
एकाकीपण आणि शारीरिक आरोग्य
माझा न्युरॉलॉजिस्ट मित्र त्याच्याकडे आलेल्या एका पेशंटचा किस्सा सांगत होता. ८५ वर्षांची महिला हाताला मुंग्या येतात म्हणून त्याच्याकडे आली होती. त्या एकट्याच असतात. मूलबाळ नाही, नवरा जाऊन काही वर्षे झाली –निवृत्त शिक्षिका.
माझा मित्र म्हणाला “तुम्ही एकट्याच असता तर!”
“हो डॉक्टर, मी एकटी असते; पण मी एकाकी नाही बरं – आय ॲम अलोन बट आय ॲम नॉट लोनली,” त्या बाई म्हणाल्या.
त्यानंतर माझ्या न्युरॉलॉजिस्ट मित्राने ‘लोनलीनेस’बद्दल नुकतेच ‘नेचर’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाबद्दल सांगण्यास सुरुवात केली.
‘समुद्रीं चौंकडे पाणी’
आज ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढती आहे. एकटे राहणारे ज्येष्ठ पुरुष तसेच महिला आजूबाजूला दिसतात; पण एकट्याने राहणारी प्रत्येक व्यक्ती एकाकी किंवा एकली असतेच असे नाही. एकलेपणा हा व्यक्तिनिष्ठ अनुभव असतो. ती व्यक्ती स्वतःच्या सामाजिक संबंधांबाबत असमाधानी असते. समाजातील इतरांशी भावनिक अर्थपूर्ण नातेसंबंधांचा त्या व्यक्तीच्या जीवनात अभाव असतो. ‘जनांच्या कोरड्या गप्पा’ असेच त्याला वाटत असते. एकलेपणाने ग्रस्त माणसाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर निश्चित परिणाम होतो. ‘लोनली’ माणसात ‘डिप्रेशनचे’ प्रमाण जास्त असते. त्यांना उच्च रक्तदाबाच्या विकाराचा धोका जास्त असतो. अशा माणसांची रोगप्रतिकारक शक्ती ढासळते. ‘डिमेनशिया’, ‘अल्झायमर’ यांसारख्या ‘न्युरोडिजनरेटिव’ मेंदूचा ऱ्हास होणाऱ्या रोगांची शक्यता वाढते. निद्रानाश, ताणतणाव यांचे प्रमाण वाढते. एकंदरीत ‘एकलेपणा’ हा माणसाची भावनिक त्रस्तता, व्याकुलता यांचा आविष्कार असतो. माणूस हा सामाजिक प्राणी; पण समाजात राहून समाजाशी जुळवून घेता येत नाही! असा हा भावनिक कल्लोळ त्या माणसाच्या मेंदूत गोंधळ घालत असतो. ‘समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ अशी जणू त्याची स्थिती असते.
मेंदूतील बदल
‘एकलेपणा’ ही साधारणपणे म्हातारपणची समस्या असा समज आहे; पण अमेरिकेत नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात १८ ते २४ या वयोगटात ‘लोनलीनेस’चे प्रमाण ७९% असते; तर ६६ वर्षांवरील माणसांत ४१% असते. ही आकडेवारी भारतीय समाजाला जशीच्या तशी लावता येणार नाही; पण तरुणपणातसुद्धा एकलेपणा असू शकतो एवढाच त्याचा अर्थ. प्रत्येक समाजात हे प्रमाण निरनिराळे असते असे तज्ज्ञांचे मत आहे.
अशा या गुंतागुतीच्या एकलेपणाचा मेंदूविज्ञानाने वेध घेतला आहे. मेंदूतील बदलामुळे एकलेपणा निर्माण होतो का एकलेपणामुळे मेंदूत बदल होतात. या दोन्ही अंगांनी मेंदूविज्ञानाने या समस्येचा शोध घेतला आहे. एकलेपणाचा त्रास असलेल्या माणसाच्या मेंदूचा आकार (वॉल्यूम )कमी झालेला असतो. मेंदूपेशींतील जोडण्या कमी झालेल्या असतात आणि मेंदूतील ग्रे मॅटर कमी झालेले असते असे संशोधनात आढळले आहे.
