांचा पुतळा मात्र पूर्णतः लोकसहभागातून उभारला गेला आहे. एखादे भव्य काम कसे उभे करायचे याचा तो एक आदर्श आहे. विवेकानदांच्या पुतळ्याशेजारीच तमिळ संतकवी थिरुवल्लूवर यांचा त्याहूनही उंच पुतळा २००० साली तमिळनाडू सरकारतर्फे उभारण्यात आला आहे. या दोन्ही विभूती आपापल्या परीने थोरच आहेत; त्यांच्यात तुलना करणे अगदी चुकीचेच होईल; पण येथील थिरुवल्लूवर यांच्या पुतळ्याची उंची अधिक ठेवण्यामागे डीएमके पुढाऱ्यांच्या मनात विवेकानंद स्मारक केंद्राशी स्पर्धा करायची भावना होती का असा विचार मनात डोकावल्यावाचून राहिला नव्हता; अर्थात हा केवळ माझ्या मनात आलेला विचार आहे; प्रत्यक्षात तसे काही नसेलही.

   रामेश्वरच्याही आठवणी आहेत. तेथील देवळे अप्रतिम होतीच पण त्या पौराणिक शहराची एक आधुनिक आठवण अगदी मनावर कोरली गेली होती. भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांचे साधे पत्र्याचे झोपडीवजा घर इथेच ऐन समुद्रकिनार्‍यावर मासेमार्‍यांच्या वस्तीत आहे. ते बघताना डोळे पाणावले. अशा अत्यंत गरीब घरातून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना थेट राष्ट्रपतिभवनात घेऊन गेला. यात त्यांचे कर्तृत्व होते हे निःसंशय; पण एका अर्थाने भारतीय लोकशाहीचे सामर्थ्यही त्यातून प्रतीत होत होते. भारतातील व्यवस्थेला (सिस्टिमला) अनेक जण नावे ठेवतात आणि त्यात थोडेफार तथ्य असते हे खरेच आहे; पण याच व्यवस्थेतून कलामांसारखी एखादी व्यक्ती अगदी खालच्या स्तरातून पुढे येते आणि सर्वोच्च स्थानी पोचू शकते हेही लक्षात घ्यायला हवे. आजच्या भारतीय तरुणांना सर्वाधिक प्रेरणादायी वाटणार्‍या ज्या चरित्रकहाण्या आहेत त्यांत कलामगाथा अग्रस्थानी आहे.

   तंजावर किंवा तंजोर हे असेच आणखी एक लक्षात राहिलेले शहर. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजी भोसले यांनी तेथे गादी स्थापन केली. साहजिकच एक मराठी माणूस म्हणून या शहराविषयी वेगळी आपुलकी होती. भारतातील सर्वांत मोठे मानले गेलेले बृहदेश्वराचे (म्हणजे शंकराचे) भव्य मंदिर इथेच आहे. राजा राजाचोला प्रथम याने सुमारे एक हजार वर्षांपूर्वी ग्रॅनाईट वापरून उभारलेले हे मंदिर विलक्षण सुंदर आहे. मंदिराच्या गोपुराची उंची २१६ फूट (म्हणजे तब्बल वीस मजले) असून जगातील हे सर्वांत उंच मंदिर आहे. इथून जवळच कावेरी नदीच्या काठी तेलुगू संतकवी त्यागराज यांनी समाधी घेतली. कर्नाटक संगीतातील हे खूप मोठे नाव. इथे मराठी भाषा आजही बोलली जाते पण त्यांचे मराठी आपल्यापेक्षा बरेच वेगळे आहे. येथील ग्रंथालयात अनेक दुर्मिळ मराठी ग्रंथ असून महाराष्ट्रापासून इतके दूर राहूनही त्यांनी मराठी भाषा कशी जोपासली याचे कौतुक वाटते. मराठी साहित्य संमेलन स्वबळावर घेता यावे म्हणून महाकोश उभारायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सर्वांत मोठा पाच लाखाचा धनादेश इथल्याच राजघराण्यातून आला होता.

