कवी विठ्ठल
कविता स्फुरते कशी याचे दोन प्रवाह कविमनाला जाणवतात. मनातल्या भावनांचा उद्रेक होऊन अंतरातून बाहेर आलेली भावगर्भ कविता आणि दुसरी बाहेरच्या परिस्थितीचा मनावर परिणाम होऊन बाहेरून आत आलेली कविता. संतकाव्य हे अंतरीच्या उमाळ्यातून ‘अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी’ या प्रकारातलं. परमेश्वर हाच संतकाव्यरचनेचा विषय होता त्यामुळे कविता भक्तिसंकल्पनेभोवतीच फिरत होती.
कालौघात विषय बदलत जातात. ते बदलणं गरजेचं असतं. पंतकवींच्या रचनेत पुराणकथांचं विश्व कथाकाव्य रूपात आलं. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अशा मानवी वृत्तींचा काव्यात परिपोष झाल्यामुळे ते मानवी पातळीवर आलं. काव्यातून ‘फक्त उपदेश’ ही पायरी मागे राहिली.
ओवीबद्ध रचनेऐवजी विविध वृत्तांच्या वापराने काव्यात गेयता आली.
काव्यरचनेच्या या नकळत घडत जाणाऱ्या पायऱ्या होत्या… आहेत. वृत्तांचं प्रेम जडल्याने वृत्तांमध्ये बसवण्यासाठी वाटेल तसा ऱ्हस्व दीर्घाचा वापर, शब्दांची विनोदी तोडमोड असेही प्रकार होऊ लागले. असे होणे हीदेखील अपरिहार्य गोष्ट होती. दीड-दोन वर्षांची बाळं एखादा शब्द उच्चारता आला की त्या शब्दात गुंतून त्याचेच आवर्तन करत राहतात; तशीच वृत्ते, अलंकार यांच्यात या वळणावरची कविता गुंतली. या कवितेत रसवत्ता आहे; पण काव्यगुणांचा परिपोष नाही; पण यावर टीका करणेही योग्य नाही. बाळाचं दुडदुडणं, बोबडं बोलणं ही जशी पायरी तशीच ही काव्यरचनेची महत्त्वाची पायरी.
या पायरीवरचं एक नाव
कवी विठ्ठल.
अर्थापेक्षाही शब्दांशी, वृत्तांशी आणि विविध रचनाबंधांशी खेळण्यात रमलेला हा कवी.
विद्वज्जीवन, पांचालीस्तवन, शुकरंभा संवाद, रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवर यांसारख्या रचनांमधून त्याने नाट्य, रस, वृत्त असा विविधांगी पट विणला आहे.
या भागात त्यांच्या वृत्तरचनेचा आढावा घेऊ या.
न जाणें मी छंदें विशद यमकें बंधरचना
न जाणें मी काव्ये नवरस अलंकारसुचना
कवी म्हणून त्यांची अशी विनम्र भावना होती. उत्कट रसाळ काव्य रचणारा नसलो तरी
मनाच्या उल्हासें रचिन तरि मी नाटकरिती
असे त्यांनी म्हटले आहे आणि त्यानुसार मोठी काव्यरचना केली आहे. त्यांची काव्यविषयक भूमिका काय होती…
शार्दूलविक्रीडित
श्रोते हो! जितुकें चरित्र तितुकें मी काय वर्णूं सकें?
सर्पारीस निकें सुधारस फिकें नेलें जसें भातुकें
तैसें म्यां इतुकें कवित्व यमके आरंभिलें कौतुकें
सालंकार तुकें विचित्र गमकें वाचा मनोरंजकें
रस, यमक, अनुप्रास, बंध यांची सालंकृत भक्तिरचना असं काव्याचं रूप त्यांच्या मनात होतं. हे काव्य ‘पूर्वजन्मदुरितद्रुम’ – पूर्वजन्मात घडलेल्या पापाच्या वृक्षाचा नाश करेल अशी त्यांची खातरी होती.
त्यांच्या रचनांमधला मजेशीर भाग म्हणजे गूढ संदेश. रुक्मिणीला शिशुपालाशी विवाह करायची इच्छा नसते. ती सुदेवाला भुजंगप्रयातात संदेश देते :
मनाचा विसावा भजे चोविसावा
त्यजी बत्तिसावा पथीं चौतिसावा
याची उकल कशी :
केशवनामांत २४ वे नाव कृष्णाचे आहे. तोच माझ्या मनाचा विसावा आहे.
