कोट्यधीश भारतीय संगीत 

(हा लेख कणकवलीत वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान  आयोजित एका संगीत रसग्रहण कार्यशाळेच्या दरम्यान झालेल्या चर्चेच्या आधाराने  लिहिला आहे.)

भाग पहिला 

संगीताचा अभ्यास करायचा म्हटलं की लोक पळ काढतात. कुठल्याही गोष्टीचा मुळात  अभ्यास करावा लागतो हीच संकल्पना मागे पडत चालली आहे. नीट अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून कलेचा आस्वाद घेतला पाहिजे या विषयी आग्रही भूमिका असणं ही आजची गरज आहे.  पद्धतशीर अभ्यास करून  जेवढे लोक सुजाण रसिक बनतील तेवढं आम्हां कलाकारांचं भाग्य;  कारण चांगलं गाणं-बजावणं लोकांपर्यंत पोचण्यासाठी समोर सुज्ञ रसिक असण्याची कलाव्यवहाराचीही गरज आहे.  पॉपकॉर्न लोकप्रिय होण्याचा सध्या जमाना आहे; त्यामुळे पंचपक्वान्नांच्या रसपूर्ण जेवणाची आपल्याला सवय राहावी याकरिता, कलाअनुभव सशक्तपणाने घेण्यासाठी अभ्यास करणे  अतिशय महत्त्वाचे आहे.

संगीताचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? याची काही रचनाकृती तुम्हांला सांगण्याचा प्रयत्न हा लेख  करणार आहे. आपल्याकडे संगीत क्षेत्रात प्रश्न विचारणे   फारसं चालत नाही असा एक गैरसमज आहे.  माझ्या  सुदैवाने माझे सर्व गुरू हे मी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं देत असत, भले एकच प्रश्न दोन-तीन वेळा विचारायला लागे; परंतु प्रश्नाला उत्तर मिळालंच  नाही अशी घटना  आणि ‘ते आमचं सगळं दैवी आहे’ वगैरे असा दावा कधीही कुठल्याही गुरूने केला  नाही. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायला हवं की प्रस्तुत लेखक  काही सर्वज्ञ  नव्हे आणि लेखकाचं म्हणणं हे संगीताच्या बाबतीतलं अंतिम सत्य वगैरे तर अजिबातच नव्हे; मात्र संगीताचा नीट आणि मनापासून अभ्यास केलेला आहे; त्यामुळे काही चार गोष्टी जास्त माहीत आहेत. त्या तुम्हां सर्वांमध्ये वाटणे आणि  तुमच्या हाती जर काही दिशा लागल्या तर त्यातून तुम्ही पुढे अधिक सुज्ञ रसिक बनावे, त्या दिशेने आपला प्रवास चालू  व्हावा यासाठी  हा लेखनप्रपंच आहे;  मात्र त्यासाठी आपल्या मनात संगीत परंपरेबद्दल काही प्रश्न असावेत अशी अपेक्षा आहे. प्रश्न विचारणे आणि त्याच्या उत्तरातून अधिक प्रगल्भ होत जाणे असं सर्व वाचकांच्या बाबतीत घडावं अशीच सदिच्छा मनात आहे. 

प्रश्न विचारण्याची परंपरा किती जुनी आहे? 

 आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा उगम हा एका प्रश्नामध्ये आहे. नचिकेताचा आणि यमराजाचा प्रसंग तुम्हां सर्वांना माहीत आहे. नचिकेताला घेऊन जायला यमराज आले. त्यांनी शेवटची इच्छा विचारल्यावर नचिकेताने प्रश्न विचारला की ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा|’ 

