उन्हाळ्यातील आठवणी
२९.४.२०२४
एप्रिल महिना संपत आला आणि तापत्या उन्हाच्या झळा सुरू झाल्या. दहिसर नदीच्या शेजारी उभी असलेली ताम्हण बहरून आली. सोनमोहराचा पिवळाधमक बहर ओसरू लागला आणि त्याची जागा ताम्हणीच्या निळ्या जर्द फुलांनी घेतली. या तळपत्या उन्हात एक हरणाचं पाडस नदीकिनारी असलेल्या उद्यानाच्या भिंतीच्या नाल्यातून घसरून सात ते आठ मीटर खाली नदीकिनारी पडलं. खाली हिरवळ असल्याने त्याला इजा झाली नाही; पण तिथून चढून ते उद्यानात येऊ शकत नव्हतं. पुलावरून चालणाऱ्या लोकांनी ते पाडस पाहिलं; आमच्या रेस्क्यू पथकाला निरोप आला; आम्ही त्या पाडसाची पाहणी केली. उद्यानाच्या भिंतीवरून सात ते आठ मीटर खाली दाट झाडीत ते पाडस बसलं होतं. बाजूला सुकलेलं नदीचं पात्र होतं . पाडस साधारण आठ ते दहा किलो वजनाचं होतं. कळपापासून दुरावल्याने घाबरून जाऊन ते अंग आखडून बसलेलं दिसत होतं. आम्ही जवळ जाऊन त्याला पकडायचा प्रयत्न केला तर दूर दूर पळू लागलं. हरणाचं पाडस अगदी लहान असलं तरी खूप वेगानं पळतं; त्यामुळे त्याला हाताने पकडू शकत नव्हतो; मग लांबूनच डार्ट मारून त्याला बेशुद्ध करण्याचं ठरलं. त्या पाडसाचं वजन लक्षात घेऊन मी तसा डार्ट बनवला. जेमतेम सात ते आठ किलो वजनाचं होतं ते. डार्ट तयार करून प्राणिरक्षक वैभव पाटीलच्या हातात तो डार्ट दिला. त्याने तो बंदुकीत भरला. जवळ जवळ सात ते आठ मीटर उंचीवरून त्याने झाडीत लपलेल्या पाडसाला डार्ट मारला. डार्ट लागताच पाडस वेगाने पळू लागलं. थोड्या वेळाने त्याच्यावर औषधाचा परिणाम दिसू लागला. आता ते झोकांड्या खाऊ लागलं. खाली त्याला पकडण्यासाठी तयार असलेले दिनेश गुप्ता आणि राजेंद्र भोईर त्याच्याजवळ सरकले. आता ते पळू शकत नव्हतं. त्या दोघांनी त्याला पकडलं आणि स्ट्रेचरवर घेतलं; वरून वैभव पाटीलने लांबच्या लांब दोरखंड खाली सोडला. स्ट्रेचरची चारी टोकं गुप्ता आणि भोईरने त्या दोरखंडाला बांधली. आता वर उभा असलेला वैभव तो दोरखंड खेचू लागला. स्ट्रेचरमधील बेशुद्ध पाडस वर पोहचल्यावर वैभवने पाडस माझ्याकडे आणलं. आता पाडस निपचित पडलं होतं. त्याचे टपोरे डोळे उघडेच होते. हृदयाचे ठोके चालू होते. मी लगेच त्याला बेशुद्धीतून बाहेर आणणारं औषध शिरेतून दिलं. औषधाचा परिणाम तत्काळ झाला. ते उठून पुन्हा पळण्याचा प्रयत्न करू लागलं; तसं वर उभ्या असलेल्या वैभव आणि अनिल साप्ते यांनी त्याच्या चारी पायांना धरून उचललं आणि उद्यानाच्या आतील बाजूला आम्ही तिघंही पळू लागलो. उद्यानाच्या आतल्या दिशेने त्याला जमिनीवर ठेवलं तर ते सुसाट पळतच गेलं. आतल्या बाजूला त्याचा कळप होता; त्यातील एक मादी त्याची आई असावी. ती दोन दिवसांपासून त्याला शोधत असावी. अचानक दोन दिवसांनी पळत कळपात आलेल्या त्या पाडसाला त्याच्या आईने पाहिलं . एखाद्या व्रात्य लहान मुलाला हाताने फटकारावं तसा तिने त्याच्या मानेचा रागाने चावा घेतला; जणू ती म्हणत होती, “दोन दिवस कळप सोडून कुठे उनाडत होतास?” पाडस बिचारं निमूटपणे पुढे चालू लागलं. कळपातील हरणं त्याच्या आता आजूबाजूला होती. आता त्याला खूप सुरक्षित वाटत होतं.
४.५.२०२४
आता उन्हाच्या तापत्या झळांनी अंग भाजून निघत होतं. त्या तापत्या उन्हाळ्यात सर्वांगांनी फुलून आलेली फणशीची झाडं मी उद्यानात पाहिली. साधारण नऊ-दहा मीटर उंचीचं हे झाड आतापर्यंत तसं लक्षातच आलं नव्हतं. आमच्या व्याघ्रविहाराच्या रस्त्यावर फणशीच्या दोन-तीन झाडांना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पोपटी पालवी फुटली – झाड पोपटी रंगात नाहून गेलेलं. तळपत्या उन्हात पानांचा कोवळा पोपटी रंग चमकत होता आणि पालवी आल्यानंतर आठवड्याभरातच झाडावर २ते ३ सेंटीमीटर लांबीच्या, फिकट निळसर रंगाच्या चिमुकल्या असंख्य कळ्या आल्या. थोड्या दिवसांतच त्या कळ्या उमलल्या. फिकट जांभळ्या पांढऱ्या रंगाच्या फुलांनी झाड लवकरच बहरून आलं. लांबून पाहावं तर फिकट जांभळा रंग निळ्या निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर खुलून दिसत होता. मी गूगल लेन्सवर त्याचा फोटो टाकला तर त्याचं शास्त्रीय नाव Dalbergia lanceolaria असल्याचं कळलं. माझ्या झाडांच्या ज्ञानात या मे महिन्यात फणशीच्या झाडाची नव्याने भर पडली.