त्यजी बत्तिसावा… म्हणजे बत्तिसावे संवत्सर – विलंब. विलंबाचा त्याग कर… वेळ घालवू नकोस. चौतिसावे संवत्सर शार्वरी म्हणजे रात्र. तो पंथ घे म्हणजे रात्रीच्या वेळी गुपचूप निघून श्रीकृष्णाला घेऊन ये.
साध्यासुध्या भक्तिप्रधान काव्याच्या परिघाबाहेर पडलेली अशी गमतीदार कविता आपल्या मेंदूला खाद्य पुरवते.
वृत्तातील एक मजेशीर खेळ हादेखील एक विशेष
जलोद्धतगती (जसजस)
मराळगमनी मनीषिणींसवे
सवे उपरमे रमे मन जवे
जवे करुनि घे निघे स्तुति करी
करींद्रगति ये तिये शचि धरी
(रुक्मिणी स्वयंवर सर्ग ४/१८)
गमनी मनी, उपरमे रमे
करुनि घे निघे असं मध्ययमक या रचनेत त्यांनी साधले आहे.
पांचालीस्तवनात त्यांनी विविध वृत्तांचे उपयोजन केले आहे. शिखरिणी वृत्तात त्यांनी एक कोडं गुंफलं आहे. ते उकललं की पांचालीस्तवन कधी रचलं त्याचा शक कळतो.
शके आनंदाब्दी रसनिधिइषूभू इह वने
वसेता क्रांती प्रथम विधि पीयूषवचनें
रसनिधिइषूभू हा कोणता शब्द? त्याची फोड केली की उलगडा होतो.
रस एकूण : ६ कटू, आम्ल, मधुर, लवण, तिक्त, कषाय
निधी ९ : पद्मनिधी, महापद्म निधी, नीलनिधी, मुकुंदनिधी, नंदनिधी, मकरनिधी, कच्छपनिधी, शंखनिधी खर्वनिधी
इषु (बाण) ५ – सर, इषु, सायक, तीर, नाराच
भू १
हे आकडे उलट्या क्रमाने लिहिले की १५९६ ही संख्या मिळते. या कोलांटउड्या काव्यात आताच्या काळात झेपणाऱ्या नसल्या तरी त्या काळात हे नवीन होतं म्हणून लोकप्रिय होतं.
पान २५९ पदसंग्रह
मात्रा वृत्तातही या कवीने रचना केल्या आहेत. सूर्यकांत मात्रा वृत्त ८८८३
सर्व सुखें पाहतां ऐकतां न घडे चित्तानंद
यास्तव त्याचा करुन अनादर सोडुन दिधला छंद
मदनरंग, दासी, परिलीना अशांसारख्या भृंगावर्तनी मात्रा वृत्तांतील पदेही आढळतात.
गगनदीप वंशदीप रघुवीर सुर तारी (मदनरंग)
गोदातटीं पंचवटी वास करुनि पर्णकुटी (दासी)
खरदूषण खरतर शर मारुन भय वारी
(परिलीना)
कबीरकथेत त्यांनी गीति वृत्त उपयोजिले आहे.
१२-१८-१२-१८
कबिरमुखांतुनि वाणी ऐकुनि संतोषि होय बहु वाणी
गुणहि त्याचे वानी बोले कबिरासि काय तुज वाणी(२४८/१७)
वाणी या शब्दाचे तीन वेगवेगळे अर्थ यात त्यांनी गुंफले आहेत.
वामनचरितही गीतिवृत्तात आहे. वामनाच्या मौंजीबंधन कार्यावेळी सूर्य त्याला मंत्र शिकवतो आणि बृहस्पती ब्रह्मसूत्र देतो. हे अवघड शब्द गीतिवृत्तात रचताना त्यांनी यमकाचीही जोड दिली आहे. (४/२८)
उपनीयमान बटुतें सावित्रीतें कथी तदा सविता
दे ब्रह्मसूत्र गीष्पति दे पुत्रालागिं मेखला सविता
एक सविता म्हणजे सूर्य आणि दुसरा सविता म्हणजे जन्म देणारा!
त्याच्या तेजाने नर्मदातटीचे विप्र चकित झाले,
बोलति परस्परें ते, येतो यज्ञासि कोण हा रविसा
कीं वन्हि कीं सनक हा, भा सर्वांच्या हि येथ हारविसा
असा शाब्दिक खेळ त्यांच्या कवितेत सतत चाललेला दिसतो.