मला ब्रह्म म्हणजे काय ते जाणून घ्यायचं आहे. यमराजाची  इतकी गोची दुसऱ्या कोणी केली नसावी! त्यामुळे त्याला ते समजावून सांगणं भाग होतं आणि त्यातून संपूर्ण भारतीय दर्शन, विचारपरंपरा  यमराजांनी नचिकेताला समजावून सांगितली असं म्हटलं जातं. भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये  जेव्हा नाट्यकर्मी रंगमंचावर येतो, तेव्हा तो यम आणि नियती यांना ओलांडून येतो असं म्हटलंय. रंगमंचाची जी रचना भरताने सांगितली त्याच्यामध्ये प्रत्येक कोपऱ्यात एक देवता कल्पिलेली आहे.  अभिनेता जेव्हा रंगमंचावर येतो तेव्हा तो यम आणि नियतीला ओलांडून येतो अशी कल्पना आहे. या दोन्ही गोष्टींचा संबंध तुम्ही जोडू शकलात तर मी काय म्हणतोय ते – म्हणजे प्रश्न विचारणं किती महत्त्वाचं आहे ते आपल्या ध्यानात येईल; त्यामुळे  विषय समजून घेण्याची  सुरुवात एका प्रश्नानं होणं हे साहजिक आहे; तर पहिला प्रश्न असा की तुम्हां सर्वांच्या मनामध्ये संगीत म्हणजे काय याची काही एक कल्पना असेल, तर ती काय आहे? नेमकं कशाला संगीत म्हणायचं? कुठल्या उपक्रमाला आपण संगीत म्हणतो? 

   या प्रश्नाची  अनेक उत्तरे मनात येऊ शकतात. काहींना वाटेल की  ज्याच्यात सूर आहे, ताल आहे ते संगीत. काही म्हणतील की  कानाला मधुर वाटणारा नाद म्हणजे संगीत. काही संगीताची सहज उपलब्ध व्याख्या सांगतील की  गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही कलांचा संगम म्हणजे संगीत. काही अधिक गुंतागुंतीच्या वाटेने जाऊन असं म्हणू शकतात की जे ध्वनी ऐकल्यामुळे आपल्या चित्तामध्ये काही भाव जागृत होतात – सुखाचे असतील किंवा दुःखाचे असतील – अशा प्रकारच्या ध्वनिलहरींचं जे चित्र असेल त्याला संगीत म्हणू शकतो. काही वेळेस अशीही भूमिका घेता येईल की नादामधून आनंद होतो ते म्हणजे संगीत. अगदी सहजपणाने ‘आपल्या आसपास सगळ्याच गोष्टींत संगीत आहे,’ असंही काही लोक म्हणू शकतात. 

पुढचा प्रश्न असा की आपण सर्वांनी श्री.अमिताभ बच्चन यांना कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना ऐकलेलं असेल, पाहिलेलं असेल. त्यांचं बोलणं ऐकताना आपल्या मनात काही भाव उत्पन्न होतात का? ते मधुर वाटतं का कानाला? त्या ध्वनिलहरी ऐकून मनात काही भाव उत्पन्न होतात का? आणि तसं होत असेल तर मग त्याला आपण संगीत म्हणतो का? 

सांगीतिक  परिभाषेची निव्वळ जंत्री माहिती असली की शब्द आपण सोळ-ढोळ पद्धतीने वापरतो.  आपण  एक पथ्य पाळू या, ते म्हणजे ज्या शब्दाचा अथवा संकल्पनेचा अर्थ आपल्याला एकत्रितपणे, सामूहिकरीत्या समजलेला नाही, तो शब्द शक्यतो वापरायचा नाही; नाहीतर काय होतं की केवळ जंत्री आपल्याला माहीत होते; परंतु त्यामागची संकल्पना कळलेली नसते; त्यामुळे मग तो शब्द आपण कुठेही वापरतो; तर अमिताभ बच्चन बोलतात त्याला संगीत म्हणायचं की नाही यावर एखादा असं म्हणेल  की एका अर्थाने ते संगीत आहे. हा जो ‘एका अर्थाने संगीत’ प्रकार आहे तो उपमेच्या पातळीवर आहे. कशातही संगीत आहे असं आपण म्हणू शकतो आणि लोकशाही असल्याने कोणाला काय संगीत वाटू शकेल यावर काहीच बंधन असू शकत नाही; परंतु एक अभ्यासविषय म्हणून आपल्याला जर संगीत समजून घ्यायचं असेल; तर अमिताभ बच्चन बोलतात ते  आणि संगीतात काय फरक आहे; तो नेमका आपल्याला समजून  घ्यायला हवा. 