व्यक्तिनिष्ठ आणि व्यक्तिगत
एकलेपणाचा अनुभव व्यक्तिनिष्ठ-सबजेक्टिव तर असतोच आणि व्यक्तिगतही असतो. एकलेपणात गुरफटलेला माणूस जगाकडे निराळ्याच नजरेने बघतो – म्हणजे ज्यांना एकलेपणाचा त्रास नाही (याला ‘न्युरोटिपिकल’ अशी पारिभाषिक संज्ञा आहे – म्हणजे सामान्य भाषेत ‘नॉर्मल’) अशा नॉर्मल माणसांपेक्षा ज्यांना तो त्रास आहे अशा माणसांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन निराळा असतो. हे तपासून पाहण्याकरता संशोधकांनी प्रयोग केला. नॉर्मल माणसांना फुटबॉल खेळाच्या, मित्र-मैत्रिणींना भेटतो आहे अशा रोजच्या जीवनातील व्हिडियो-क्लिप्स दाखवल्या. त्या बघताना त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले; तेव्हा त्या सगळ्या माणसांच्या मेंदूंतील समान केंद्रे उजळलेली संशोधकांना दिसली. आता एकाकी माणसांना त्याच क्लिप्स दाखवल्या आणि त्याच वेळी त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले; तर या माणसांच्या मेंदूतील निराळीच केंद्रे उद्दीपित झालेली दिसली. नॉर्मल माणसांची उजळलेली केंद्रे आणि एकाकी माणसांची केंद्रे यांच्यात खूप फरक होता. एवढेच नाही; तर प्रत्येक एकाकी माणसाच्या मेंदूत उजळलेली केंद्रे दुसऱ्या एकाकी माणसापेक्षाही निराळीच होती. याचा अर्थ प्रत्येक एकाकी माणूस दुसऱ्या एकाकी माणसापेक्षा निराळा असतो आणि एकलेपणाने ग्रस्त अशा प्रत्येक माणसाचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन निराळा असतो. एकलेपणात गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर उपचार करताना हे लक्षात घेतले पाहिजे असे संशोधकांचे मत आहे.
उत्क्रांतीमधील योजना
माणसाच्या वर्तनाकडे उत्क्रांतीच्या नजरेने बघावे लागते. कोणतेही मानवी वर्तन ही जीवनसंघर्षात तगून राहण्याची योजना असते. त्याच वाटेने आणि दिशेने मेंदूविज्ञानाचे संशोधन चालू असते. एकमेकांना धरून रहाणे हे मानवी प्रजातीचे ‘जिवटपणा’करता उत्क्रांत झालेले मानवी वर्तन आहे. (जिवटपणा हा शब्द मला भावला,‘चिवटपणाने’ जगण्याकरता धडपड करणे, असा त्याचा अर्थ.) ‘मग एकलेपणा हा काय प्रकार आहे,’ असा प्रश्न पडणे साहजिक.
आदिमकाळी माणूस टोळ्या करून राहत होता. वाट चुकलेला एखादा जंगलात एकटा पडायचा, घाबरून जायचा. तो एकटेपणा त्याला टोळी शोधून काढायला प्रेरित करायचा. टोळीत जाऊन मिसळल्यानंतर त्याला सुरक्षित वाटायचे; म्हणजे तात्पुरते एकाकीपण तगून राहण्यासाठी तो प्रेरक घटक होता; जशा भूक आणि तहान या दोन गोष्टी माणसाने अन्न आणि पाणी शोधण्यासाठी उत्क्रांत झाल्या आहेत. जिवटपणासाठी अन्न आणि पाणी शोधणे किती महत्त्वाचे आहे हे काही सांगायला नको. भूक आणि एकलेपणा यांत काही साम्यस्थळे आहेत. ती शोधण्याकरता काही हुशार प्रयोग मेंदू-संशोधकांनी केले आहेत.