कामदा (र य ज ग) आणि शुद्धकामदा
(न र र ल ग) ही अतिशय गोड वृत्तं. द्रौपदी वस्त्रहरणात या वृत्तांचा गोडवा दुर्योधनाचा दांभिकपणा रंगवण्यासाठी योजला आहे. (१७६/३)
कुरुपतीसभे श्रेष्ठ बैसला
दुष्ट सर्वही मंत्र योजिला
दुर्योधन गोड वाणीने सांगतो
कुरुपती म्हणे, धर्म आणवा,
बंधु तो सखा शीघ्र भेटवा
वीटलों जिवा, सर्व वैभवा,
ये क्षणी तुम्ही विदुर पाठवा
नश्वरासि मी काय लुब्धलो
राज्यवैभवें सर्व वंचलो
हे बोलता बोलता नक्राश्रू पाझरू लागले, उपरती झाली आहे असे नाटक करत दुर्योधन गोड वाणीने म्हणाला
बंधु धर्मजी भेटवा मला
बोलतां क्षणी कंठ दाटला
लोचनीं किती पूर चालिला
जाय रे सख्या आणिं बंधुला
थंड तिरकसपणे यथायोग्य वृत्तातून मानवी स्वभाव त्यांनी दर्शवला आहे.
चामर १७७ रजरजर
दुर्योधनाच्या नक्राश्रूंमुळे भोळ्या धर्मराजाला आश्चर्य वाटलं
हास्यमूख धर्मराज काय शब्द बोलिला
उत्तरेसि आजि अस्त सूर्यराज पातला
आमवातिथीस चंद्र हा नभीं विराजला
क्षारता त्यजूनी आज सिंधु गोड वाटला
साध्यासुध्या लोकांसाठी केलेली अशी रचना.
विद्वज्जीवन काव्यात सात सर्ग आणि ३५३ श्लोक आहेत. पौराणिक कथावर्णनच असले; तरी विद्वान लोकांना हे आवडतील असे कवीला वाटत होते म्हणून नाव विद्वज्जीवन असे नाव त्यांनी योजले.
वानगीदाखल तोटक वृत्तातील एक रचना
कमला क्षणिं प्रश्न करी कमळा
कमलावरि शोभविसी कमळा
कमलावर आणि प्रिया कमळा
कमला कथि तूं त्यज पंक मला
कमळ, कमला पंक ( चिखल)मला अशी शाब्दिक कसरत वाचताना मजा येते.
पंडितांच्या अभिरुचीसाठी लिहिलं असल्याने यात अनेक अलंकार, वृत्तांनी नटलेली कवितासुंदरी सामोरी येते.
रुक्मिणी सुदेवाच्या निरोपाची वाट बघत आहे. व्याकूळ झाली आहे. तिची घायकुती अवस्था व्यक्त करण्यासाठी तोटक वृत्त (समरा*४) जलद ठेक्यामुळे अगदी समर्पक ठरतं.
अतिविव्हल होय विदर्भसुता,
तिसि आवरिती सखिया बहुता
तव वाम भुजें दृग विस्फुरती
शुभ चिन्ह दिसे वदती युवती
नभभर द्रुतविलंबित
पान १५२/३५
हळु चढाळ दिल्हे मलयानिलें
तरुण मंजरि कांपविली दळें
समजली हरिणांकनिभानना
मृगि मृगासि पुसे मृगलोचना
हरिणांक- चंद्र, नि-सारखा, आनन – चेहरा= चंद्रानना – खास पंडिती रचना!
रथोद्धता रनरलग १५९/३४
हरिविना व्याकूळ झालेली राधा म्हणते
मूर्तिमंत यमरूप चंद्रमा
मारमातुळ पिठी प्रियोत्तमा
गंधलेप सखिये न सोसवे
हारभार करि तो नसो सवे
स्वागता/१३८ – १रनभगग
ईश्वर एकच आहे. त्याला विष्णू म्हणा कृष्ण म्हणा की राम! अशी शिकवणही विद्वज्जीवनमधून ते देतात.
कुंडलें मणिमनोहर कानीं
पीतचीर जघनीं कर दोन्ही
पाउले सम इटेवर सानीं
तो तुझा कवि विठो वरदानी
आणि म्हणतात,
अक्षराणामकारोS स्मि मधला चौथा वर्ण (णा) काढून उरेल तो मीच आहे… म्हणजे राम!