दुसऱ्या दिशेने या प्रश्नाकडे बघू या. तुम्हांला माहिती असलेलं जगातील कुठलंही संगीत घ्या, त्यात एक मूलभूत क्रिया घडते; ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन जे बोलतात ते संगीत नाही असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. अगदी साधी मूलभूत प्रक्रिया आहे ती.  तुम्हांला सांगितल्यावर तुम्ही म्हणाल – 

‘अरे हो खरंच की!’

काही वेळेस असं म्हणण्याचा प्रघात आहे आणि विशेषतः संगीतप्रेमी असं म्हणतात की आम्हांला निसर्गात सगळीकडे संगीत दिसतं; पण यात  तथ्य फारसं नाही; पण आपण एका प्रक्रियेबद्दल बोलत आहोत – नेमकं काय घडतं? कुठल्याही प्रकारचं संगीत असेल तरी त्यात ती क्रिया घडतेच घडते; मात्र  त्याचा आविष्कार बदलत जातो. प्रत्येक माणसागणिक, संस्कृतीगणिक,  प्रांतागणिक, प्रत्येक भाषेगणिक त्याचा आविष्कार बदलेल; पण मूळ क्रिया तीच आहे. 

भाषेच्या संदर्भाने आपण दोन पारिभाषिक शब्द वापरतो : गद्य आणि पद्य. जगातला कुठलाही संगीताचा प्रकार असो त्यात घडते ती मूलभूत प्रक्रिया अशी की आपण त्यात  फक्त गद्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. गद्यापासून दूर जाण्याचा निर्णय मानवी मन घेतं;  त्यामुळे  कविता तयार होतात. ज्या क्षणी गद्याच्या जागी पद्याचा आविष्कार होतो त्या क्षणी तिथे संगीताची सुरुवात झालेली असते; त्यामुळे पद्य आणि पद्यसंबंधित सर्व घटना या संगीत   व्यवहाराच्या अभ्यासाचा भाग आहेत. हा आपला आरंभबिंदू असणार  आहे. 

त्यामुळे संगीत म्हणजे काय तर – ‘गद्यापासून दूर जाणे.’  आपल्यापैकी  प्रत्येक जण जेव्हा केव्हा गातो किंवा गाणे या सदराखाली जे काही करतो ते सर्व अत्यंत योग्य आणि न्याय्य पद्धतीचं संगीत आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. 

आता एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो की गद्यापासून दूर जाणे म्हणजे पद्य हे एकच उत्तर आहे का? तर त्याचं उत्तर आहे   ‘नाही.’  अनेक उत्तरं असू शकतात; पण संगीताचा विचार करताना आणि भाषेच्या संदर्भाने विचार केला असता गद्यापासून दूर गेल्यानंतर पहिलं काय घडतं तर भाषेचं  पद्यीकरण. (व्हर्सिफिकेशन ऑफ लँग्वेज). भाषा हे मानवी अभिव्यक्तीचं मूलभूत वाहन आहे; तर गद्यापासून दूर जाताना भाषा कुठली दिशा घेते… तर आत्तातरी ती प्राधान्याने पद्याचीच दिशा दिसते आहे. त्याहून वेगळी दिशा भाषेने घेतलेली सध्यातरी  आपल्याला माहिती नाही. पद्याच्या निर्मितीमुळे काय होतं तर पुनरुक्ती(रिपीटिशन) होते.  त्यातून एक आकृतिबंध (पॅटर्न) निर्माण होतो व तो आपल्या लक्षात येतो. मानवी मन अशा प्रकारचं आहे की संरचनेचा अनुभव त्याला लगेच येतो. इथे काहीतरी विशिष्ट प्रकारची रचना आहे हे आपल्याला लगेच कळतं आणि ते कळण्याची प्रक्रिया गद्यापासून दूर जाण्याचा निर्णय झाला की लगेच सुरू होते आणि भारतीय परंपरा जर आपण नीट पाहिली तर तिथे ही प्रक्रिया भाषण – पठण- गायन- अशा तीन टप्प्यांमध्ये होते हे नीट नोंदलेलं आहे. भाषण – बोलायच्या अनेक पद्धती, अनेक बोली भारतात तयार झाल्या. पठणाच्या अनेक पद्धती मात्र भारतातच नव्हे तर जगभरात तयार झाल्या आणि गायनाच्याही  असंख्य पद्धती तयार झालेल्या आपल्याला दिसतात. 

