रद्दीतील रत्ने ( ४ ): ताजमहालची अपार्थिवता 

   अंतर्नाद मासिकाच्या जून महिन्याच्या अंकात  माझा ‘वा! ताज’ या शीर्षकाखाली जो लेख प्रसिद्ध झाला आहे त्या लेखात ताजमहाल ही वास्तू बघितल्यानंतर विविध परदेशी प्रवाशांच्या  कशा प्रतिक्रिया होत्या याचा आढावा घेतला. या सर्व प्रतिक्रियांचा मध्यवर्ती आशय असा होता की ताजमहाल ही एक अत्यंत सुंदर, स्वर्गातून पृथ्वीवरती अवतरलेली अद्भुत वास्तू असून  या वास्तूचा एक अविस्मरणीय परिणाम मनावर होतो आणि तो कधीच पुसून टाकता येत नाही. वास्तुशिल्पकार कै. माधवराव आचवल यांना अभिप्रेत असलेली ताजमहालाची अपार्थिवता हीच आहे. श्री. भा. द. साठे लिखित ‘ताजमहालची अपार्थिवता’  या शीर्षकाचा लेख १० मार्च २००७ रोजी लोकसत्ता या दैनिकाच्या वास्तुरंग पुरवणीत प्रसिद्ध झाला.  याच लेखाच्या आधारावरती मी हा प्रस्तुत लेख लिहीत आहे.

   मी मागील लेखात म्हटल्याप्रमाणे कै. माधवराव आचवल यांनी १५ वर्षे ताजमहाल या वास्तूचा अभ्यास केला व ताजमहाल पार्थिव असून तो अपार्थिव का भासतो यामागील कारणे शोधून काढली. कै.माधवराव आचवल यांनी, ‘ताजमहाल असा  अपार्थिव दिसावा किंवा भासावा हे योगायोगाने घडले असेल; का ताजमहालाच्या शिल्पकाराने ते ठरवून घडवले असेल?’ या प्रश्नाचासुद्धा शोध घेतला. त्यांच्या अनुमानाप्रमाणे हे सर्व ताजमहालाच्या अनामिक शिल्पकाराने योजनापूर्वक केलेले आहे. कै.आचवलांच्या या अनुमानामागील कारणांचा शोध घेण्यापूर्वी ताजमहाल हा ज्या  भूखंडावर किंवा प्लॉटवरती उभा आहे त्याची व प्रत्यक्ष ताजमहाल या वास्तूची मोजमापे जाणून घेऊ या; कारण ताजमहाल किती अंतरावरून बघावा, कोणत्या चौकटीत बघावा हे सर्व वर वर्णन केलेल्या मोजमापावरून ठरणार आहे. ताजमहालाच्या शिल्पकाराने ही मोजमापे विचारपूर्वक ठरविली आहेत. ताजमहालाचा जो भूखंड आहे त्याची दक्षिणोत्तर लांबी ५८० मीटर (१९०० फूट)आहे, पूर्व पश्चिम रुंदी ३०५ मीटर (१०००फूट) आहे. ताजमहालाच्या उत्तरेला ताजमहालाच्या मागून यमुना नदी वाहते. पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी दक्षिणेकडील प्रवेशद्वारातून प्रवेश करतो. हा  भूखंड तीन भागांत विभागलेला आहे. या तीनही भूखंडांची रुंदी सारखीच म्हणजे ३०५ मी.(१०००फूट) आहे.

१)यमुनेला लागून असलेला भूखंडाचा जो भाग आहे तो ३०५ मी. (१०००फूट) रुंद व १३७ मी.(४५०फूट) लांब असा आहे. याच भागात ताजमहालाची वास्तू  उभी आहे. ताजमहाल हा दोन चौथर्‍यांवर उभा आहे. सर्वांत खालचा जो चौथरा आहे त्याची लांबी रुंदी ३०५ मी. × १३७ मी. असून उंची १/२ मी. आहे. या सर्वात खालच्या चौथऱ्याच्या  मध्यभागी ९५ मी. ×९५ मी. (३११ फूट×३११ फूट) लांबी-रुंदीचा चौरस चौथरा आहे. या चौथऱ्याची  उंची ५.६ मी. म्हणजे जवळपास १८फूट आहे. याच चौथऱ्याच्या चार कोपऱ्यांत  मिनार आहेत. या दुसऱ्या  चौथऱ्याच्या  मध्यभागी ताजमहालाची मुख्य वास्तू उभी आहे. ताजमहाल हा अष्टकोनी आहे. या वास्तूची लांबी रुंदी ५५मी. × ५५मी. (१८०फूट×१८०फूट) अशी आहे. ताजमहालाची उंची ५८ मी.म्हणजे १९०फूट आहे. सर्व गोष्टी जवळपास चौरसात बसविल्यामुळे सिमेट्री साधली गेली आहे.  ही सिमेट्रीच त्याच्या अपार्थिवतेचा पाया कसा आहे हे पुढील वर्णनावरून कळेल. 