१५५ ३ श्रीकृष्णाचं वर्णन करण्यासाठी म र भ न य य य गणांचं २१ अक्षरी वृत्त योजलं आहे. स्रग्धरा ( चाल: ध्यायेदाजानुबाहुं)
वक्त्री निर्माण गीता, पदिं सुरसरिता
नाभिपद्मीं विधाता
श्री ज्याची लोकमाता त्रिभुवनिं परता
एवढी ज्याचि सत्ता
सर्वात्मा सर्ववेत्ता गगनपरिणता
व्यापक प्राणदाता
राधे तो दैत्यहंता तुजहुनि परता काय गेला दिगंता?
(वक्त्री म्हणजे मुखातून)
इतक्या मोठ्या वृत्तात शब्द ओढाताण न होता इतके सुरेख आणि सुरेल बसतात की पंक्ती गुणगुणायचा मोह होतोच.
याच वृत्तातील श्रीकृष्ण स्तवनात
तैसा तूं पाव आतां कुवलयनयना! वासुदेवा मुरारी
कुवलयनयना हा भला मोठा शब्द किती सहज बसला आहे बघा!
रुक्मिणीस्वयंवराचं वर्णन ते रसिकतेने करतात. (१२१/४१)
उपेंद्रवज्रातून देशस्थ पद्धतीचे लग्न समोर उभं करतात. स्थळविपर्यास करत ‘धेंडा नाचवणे’ सारख्या देशावरील प्रथा रुक्मिणी स्वयंवरातही त्यांनी आणल्या आहेत.
धनें जिरें वायन झालि यानें
वधू कडे घेतलि नोवऱ्यानें
शिंपावया आम्र निघे मुरारी
कपाट देती मग राजनारी
रसमंजरीमध्ये नायिकाभेद स्पष्ट करताना मानवती नायिकेचं उपेंद्रवज्रातून वर्णन करतात. पती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षिला गेला आहे, पत्नीला हाक मारताना प्रेयसीचं नाव मुखात आलं हे लक्षात आल्यावर रागावूनही ती त्याचा अपराध पोटात घालते. तो क्षमा मागतो आणि साप हातात धरायच्या दिव्याला सामोरं जायला तयार होतो. २२७/३५
चुकोनि तें नाम मुखात आलें
हें सत्य मानीं सखि! एक बोलें
न मानिसी तें दिव मी करीतों
रोमावळीव्याळ करीं धरीतों
पतीचे परस्त्रीगमन तिला कसे कळले?
डाग या शब्दाचा एकाच ठिकाणी उचित उपयोग भुजंगप्रयातातून ते करतात; तो दोन ठिकाणी चपखल बसतो.
कपाळीं पतीचे परस्त्रीपदाचा
पडे डाग देखोनियां यावकाचा
परस्त्रीपदाचा डाग यावकाच्या – आळत्याच्या डागातून लक्षात आला.
या शब्दचमत्कृती निकृष्ट मानल्या जात असल्या तरी काव्यात गंमत आणतात.
उपेंद्रवज्रा पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत आणि इंद्रवज्रा दुसर्या आणि चौथ्या अशा उपजातिवृत्ताला विपरीतपूर्वा म्हणतात. रुक्मिणी सुदेवाला श्रीकृष्णाकडे लग्नासाठीचे विनंतिपत्र देण्यासाठी पाठवते. त्या वेळी श्रीकृष्णाने प्रेमाने केलेल्या आदरातिथ्याची
झलक७३/५१
धरूनि हस्तांबुज वाग्विलासें
पृच्छा किजे मंद उदार हांसे
कथा निवेदा सुरसा अपूर्वा
सुवृत्त जाणा विपरीतपूर्वा
सूर्याच्या बारा कला आणि चंद्राच्या सोळा कला, दाहक उन्हाळा यांची आणि ‘भवतापा’ची आणि मेघ आणि मेघनीळ यांची सांगड घालत ते म्हणतात(मंदाक्रांता) १५७/१३
बारा सोळा| रविशशि कळा| दाविती वेळवेळां|
काढी माळा| दहति विपुळा| क्रूर मोठा उन्हाळा|
वेळोवेळां| तरुपरिमळा| सिंचिती गोपबाळा|
मंदाक्रांता| त्यजुनि सकळां| चाल तूं मेघनीळा|
१५८ २०/
हा रमणीस निरोप निरोपी
हारमणी मग हा तिस वोपी
दोधकातला असा पंडिती शब्द खेळ! ही विठ्ठल कवीची खासियत.