त्यामुळे भारतीय परंपरेच्या अभ्यासकांनी दोन अतिशय महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत : एक आहे डायव्हर्सिटी किंवा विविधता आणि दुसरा आहे प्लुरॅलिझम किंवा अनेकवाद. 

एकच गोष्ट अनेक पद्धतींनी असणं आणि ते आम्हांला मान्य असणं  हे भारतीय संगीत परंपरेचं सांस्कृतिक संचित आहे;  त्यामुळे एकाच एक पद्धतीने आम्ही एखादी गोष्ट करू इच्छितो हा विचार भारतात रुजू शकत नाही.   आपला मूळ स्वभाव हा एकच गोष्ट अनेक पद्धतीने बघण्याचाच आहे. मूळ तत्त्व एक आहे असं सांगणारी जी भारतीय परंपरा आहे तीसुद्धा सांगताना असंच सांगते, की मी एक आहे आणि मला अनेक व्हायचंय. त्या तत्त्वाची इच्छाही एकोऽहं बहुस्याम् अशीच आहे; त्यामुळे संगीत परंपरेचा अभ्यास करताना तर हे दोन मुद्दे अगदी घट्टपणे लक्षात ठेवावे लागतात. या भूमिकेमुळे होतं काय की माझ्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं संगीत जर मी ऐकलं तर मला असं वाटत नाही किंवा वाटायला नको, की माझं संगीत – ते फार भारी आहे आणि यांचं संगीत फालतू आहे. हा पहिला मुद्दा. स्वीकारवृत्ती आणि सहअस्तित्व मान्य असण्याची वृत्ती वाढीस लागणे अशी अत्यंत महत्त्वाची घटना या दोन मूल्यांचं नित्य स्मरण ठेवल्याने होते. आपण गोष्टी स्वीकारायला शिकतो आणि दुसरा मुद्दा असा की तेही जर योग्य अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून आपण मान्य केलं तर त्या विषयी आदर ठेवला पाहिजे ही भावनादेखील मनात येण्याची शक्यता आहे!  त्यामुळे संगीत परंपरेचा अभ्यास करताना या मूलभूत मूल्यव्यवस्थेचं भान अधिक सजगपणे मनात तयार होतं; हे आपण कृपया लक्षात घ्यावे आणि संगीत परंपरेचा अभ्यास करून अंतिमतः साधायचं काय? तर ‘ग्यान का आलोक!’ अज्ञान तिमिरान्धस्य हे तर खरंच; पण ज्ञानांजन शलाकया – त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशाचा आमच्यात प्रादुर्भाव व्हावा अशी अपेक्षा आहे. आजच्या काळात हे सांगण्याची अत्यंत गरज आहे, की वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी करत राहणे यात आपलं सत्त्व आणि स्वत्व दडलेलं आहे आणि मी तर हे नेहमी सांगतो की ज्याला कुणाला भारतीय परंपरेविषयी चिंता वाटते, परकीय आक्रमणामुळे किंवा पाश्चात्त्य आक्रमणामुळे कसं होणार आता माझ्या  भारत देशाचं? असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी संगीत परंपरेचा जवळून अभ्यास करण्याची गरज आहे. त्यातून हा विश्वास नक्की मिळतो, की आपण कुठेही जात नाही आणि आपली परंपरा पुरेशी भक्कम आहे. भारतीय परंपरा आणि भारतीय मूल्यविचार हा इथून पुढच्या काळामध्ये जगाला मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने पुढे येईल, याच्या खुणा आपल्याला या अभ्यासातून मिळतात. 

आता दुसरा प्रश्न. संगीत म्हणजे काय तर गद्यापासून दूर जाणे; मग आता भारतीय म्हणजे काय? आणखी एक अडचणीचा मुद्दा आहे! आणि सध्याच्या काळामध्ये त्या विषयी काही विधान ठामपणे करणं म्हणजे बऱ्यापैकी आव्हानात्मक परिस्थिती आहे; तर ‘भारतीय’ म्हणजे काय? ‘भारतीय’ याची  नीट सांगता येईल अशी व्याख्या उपलब्ध नाही. भारतीय म्हणजे काय हे समजून घेण्याची एक दिशा भौगोलिक मांडणीत आहे. आजच्या संदर्भात ‘ आसिंधु सिंधु पर्यंता’ अशी व्याख्या भारतीयत्वाची भौगोलिक व्याख्या आहे; पण संगीत परंपरेचा विचार करताना ती अपुरी आहे हे लक्षात येतं. 

