मोठी माणसे : १० 

कुसुमाग्रज : वि.वा. शिरवाडकर

मागचा लेखांक मी शंकर वैद्यांवर लिहिला होता. शंकर वैद्य स्वतःच्या कविता ग्रंथरूपाने संपादित करण्याबाबत उदासीन होते; पण इतर मोठ्या कवींच्या कवितांच्या संपादनाचे काम त्यांनी साकल्याने केले. त्यांतले मुख्य होते कुसुमाग्रज. आजचा लेखांक आहे त्या कुसुमाग्रजांवर. कुसुमाग्रज हे नाव शालेय वयातच पाठ्यपुस्तकांतील कवितांमुळे ओळखीचे झाले होते. नंतर त्यांच्या कविता नियतकालिकांतून आणि संग्रहांतून भेटीस येत राहिल्या. वि. वा. शिरवाडकर या नावाने त्यांनी लिहिलेली नाटके येत राहिली. एक मोठा साहित्यिक म्हणून त्यांचे नाव मनात ठसलेले होते. १९८२ या वर्षी माझा ‘होड्या’ संग्रह प्रकाशित झाला. त्याची प्रत मी कुसुमाग्रजांना पाठवली होती. त्यांच्यासारखा मोठा साहित्यिक तो संग्रह वाचून पत्र लिहील असे मला वाटले नव्हते; पण तो संग्रह मिळाल्याचे, वाचल्याचे आणि आवडल्याचे कळवणारे त्यांचे पत्र आले. पुढे दोन वर्षांनी,१९८४ मध्ये माझा विडंबन कवितांचा संग्रह ‘माझा (पण) बेहद्द नाममात्र घोडा’ प्रकाशित झाला. तोही मी कुसुमाग्रजांना पाठवला. अभिजात साहित्य लिहिणाऱ्यांना सहसा विडंबने आवडत नाहीत. पु.शि.रेगे यांना त्यांच्या कवितेचे  विडंबन केलेले आवडत नसे; पण कुसुमाग्रजांसारख्या  अभिजात कवीने माझ्या विडंबन कविता वाचून मला पत्र पाठवले; त्यात त्यांनी म्हटले होते : ‘आपली विडंबने फार मार्मिक आणि विनोदपूर्ण आहेत. त्यावरील भाष्येही तितकीच रोचक. बऱ्याच वर्षांनी इतकी चांगली विडंबने प्रकाशित होत आहेत. श्री.सरवटे यांची चित्रे तर बहारीची आहेत. मनःपूर्वक अभिनंदन.’ 

वि.वा. शिरवाडकर या स्वाक्षरीसह आलेले ते पत्र मिळाल्याने आणि त्यांच्या अभिप्रायाने मला खूप आनंद झाला होता; पण त्यांची प्रत्यक्ष भेट होण्याचा योग त्यानंतर ‘बऱ्याच वर्षांनी’ आला.दरम्यान कुसुमाग्रजांच्या कविता आणि शिरवाडकर नावाने त्यांची नाटके प्रसिद्ध होत राहिली. त्यांना सर्व तऱ्हेचे पुरस्कार मिळत राहिले. कविता आणि नाटकांना राज्य पुरस्कार, नटसम्राट नाटकाला साहित्य अकादमी पुरस्कार आणि भारतातील लेखनासाठीचा सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ सन्मान मिळाला. १९९२ मध्ये त्यांना पद्मभूषण मिळाले. त्या घडीच्या लिहित्या मराठी साहित्यिकांमध्ये कुसुमाग्रज सर्वोच्च स्थानी पोहोचले होते.

माझे काव्यलेखन माझ्या गतीने चालले होते. कुसुमाग्रजांनीच नाशिक येथे लोकहितवादी साहित्य मंडळ १९५० मध्ये स्थापन केले होते. त्या मंडळाच्या वसंतोत्सवी कविसंमेलनात १९९४ मध्ये मला निमंत्रित केले गेले होते. या कविसंमेलनाच्या निमित्ताने नाशिकबाहेरचे निमंत्रित आणि नाशिकमधील कवी मंडळी भेटली. त्यांत नाशिकचे किशोर पाठक, आनंद जोर्वेकर हे मुख्य होते. कविसंमेलन कमालीचे रंगले आणि त्या रात्री मी नाशिकमध्येच मुक्काम केला. माझ्याबरोबर कवी सतीश पिंपळगावकर होते. मी कुणा थोरामोठ्यांना भेटायला जायला संकोचत असे; पण सतीश पिंपळगावकर म्हणाले, “नाशकात येऊन कुसुमाग्रजांना न भेटणे म्हणजे पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन न घेण्यासारखेच आहे.” दुसऱ्या दिवशी मला ते कुसुमाग्रजांच्या घरी येऊन गेले.