   मदुराईदेखील असेच माझ्या मनावर खूप ठसले गेलेले शहर. मुंबईतील काही मित्रांबरोबर मी आणि माझी पत्नी वर्षा तिथे गेलो होतो. तमिळनाडू पर्यटन मंडळाच्या एका दौऱ्याचा तो भाग होता. चेन्नई ही तमिळनाडूची राजकीय राजधानी असली तरी तमिळनाडूची सांस्कृतिक राजधानी मदुराई हीच आहे. चेन्नई तमिळनाडूच्या अगदी उत्तरेला आहे. याउलट वैगयी नदीच्या काठी वसलेले मदुराई मात्र तमिळनाडूच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे. चेन्नईची वाढ तिथे सतराव्या शतकात इंग्रजांनी आपला तळ स्थापन केल्यानंतरच झाली; याउलट मदुराईमध्ये तमिळ संस्कृती त्यापूर्वी निदान दोन हजार वर्षे बहरून आली होती. संगम साहित्य इथेच निर्माण झाले. वाराणशीइतकेच मदुराई हेही प्राचीन आहे. सध्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भरतनाट्यमच्या प्रसारक आणि ‘कलाक्षेत्र’च्या निर्मात्या रुक्मिणी देवी अरुंडेल, विख्यात गायिका भारतरत्न एम. एस. सुब्बुलक्ष्मी, आजचे गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई ह्या सार्‍यांचा जन्म मदुराईमधलाच आहे. 

   मदुराईची मुख्य ख्याती आहे ती अर्थातच इथल्या अनेक भव्य मंदिरांमुळे, विशेषतः मीनाक्षी मंदिरामुळे. मीनाक्षीचे, म्हणजेच पार्वतीचे, हे दगडी मंदिर चोला राजांनी उभारले. आकाशात उंच गेलेली चौदा गोपुरे आणि त्यांच्या खालचे चौदा मांडव अत्यंत रेखीव आहेत. प्रत्येक गोपूर आणि मांडव हे दोन्ही एकाच दगडातून कोरून काढलेले आहेत. हजार खांब असलेला इथला मुख्य मंडप बघणे अविस्मरणीय आहे. ह्यातल्या प्रत्येक खांबावरची नक्षी वेगळ्या प्रकारची आहे. त्या काळात ते कसे उभारले गेले होते याची आज आपण कल्पनाही करू शकत नाही. 

    तेथील गांधी म्युझियम आवर्जून बघावे असे आहे. या शहराविषयी गांधीजींना विशेष आपुलकी होती. इथल्याच एका सभेत भाषण करताना त्यांनी यापुढे आपला पाश्चात्त्य पोशाख सोडून फक्त धोतर  नेसायचा निर्णय जाहीर केला होता. इथल्याच एक विद्यार्थी संघटनेने त्यांना ‘राष्ट्रपिता’ (फादर ऑफ द नेशन) ही उपाधी दिली होती. एकूणच गांधीजींविषयी तमिळ जनतेला प्रेम होते. मागच्या प्रकरणात लिहिल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेत त्यांनी काढलेली २१ वर्षे आणि त्या दरम्यान तेथील तमिळ कामगारांशी आलेला जवळचा संबंध हेही यामागचे एक कारण असावे. गांधीजींच्या नावाने असलेले कुठले ना कुठले स्मारक आपल्याला तमिळनाडूमधील बहुतेक सगळ्या प्रमुख शहरांत आढळते. 

