देवगड हापूस

Mango fruits scattered on red dirt driveway

सकाळची वेळ, तव्यावर घावन टाकल्याचा ‘चुर्रर्र आवाज आला.  त्याचा मंद सुगंध जेवणघरात  दरवळला. सुमित्रा खुर्चीत निःस्तब्ध बसली होती – शून्यात  पाहत. आभाने तिच्या पुढ्यात  टेबलावर प्लेट ठेवली,म्हणाली, “आई, घे गरमगरम… तुझ्या आवडीची तांदळाची घावनं… मऊ, लुसलुशीत, जाळीदार…त्याच्याशी नारळाची चटणी, शिवाय नारळाचे दूध… गूळ  वेलची घातलेलं.”  विचारातून जागी होत सुमित्रानं तिच्याकडे पाहिलं.

“इतकी नकोत गं मला…एकच पुरे… जाणार नाहीत जास्त!”

“काहीतरी काय… खायलाच हवं हे सगळं. वजन कमी झालंय तुझं. नीट खातपीत नाहीस. प्रकृती कशी राहील अशानं?” म्हणत आभाने प्रेमाने तिच्या तोंडात एक घास भरवला. 

 थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या… म्हणजे  आभाच बोलत होती आणि सुमित्रा देत  होती नुसते हुंकार. आभा हळूच म्हणाली, “आई मी  निघू दोन-चार दिवसांनी? मुलांच्या परीक्षा आल्या आहेत जवळ. तूर्त चल ना माझ्याबरोबर. बदल होईल तुला थोडा, सारखी  उदास असतेस!”

सुमित्राने नजर उचलून लेकीकडे पाहिले. काय नव्हते  त्या  आर्त नजरेत? गेल्या काही महिन्यांत तिचं विश्वच बदलून गेलं होतं. दिवस जसे  धुकाळलेले होते… अंधुक आणि उदास! दोन महिन्यांपूर्वी महेश अचानक आजारी पडले. औषधपाण्याला न जुमानता त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि महिन्यात सगळे संपले. त्यांच्या बेचाळीस वर्षांच्या दीर्घ, सुखी, सुफळ सहजीवनाची एका क्षणात सांगता झाली. एक दीर्घ सहवास ! दूधसाखरेसारखं एकमेकांत विरघळून गेलेलं जीवन. सुखदुःखांच्या  आठवणींनी भरलेला चार शतकांचा संसार – एकमेकांना समजून घेत, कधी ठेचकाळत, कधी धडपडत, कधी रमतगमत केलेला! काय हरवलं  हे बुद्धीला कळलं; पण मनाला नाही. जिवाचा  आकांत झाला!

लेक-जावई दिल्लीहून आले. जवळच्या नातेवाइकांनी घर भरून गेलं. मृत्यूनंतरचे सर्व सोपस्कार झाले. तेराव्यानंतर गावी परतताना भावाने बरोबर चलण्याचा खूप आग्रह केला; पण सुमित्रा मन‌ली नाही. महेशच्या सहवासाच्या खुणा ताज्या असताना घर सोडून कुठेही जायला तिचं मन राजी नव्हते.  महिनाभर तिच्यासोबत राहून आता आभाही  परत जायला निघाली होती.

“निघतेस? तुलाही घरी जायला पाहिजे आता.  मुलं, शरद वाट पाहत असतील. माझी काळजी करू नकोस. पारूबाई आहे सोबतीला, शिवाय ताई आहे गावातच अडल्यापडल्याला. निश्चिन्त  नीघ तू. मी येईन नंतर… जरा स्थिरस्थावर झाल्यावर…” 

महेशच्या हसऱ्या फोटोला ताज्या  फुलांचा  हार घातला होता – त्याकडे बघत आभा हलकेच म्ह‌णाली

“आई, बाजारात आंबे यायला लागलेत. आणू थोडे जाण्यापूर्वी  नैवेद्यासाठी? बाबाला खूप आवडायचे. उद्या महिना  होईल त्याला….”  तिचा आवाज रुद्ध झाला.

“एवढ्यात आले आंबे बाजारात?” 

“अगं मार्च उजाडला ‘आई!”

“पहिला आंबा अक्षयतृतीयेला…” सुमित्रा तंद्रीतच उद्‌गारली ।

आभाने चमकून आईकडे पाहिले. ती अचानक असे काय बोलते तिला कळेना.