कुसुमाग्रज आपल्या आसनावर विराजमान होते. तेज:पुंज म्हणावे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कर्तृत्वाचे अदृश्य वलय त्यांच्या चेहऱ्याभोवती होते. सतीशजींनी त्यांना पायाला हात लावून  वंदन केले, त्यांच्या पाठोपाठ मीही केले. त्यांनी आम्हांला थांबवले नाही. अभ्यागतांनी पाया पडण्याची कुसुमाग्रजांना आता सवयच झाली असावी. जाहीर कार्यक्रमात पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांनीही त्यांना वाकून नमस्कार केला होता. आम्ही बसल्यावर मला उद्देशून ते म्हणाले, “तुम्ही हेमंत जोगळेकर ना?” मला आश्चर्य वाटले; कारण मी पहिल्यांदाच त्यांना प्रत्यक्ष भेटत होतो. ते पुढे म्हणाले, “तुम्ही आल्याचे मला कळले होते. मला तुमच्या कविता आवडतात.” त्यांच्यासारख्या मोठ्या कवीने माझ्यासारख्या छोट्या कवीची अशी दखल घ्यावी हे विशेष होते. मला सुखावणारे होते.

आज विचार करताना असे वाटते की, मोठ्या कवींनी नव्या दखलपात्र कवींच्या पाठीवर हात ठेवणे ही त्या काळातील साहित्यिक संस्कृतीच होती; म्हणूनच इतक्या वेगवेगळ्या मोठ्या माणसांचे प्रेम मला मिळाले. खुद्द कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ कवितासंग्रह वि. स.खांडेकरांनी स्वतःच्या खर्चाने प्रकाशित केला होता. त्या संग्रहाने कुसुमाग्रज एकदम प्रकाशात आले होते. १९४२  या वर्षी प्रसिद्ध झालेल्या ‘विशाखा’तील कविता त्या काळातील वाचकांच्या मनातील स्वातंत्र्योर्मींना आवाहन करणारी होती. देशभक्तांच्या मनातील  त्वेष आणि निर्धार, त्यांच्याबदल लोकांना वाटणारे प्रेम आणि आदर कुसुमाग्रजांची कविता अत्यंत सुसंवादी रितीने व्यक्त करीत होती; म्हणूनच ती सामान्य वाचक आणि समीक्षक दोघांनीही सदैव गौरविली. कुसुमाग्रजांची नंतरची कविताही तशीच आवाहक राहिली. 

वि.स. खांडेकरांना मराठीतला पहिला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार ययाती कादंबरीसाठी मिळाला आणि त्यांनी ज्यांची कविता प्रकाशात आणली त्या कुसुमाग्रजांनाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला; पण हा पुरस्कार त्यांच्या कवितासंग्रहासाठी नव्हता. नाटकासाठी होता. तसे पाहिले तर, कुसुमाग्रजांच्या कवितेचेही बलस्थान त्यातील नाट्यमयताच आहे. आरती प्रभु, पु.शि. रेगे यांचे गद्यलेखनदेखील काव्यात्म आहे. आरती प्रभुच चिं.त्र्यं. खानोलकर नावाने नाटके, कादंबऱ्या लिहितात असे म्हणावेसे वाटते; पण कुसुमाग्रजांच्या बाबतीत मात्र वि.वा. शिरवाडकरच कधी कधी कुसुमाग्रज म्हणून कविता लिहितात असे म्हणावेसे वाटते !