‘भारतीय’ म्हणजे आपली विचारांची पद्धती असाही विचार करता येतो;   फक्त आपलाच विचार नाही करायचा तर सगळ्यांचा विचार करायचा हा मूल्य-व्यवस्थेचा भाग असणं;  किंवा मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे विविधता आणि अनेकवाद  स्वीकारण्याची वृत्ती – यांनी संगीतात  विविधता निर्माण झाली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संगीताला निश्चित असं रूप नाही. ज्याला जसं वाटलं तसं संगीत तो निर्माण करू शकतो. या सर्व विचारमंथनातून महत्त्वाचा मुद्दा हाती लागतो की ‘भारतीय’ रूप नाही – म्हणजे निश्चित रूप देणं शक्य नाहीये खरंतर; कारण भारतीय म्हटल्यास निदान १०० किंवा २०० व्याख्या तुमच्यासमोर येतील. म्हणजे हे थोडंसं ईश्वर संकल्पनेच्या चर्चेसारखं होऊ लागतं.  ‘नेति नेति’ या पद्धतीनेच त्याची व्याख्या करावी लागते. हे म्हणजे भारतीय  नाही; तर याहून जास्त काहीतरी आहे; त्यामुळे दशांगुळे उरणारी अशी ती काहीतरी संकल्पना आहे; ज्याला नेमका रंग, रूप, आकार प्रत्येक वेळी देता येईलच असं नाही आणि असं देता न येणं हे भारताच्या गोंधळलेल्या मनःस्थितीचं दर्शक नसून ती त्याची ताकद आहे.  आम्ही इतके बहुरंगी, बहुमुखी असे असू शकतो; तरीही आमच्यात सूत्रबद्ध पद्धतीने काहीतरी समान  सापडत राहतं आणि ते संगीत परंपरेच्या अभ्यासाअंती तर नक्कीच सापडतं. भारताच्या कुठल्याही प्रांतात गेलात तर तुम्हांला अमुक एका प्रकारची सुरावट आढळते की नाही? तर आढळते. भारताच्या कुठल्याही प्रांतात लोकसंगीताच्या परंपरा आहेत की नाही? तर आहेत. त्यांतले गाण्यांचे प्रकार त्याच पद्धतीचे आहेत का नाहीत?  तर आहेत; त्यामुळे संगीत तुम्हांला सूत्राने बांधते असं दिसतं.  भारतीयता या संकल्पनेला एका सूत्रात बांधण्याची क्षमता जर कुठल्या सूत्रात असेल; तर ती फ्लाय ओव्हर्स आणि चकाचक आठ पदरी रस्ते यांच्यात नसून संगीताच्या उपलब्ध सामग्रीमध्ये आहे. तर अशा या भारतीय संगीत परंपरेचा धांडोळा आपण घेणार आहोत. 

संगीत-परंपरेने आपली एक सुनियोजित रचना व व्यवस्था केली पाहिजे असं वाटणाऱ्या चिंतकांची – म्हणजे भरतापासून भातखंड्यांपर्यंत एक मोठी परंपरा आपल्याकडे आहे. विचार करणारे अनेक लोक, त्यांनी केलेली रचना, त्यांची मांडणी  आपल्याला उपलब्ध आहे. त्याच परंपरेतले आमचे गुरु संगीताचार्य डॉ. अशोक दा. रानडे. त्यांनी संगीत परंपरेचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं याची काही सूत्रं  सांगून ठेवली आहेत. त्यातलं महत्त्वाचं सूत्र म्हणजे भारतीय संगीत परंपरा ही सहा कोटींमध्ये विभागता येते, आपल्याला समजून घेता येते.  या सहा कोटी : आदिम, लोक, धर्म, जन , कला आणि संगम या आहेत.  ‘इलेक्ट्रॉनिक म्युझिक ही  आणखी एक कोटी करावी काय?’  हा  प्रश्न उपस्थित करून  रानडे गुरुजी थांबले होते. त्यांनी केलेल्या रचनेमध्ये काही फार मजेशीर भूमिका आपल्याला पाहायला मिळतात. 