पण इ‌कडे सुमित्रा विचारात हरवली होती. खूप खूप –  म्हणजे पन्नास वर्षे मागे गेली होती.

 तिचं  माहेर विद‌र्भातलं. डिसेंबर महिन्यात  अंगणातला कलमी आंबा मोहरून येई. वाऱ्याच्या झुळकेबरोबर दरवळणारा त्याचा मंद सुगंध मनाला हेलकावे देऊन जाई. पुढील सुफलाम् ऋतूच्या आशेने मनही मोहरून जाई. आता झाडाला छोट्या छोट्या बाळकैऱ्या लटकतील, हळूहळू मोठ्या होतील, पोपट येतील, कोकिळा ‘कुहू कुहू’  साद घालेल, कमलआत्या दरवर्षीप्रमाणे संस्कृत सुभाषित ऐकवेल… 

यद्यपि दिशि दिशि तरव:

परिमल बहुलाश्च पारिजाताद्याः । 

तद‌पि रसालोप्येकः

कोकिलहृद‌ये सदा वसती ॥… 

आणि म्हणेल,

“बरं का मुलांनो, चारी बाजूंना जरी पारिजात‌कासारखी सुगंधी फुलांची खूप झाडं असली तरी कोकिळेच्या मनात मात्र एक आम्रवृक्षच घर करून राहतो!” 

फारसं कळत नसलं तरी आम्ही मुलं माना डोलवत राहू. 

त्या सुगंधी, कोवळ्या आम्रमंजिऱ्या  संक्रातीला सुगडांमधे ठेवल्या जातील. थोडे दिवसांनी कैऱ्या मोठ्या झाल्या की घराघरांतून पन्हे, आंबेडाळ, लोणची, मुरांबे यांचा सीझन सुरू होईल आणि नंतर बाजारात आवक होईल त्या पिवळ्याधमक रसरशीत   फळांची जे पुढील दोन महिने घरोघरी राज्य करतील; बाकीची सगळी फळं बापुड‌वाणी बाजूला राहतील.

 परीप्रकारचे आंबे… रायवळ, कलमी, तोतापुरी, केसर, नीलम. पुढे जुलैपासून उत्तरेकडचे लंगडा, दशेरी, चौसा! घरोघरी आमरस पुरीच्या, कुरड्‌या पापड्यांच्या मेजवान्या होऊ लागतील

   उन्हाळ्याच्या दिवसांत साखरेच्या गोडीचे रायवळ आंबे टोपल्यांमधून शेकड्‌याने विकायला येत… कधी पोत्यानेसुद्धा. घरी एका छोट्या खोलीत आंब्याची आढी पडे. जमिनीवर पसरलेल्या वाळलेल्या  गवताच्या गादीवर ते  निगुतीने पसरले  जात.  अर्धकच्चे खाली, त्यावर गवताचा थर… त्यावर पिकू लागलेले आणि वर पुन्हा गवताचे आवरण. हळूहळू खोलीत  तयार आंब्यांचा सुगंध पसरू लागे. उन्हाळ्याच्या सुटीत घरी जमलेली आत्ये, मामे, मावस भावंडे  खोलीभोवती रेंगाळू लागत. वडील मंडळींची त्यांच्यावर कडक नजर असे. 

 रोज सकाळी कुणी जाणतं माणूस खोलीत जाऊन, पिकलेले आंबे छाटून, स्वच्छ  धुऊन, एका पितळी  बादलीत पाण्यात घालून मागीलदारच्या व्हरांड्यात  पाटावर बसलेल्या काकी, मामींपुढे आणून ठेवी. आंबे माचवून एका मोठ्या कल्हईच्या  पितळी  गंजात रस काढला जाई. दुसऱ्या एका स्वच्छ पातेल्यात  पिण्याचे  पाणी असे.  त्यात रस काढलेल्या कोयी टाकून उरलासुरला रस निपटला जाई… काही वाया जायला नको! त्यात साखर घातली की झाला ‘फजिता’ तयार… म्ह‌णजे आजकालचा ‘मॅंगोलाच!

मात्र अक्षयतृतीयेला आंब्याच्या पानाचे तोरण पुढल्या दारावर चढल्यावर, पहिल्या आंब्याचा नैवेद्य देवाला दाखविल्यावरच घरच्यांच्या पानात पडे.

