खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एकूणच शवविच्छेदनं फार कमी होतात – होतच नाहीत म्हणू शकतो. आलीच क्वचित तर लहान बाळांची शवविच्छेदनं येतात; त्यामुळे स्टाफमध्ये शवविच्छेदन करण्याचा उत्साह कमीच.
अशातच एक दिवस दुपारी बालविभागातला शवविच्छेदनाचा कॉल आला, requisition फॉर्म्सवर पालकांची मान्यतेची सही नाही म्हणून परत पाठवला. वस्तुस्थिती अशी आहे की पालक शवविच्छेदनासाठी सहसा इच्छुक नसतात; म्हणून बला टळली अस वाटलं; पण अगदी कॉलेजची वेळ संपताना मावशी एक पिशवी व सही केलेला मान्यतेचा फॉर्म घेऊन आली. मग केसपेपर नीट वाचला. जुळी बाळं होती, precious babies! ८ वर्षांनंतर गर्भ राहिला होता व नीट पोसला गेला होता, डिलिव्हरीसाठी बाई आली. आमच्या हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत अर्भके मृत होती. केस इंटरेस्टिंग होती खचितच. Monochorionic Twins! (?TTTS)*. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सांगितलं शवविच्छेदन उद्या करू; पण आत्ता formalin इंजेक्ट करून काप देऊन ठेवा. त्या विशिष्ट बालरोग – निदानाविषयी वाचून या. मीदेखील ट्रेनमध्ये थोडे वाचन केलं, दुसरे दिवशी लवकर जाऊन पुस्तक वाचलं.
सकाळी १० वाजता २ विद्यार्थ्यांनी ती दोन बाळं शवविच्छेदनासाठी ट्रेमध्ये घेतली. मुली होत्या दोघी! गोऱ्या, पूर्ण वाढ झालेल्या (९ महिने १५ दिवस), गुबगुबीत, नीटस चेहेऱ्याच्या! एकदम वाटलं, कसं झेललं असेल त्या पालकांनी. विचार झटकला. No emotions!
आम्ही २-३ सिनियर शिक्षक मुलांना शिकवत शिकवत शवविच्छेदन करू लागलो. सुशांतची बोटे मोठी होती तरी त्याने अतिशय नजाकतीने अवयवविच्छेदन पूर्ण केलं. आता अवयव वेगळे करणं सुरू झालं, अपेक्षित अनुमानं मिळत होतीे. शवविच्छेदनाचे सोपस्कार नीट पार पडल्यावर परत भावनिक आंदोलनं सुरू झाली. अवयव वेगळे करून तपासण्या करून, छोटे तुकडे देणं सुरू झालं.
त्या दोघींची इवलाली गर्भाशयंदेखील कौशल्यपूर्ण रितीनं वेगळी केली गेली. सगळे अवयव ट्रे मध्ये ठेवलेले. श्वास न घेतलेली फुप्फुसं, लहानसं हृदय, किडन्या,मेंदू, यकृत, गर्भाशय…
अचानक परत एकदम लो फील व्हायला लागलं. जेव्हापासून समजलं होतं की त्या मुली होत्या, जुळ्या होत्या, precious होत्या, थोडी अस्वस्थता होतीच. ही इवलाली पण केवढ्या ताकदीची गर्भाशयं!!
ही गर्भाशयंदेखील गेली आणि त्यासोबत पुढची केवढी तरी वंशावळ थांबली!!
*TTTS हा जुळ्या गर्भांना होणारा एक दुर्मीळ आजार आहे.