२) या भूखंडाचा जो दुसरा भाग आहे तो चौरस असून ३०५ मी. ×३०५ मी. या मोजमापाचा आहे. या भागात सुंदर बाग, वाहत्या पाण्याचा पाट, ताजमहालाकडे जाणाऱ्या पायवाटा,  सुंदर फुलांचे ताटवे असं सर्व आहे. यातसुद्धा  सिमेट्री साधली आहे. मध्यभागी पाण्याचा पाट, त्याच्या दोन्ही बाजूंना ताजमहालाकडे जाणाऱ्या पायवाटा,  त्यांना लागून दुतर्फा एकाच उंचीची सायप्रसची झाडे –   सर्व काही दोन्ही बाजूंना समान! 

 ३) या भूखंडाचा दक्षिणेकडील जो तिसरा भाग आहे तो ३०५ मी. ×१३७ मी. या मोजमापाचा आहे. हा चारी बाजूंनी – दोन प्रवेशद्वारे – सोडून उंच लाल दगडाच्या भिंतीने बंदिस्त केला आहे. या भागाला प्रांगण म्हणतात. हे प्रांगण पूर्णपणे मोकळे आहे. या प्रांगणात प्रवेशद्वारे सोडून कोणतीही वास्तू नाही. आपण दक्षिणेकडील पहिल्या प्रवेशद्वारातून प्रांगणात येतो. आपण हे प्रांगण ओलांडून दुसऱ्या प्रवेशद्वारात येतो तेथून आपल्याला ताजमहालाचे पहिले दर्शन होते. ताजमहालाचा जो ५८० मी. ×३०५ मी. लांबी-रुंदीचा जो मूळ भूखंड आहे त्याच्या  तीनही बाजूंनी लाल दगडांत बांधलेली उंच भिंत आहे. उत्तरेकडील नदीच्या बाजूने भिंत नाही; याचे कारण नदीच्या पलीकडे असलेल्या लाल  किल्ल्यातून ताजमहाल दिसावा हे असावे; असे मला वाटते. ताजमहालाच्या मूळ भूखंडाला घातलेल्या ज्या लाल दगडांतल्या भिंती आहेत त्यांना लागून दोन लाल दगडांतल्या वास्तू आहेत. पूर्वेला जी वास्तू आहे ती मशीद आहे. पश्चिमेकडील वास्तू  हुबेहूब पूर्वेकडील वास्तूसारखीच आहे;  पण ती मशीद नाही. त्या वास्तूला ‘जबाब’ म्हणतात – किती योग्य नाव आहे! असो! 

येथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ताजमहालाची मूळ वास्तू सोडून कुठेही संगमरवर या दगडाचा उपयोग केलेला नाही.

 आचवलांच्या  मते प्रांगणापासूनच आभासाच्या जादूला सुरुवात होते. कै.आचवल म्हणतात की, आग्रा शहरातल्या ज्या रस्त्याने आपण ताजमहालाकडे येतो तेव्हा आपल्याला अस्ताव्यस्त परिसर, खडबडीत रस्ता, खुरटी झाडे आणि उजाड जमिनीचा भाग असे दृश्य दिसत असते. नंतर आपण एका प्रवेशद्वारातून प्रांगणात येतो. मोकळे रेखीव आणि लाल दगडांच्या उंच भिंतीने वेढलेले सुरेख प्रांगण आपण बघतो. प्रांगणात भरपूर प्रकाश असतो व ते पूर्णपणे मोकळे असते. हे प्रांगण ओलांडून आपण पुढे पुन्हा दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी येतो. यामधून ताजमहालाच्या उद्यानात प्रवेश करणार असतो. या प्रवेशद्वाराच्या कमानीतून ताजमहालाचे जे दर्शन होते त्याने आपण नुसतेच मोहित होत नाही तर चकितसुद्धा होतो. एका अवर्णनीय दृष्टिसौख्याने भारून जातो. या कमानीतून जे दृश्य आपल्याला दिसते तेच एखाद्या चित्रासारखे भासते. इथेच द्विपरिणामी – टू डायमेंशनल चित्रमयतेची सुरुवात होते. त्याची कारणे कै. आचवलांनी दिली आहेत :