काम करता करता स्त्रीवर्गाच्या गप्पांना रंग भरे. कितीही काळजी घेतली तरी आंबा माचवताना मध्येच रसाची चिळकांडी उडे… कुणाच्या साडीवर, कुणाच्या कुडत्यावर…सगळे हसत. कपड्यांवरचे रसाचे, चिकाचे डाग निघता निघत नसत. त्याचे कुणाला काही वाटतही नसे… रसाचे डाग पडणारच… त्यांचं काय एवढं? सकाळ संध्याकाळ रसपोळी… कधी आंबे चोखून खावे. मुले भाजी आमटीकडे ढुंकूनही पाहत नसत. आयांनाही त्याचे काही वाटत नसे. त्यांच्या  मते ‘आंबा असला की दुसरं काहीही  नको.’

कुठे आमरसाच्या वाटीत साजूक तुपाची  धार पडे; तर कुठे घरी केलेल्या हातच्या नाजूक शेवयांवर आमरस. कुठे अंगणातल्या खाटेवर दुपारच्या कडक उन्हात  ताटामध्ये आमरस वाळत राही… आंबापोळी  तयार होई; तर कुठे नुकताच मांडव पडून गेलेल्या दारी ‘आंब्या-जांभळाच्या सणाची’ सिद्धता  होत राही.

हौसेने, प्रेमाने केलेले आंब्याजांभळांचे विविध पदार्थ, आंबापोळीपासून केलेल्या चोळखणासहित नववधूच्या सासरघरी कौतुकाने रवाना होत.

आमरस पोळी तुडुंब जेवल्यावर दुपारी खसत‌ट्टी लावलेल्या थंडगार सुगंधित  खोलीत भल्यामोठ्या सतरंजीवर उश्या टाकून सकाळभर कामात गुंतलेला, थकलेला स्त्रीवर्ग आडवा होई. ‘कधी केली गं मोहनमाळ? किती तोळ्यांची?’ ‘नानाच्या लेकीचं लग्न ठरलं ऐकलं. चांगलं स्थळ आहे म्हणे नाशकाकडचं,’ ‘आई गं, गुड‌घे दुखतात  बाई आजकाल,’  ‘अक्कांची तब्येत अगदी बरी नाही हो,भेटून आलं पाहिजे आता,’ ‘कसला हा उन्हाळा यंदा’

अशा पसरत चाललेल्या गप्पा करता करता त्यांचा डोळा लागे. पुरुषवर्ग आधीच दुसऱ्या खोलीत वामकुक्षीला गेलेला असे. कोपऱ्यात मुलांचा पत्त्यांचा किंवा कॅरमचा डाव रंगात येई, त्यांना बाहेरच्या उन्हात  जायची मनाई असे;  तरीही ती डोळे चुकवून जातच.  मोठी माणसेही त्यांना लटके रागावून त्यांच्याकडे काणाडोळा करीत.

वाळ्याच्या पड‌‌द्यावर बाहेरून शिंपडलेल्या पाण्याचे चुकार थेंब अंगावर येत, एक शिरशिरी उठे आणि सुखावलेल्या मनातून तृप्तीचा हुंकार फुटे !

कधी संध्याकाळी आइसक्रीम  पार्टीचा बेत ठरे. लाकडी बादलीत असलेल्या ॲल्युमिनियमच्या पॉटचं हँडल फिरवायच्या पाळ्या लागत. केशरी आटीव दुधाच्या आइसक्रीमनंतर नंबर लागे आंबा आइसक्रीमचा.  हँडल फिरवताना जड लागलं की वारंवार झाकण उघडून पाहण्यात येई. ‘झालं का?’ ‘झालं का?’ अशा आतुर प्रश्नांची सरबत्ती होई. पुन्हा पुन्हा चमचा आत घालून चवसुद्धा बघण्यात येई. एकदाचं झालं की मिळेल त्या वाटी-भांड्यांत आइसक्रीम  घेऊन मुले नाचू लागत. मोठेसुद्धा  नाचत  नसत एवढंच – बाकी त्यांचाही उत्साह  तसाच असे. कितीही केलं तरी कमीच पडे आइसक्रीम! 

ह्या एका फळाभोवती संपूर्ण उन्हाळा पसार होई. 