१५६-७ आरतीच्या चालीवरच्या मणिमाला (तयतय) या वृत्तात काही उच्चार दीर्घ केले जातात. श्रीकृष्णस्मरणात रंगलेली व्रजबाला! तिला सगळीकडे श्रीकृष्णाचंच दर्शन घडत आहे.
वृंदावनधात्री प्रार्थी व्रजबाळा
गोपsवधुमध्ये देखे घननीळा
पीतांबर कांसे कंठीं वनमाळा
विद्वज्जीवन गाती हे विद्युन्माला
कवीने भगवद्गीतेचे सार कटिबंधात गुंफले आहे. कटिबंध ही पादाकुलकातील, १६-१६ मात्रांचे अनेक चरण असलेली वेगवान रचना. अर्जुनाने शस्त्र खाली ठेवल्यावर श्रीकृष्ण म्हणतो, २०१.
हा धिक् तुज कौंतेयासि म्हणे कोण समय हरिपुंगव हा, उपहास करिल पहा, शोक महा हा, करिशि अहाहा…
जिवलग मित्रा| स्पर्शुनि गात्रा| विकसितनेत्रा|
धरि करि तोत्रा| ज्ञानदमुद्रा| दावुनि भद्रा|…
पुढच्या शब्दांची उत्सुकता वाढत जाते.
विश्वरूप दर्शन घडवताना अनुस्वारांची मधुर योजनाही कटिबंधाची गेयता वाढवते. २०४
नैकवर्ण वपु| सुंदर चंदन| गंधमाल्यधर| कंधरमणि पीतांबर नेसे, तुंबर नारद मंजुळ गाती…
यात अचानक रौद्ररसाची झलक दिसते.
तन्मुखपंक्ती| सन्मुख उघड्या| उन्नत दाढा| उन्मदकौरव सैन्य तदंतरी जाता चघळी…
सीतास्वयंवर ३५/३६
सुकुमार रामाला एवढं मोठं धनुष्य कसं पेलता येईल? ही विवंचना जनकाला पडली आहे. मालिनी वृत्ताच्या आर्ततेतून ती वाचकांच्या मनाला भिडते.
म्हणउनि धरि राजा मौनमुद्रा, वदेना.
अमुप नृप मिळाले सार्वभौमाभिमानी
त्रिदश दनुज आले लंकनाथाभिमानी
देव आणि दानवांचे त्रिदश आणि दनुज हे समानार्थी शब्द मालिनी वृत्तात अगदी चपखल बसले आहेत.
मत्तगयंद वृत्त यालाच मदिरा वृत्त किंवा मराठीत सवाई म्हणतात. भभभभभभभगग (अयि गिरिनन्दिनिच्या जवळची चाल) १३७
कृष्ण जनार्दन कैटभमर्दन केशव माधव वामन विष्णो
श्रीमधुसूदन देवकिनंदन दानवशासन विठ्ठल जिष्णो
जे श्रुतिसारपरायण ते जन मुक्त निरंतर त्या हरिनामें
विठ्ठलदास करी हृदयीं जप छंदघटा प्रमदाहित कामें
परुषावृत्ती अनुप्रासामुळे या काव्यात आगळी मौज येते.
४१/३५
याच वृत्तातलं रामाचं वर्णन
राम दिसे सुकुमार निमासुर सुंदर नागर मन्मथगाभा
हस्त सुकोमल अंबुदशामल चाचर कुंतल षट्पदशोभा
(चाचर म्हणजे जटा, षट्पद म्हणजे भुंगा – भुंग्यासारखा निळसर रंगाचा)
रुक्मिणीचं याच वृत्तातलं गहिरं वर्णन. श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आतुर चांचर चालीने – अडखळत निघालेली रुक्मिणी
८४ /२२
चंचल चित्त| अचंचल तूं करिं| अंचल सावरिं
निश्चल राहें|
चाल रुळे चरणांबुज हा, वरि| कां चळ कांप तुला सुटलाहे
चारु म्हणे सखि चंद्रमुखी उठिं चांचरि चालिसि सावध पाहे
हेमकले प्रमदा मुकुटेश्वरि धीर धरी हरी संनिध आहे
वसंततिलकेला उद्घर्षिणी, सिंहोन्नता, सिंहोद्धता आणि मधुमालती अशी पर्यायी नावे कवी सांगतो.
बिल्हण चित्राच्या अनुवादात राजकन्येच्या शिक्षणाचा सखोल, समग्र तपशील कवीने वसंततिलकेत गुंफला आहे. अकराव्या शतकात स्त्रिया हे शिकत होत्या याचं आश्चर्य वाटतं.