१) मोकळा, भरपूर प्रकाश असलेल्या व मुक्त अवकाशाची जाणीव करून देणाऱ्या प्रांगणातून आपण एकदम चिंचोळ्या, जरा काळोख्या प्रवेशद्वाराच्या अवकाशात येतो. अवकाशाच्या या दोन जाणिवा अजाणता आपल्या मनावर विरोधाने ठसतात.

२) दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या कमानीने समोर दिसणाऱ्या दृश्याला – म्हणजे ताजमहालाची वास्तू, त्यासमोरील सुंदर भाग, खळखळत वाहणारे पाणी, उद्यानाच्या आखीव पायवाटा यांना – एक डार्क चौकट तयार केली आहे. प्रवेशद्वाराची उंची व रुंदी अशी आहे की त्यात हे सर्व दृश्य बरोबर सामावते. शहरातून येताना पाहिलेले बाहेरचे दृश्य आणि प्रवेशद्वाराच्या कमानीतून दिसत असलेले दृश्य यांत बाहेर पाहिलेले रोजच्या जगातले सत्य व समोर दिसत आहे तो एक स्वप्नील आभास आहे असे वाटून ताजमहालाच्या अपार्थिवतेचा परिणाम मनात खोल झिरपत जातो.

३) या  वास्तूकडे पाहताना आपण चित्र पाहत आहोत असा भास व्हायचा असेल तर तिचा त्रिपरिणामी गुण किंवा थ्री डायमेन्शनल क्वालिटी ही कमी होणे किंवा नाहीशी होणे आवश्यक आहे. ताजमहालाची वास्तू ही अष्टकोनी व कमालीची सिमेट्रिकल  असल्याने त्याचे थर्ड डायमेंशन लक्षात येत नाही. सिमेट्रीमुळे मोठ्या घुमटाच्या बाजूला असलेले दोन छोटे घुमटच दिसतात – त्याच्याबरोबर मागे असलेले दुसरे दोन छोटे घुमट दिसतच नाहीत; त्यामुळे वास्तूला टू डायमेंशनल स्वरूप प्राप्त झालेले आहे.

४) याशिवाय अष्टकोनी  आकारामुळे वास्तूच्या कडा निश्चित व कठीण म्हणजे फर्म आणि हार्ड आहेत असे भासत नाही.  ताजमहालाच्या मूळ घुमटाचा आकार असा विलक्षण आहे की, तो हवेने टरटरीत फुगल्यासारखा वाटतो. तो अलगद वास्तूवरती ठेवल्यासारखा भासतो. या सर्वांमध्येच ताजमहालाची अपार्थिवता   किंवा (Ethereal Quality)सामावलेली आहे. असे कै. आचवलांचे मत आहे. वर वर्णन केलेल्या गोष्टी योगायोगाने होत नसतात म्हणूनच आचवल म्हणतात की, ताजमहालाच्या वास्तुशिल्पकाराने जाणीवपूर्वक सर्व रचना केली आहे. ताजमहालाचे हे पहिले दर्शन असेच असायला हवे, अशा प्रकारची वास्तुयोजना केली आहे असे आचवलांना वाटते.  त्यांचे म्हणणे असे की, प्रवेशद्वाराची उंची, रुंदी प्रवेशद्वार व ताजमहालाची वास्तू या दोन्हींमधील अंतर तसेच प्रवेशद्वारातून दिसणारे रेखीव उद्यान, शुभ्र संगमरवरी ताजमहाल व त्याच्या बाजूला आणि वर पलीकडे दिसणारे निळे विस्तीर्ण आकाश या तीनही घटकांचे प्रमाण या दृश्यात असे आहे की ज्यामुळे त्यात द्विमिती चित्राचा आभास निर्माण होईल.

