बोल सुना जानी — अर्थात चिजांच्या मुखड्यावर आधारित चित्रपटगीते भाग २

हिंदी चित्रपटांतील जी गाणी मूळ शास्त्रीय बंदीश किंवा उपशास्त्रीय (ठुमरी, दादरा वगैरे) गाण्यांवर बेतलेली आहेत आणि ज्या गाण्यांचा मुखडादेखील मूळ बंदिशीशी साधर्म्य असलेलाच आहे त्या गाण्यांबद्दल दिनेश शिंदे लिहीत आहेत. या लेखाचा पहिला भाग सप्टेंबर २०२४ च्या अंकात आलेला आहे. आता ऐकू या दुसरा भाग. 

११) गरजत बरसत सावन आयो रे / गरजत बरसत भिजत आईलो 

गौड मल्हार रागातला हा छोटा (द्रुत) खयाल. रोशनने ‘मल्हार’ चित्रपटासाठी लताकडून गाऊन घेतला होता. हाच राग आणि हीच चाल रोशनने परत ‘बरसात की रात’ चित्रपटासाठी वापरली. बोल किंचित बदलले. या वेळी सुमन कल्याणपूर आणि कमल बारोट यांच्याकडून ही रचना गाऊन घेतली. चित्रपटात टायटल्सच्या वेळी हे गाणे आहे. मालिनी राजुरकरांनी बड्या ख्यालानंतर ही द्रुत रचना गायली आहे. तिन्ही गाण्यांतल्या जागा तंतोतंत तशाच आहेत.

गरजत बरसत सावन आयो रे, चित्रपट : बरसात की रात, गायिका : सुमन कल्याणपूर आणि कमल बारोट

गरजत बरसत भिजत आईलो, चित्रपट : मल्हार, गायिका : लता (वरच्या लिंकवरही आहे )

गरजत बरसत भिजत आईलो, (छोटा ख्याल) मालिनी राजुरकर

१२) नदिया धीरे बहो

पिलू रागातली ही एक ठुमरी आहे –  ‘उडन खटोला’ चित्रपटात एक कोळीगीत म्हणून आली आहे, गायली आहे लता आणि कोरसने. यात कोरसचा सुंदर वापर आहे. ‘हो मोरे सैंयाजी उतरेंगे पार हो, नदिया धीरे बहो’ या ओळी त्याच असल्या तरी चित्रपटात शब्दशः अर्थ आहे. ठुमरी मात्र ‘नदिया गहरी, नाव पुरानी’ अशा आध्यात्मिक अंगाने जाते.

नदिया धीरे बहो, चित्रपट : उडन खटोला, 

गायिका : लता आणि कोरस

नदिया धीरे बहो, डॉ. प्रभा अत्रे

१३) ‘बनाओ बतिया अजि काहे को झूठी’

हा भैरवीमधला दादरा मन्ना डे च्या आवाजात ‘मंझिल’ या चित्रपटात आहे. हे गाणे जितके श्रवणीय आहे तितकाच मेहमूदचा पडद्यावरचा आविष्कार सुंदर आहे. एखाद्या कुशल कथ्थक नर्तकासारखा त्याने मुद्राभिनय केला आहे. मुळात मन्ना डे गात आहे आणि पडद्यावर मेहमूद आहे – हेच पटत नाही – मेहमूदच गात आहे असेच वाटते. “जरा, लय उठा के भैया,” वगैरे तर खासच. हे चित्रपटातले गाणे असले; तरी सर्व शब्द मूळ दादऱ्याचेच आहेत. हे गाणे नंतर मन्ना डेने स्वतंत्ररीत्या स्टुडिओमध्येही रेकॉर्ड केले होते.

बनाओ बतिया अजि काहे को झूठी, https://www.youtube.com/watch?v=DoNOYo7fupU

चित्रपट : मंझिल, गायक : मन्ना डे बनाओ बतिया अजि काहे को झूठी, चित्रपट : मंझिल, गायक : मन्ना डे – स्टुडिओ व्हर्जन 

बनाओ बतिया अजि काहे को झूठी – उस्ताद फैयाझ खान

१४) मोहे पनघट पे नंदलाल 

मुघल-ए-आझम चित्रपटातील ही राग गारातली ठुमरी. मोरा घुंघटा… या शब्दांना आधीच्या एका प्रसंगाचा संदर्भ आहे. पडद्यावर मूर्तिमंत सौंदर्य – मधुबाला. त्यात आता ती रंगीत रूपात दिसते. तिच्या या गाण्यावरच्या अदा अत्यंत विलोभनीय आहेत; पण या गाण्याबद्दल मात्र वाद झाले होते. मूळ रचनाकाराला श्रेय दिले गेले नव्हते. मूळ रूपात ते इंदुबाला यांच्या आवाजात जरूर ऐका.