महेशशी लग्न झाल्यावर सुमित्रा मुंबईला आली. या काँक्रीटच्या जंगलातही आंब्याचे एखादे झाड दिसून जाई. इथल्या खाऱ्या हवेत मोहराचा दरवळ जरा झाकलाच  जाई. मार्च महिना आला की लाकडी फळ्यांचे खोके डोक्यावर घेऊन फळविके रस्त्यावरून फिरू लागत… ‘आ पो   ऽऽस’ अशी आरोळी देत. आता कोकणातून येणाऱ्या या दैवी फळाचीही ओळख झाली. मुंबईच्या फ्लॅटमध्ये आंब्याची आढी लावणे शक्य नव्हते; पण कोकणातून येणाऱ्या ठरलेल्या  आंबेवाल्याकडून आंब्याच्या पेट्यांचा नियमित रतीब लावणे सुरू झाले.  सुरुवातीला नेमाने पाळलेला ‘अक्षयतृ‌तीयेला पहिला आंबा’ हा सुमित्रेचा हट्ट आता मागे पडला होता. नुकतीच हायस्कूलमधे जाऊ लागलेली आभा हट्ट  धरी… “आई, का थांबायचं अक्षयतृतीयेपर्यंत आपण? प्रियाच्या बाबांनी आणलेसुद्धा आंबे त्यांच्याकडे!” 

“अगं, पद्धत होती ती. झाडावर आंबा पिकू लागायला लागत असे तेवढा वेळ. चैत्र-वैशाखातला सूर्य तापलेला…उन्हे चटकलेली  – अवीट गोडी भरायची रसात. घरोघरी अक्षयतृतीयेचे वेध लागलेले असत. चैत्री पाडव्याला कैरीचं डाळपन्हं आणि अक्षयतृतीयेला आंब्याचा नैवेद्य देवाला आणि पूर्वजांना.  मगच घरच्यांच्या पानात वाढायचा.”

आभा विचारायची, “देव कुठे खाली येतो नैवेद्य खायला…आणि आजोबांचं  काय?” भावभरल्या आवाजात सुमित्रा उत्तरायची, “नाही गं बाळा! नाही येत खाली देव… आणि आजोबाही नाही येत आंबा खायला;  पण आपलंच मन मोठं होतं गं… संयमी होतं. देवतत्त्वापुढे, वडिलांपुढे नतमस्तक होतं.  आपल्याआधी दुसऱ्याचा विचार करायला शिकतं. आपल्या पूर्वजांची, वंशाची आठवण ठेवायची बुद्धी होते. आपला तोल सांभाळणारी एक कंटिन्युइ‌टी असते ती – एकटेपण दूर ठेवणारी!

पण असो! काळ बदलला. आता  आंब्यालाही लवकर पिकायचं समजू लागलं आहे. आपणही  आणत  जाऊ आंबे लवकर!” आणि पुढे मार्च महिन्यापासूनच आंबे घरी येऊ लागले.

आता मधूनमधून रसाऐवजी आंब्याच्या लांब चौकोनी फोडी कापून, त्या सुंदर डिशमध्ये सजवून जेवणानंतर खायची पद्धत सुरू झाली. बाजारातून आणलेली आंबाबर्फी, आम्रखंड, मँगो आइसक्रीम पॅकिंगमधून काढले  की बसल्याजागी फस्त होते; शिवाय मॅंगो शेक, मँगो सूफले अशी फॅन्सी मंडळीही आपले अस्तित्व जाणवून देऊ लागली. सर्व काही छान होतं; पण त्या तात्पुरत्या छान चवीभोवती मनात रेंगाळणाऱ्या  सुखद आठवणींची गुंफण मात्र नव्हती.

एकदा नात लाडाने म्हणाली होती, “काय एवढं त्या आंबापोळीचं कौतुक गं आजी? हल्ली एकावर एक लेयर्स असलेले सेलोफीनमध्ये रॅप केलेले आमपापड मिळतात – चौकोनी – कँडीसारखे केव्हाही  खा.”

“हो ना. छान असतातच गं; पण शेवटी कॅंडीच ती. तोंडात टाकली की दहा मिनिटांत घशाखाली उतरणार, आगेमागे काहीच नाही.”

“आगे मागे म्हणजे?” नातीचा अचंबित प्रश्न.

“ काय उत्तर देऊ तुला, बाळा?” सुमित्रा गप्प. आंबापोळी  करण्याची लगबग, हास्यविनोद, स्वयंपाकघरातल्या चर्चा, चार-चारदा अंगणात जाऊन ती कुठवर वाळली हे तपासणे, खोडकर मुले आणि पक्षी यांपासून ती तयार होईपर्यंत जपणे आणि नंतर निगुतीने डब्यात भरणे या संपूर्ण प्रक्रियेतली गंमत आणि मनाचे जुळलेले भावबंध या लहानगीला कसे कळणार? तिच्या आकलनापलीकडचं होतं ते! 