केलेंच अध्ययन संस्कृतप्राकृताचे
पातंजलादिक महाश्रुत शास्त्रचर्चे
गांधर्व वैद्य रस ज्योतिष मंत्रविद्या
भाषा कवित्वगुण काव्य कला समुद्या
कथाकाव्यात नाट्य निर्माण व्हावं म्हणून कवी सूचक स्वप्नांचा आधार घेतो. वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदीला पडलेलं स्वप्न अर्जुन धर्माच्या कानावर घालतो. तेव्हा धर्म स्त्रियांच्या विरोधात बोलताना दाखवला आहे. कवी विठ्ठलाच्या काळात स्त्रियांना स्वातंत्र्य नसल्याने त्यांनी कालविपर्यास करत धर्माच्या तोंडी त्याच्या काळातील वाक्यं घातली आहेत. तो म्हणतो, ‘जो स्त्रीचं मत ऐकतो त्याला दुःखच होतं, अंगनामते सर्व नाडिले – पुढे प्रमाणिकेसारखा जोरकस छंद वापरून स्त्रियांविषयीचं त्याचं मत सडेतोडपणे मांडलं आहे.
प्रमाणिका छंद १८०- ३८,३९,४०
सदा असत्य बोलणें
किमर्थ शब्द मानणें
कळा अपार दावणें
नरोत्तमासि मोहणे
हे नाट्य अधिकाधिक गडद होत जातं.
द्रौपदीला सभेत आणल्याने भीष्म, कृपाचार्य आणि द्रोणाचार्यांनी दुर्योधनाला ‘बंधुअंगना माउलीपरी, भूपति बरी बुद्धि हे धरीं’’ असे सांगतात. यावर खवळलेल्या दुर्योधनाचा संताप व्यक्त करताना पंचचामर वृत्ताचं १८८ चपखल उपयोजन केलं आहे. तो या श्रेष्ठांना म्हणतो… (जरा= म्हातारपण)
जरा तुम्हास पातली म्हणोनि बुद्धि मंदली
नव्हे स्वहीत बोलणें अपत्यबुद्धि टाकिली
पुसे तुम्हांस ते दिसी स्वहीतबुद्धि सांगणें
सकाम सर्व वित्पति तुम्हांसि काय सांगणें
७ मात्रांचे गण असलेल्या विबुधप्रियेतील (रसजजभर) रचना. द्रौपदी आर्ततेने श्रीकृष्णाचा धावा करत असते. १९३/१६५
गोपिवल्लभ माधवा हरि यादवा मधुसूदना
अच्युता ऊपेंद्र ईश्वर कामिनीमनमोहना||
पद्मिनीपती कर्णिकातिरवासिनी यदुनायका
सांवळे मुरमर्दने कुळदेवते वरदायका….
श्रीकृष्णाची नावं ७/७ मात्रांमध्ये गुंफून सुरेल भक्तिशब्दमाला श्रीकृष्णाला चढवली आहे.
इंद्रवंशा १४८ ६ ततजर आणि वंशस्थ यांची गुंफण घालून
मद्भक्ति चौथी परिचारिका म्हणे
प्रिया प्रिया चक्र किरीट भूषणे
नवीन पाहे फुलल्या वनस्पती
वसंत आला ऋतु या वनाप्रती
दास्यभक्तीसाठी परिचारिका भक्ती हा शब्द योजून वृत्तरचना साधली आहे. शब्दांची अशी निवड अचंबित करते.
स्वर्गंगा वृत्त – याची चाल फटक्याची नाहीतर श्रावणमासी.
८-८-८-६ १६०/३
जय गोविंदा परमानंदा जीवनकंदा भगवंता
पाव मुरारी दैत्यकुलारी कुंजवीहारी जयवंता
हा भवसिंधू तारकबंधू मानस साधूवीहरणा
तुजला ध्यातो पावशी कान्हा द्रौपदिलज्जासंहरणा
वृत्तांच्या मांदियाळीत विद्युन्माला हे विजेसारखं चपळ, वृत्तही डोकावून जातं.