मोहे पनघट पे नंदलाल , चित्रपट : मोगल-ए-आझम, गायिका : लता

मोहे पनघट पे नंदलाल, गायिका : इंदुबाला

१५) नैन से नैन मिलाये रखने को

नैन से नैन मिलाये रखने को, ही दरबारी रागातली सदारंग यांची रचना, वादा या पाकिस्तानी चित्रपटात वापरली होती. याचे गायन (जाहिदा परवीन आणि उस्ताद फ़तेह अली खान) तर सुंदर आहेच शिवाय आधी एकताल आणि मग त्रितालात बांधलेले कथ्थकपण सुरेख आहे. उस्ताद फ़तेह अली खान यांनी हीच रचना स्वतंत्ररीत्यापण गायली आहे. हीच रचना पं. कुमार गंधर्वांच्या आवाजात ऐकणे एक सुखद धक्का आहे. त्यांना आपण सहसा निर्गुणी भजन गाताना ऐकलेले असते; पण ते पारंपरिक रचनादेखील गात असत. त्यांचे गाणे आणि गाताना त्यांना बघणे दोन्ही आनंददायी आहे. 

नैन से नैन मिलाये रखने को, चित्रपट : वादा (पाकिस्तानी), गायक : जाहिदा परवीन आणि उस्ताद फ़तेह अली खान

नैन से नैन मिलाये रखने को, गायक : उस्ताद फ़तेह अली खान

नैन से नैन मिलाये रखने को, गायक : कुमार गंधर्व

१६) सप्त सूरन तीन ग्राम गाओ सब मुनीजन 

चित्रपटात ध्रुपद गायकी क्वचितच ऐकायला मिळते. ख्याल गायकीच्या पूर्वी म्हणजेच तानसेनच्या काळात हीच गायकी प्रचलित होती. पखवाजाच्या साहाय्याने आणि नेमके सूर लावत केलेले हे गायन आता अगदी मोजकेच कलाकार गातात. ‘संगीत सम्राट तानसेन’ नावाच्या चित्रपटात कुंदनलाल सैगल यांनी ही रचना गायली होती. याच नावाचा एक चित्रपट नंतरही आला होता. त्यात मन्ना डेने ही रचना गायली आहे; पण शब्द थोडे वेगळे आहेत. मी वाचल्याप्रमाणे तानसेनचे गुरू स्वामी हरिदास यांची ही मूळ रचना खूप मोठी आहे आणि तिचे गायन अनेक रागांत करावे अशी योजना आहे. (या नंतरच्या चित्रपटात, हेमंत रागातले एक ध्रुपद आहे. ‘सुध बिसर गयी आज’ रफ़ी आणि मन्ना डेने गायले आहे. रफ़ीच्या खर्जातल्या ओळी मुद्दाम ऐका.) लताने श्रद्धांजली नावाचा एक संग्रह काढला होता. त्यात तिनेदेखील ही रचना गायली आहे.

सप्त सूरन तीन ग्राम गाओ सब मुनीजन, चित्रपट : संगीतसम्राट तानसेन, गायक : कुंदनलाल सैगल

सप्त सूरन तीन ग्राम गाओ सब मुनीजन, चित्रपट : संगीतसम्राट तानसेन, गायक : मन्ना डे

सप्त सूरन तीन ग्राम गाओ सब मुनीजन, संग्रह : श्रद्धांजली भाग १, गायिका : लता

सुध बिसर गयी. ध्रुपद, (राग हेमंत), चित्रपट : संगीतसम्राट तानसेन, गायक : रफ़ी आणि मन्ना डे

१७) बाट चलत नयी चुनरी

‘बाट चलत नयी चुनरी रंग डारी रे’ ही एक पारंपरिक रचना – रानी रूपमती चित्रपटात रफ़ी आणि कृष्णराव चोणकर यांनी गायली आहे. नंतर हीच रचना, तिच्या नेहमीच्या मधाळ आवाजात, गीता दत्तने ‘लडकी’ या चित्रपटासाठी गायली आहे.

शास्त्रीय ढंगात ही रचना, मलिका पुखराजने गायलेली आहे. ही रचना एवढी सुरेल आहे की अनेक वादकांनाही ती सादर करावीशी वाटली. त्या लिंक्स तुम्हांला, मलिका पुखराजच्या क्लिपसोबत दिसतीलच.

बाट चलत नयी चुनरी, चित्रपट: रानी रूपमती, गायक : रफ़ी आणि कृष्णराव चोणकर

https://www.youtube.com/watch?v=F3ji_fIosso

बाट चलत नयी चुनरी, चित्रपट: लडकी, गायिका, गीता दत्त, (वरच्याच लिंकवर)

बाट चलत नयी चुनरी, गायिका : मलिका पुखराज

१८) जमुना के तीर

‘कैसे आऊँ जमुना के तीर,’ ही रचना, देवता चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी लताकडून गाऊन घेतली आहे. चित्रपटात प्रसंगानुरूप हे गाणे येते. मूळ रूपात खानसाहेब अब्दुल करीम खान आणि पंडित  भीमसेन जोशी यांच्या आवाजात उपलब्ध आहे.