कधी पाहिलंच नव्हतं. पैसे टाकले की काहीही, कितीही आणि केव्हाही होम डिलिव्हर होण्याच्या नव्या युगात वाढ‌ली होती ती. आंब्याभोवती गुंफलेल्या या भावभावनांचे तिला काय अप्रूप असणार?

नातवाची तर दुसरीच तऱ्हा! 

“वजन वाढतं आजी. दोनच फोडी दे; शिवाय इतकं मशी (mushy) फ्रूट  नाही आवडत मला, ” म्हणून तो उडवूनच लावी. 

“अगं आई काय विचारतेय मी तुला? कुठे हरवली आहेस? सांग नं, आणू का आंबे ? खूप आवडायचे बाबाला.” आभाच्या प्रश्नाने विचारात हरवलेली सुमित्रा पुन्हा नेहमीच्या जगात  परतली.

” नको गं. त्यांना खूप आवडत आंबे, म्हणूनच नको.

नाही वाटत खावासा!”

 आभानेही विषय वाढवला नाही.

महेशला आंब्याचं खूप कौतुक…आणि प्रेम – सुमित्रासारखंच. कोकणात आजोळ होतं त्याचं – देवगडला! आंबे खाता  खाता  तो बालपणच्या आठवणीत बुडून जाई.

“अगं देवगड म्हणजे देवभूमी ! जमिनीचा चिंचोळा पट्टा, दोन्ही बाजूंना समुद्र… आंब्याफणसांची, नारळाची झाडं. तिथे रंग दोनच : हिरवा आणि निळा … आणि हो… पुळणीचा पांढरा ! उन्हाळ्याची सुट्टी  सुरू झाली की आम्ही आजोळी  दाखल व्हायचो. आजोबांचा खूप जुना चिरेबंदी वाडा होता – 

लाल जांभ्या द‌गडाचा, चौक असलेला. तिथे नेहमी काही ना काही वाळवण पडलेलं असेच. सभोवताली हिरवंगार. जरा दूर विहीर  आणि पुढे आजोबांची आमराई – कलमं  होती हापूसची; शिवाय इतरही. घरी  जमलेल्या आम्हां मावस, मामेभावंडांचा आणि मित्र मंडळाचा मुक्काम दुपारी आमराईतच असायचा. हैदोस चालायचा नुसता.  कैऱ्यांचे घड फांद्यांवरून लटकत असायचे. एक दगड मारला आणि कैरी खाली टपकली की ती हडपायला शर्यत  लागायची आमची.  ठेचलेल्या कैरीच्या नुसत्या वासाने चळचळून पाणी सुटायचं तोंडाला. घरून पुडीतून आणलेलं तिखटमीठ लावून तोंडात टाकली की काय! वा! स्वर्गसुखच!!

पाडाला आलेले आंबे पक्ष्यांनी अर्धवट खाऊन खाली टाकले की समजायचं आंबा उतरवायला  झाला आहे. गडीमाणसे  झेला घेऊन येत, झाडावर चढून आंबे  उतरवत. हिरव्यागार  आंब्यांचे छोटे छोटे ढीग लागत. त्यात आम्हां पोरासोरांचीही लुडबुड चाले. काय माहौल असे तो! त्या वेळी रत्नागिरी हापूसची चलती होती; पण आम्हांला देवगडचा अभिमान. पातळ  साल, केशराकडे झुकणारा रंग आणि दळदार! चव तर अमृतालाही मागे टाकील. पिकला की घरभर घमघमाट सुटे. रसाच्या वाट्याच्या वाट्या  फस्त करायचो आम्ही. 

आजीच्या हातच्या उकडांब्याचा मोहरीचा फणका आणि मामीच्या हातची आंब्याची जाळीदार सांदणे… उन्हात हुंदडून घरी आल्यावर प्यायलेलं कैरीचं किंवा रातांब्याचं सुमधुर पन्हं… अहाहा अजून जिभेवर चव घोळते  आहे. आम्ही  घरी परत जायला निघालो की किती गोष्टी मामी बांधून द्यायची. आंबापोळी, फणसाची साठं, घरचे  नारळ, ओले काजू, कोकमं आणि आजोळची माया!”