वृंदारण्यामध्यें बाला
यंत्रावर्णी बारासोळा
पूजी राधा श्रीगोपाळा
श्रोते गाती विद्युन्माला
पान १५० १९
चार वेळा राधिका गण असलेले स्रग्विणी (पद्मिनी) वृत्तही चपळ गतीमुळे चैतन्य निर्माण करतं
आत्मभू ब्रह्मभू रामनामें बरी
दोष सद्विठ्ठलातें दिजे चातुरी
ग्राम याचे चिदाकाश येणें घडे
शक्रचापा बरे द्वार पूर्वेकडे
७२/३७,४३
रुक्मिणी स्वयंवर प्रसंगी उपासकांची उपासना आणि नगरीच्या शोभेचे वर्णन पृथ्वी वृत्तात गुंफले आहे. (चाल : अनन्यगतिका जना)
ट, ठ, ड च्या योजनेमुळे उपासकांची कठोर उपासना दृग्गोचर होते :
मुमुक्षु तडितापडी जटिल कंदमूलाशनी
दिगंबर शिवालयीं धरुनि बैसले आसनीं
उपासक उपासना धरुनि राहिले साधनीं
अखंड मठमंडपीं वसति मंत्रआराधनीं
तर अनुस्वारांच्या उपयोजनेमुळे नागरिकांचा आनंदोत्साह अनुभवता येतो.
चतुष्पथ पदोपदीं मणिमनोहरा वेदिका
समार्जित सुकुंकुमें सरणि विथिरथ्यादिका
पवित्र तुळसीवनें सजल कुंभ कुंभावरी
महोत्सव पुरौकसा नगरि रम्य पृथ्वीवरी
शालिनी (मततगग)
८८/५
देवदर्शनाला रुक्मिणी निघाली असताना, पुढे काय? आता श्रीकृष्ण कधी? कसा येईल? ही उत्सुकता ताणून धरण्यासाठी शालिनी वृत्तात सभोवतालचं वर्णन करत राहतात.
चंद्राकारें वर्तुलें आतपत्रें
तैसीं माना सुंदरें सूर्यपत्रें
सेनेमध्ये राजभारीं उदंडे
दूतांहातीं चामरें हेमदंडें
८४/२२
कुसुमविचित्रा (नयनय) असे वेगळे वृत्त वापरले आहे. याचीही रचना सैल आहे. १५३ ३९, ४०
नदियमुनेचे स्थिर बहु पाणी
क्षितिवनितेची सरळ सुवेणी
नग परिवेष्टित वल्लि पवित्रा
शशिवदना या कुसुमविचित्रा
समरा समरा समरा लग अशी लगावली असलेलं अतिशायिनी किंवा उपचित्र वृत्त
सखियास वदे व्रज गोरटी
भ्रमा न पवे हरि संकटीं
श्रमली न चले पद येथुनी
जन हो परिसा अतिशायिनी
मत्ता नावाचा एक सुरेल छंदही विठ्ठलाच्या पोतडीतून निघतो. मभसग १६१/५
कृष्णा! कान्हा! नवघननीळा
धावें पावें सुहृतकमाला
ऐसी राधा स्तवि व्रजबाला
छंदोमत्ता जलधरमाला
विठ्ठल कवीच्या छंदोबद्ध रचनेत अफाट वैविध्य आहे. पठडीतल्या नसलेल्या काही वृत्तांची नावंही त्याने रचनेत गुंफली आहेत. त्यामुळे गेयतेला ज्ञानाचीही जोड मिळाली आहे.
तामरस नजजय १४४ /९
मधुविपिना परमादर जाया
रस पहिला करि सादर जाया
नग परिवेष्टित लंपट जाया
व्रजमहिषी हरिची पट काया
चंपकमाळा (भमसग)
९१/२८ रुक्मिणी स्वयंवर
देशपरत्वें प्राकृत लेणें
भूषणिं रत्नें द्योतत तेणें
केवळ पद्मा भूभुजबाळा
शोभित कंठीं चंपकमाळा
संस्कृत मत्ते वर्णिन सोळा
चार जगण आले की मौक्तिकदाम वृत्त होतं असं विठ्ठल सांगतात. अशोकवनातल्या झाडांचं वर्णन…
अशोकवनस्थळिमाजी विराजी
महाहरिचंदनपादपराजी
सखि! सहकार महीरुह नाम
कथिति कवीश्वर मौक्तिकदाम
कोराट पालाश कदंब निंब
औदुंबराश्वत्थ मधु प्रलंब
संतान रातांजन पारिजात
मंदार कल्पद्रुम या वनांत
दंडका छंद १५०-१६
त्यासवे मागुते सस्यवर्षा ऋतु
ते मेघ धारामृतें वाढवीले
वृत्त हे पैं भलें दंडका वर्णिलें
सत्कवी विठ्ठलें पद्य केलें
(२६ अक्षरी छंद)
पुष्पिताग्रा १५०/१८जल कंबुशे बहु पंकज होय वाटे
नदनदी याप्रति पूर दाटे
धन दुर्दिनोत्तम मानला समग्रा
रस निपजे सखि वृत्त पुष्पिताग्रा
पुष्पिताग्रा वृत्त असं त्यांनी लिहिलं आहे त्या प्रमाणे पुष्पिताग्राच्या पहिल्या ओळीत (विषम चरण) नजजरग असे गण असायला हवेत. पण पहिल्या ओळीचे गणसजजरग आणि दुसर्या ओळीत नसजरग असे गण आहेत. शिवाय अक्षरसंख्याही भिन्न नाही. त्यामुळे हे अर्धसमवृत का म्हणावे हा प्रश्न पडतो.