त्यांतली पहिली भूमिका म्हणजे संगीत परंपरेत दोन प्रवाह आपल्याला दिसतात : एक आहे प्रयोग परंपरा आणि दुसरी आहे विद्वत् परंपरा. सोप्या मराठीत, परफॉर्मिंग ट्रॅडीशन आणि दुसरी स्कोलॅस्टिक ट्रॅडीशन!!  स्कोलॅस्टिक ट्रॅडीशन ही परफॉर्मिंग ट्रॅडीशनच्या दोन पावलं मागे असते. संगीत परंपरेच्या बाबतीत असं असण्याचं कारण असं, की स्कोलॅस्टिक ट्रॅडीशनचं काम, विद्वत् परंपरेचं काम हे जो प्रयोग चालू आहे त्याचा संकल्पना व्यूह निर्माण करणे, त्याचं कॉन्सेप्ट्युअल फ्रेमवर्क तयार करणे, त्याचं शास्त्र गठीत करणे, असं असतं; त्यामुळे ती परंपरा दोन पावलं मागे राहून जो प्रयोग चालला आहे तो पाहते, अनुभवते आणि त्या प्रयोगाचं स्थिरीकरण झाल्यानंतर त्या विषयी काही विधान करते. भारतामध्ये असं कधीच  होत नाही की आधी एखाद्या प्रयोगाच्या शास्त्राचीच मांडणी झाली; मग त्याचा प्रयोग झाला. संगीत परंपरेत तरी असं झालेलं दिसत नाही. खरंतर हे जगभरातल्या संगीत परंपरांमध्ये दिसतं; मात्र पाश्चात्त्य संगीताच्या बाबतीत असं म्हणता येईल की ते आधी लिहिलं जातं आणि मग त्याचा प्रयोग होतो; मात्र याचा प्रतिवाद करणारा मुद्दा असा की जेव्हा संगीत रचनाकार एखादी रचना लिहितो तेव्हा ती त्याच्या मनात आधी वाजते आणि मग तो लिहितो. एका अर्थी  तिथेही सादरीकरण आधी आणि शास्त्र नंतर हेच सूत्र दिसतं. आता तर रचना करू शकणारी संगणकप्रणाली किंवा सॉफ्टवेअर्स आलेली आहेत. यात रचनाकाराने एखादी संगीत  कल्पना दिली की संगणक विविध पर्याय निर्माण करून देतो; त्यामुळे आता खरोखरीच थिअरीचा भाग आधी आणि मग परफॉर्मन्स अशी स्थिती आलेली आहे; परंतु भारतीय परंपरेत तरी निदान अजून आधी आपण परफॉर्म करतो आणि मागून त्याची थिअरी बनते.  आपल्यापैकी   अनेक जण अनेक वर्षांपासून, अनेक पातळ्यांवर, अनेक पद्धतीने गात – वाजवत आहेत, संगीताची आवडही आहे; मग आता त्याचा थोडा शास्त्रपक्षही समजून घेऊ या; कारण रसास्वाद करता येणं हा आस्वादोत्तर ज्ञानव्यवहार असतो.  त्यात  प्रश्न विचारले पाहिजेत, विश्लेषण केलं पाहिजे, त्यासाठी काही साधनं हाती असली पाहिजेत.  आता आपण  एकेक संगीत कोटी समजून घेऊ या. आधी कोटी या शब्दाबद्दल – आपल्याकडे एक बोललं जातं की आपले ३३ कोटी देव आहेत – देवतांचे ३३  प्रकार आहेत. दैवतशास्त्र हा एक अभ्यासविषय आहे आणि त्यानुसार या ३३ प्रकारच्या देवता आहेत. आपल्याला ‘कोटी’ या आकड्याविषयी अधिक ममत्व असल्यानं अनेकदा गोंधळ होतो आणि आता राजकारण्यांनी ‘कोटी’ ला काही किंमतच ठेवलेली नाही; त्यामुळे इथून पुढे जिथे जिथे ‘कोटी’ असं म्हटलं जाईल त्याचा अर्थ कॅटेगरी असा आहे हे आपण लक्षात ठेवू या. 