   तेथील एक व्यक्तिगत आठवणही आहे. आम्ही मदुराई सोडणार त्याच्या आदल्या रात्री वर्षाची प्रकृती एकाएकी बिघडली. सपाटून ताप भरला. कपाळावर घड्या ठेवल्या, क्रोसिनच्या दोन गोळ्या घेतल्या, तरीही ताप उतरेना. रात्रभर आम्ही झोपूही शकलो नाही. आमचे मित्र आणि बसमधले इतर प्रवासी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास नाईलाजाने पुढे निघून गेले; एकूण प्रवासाचे पूर्वनियोजन पूर्वीच झालेले असल्याने त्यांना मदुराईत थांबणे अशक्य होते. आम्ही सर्किट हाऊसमधे उतरलो होतो. आसपास ओळखीचे कोणीच नाही. घाबरूनच गेलो होतो. सुदैवाने तेथील मॅनेजर मदतशील होता, त्याने जवळच असलेल्या एका छोट्या दवाखान्यात जायला सांगितले, सोबत एक माणूसही दिला. तिथे कितपत चांगला इलाज होईल याविषयी आम्ही साशंकच होतो पण दुसरा काहीच पर्याय नसल्याने गेलो. तेथील एका तरुण डॉक्टरने वर्षाला तपासले आणि काही गोळ्या दिल्या. फक्त वीस रुपये भरावे लागले. आश्चर्य म्हणजे एक गोळी पोटात गेल्यावर दीड-दोन तासांतच ताप पूर्ण उतरला. आम्हाला त्यावेळी किती हायसे वाटले ते शब्दांत सांगता येणार नाही. नंतर कळले की तेथील टीव्हीएस कंपनीने चालवलेला तो धर्मार्थ दवाखाना होता. तिथे उत्तम डॉक्टर उपलब्ध असतात आणि जवळजवळ फुकटात इलाज केला जातो. टीव्हीएस ह्या विख्यात स्कूटरकंपनीचे मुख्यालय इथेच आहे. अगदी वेळेत उत्तम उपचार मिळाल्याने त्याच संध्याकाळी दुसरी टॅक्सी करून आम्ही आमच्या बरोबरच्या प्रवाशांचा पुढचा मुक्काम जिथे होता तिथे पोचू शकलो. तमिळनाडूमधील वैद्यकीय सेवेबद्दल माझे त्या दिवशी जे चांगले मत झाले ते आजही कायम आहे!  त्यामुळेच कार्तिकला आज वृद्धापकाळातही चेन्नईजवळ राहत असल्याने तब्येतीचे कसले टेन्शन नसावे हे मला अगदी पटले! 

   कार्तिक आणि त्याची पत्नी लक्ष्मी दोघेही आता चेन्नईपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एका वृद्धाश्रमात राहतात. आपला वडिलोपार्जित बंगला त्यांनी कुठल्या तरी बड्या बिल्डरला विकून टाकला आहे. वीस वर्षांपूर्वी त्यांच्या त्या घरात मी मुक्कामही केला होता. पण आज तिथे एक उंच इमारत उभी राहत आहे. भारतातील इतरही महानगरांमधे जे घडते आहे तेच इथेही घडत आहे. त्यांची एकुलती एक उच्चशिक्षित मुलगी लग्नानंतर जमशेदपूरला स्थायिक झाली आहे; नवरा-बायको दोघेही उत्तम कमाई करत आहेत. त्यामुळे चेन्नईत ती कायमस्वरूपी यायची जवळपास काहीच शक्यता नाही. देशांतर्गत झालेले असले तरी हेही एक प्रकारचे ब्रेनड्रेनच! 

अर्थात या ब्रेनड्रेनकडे पाहण्याचा आणखीही एक व्यावहारिक दृष्टिकोन आहे. इतिहासपूर्व काळापासूनचमनुष्य स्थलांतर करत आला आहे; दाणे शोधण्यासाठी ‘पक्षी जाय दिगंतरा’ हे खरेच आहे. ‘अयं निजःपरो वेति गणना लघुचेतसाम्, उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्’ हा जर आपल्या संस्कृतीचा आदर्श असेल तर कोणाचे वास्तव्य कुठल्या देशात आहे हा प्रश्न महत्त्वाचा नाही. कार्तिकच्या म्हणण्याप्रमाणेवर्षातून एकदातरी ती दोघे जमशेदपूरला जातात आणि वर्षातून एकदातरी त्यांची मुलगी चेन्नईला येते.एकाच गावात राहूनही एकमेकांना फारसे कधी न भेटणारे कुटुंबीय आपल्या अवतीभवती असतातआणि त्याच्यापेक्षा कार्तिक आणि लक्ष्मी यांनी शोधलेला मार्ग अधिक चांगला.

‘Distance is to love, like wind is to fire. It extinguishes the small, and kindles the great!’ असे एका
फ्रेंच लेखकाने म्हटलेच आहे.

Author

2 thoughts on “आयआयटीची ज्ञानगंगा आणि ब्रेनड्रेन

  1. भानू सरांचे वेगळ्या अंगाने स्थलमहात्म्य सांगणारे लेख त्या ठिकाणाला आभासी भेट दिल्याचं नुसतं समाधान देत नाहीत तर प्रत्यक्ष भेटीची आस निर्माण करतात

Leave a Reply