त्रिभंगी देहुड्याचं म्हणजेच श्रीकृष्णाचं वर्णन करताना विठ्ठल कवीने वेगवेगळ्या वृत्तांमधून केलं आहे.
त्रिभंगी छंदातील असंच एक वर्णन. श्रीकृष्ण जसा तीन ठिकाणी वक्रावस्थेत असतो तसा हा तीन ठिकाणी यती असलेला ३२ मात्रांचा छंद. १५६/१२
ते राधाराणी| चतुर शहाणी|तुजविण पाणी|
पीइच ना
स्त्री तुझि कांता| पुत्र विधाता| म्हणे गुणवंता| बोलचना
छंद सुमित्रा राजिवनेत्रा चाल सुनेत्रा कुंजवना
त्रिभंगी छंदा गुणगोविंदा बत्तिस बाधा बोलवना||
मत्तमयूर मतयसग१६४/२७’
राधा रात्रीं तल्प यजी हो! मृगनेत्रा
भाणे कांते! घ्या विभु आलिंगनगात्रा
रात्रीं भीत्या त्रास गमे त्याऽमृतधारा
राधायंत्रीं लिंगितसे मत्तमयूरा
‘त्या अमृतधारा’ वृत्तात बसवण्यासाठी अवग्रह वापरणे चुकीचे असले तरी नव्या वृत्ताची ओळख होणं महत्त्वाचं आहे.
प्रहर्षिणी १६७, ६ मनजरग
केयूरें मुगुट भुषार्ह दिव्यमाला
सर्वांगीं मलयजपंकलेप केला
कालिंदीतटपुलिनीं सुवेणु वाहे,
श्रोते! हो! सुरसरव प्रहर्षिणी हे
काव्यातच या वेगळ्या छंदांची नावं गुंफल्याने काव्याभ्यासाला मोलाची मदत झाली आहे.
मंजुभाषिणी/कलहंस/सिंहनाद/कुटजा पान१७१-३१ सजससग असतो पण विठ्ठल सजसजग असा घेतात.
९२/३० रुक्मिणीच्या दागिन्यांचे वर्णन
मुद राखडी प्रभुत मंडित वेणी
उभि राहिली जडित लेउनि लेणीं
करकंकणादिरशना विहरीणी
नृपनंदिनी मधुरमंजुळवाणी
(राखडी म्हणजे केसांतला दागिना)
प्रहरणकलिका१७१- ३२ ननभनलग
हिमकर हरिणावर सखि! विलसे
धनपति शिबिकासनिं गण सरिसे
नमिति उभयता यदुकुलतिलका
कविजन म्हणती प्रहरणकलिका
वामनचरित, शुकरंभासंवाद, सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, विद्वज्जीवन, द्रौपदी वस्त्रहरण, भगवद्गीता, बिल्हण चरित्र, रसमंजरी, पांचालीस्तवन, कबीरकथा, पदे अशी प्रचंड ग्रंथ आणि श्लोकसंख्या असलेल्या विठ्ठलाच्या वृत्त कौशल्याचा हा पट. मांडणीत कितीतरी उणिवा असतील, कित्येक महत्त्वाची स्थळं शब्द मर्यादेमुळे गाळावी लागली आहेत. म्हणूनच
विठ्ठलाच्या नावात बदल करून म्हणावंसं वाटतं…
छंद बंध यमकें अनुपम्यें
काव्यरीतिवचनें ननु रम्यें
दोष टाकुनि तुम्हीं गुण घ्यावा
सुषमासि अभयंकर द्यावा!
जे स्पष्ट करू शकले नाही असा दोष पोटात घ्यावा.
सुषमा जोशी