जमुना के तीर, चित्रपट : देवता, गायिका : लता

जमुना के तीर, गायक, खानसाहेब अब्दुल करीम खान,

जमुना के तीर, गायक : पंडित भीमसेन जोशी

१९) ए री आली पिया बिन

यमन रागातली ही पारंपरिक बंदीश लताने 

‘राग रंग’ या चित्रपटासाठी गायली आहे. खरेतर हे गायन पूर्ण तीन मिनिटांचेही नाही;  तरीही तिची तयारी यातून दिसतेच. मला खूपदा वाटते, लताने शुद्ध शास्त्रीय गायनाच्या रेकॉर्ड्स, निदान लक्षणगीते तरी गायला हवी होती. खूप नुकसान झाले. त्या काळातली तिची आणि आशाची गाणी ऐकली, की दोघी किती तयारीच्या गायिका होत्या, हे जाणवतेच. ही रचना पं. संजीव अभ्यंकरांच्या आवाजातही ऐका. (ही एक लोकप्रिय रचना आहे. अनेक कलाकारांनी गायली आहे.)

ए री आली पिया बिन, चित्रपट : रागरंग, 

गायिका : लता

ए री आली पिया बिन, गायक : पं. संजीव अभ्यंकर

२०) ए री जाने ना दूंगी / कारे जाने ना दूंगी

कामोद रागातील ही बंदीश चित्रलेखा  चित्रपटात लताच्या आवाजात आहे. यात नायिकेचा स्वभाव किंवा तिचे अधिकार दाखवणाऱ्या आज्ञार्थी  ओळी आहेत. कोरसचा सुंदर वापर आहे. मूळ बंदीश मोनाली बोसच्या आवाजात जरूर ऐका. मोनाली बोसने १००१ बंदिशी रेकॉर्ड करण्याचा विडा उचललेला आहे. अनेक पारंपरिक बंदिशी ती रेकॉर्ड करत आहे. 

ए री जाने ना दूंगी, चित्रपट : चित्रलेखा, 

गायिका : लता मंगेशकर 

कारे जाने ना दूंगी / मोनाली बोस 

२१) माता सरस्वती शारदा / माई सरस्वती शारदा

ही पारंपरिक प्रार्थना, लता आणि दिलराज कौरच्या आवाजात, ‘आलाप’ चित्रपटात आहे. लता एकेका शब्दाचा जो स्पष्ट आणि नेमका उच्चार करते तो अगदी कान देऊन ऐकण्यासारखा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताची खासियत म्हणजे तो प्रत्येक कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतो. तेच शब्द, तोच राग; पण तरीही या तीन कलाकारांनी केलेला शारदा या शब्दाचा वेगवेगळा उच्चार आणि सुरावट नक्की ऐका.

माता सरस्वती शारदा, चित्रपट : आलाप, गायिका : लता मंगेशकर, दिलराज कौर

माई सरस्वती शारदा, गायिका : अश्विनी भिडे देशपांडे

माता सरस्वती शारदा, गायक : पंडित कुमार मर्दुर

वरची यादी करताना मी मूळ चीज आणि त्यावर आधारित चित्रपटगीत अशी मर्यादा घालून घेतली होती; त्यामुळे काही गाणी घेता आली नाहीत. 

उदा. ‘अलबेला सजन आयो रे,’ ही चीज, ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये अगदी थोड्या वेळासाठी आहे. (पूर्ण नाही.) अनेक चित्रपटांत मूळ चिजेतली एखादी तान वगैरे, बॅकग्राउंडला वाजलेली असते, तिचाही विचार केलेला नाही. (उदा. बेगम अख्तर यांची एक तान ‘धोबीघाट’ चित्रपटात आहे.) ‘अबके सावन घर आजा,’ या ठुमरीतली फक्त एक ओळ लताने, ‘झनक झनक पायल बाजे’मधल्या, रागमालेत गायली आहे.