भूक आणि एकलेपणा
या प्रयोगात काही जणांना दहा तास उपाशी ठेवले आणि काहींना दहा तास एकटेच ठेवले, त्यांचा कोणाशी कुठल्याच प्रकारचा संपर्क येऊ दिला नाही. त्यानंतर ज्यांना उपाशी ठेवले होते त्यांना अन्नपदार्थांची चित्रे दाखवली आणि त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले तेव्हा मेंदूतील अत्यंत महत्त्वाचा जुना भाग ‘मिड-ब्रेन’ यातील एक केंद्र उजळून निघाले आहे असे दिसले. आता ज्यांना एकटे ठेवले होते त्यांना मित्र एकमेकांना भेटत आहेत; हसतखेळत आहेत अशी चित्रे दाखवली. त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले आणि काय आश्चर्य त्यांच्या ‘मिड-ब्रेन’मधील तेच केंद्र उजळून निघाले आहे असे दिसले; म्हणजे भुकेचे केंद्र आणि ‘पीपल सोशलायझिंगचे’ केंद्र हे एकच आहे असे दिसून आले. समाजातील इतरांशी संबंध ठेवणे हे अन्नाइतकेच महत्त्वाचे असते. हे केंद्र मानवी मेंदूच्या उत्क्रांतीतील अगदी जुन्या भागात आहे; याचा अर्थ भूक आणि इतर माणसांबरोबर राहणे या गोष्टी आदिमकाळापासून उत्क्रांत झाल्या आहेत. भूक, तहान यांप्रमाणे एकमेकांना धरून राहणे ही माणसाची आदिम ऊर्मी आणि गरज आहे. मिड-ब्रेनमधील हे केंद्र या ऊर्मींसाठी प्रेरक केंद्र आहे. एकलेपणाने ग्रस्त असलेल्या माणसाच्या शरीरावर, मनावर, विपरीत परिणाम होतात. उपाशी माणूस अन्नाचा भुकेला, एकाकी माणूस इतर माणसांचा भुकेला असतो.
स्ट्रेस हॉर्मोन्स आणि एकलेपणा
गरिबीत उपासमारीने स्ट्रेस हॉर्मोन ‘कोर्टीझॉल’चे माणसाच्या शरीरातील प्रमाण वाढते. त्याच प्रमाणे एकलेपणात कॉर्टीझॉलचे प्रमाण वाढते. एकलेपणा हीसुद्धा तणावपूर्ण – स्ट्रेसफुल विकृती आहे.
Hans Selye (१९०७-१९८२) या हंगेरीयन-कॅनॅडियन एन्डोक्रायनॉलॉजिस्टने स्ट्रेस = ताण, तणाव या संकल्पनेवर मूलभूत काम करून ‘स्ट्रेस-सिन्ड्रोम’ ‘ताणामुळे निर्माण होणारा लक्षणसमूह’ म्हणजे काय हे सप्रयोग जगापुढे मांडले. स्ट्रेस ही संकल्पना त्याने उलगडून सांगितली. स्ट्रेसमध्ये निर्माण होणारे कॉर्टीझॉल हे हॉर्मोन जगण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. त्याच प्रमाणे ताण हासुद्धा जगण्यासाठी जरुरीचा असतो. स्ट्रेसमध्ये ‘Eustress’ Eu—ग्रीक गुड – चांगला ताण. आपण नाटक-चित्रपट बघायला गेलो आहोत, उत्कंठा वाढते आहे, मनावर ताण येतो. या ताणातसुद्धा कॉर्टीझॉल वाढते; पण आपण तो ताण एंजॉय करतो, त्याकडे चांगल्या नजरेने बघतो; त्यामुळे वाढलेल्या कॉर्टीझॉलचा फारसा वाईट परिणाम होत नाही. स्ट्रेसचा दुसरा प्रकार ‘Distress.’ लॅटिन Dis म्हणजे bad—वाईट स्ट्रेस. एखादा अपघात आपल्या डोळ्यांदेखत घडतो. आपण त्यात प्रत्यक्ष अडकलेले नसतो; तरीसुद्धा ताण निर्माण होतो, कॉर्टीझॉल वाढते त्या ताणाकडे आपण निराळ्या नजरेने बघतो, मेंदू निराळया प्रकारे ‘रिऍक्ट’ प्रतिक्रिया देतो; त्यामुळे कॉर्टीझॉलचे प्रमाण आणखी वाढते आणि त्या ताणाचा शरीरावर वाईट परिणाम होतो. एकलेपणा हा एक प्रकारचा ‘डिस्ट्रेस’ आहे. सततच्या एकलेपणामुळे त्या माणसाच्या रक्तातील कॉर्टीझॉलचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढलेले असते. कॉर्टीझॉलचे दीर्घकालिक ‘क्रॉनिक’ वाढलेले प्रमाण आणि डिमेंशिया, अल्झायमर अशा मेंदूच्या ऱ्हास-विकृती, यांमध्ये काहीतरी दुवा आहे. या दुव्यांचा शोध मेंदूविज्ञान घेत आहे. अजून ठोस निष्कर्ष काढण्याइतकी माहिती विज्ञानाच्या हाती आलेली नाही.
अंतराभिमुख होणे
एकलेपणाच्या ताणाने माणूस अबोल, कुढा होतो याचे कारण तो अंतराभिमुख होतो. याबाबत विज्ञानाने थिअरी मांडली आहे : सिग्नलजवळ मोटार थांबली की इंजिन आयडल म्हणजे चालू ठेवून ड्रायव्हर सिग्नल ग्रीन होण्याची वाट बघतो. सिग्नल मिळाला की मोटार चालू करण्यात वेळ जाऊ नये हा उद्देश असतो. हीच कल्पना मेंदूला लावली तर… माणूस नुसता स्वस्थ बसला आहे, काही काम न करता बसला आहे, अशा वेळीसुद्धा मेंदूतील एक ‘नेटवर्क’ चालू असते; म्हणजे त्यात विद्युतक्रिया घडत असतात. याला ‘डिफॉल्ट नेटवर्क’ म्हणतात. हे नेटवर्क चालू असल्यामुळे स्वस्थ बसलेला माणूस गरज पडली तर लगेच ‘ॲक्टिव्ह’ – क्रियाशील होऊ शकतो. डिफॉल्ट नेटवर्क हे जणू मेंदूचे ‘आयडलिंग’ असते. हे महत्त्वाचे नेटवर्क म्हणजे मेंदूपेशींचे जाळे इतर केंद्रांतील मेंदूपेशींच्या जाळ्यास जोडलेले असते. डिफॉल्ट नेटवर्क आणि एकलेपणा यांचा संबंध शोधण्याकरता संशोधकांनी प्रयोग केले आहेत.
तरुण आणि ज्येष्ठ
एकलेपणाचा त्रास असलेल्या तरुण-तरुणींच्या मेंदूचे स्कॅनिंग केले तेव्हा डिफॉल्ट नेटवर्क आणि दृष्टिकेंद्रे, अवधान ठेवणारी केंद्रे, कार्यकारी आणि अंमल बजावणारी केंद्रे यांच्यामध्ये सतत ‘क्रॉसटॉक’ चालू आहे असे दिसले. ‘क्रॉस-टॉक’ याचा अर्थ डिफॉल्ट नेटवर्क आणि वर सांगितलेली इतर केंद्रे यांच्यात सतत संदेशवहन चालू असते. समाजात मिसळण्याची काही सूचक चिन्हे आहेत का, हे शोधण्याकरता हा क्रॉसटॉक चालू असावा असा संशोधकांचा कयास आहे. आता ४० ते ६९ या वयोगटात काय घडते ते पाहू. या गटातील एकलेपणाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या मेंदूचे स्कॅनिंग केले तेव्हा यांच्या मेंदूतील डिफॉल्ट नेटवर्कच्या दृष्टिकेंद्राशी असलेल्या जोडण्या दुर्बल झाल्या आहेत आणि गतकालातील स्मृती साठवणाऱ्या केंद्राशी असलेल्या जोडण्या बळकट झाल्या आहेत असे आढळून आले; त्यामुळे म्हातारपणातील एकाकी माणूस जुन्या आठवणी उगाळत बसतो. त्याची दृष्टी बाहेर बघण्याऐवजी आत वळलेली असते. तो गतकालात गुंतून राहतो, अंतराभिमुख होतो. तरुणपणातील एकलेपणा आणि म्हातारपणातील यातील हा फरक आहे. हे प्राथमिक संशोधन आहे; पण यावर आधारित थिअरी मांडून पुढील संशोधनास दिशा मिळण्यास उपयोग होईल असे तज्ज्ञांचे मत आहे.