फणशीची पोपटी पालवी न्याहाळत असतानाच त्या काळात एक पोपटाचं छोटसं अनाथ पिल्लू आमच्याकडे संगोपनासाठी दाखल झालं होतं – वजन जेमतेम पंचवीस ते तीस ग्रॅम असावं. अंगावर केसही नव्हते – नुसती गुलाबी त्वचा आणि लाल चोच. आम्ही त्या आईवेगळ्या पिल्लाला पातळ खाद्य भरवायला सुरुवात केली. दिवसातून दोन ते तीन वेळा खाद्य भरवायला लागायचं. एका छोट्या पुठ्ठ्याच्या खोक्यात कोंडा टाकून त्यावर त्याला आम्ही ठेवलं. खाद्य भरलेली सिरींज त्याच्याजवळ नेली रे नेली की ते पिल्लू चोच वासायाचं; मग आम्ही लगेच चोचीत खाद्याचे थेंब सोडायचे. या पिल्लाला भरवायाचं काम पंकज करायचा. पावसाळ्यात ओल्या जमिनीतून गवताची हिरवी पाती बाहेर डोकावतात त्याप्रमाणे त्याच्या गुलाबी त्वचेतून पोपटी पिसं बाहेर येऊ लागली; त्याचं वजन वाढलं; अंगभर हिरवी पिसं आली; मग आम्ही त्याला फळं देऊ लागलो. त्याला हाताने छोटे तुकडे भरवायचं काम पंकज आवडीने करायचा. बघता बघता त्याच वजन वाढलं; मग त्याला ऑफीससमोरच्या हिरवळीवर आम्ही ठेवू लागलो. पंकज त्याच्यासमोर बसायचा आणि त्याला हाताने त्याच्याकडे यायचा इशारा करायचा. एखादं लहान मूल जसं आईकडे बघत चालायचा प्रयत्न करतं; त्याप्रमाणे ते पिल्लू आता पंकजकडे बघत हिरवळीवर एक एक पाऊल टाकायचं. पंकज त्याला उडवायचा प्रयत्न करत राहायचा. ते पंख फडफडवत घाबरल्यासारखं पुन्हा जमिनीवर यायचं. सात ते आठ दिवस असे आमचे प्रयत्न चालू होते. ते पिल्लू हिरवळीवर छान चालायचं; पण उडवायला गेलं की पंख फडफडवत जमिनीवर उतरायचं. आता ते बऱ्यापैकी मोठं झालं होतं; पण अद्याप उडत नव्हतं. मध्ये तीन-चार दिवस दुसऱ्या काही कामात गुंतल्यामुळे आम्हांला त्या पोपटाला रोजचा व्यायाम देता आला नाही. मला एकदम त्याची आठवण आली. इस्पितळातील प्राण्यांच्या खाद्याची काळजी घेणाऱ्या प्रशांतला मी हाक मारली. प्रशांतला मी त्या पोपटाच्या पिल्लाला माझ्याकडे आणायला सांगितलं. खरंतर ते आता पिल्लू राहिलं नव्हतं – हिरवेगार पंख, लालचुटुक चोच आणि बळकट पाय असलेला तो टीन-एजमध्ये असलेला पोपट होता. मी त्याला घेऊन आमच्या ऑफीसच्या लॉबीत उभी राहिले. प्रशांत माझ्या बाजूला होता. मी त्या पिल्लाला उडवण्याचा प्रयत्न केला; तर ते पंख फडफडवत खाली जमिनीवर उतरलं. मी पुन्हा एकदा त्याला हातात घेतलं आणि वर उडवण्याचा प्रयत्न केला. त्याने अचानक वर झेप घेतली. दोन्ही पंख शरीराच्या बाजूला ताठ करत त्याने आमच्या इस्पितळाच्या बाहेर उड्डाण केलं. आम्ही सारेच चकित होऊन त्याच्याकडे बघत बाहेर धावलो. तो ऑफिसच्या समोरील रेन ट्रीच्या उंच फांदीवर जाऊन बसला. आम्ही सारे मान वर करून त्याच्याकडे पाहत होतो. त्याने एकदा इस्पितळाच्या इमारतीकडे खाली पाहिलं. आमच्याकडे एक नजर फिरवली आणि उंच आभाळात ते उडून गेलं. आमच्या ऑफीसची माणसं एकत्र जमली. एवढे दिवस सारीच त्या पिल्लामध्ये मनाने गुंतली होती. ते उडून गेलं याचा आनंद होता; पण ते असं अचानक गेलं याचं दुःखही होतं. माझ्या एक लक्षात आलं, पक्ष्यांना उडायला शिकवावं लागत नाही. त्यांच्या पंखात बळ आलं आणि उघडं आभाळ दिसलं की ते आपोआप उडून जातात.
कळपापासून दुरावलेल्या हरणाच्या पाडसाचं त्याच्या आईबरोबर मिलन होताना आणि अनाथ पोपटाच्या पिल्लाला मोठं होऊन आकाशात झेपावताना या उन्हाळ्यात मी पाहिलं. त्या दोन्ही पिल्लांच्या आठवणी आल्या की मला तप्त उन्हाळ्यात वाऱ्याची झुळूक आल्याचा भास होतो.

मस्तच