बालपणीच्या आठवणींनी महेशचे डोळे भावुक होत… त्यांच्या मनाचा हळवा कोपरा त्या रम्य क्षणांनी जोपासला होता..

मग सुमित्राही स्मरणरंजनात जाई, “अहो गंमतच… विद‌र्भात अक्षयतृतीयेला आणखी एक पदार्थ होई आमरस… म्हणजे आंब्याचा रस नाही काही! एक प्रकारचे पन्हंच  असे ते – गुळाच्या  पाकात शिजवलेल्या कैरीच्या गराचं… पानाचा विडा, वाळा, थोडेसे भिजवलेले तांदूळ वाटून  केलेलं आणि वर  चारोळ्या घातलेलं. निरनिराळ्या वनस्पतींची पानं, फुलं, फळं, मुळं, देठं, बिया अशा सर्व भागांचा  उपयोग केलेलं एक अजब  रसायन असे ते… औषधी गुणाचं आणि सुमधुर चवीचं. कैरी, वाळा, विड्याचं पान आणि वेलची यांचा संमिश्र  सुगंध तर अप्रतिम असे. पूर्वजांनी खूप विचार करून आरोग्याची आणि व्यवहाराची निसर्गचक्राशी कशी छान सांगड घातली होती. उन्हाळा थंड होऊन जाई. बाधत नसे. एवढ्या राजस फळाचं केलेलं कौटुंबिक कौतुक असे ते.” 

बोलता बोलता वेळेचं भान राहत नसे दोघांनाही. या सुमधुर फळाशी दोघांचेही रेशीमबंध जुळले होते.

काळाच्या प्रचंड रेट्यात खूप काही मागे पडलं. घरं  लहान झाली. अंगणे  हरवली. ‘मामाचा गाव’ दिसेनासा झाला. नाती आक्रसली आणि संपलीही. काका असला तर आत्या असेलच असे राहिले नाही. रोजच्या धकाधकीत  नाती जपायला वेळ आणि शक्तीही राहिली नाही. कुणाला भेटायला जाताना प्लास्टिकच्या पिशवीत सहा आंबे न्यायचे. कुणी खासच असल्यास डझनाचा बॉक्स  कुरिअरने रवाना करायचा. एवढीच बांधिलकी  राहिली आंबे आणि नात्यांबरोबर. 

एका आयुष्यात किती बदल पाहावेत! आंबाही  या सगळ्यातून सुटला  नाही. फळ देणारं झाड तेच होतं; पण आता त्याला हवामान बदलाच्या आणि इतरही अनैसर्गिक आव्हानांना तोंड द्यावं लागत होतं. हजारो रुपयांचा प्राइस टॅग घेऊन आंब्याची पहिली पेटी फेब्रुवारी महिन्यातच बाजारात दाखल होऊ लागली. ‘पहिला आंबा देवाला’ पेक्षा ‘पहिली पेटी  कुणाकडे’  हे स्टेटस सिम्बल भाव खाऊ लागले. नैसर्गिक रितीने पिकलेला  आंबा घेण्यासाठी शोध घ्यावा लागत होता.  वाढलेले भाव आवाक्याबाहेर जात होते; तरीही फळांचा राजा होता  आंबाच !

“परवाच्या फ्लाईटचं बुकिंग झालं गं आई माझं. मुलांच्या परीक्षा झाल्याबरोबर पुन्हा येईन मी आणि घेऊन जाईन तुला.” 

आभाच्या बोलण्याने  सुमित्रा पुन्हा भानावर आली. आभा दिल्लीला परतल्यावर घर सुनंसुनं झालं. महेश  गेल्यानंतरचं आयुष्याचं नवं पर्व सुरू झालं होतं. काही करण्याचा, बाहेर जाण्याचा उत्साह राहिला नव्हता. सगळं काही एकट्यानं करायची सवय करायला हवी, हे कळत होतं वळत नव्हतं. पारूबाईच्या  आग्रहाने – अनिच्छेने – का होईना घास पोटात जात होते. अन्न हे यज्ञकर्म झालं होतं! बसलं की आठवणी यायच्या. एखाद्या सुट्टीत नुसते आंबे खाण्यासाठी मारलेली कोकणची  फेरी आठवे; तर  कधी आंब्याच्या झाडाखाली बसून आंब्याचेच पदार्थ खाण्याची पार्टी.  पुण्यातल्या आंब्यांचा  आस्वाद घेता  घेता दोघेही  बालपणाच्या जादुई   दुनियेत फेरफटका मारून येत. एक भावनिक ऊर्जा घेऊन येत. एखादी रंगलेली मैफिलच  असे  ती. ज्याच्याबरोबर रसिकतेने ती मैफिल अनुभवायची तो सोबती कायमचा निघून गेला होता. मन रिकामं  झालं होत. आणि निरस ! 