काय करता येईल
सध्याच्या स्थितील ज्ञान आणि माहिती वापरून एकलेपणावर काय उपाय करता येतील याबाबत संशोधकांनी विचार मांडले आहेत. चांगले जीवन जगण्यासाठी, जीवन सुंदर करण्याकरता सतत ‘सेन्सरी इन्पुट’ ‘संवेदी-भरणाची’ गरज असते. एकाकी माणूस यापासून वंचित असतो. घरातून बाहेर पडणे, निरनिराळ्या लोकांना भेटणे, विविध गोष्टींचा आस्वाद घेणे अशा अनेक गोष्टींपासून तो दूर असतो. घरी आल्यानंतर शरीराच्या हालचालीसुद्धा कमी असतात. त्याचा वेळ कंटाळवाणा जातो. याला ‘डेप्रिव्हेशन स्ट्रेस’ वंचिततेचा ताण म्हणतात. घराबाहेर पडून एक-दोन तास फिरणे असा सोपा उपाय संशोधकांनी सांगितला आहे. या फिरण्यामुळे संवेदनाभरण तर होतेच; पण शारीरिक व्यायामामुळे रक्तात नवीन रसायने तयार होतात. ही रसायने माणसाचा मूड बदलायला मदत करतात. डिफॉल्ट नेटवर्कच्या जुन्या जोडण्या तुटतात आणि नव्या जोडण्या तयार होण्यास मदत होते. निगेटिव विचार कमी होऊन पॉझिटिव विचार येऊ लागतात.
अमेरिकेत काही डॉक्टरांनी ‘वॉक विथ डॉक’ असा प्रयोग केला आहे. एकलेपणाने ग्रस्त व्यक्तींचा ग्रुप डॉक्टरांबरोबर गप्पागोष्टी करत शहरात फिरतो, मॉलमध्ये जातो वगैरे. एकलेपणाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याकरता डॉक्टर त्यांना मदत करतात. प्रत्येक समाजाने आपल्या संस्कृतीनुसार उपाय शोधायचे असतात असे संशोधकांचे मत आहे.
एकलेपणाची आग
विज्ञान हा जसा मेंदूचा महत्त्वाचा आविष्कार तसा कला, कविता हासुद्धा मेंदूचा महत्त्वाचा आविष्कार. मानवी व्यथांचा मेंदूविज्ञान शोध घेत असते. कवीसुद्धा व्यथा कवितेतून मांडत असतो.
‘एकलेपणाची आग’ या कवितेत अनंत काणेकर म्हणतात –
एकलेपणाची आग लागली हृदया;
घनदाट दाटली विषण्णतेची छाया.
तडफडे जिवाचे पांखरु केविलवाणें,
होत ना सहन त्या एकलकोंडें जगणें!
(एकलेपणाची आग, चौकोनी आकाश अनंत काणेकर यांची कविता, सं. प्रा . रमेश तेंडुलकर. सुविचार प्रकाशन मंडळ पुणे, नागपूर पहिली आवृत्ती ऑगस्ट १९७४)