हा लेख लिहिणे माझ्यासाठी खूपच आनंददायी होते. यांपैकी बहुतेक गाणी माहिती होती; पण त्या मूळ शास्त्रीय चिजा आहेत, हे यू ट्यूबवरूनच कळले. काही गाण्यांबद्दल त्या मूळ शास्त्रीय चिजा नाहीत (म्हणजे सापडल्या नाहीत) हे कळून थोडा निराश झालो. उदा. ‘झनक झनक पायल बाजे’ मध्ये लताने, ‘सैंया जाओ मोसे ना बोलो’ अशी देश रागातली पारंपरिक ठुमरीच वाटेल अशी रचना गायली आहे. ‘मोसे ना बोलो’ असे बोल असणाऱ्या अनेक ठुमऱ्या मला दिसल्या; पण त्या देश रागात नाहीत; तसेच मन्नाडेचे ‘दिल ही तो है’ मधले, ‘लागा चुनरी में दाग’ हे गाणेपण पारंपरिक चीज नाही, यावर विश्वास बसत नाही. (या दोन्हीचे श्रेय या दोन श्रेष्ठ कलाकारांना आणि संगीतकारांना.) तक्षकमधल्या आशाच्या ‘मोहे रंग दे’ चे काही बंदिशींशी साम्य दिसले; पण त्याबद्दल मला खातरी नाही. काही मूळ बंदिशींचे फ्यूजन वगैरेपण बघायला मिळाले. हा प्रकार ज्यांना आवडतो त्यांना आवडो, मला तरी तो ‘ताजमहालाला विटा लावण्याचा’ प्रकार वाटला.

पण तरीही मुद्दाम लिहितो, मी शास्त्रीय संगीताचा जाणकार नाही. हजारो ख्वाइशोंमधल्या, कम निकल्या अरमानोंपैकी ती बाब आहे; पण हे संगीत ऐकणे माझ्यासाठी आनंदनिधान आहे.

वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मीदेखील या संगीताला ‘आआऊऊ’ संगीतच समजत होतो; पण कीर्ती शिलेदारचा एक कार्यक्रम बघून मी या संगीताचा चाहता झालो ते आजपर्यंत. एक सामान्य श्रोता म्हणून एक ‘कानमंत्र’ देतो. हे संगीत ऐकताना, राग कुठला आहे, ताल कुठला आहे वगैरे समजण्याची गरज नाही. वरच्या कुठल्याही लिंक वर क्लिक करा आणि निवांत ऐका. जर ती क्लिप जास्त वेळाची वाटत असेल तर तिचा शेवटचा काही भाग ऐका. नक्कीच आवडेल.

असे गाण्यासाठी त्या त्या कलाकारांनी अनेक वर्षे मेहनत घेतली आहे. सूर, ताल, रागाचे व्याकरण वगैरे गोष्टी त्यांच्या अंगात भिनल्या आहेत; पण त्याहून त्यांच्या अंगी असलेली नम्रता आणि लीनता त्यांना अधिकच थोर करते. शास्त्रीय संगीत म्हणजे पाट्या टाकणे नव्हे. एकच राग नव्हे तर एकच चीज अनेक प्रकारे आणि स्वतःच्या कल्पनेप्रमाणे गाता येते – हे आपले वैभव आहे; त्याचा अभिमान वाटला पाहिजे आपल्याला! 

वरच्या यादीतील अनेक गाणी भैरवी रागावर आधारित आहेत; तरीही परंपरेनुसार या लेखाचा शेवटही एका भैरवीनेच करतो.

२३) बाबूल मोरा नैहर छुटो जाय

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए

चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें 

मोरा अपना बेगाना छुटो जाए

आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश

जे बाबुल घर आपना मैं पिया के देश

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए

लग्न होऊन सासरी निघालेल्या मुलीचे हे मनोगत म्हणजे वाजिद अली शाहची रचना आहे. बंदी बनवून जेव्हा त्याला दिल्लीपासून दूर नेण्यात आले; तेव्हा त्याने ही रचना केली. अगदी अलीकडची असली तरी मैफिलीचा समारोप करताना अनेक कलाकार ही सादर करतात. ही रचना काय किंवा ‘कन्या सासुऱ्यासी जाये’ ही तुकाराम महाराजांची रचना किंवा ‘पडिले दूरदेशी, मज आठवे मनासी’ ही ज्ञानेश्वर माउलींची रचना काय – हा वियोग आपण आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेलाच असतो. जिथे खेळलो बागडलो, ते आपल्याच घराचे अंगण, पर्वतासारखे अप्राप्य होते. जो सहज ओलांडत होतो, तो उंबरठा (देहली) परदेशाप्रमाणे वाटते. शेवटच्या यात्रेची व्यवस्था करणारे चार साथीदार! सुटत चाललेले माहेर असो, देश असो, मित्रपरिवार असो की आयुष्य असो – ही उत्कट भावना जेव्हा सिंधुभैरवीच्या रूपात कानावर पडते, तेव्हा मन कातर होते, डोळे भरून येतात. 

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए, चित्रपट : स्ट्रीट सिंगर, गायक, कुंदनलाल सैगल

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए, गायिका, आरती नायक

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए, गायिका धनश्री पण्डित राय आणि कथ्थक नर्तिका, केका सिन्हा

Author

Leave a Reply