आंब्याचा सीझन आता भरात आला होता. कोपऱ्याकोपऱ्यांवर, गल्लोगल्ली आंब्यांचे ढीग दिसू लागले. आंबामहोत्सवाच्या पाट्या झळकू लागल्या,

“’ताई घ्याना… एक नंबर हापूस आहे…आमच्या बागेतला.  साहेब किती पेट्या  घ्यायचे. पाठवू घरी एखादी?” बाजारात भाजीला गेल्यावर फळवाल्याची विचारणा. 

“अरे नको… आंबा नको डाळिंब दे एखाद – दुसरं… बस्स!” तिच्या ओलावलेल्या डोळ्यांकडे आणि उतरलेल्या चेहेऱ्याकडे बघून तोही बिचारा गप्प बसे.

आज सकाळीच देसायांचा  दरवर्षीप्रमाणे  फोन आला. “वहिनी आंबे आले आहेत आमच्या बागेतले. देवगड हापूस ! अक्षयतृतीया आली आहे पुढच्या आठवड्यात. पाठवू?”

सुमित्रा सुन्न ! जसा जादू‌टोणा झाला होता. स्वतःच्याही 

नकळत ती बोलून  गेली, “कसे आहेत?”

“१२०० रु. डझन. पाठवू दोन डझन?”

” नको हो इतके मला. अगदी थोडे हवेत ” 

“ दोन म्हणालात तरी देतो पाठवून.” 

“सहा पाठवा फक्त.”

सुमित्राने फोन बंद केला तेव्हा तिच्या डोळ्यांतून आसवं ओघळत होती. शरीराला सूक्ष्म कंप सुटला होता – तिच्याही नकळत.

‘हे काय झालंय आपल्याला? महेश गेल्यानंतरचा हा  पहिला सीझन. त्यांचं  अत्यंत आवडतं फळ.  वर्षसुद्धा झालं नाही त्याला  जाऊन आपल्याला एकटीला खाववतं तरी  कसं? मन इतकं भावनाशून्य कधी झालं? अचानक ही हाव कशी निर्माण झाली? ही त्यांच्यासोबत जुन्या आठवणी जगण्याची ऊर्मी की त्याचे अस्तित्व शोधण्याचा मार्ग? की… की… दुसरंच काहीतरी ? गेल्या दोन तीन महिन्यांत पुसटसुद्धा न जाणवलेली भावनांच्या कोवळिकीवर मात करणारी  ही भोगवादी प्रबळ जीवनेच्छा तर नाही?

महेश गेले. आपल्याबरोबर आमच्या सह‌जीवनाचे सर्व रंग घेऊन गेले; पण मी अजून जगते आहे. जगणं बाकी   आहे माझं अजून. भोवताल तसाच आहे आणि मीही – स्थिरावत चाललेल्या मनाला तो खुणावतो आहे. माझं मनही त्याला प्रतिसाद देऊ पाहत आहे.

कसं थांबवायचं  मी हे सारं आणि का? रसरसू‌न वर येणाऱ्या या विचारासरशी, उघड पडण्या- जाणिवेने आणि अपराधीपणाच्या भावनेने सुमित्रा शरमून गेली.

महेशची साथसंगत कायमची सुटल्यानंतरची  अंतर्वेदना, शोक, विलाप हे सर्व जितकं सत्य होतं तितकीच खरी होती  जीवनाच्या रसानुभवाची असोशी.  भावभावनांची अंतर्मनातील सरमिसळ आणि पंचेंद्रियांची हाक यांचा गुंतागुंतीचा मनोव्यापार इतका सहजी कसा कळणार?

सुमित्राचे डोळे पाण्याने भरले होते आणि मनात मात्र  कोकणचा राजा झिम्मा खेळत होता.

आयुष्य पुढेच जातं… कुणासाठी थांबत नाही… ठीकच आहे ते… नव्या आठवणीही तयार  व्हायला हव्यात. 

Author

Leave a Reply