    मी स्वतः जेव्हा प्रथम ताजमहाल बघितला तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे त्याची भव्यता.  आपण प्रत्यक्ष ताजमहाल बघण्याआधी त्याचे फोटो, छोटी मॉडेल्स बघितलेली असतात व त्याचा मनावर एक ठसा उमटलेला असतो. त्याच्या  आकाराविषयी मनात एक कल्पना तयार झालेली असते; पण प्रत्यक्ष ताजमहाल आपण पाहतो तेव्हा या कल्पनेचा अगदी चक्काचूर होतो एवढा तो भव्य आहे. ताजमहाल बघितल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की भव्यतेतसुद्धा एका प्रकारचे सौंदर्य असते. असो! त्यावेळी मी काही आचवलांचा हा लेख  वाचला नव्हता.

   प्रसिद्ध लेखक व वास्तुरचनाकार  कै.फिरोज रानडे यांचे  भव्य वास्तुविषयीचे मत जाणून घेणे येथे अप्रस्तुत ठरणार नाही असे वाटते. कै.फिरोज रानडे मला एकदा म्हणाले होते की, भव्य वास्तूचा पाया म्हणजे प्लिन्थएवढी उंच पाहिजे की ती  पाहतानाच मागे आकाश दिसले पाहिजे. पायाच एवढा उंच घेतल्यावर त्यावरची वास्तू भव्य होतेच व ती आकाशात घुसते. त्यांच्या  या अनुमानाच्या समर्थनासाठी त्यांनी १) हुमायुनाची कबर २)ताजमहाल व ३) हल्लीचे राष्ट्रपतीभवन – म्हणजे पूर्वीचे व्हाईसरॉयज् हाऊस या तीन वास्तूंच्या पायांची उंची मोजली. ती साधारणपणे साडेअठरा फूट ते १९ फूट याच्या आसपास आहे. यातील लक्षात ठेवण्याचा भाग हा आहे की, या तिन्ही वास्तू सर्वसाधारणपणे तीनशे ते साडेतीनशे वर्षांच्या अंतराने बांधलेल्या आहेत; परंतु तिन्ही वास्तूंच्या शिल्पकारांचे पायाच्या उंचीबाबत एक मत आहे.

   वास्तू किंवा भव्य पुतळा किती अंतरावरून बघावा याचेसुद्धा एक शास्त्र आहे. फिरोज रानडे यांनी राष्ट्रपती भवनाच्याबाबत एक किस्सा सांगितला तो इथे मी देतो. 

राष्ट्रपती भवन हे एका टेकडीवरती आहे. उंचावरती असलेल्या वास्तूकडे जाणारा रस्ता सर्वसाधारणपणे असा असतो की, त्या रस्त्याने वर जाताना वास्तूचा सर्वात वरचा भाग आधी दिसतो नंतर आपण जसे वरती जातो  तसा क्रमाक्रमाने वास्तूचा खालचा भाग दिसू लागतो. राष्ट्रपती भवनाचे  आर्किटेक्ट सर एडविन ल्यूटन व हार्बर्ट बेकर यांना त्यांची वास्तू अशी तुकड्या तुकड्याने दिसणे मान्य नव्हते. त्यांना त्यांची भव्य वास्तू एकदम एकाच वेळी दिसली तर त्याचा वेगळा ठसा बघणाऱ्याच्या मनावर उमटावा असे त्यांना अपेक्षित होते म्हणून त्यांनी टेकडीवर एक सपाटी निर्माण केली. त्या सपाट जागेवर एकाच पातळीवर संपूर्ण वास्तू निर्माण केली. या सपाटीवर जाण्याच्या रस्त्याचा चढ म्हणजे ग्रेडियंट असा ठेवला की राष्ट्रपती भवनाच्या ग्राउंड लेव्हलला येईपर्यंत वास्तूच्या तीन घुमटांचेसुद्धा दर्शन होणार नाही.  तुम्ही जेव्हा वरती याल तेव्हाच संपूर्ण वास्तूचे दर्शन होईल. तेव्हा वास्तू  कशी दिसली पाहिजे याचेसुद्धा एक तंत्र आहे जे ताजमहालाच्या वास्तुशिल्पकाराला अवगत होते ही गोष्ट महत्त्वाची आहे. 

Author

One thought on “ रद्दीतील रत्ने ( ४ ): ताजमहालची अपार्थिवता 

  1. ताजमहाल व इतर वास्तुंच्या रचनेविषयी सुरेख माहिती. सामान्य व्यक्ती याविषयी अनभिज्ञ असते.

Leave a Reply