आपल्या ८७ वर्षांच्या आयुष्यात  कुसुमाग्रजांचे जवळजवळ २२ कवितासंग्रह आणि तेवढीच नाटके प्रसिद्ध झाली. त्याखेरीज  त्यांनी एकांकिका, कथा, कादंबऱ्या, लघुनिबंध देखील लिहिले. शंकर वैद्य यांनी  बोरकरांबरोबर संपादित केलेला कुसुमाग्रजांचा ‘रसयात्रा’ हा ग्रंथ १९६९ मध्ये प्रकाशित झाला. त्या वेळीही कुसुमाग्रज मोठे कवी म्हणून प्रसिद्ध होते; पण शंकर वैद्यांनी आपल्या प्रस्तावनेत (ही प्रस्तावना बहुधा त्यांनीच लिहिली असावी) त्यांच्या कवितांच्या मर्यादा आणि बलस्थाने नेमकी सांगितलेली आहेत. त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणतात, ‘ही कविता विरोधातून नाट्य परिणामकारकपणे उभे करते. कुसुमाग्रजांच्या कवितेत अशा नाट्याचे आणि आवेशपूर्ण क्रियांचे दर्शन घडवले जाते ते भौगोलिक विश्वाच्या व मानवी जीवनाच्या भव्य संबंधांत; कधी कधी त्याच्या भव्य रंगमंचावर व तेही अगदी नाट्यपूर्ण आविर्भावातून. ही कविता मूलतः बहिर्मुख आहे. अंतर्मुखतेकडे ती सहसा वळत नाही.’ ‘कविता विसाव्या शतकाची’ या ग्रंथात कुसुमाग्रजांच्या कवितेसंबंधी संपादक म्हणतात, ‘ही थरारक नाट्य निर्माण करण्याची क्षमता असलेली कविता आहे.’

कुसुमाग्रजांनी कुणा एका कवीच्या कवितांचे संपादन केलेले नाही; पण त्यांनी शालेय पुस्तकांचे, पाठ्यपुस्तकांचे सहसंपादन केले.  ‘१०० कविता’ नावाने त्यांना आवडलेल्या शंभर कविता संपादित केल्या. अनेक कवींच्या कवितासंग्रहांसाठी प्रस्तावना, ब्लर्ब्ज लिहिले. नाशिकातल्या कवींसाठी तर ते एक हक्काचे, केव्हाही भेटावे असे आश्रयस्थान होते.

आजच्या स्पर्धेच्या जगात नव्या कवींना प्रोत्साहन देण्याची ही संस्कृती लोपत चालली आहे की काय असे कधी कधी वाटते. असे अनेक चांगले कवी आहेत ज्यांच्याकडे लक्ष द्यायला समीक्षकांना वेळ होत नाही. मी माझ्या परीने अशा १५ समकालीन कवींवर लेख लिहिले. ते अंतर्नाद मध्येच लेखमालेच्या रूपात प्रसिद्धही झाले होते. त्याचे ‘संस्कृती प्रकाशना’ने ‘अगा कवींनो’ नावाचे पुस्तकही प्रकाशित केले आहे. एका तऱ्हेने मला माझ्या पूर्वसुरींकडून जे मिळाले ते पुढच्या कवींकडे, माझ्या अल्प क्षमतेनुसार, मी देण्याचा प्रयत्न केला आहे. असेच आणखीही काही लेखन पुढच्या पिढीच्या कवींसाठीही  मी यापुढे करण्याचा प्रयत्न करीन. 

ही लेखमाला देखील पूर्वसुरींचे कृतज्ञ स्मरण करणारीच आहे. साहजिकच हे  स्मरण करताना या मोठ्या माणसांचे मला आलेले व्यक्तिगत अनुभव मी लिहिले. हे अनुभव  म्हणजे माझे मोठेपण नाही, त्यांचे  मोठेपण आहे ! 

कुसुमाग्रजांवर हा लेख लिहिताना हे सर्व आठवले म्हणूनच या मोठ्या माणसांबद्दलची माझी भावना व्यक्त करण्यासाठी कुसुमाग्रजांच्याच ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या सुप्रसिद्ध कवितेच्या ओळीत माझी भर टाकून म्हणतो :

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्  

मला ज्ञात मी एक धुलि:कण

तू जे दिले ते इथे पाहतो मी 

माझ्यामधे मीच डोकावून

                                 आणि ‘मोठी माणसे’ या लेखमालेचा या लेखांकानेच समारोप करतो. या लेखमालेच्या निमित्ताने मलाही या सर्व मोठ्या माणसांच्या आठवणी जागवता आल्या. मी कृतज्ञ आहे!

Author

Leave a Reply