आपण सुरुवात करणार आहोत ते प्रीमिटीव पासून – ज्याला मराठी प्रतिशब्द ‘आदिम’ असा आहे. ‘गद्यापासून दूर जाणे म्हणजे संगीत’ अशी भूमिका आपण पाहिली आहे. त्याच्या भारतीय आविष्कारची पहिली पायरी ही ‘पठण’ परंपरेत सापडते. 

वैदिक साम गायन

ही वेद गायन पद्धती आहे. ह्याला सामगायन असं म्हणतात. सामगायन ही भारतातील पहिली ‘शास्त्रोक्त’ संगीत पद्धती आहे; कदाचित जगातली पहिली पद्धती असू शकेल. या पद्धतीमध्ये नियम निश्चित झालेले होते. सहसा सहा लोकांच्या गटाद्वारे ह्याचं सादरीकरण केलं जात असे. हा गट यज्ञकर्माच्या ठिकाणी ह्या पद्धतीने वैदिक ऋचांचे  पठण करी.  याला सामगायनच म्हटलं जायचं. नेहमीच्या व्यक्तिगत वेद पठणापेक्षा येथे काहीतरी वेगळं केलं जात असे. आपण जर नीट ऐकलं तर लक्षात येईल की या पठणात ऋचांच्या शब्दांमध्ये आकार, इकार, उकार यांचा वापर झालेला दिसेल. म्हणजेच शब्द थोडासा ताणून, जागा तयार करायची आणि त्यामध्ये आकार, उकार अथवा इकार घालून संगीत निर्माण प्रक्रियेचं सूचन करायचं असा हा पठण परंपरेचा आविष्कार दिसतो. यातून दोन गोष्टी समोर येतात : एक म्हणजे ध्वनित अवकाश ( tonal Space ) तयार करता येतो, ध्वनिनिर्मितीसाठी आवश्यक जागा शब्दांच्या मध्येही निर्माण करता येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या निर्माण झालेल्या जागेत कोणते ध्वनी घालावे यासाठी आवश्यक सौंदर्यनिर्णय करता येणं. कुठल्या शब्दांत कुठला अतिरिक्त ध्वनि वापरता येईल या विषयी नीट विचार झालेला दिसतो. शब्द ताणून जागा तयार करणे आणि त्यात विविध ध्वनींचा वापर करून संगीत संकल्पनेचं सूचन करणे हे सूत्र आजही वापरात आहे. हिंदी सिनेसंगीतात  ‘अनजाना अनजानी’ या चित्रपटात त्याच शब्दांचा वापर केलेलं गाणं या वैदिक सामगायन परंपरेचा वापर करून तयार झालेलं आहे!

आदिम संगीत या नावात कुठलाही मूल्य-निर्णयवाचक भाव नाही. त्यात संगीत रचनाबंधाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. सामगायन ऐकताना संपूर्ण गीत ऐकल्याचा समज होत नाही; तरीही त्यात संगीतसूचन सतत होत राहते. आमचे रानडे गुरुजी सांगायचे की आदिम संगीत ऐकायचं असेल तर शहरामध्ये डिस्को पबमध्ये जावे. तिथल्या संगीताचा एक विशेष असा की खूप ठळकपणाने एक ठोका वाजत असतो. तो ठोका इतका जोरात वाजतो की गाणं कोणतं चालू आहे याकडे लक्ष जाऊच  शकत नाही; तसं अपेक्षितही नसतं. त्या जागेत गेल्यावर तुम्ही नाचणंच अपेक्षित असतं.

आदिम संगीताचा महत्त्वाचा गुणधर्म असा की त्यात लय अथवा सूर यांतलं एक तत्त्व प्रधानरूपात वापरलेलं असतं; म्हणजे काहीसं एकारलेलं असं त्याचं स्वरूप असू शकतं. काही आदिम संगीत आविष्कारांत लयीचा पगडा दिसतो; तर काही ठिकाणी सूर अथवा स्वरसदृश आवाज यांचा पगडा दिसतो. आता आपण दुसरा तुकडा ऐकू या म्हणजे या संगीत  कोटीविषयी आणखी स्पष्टता येईल. 

बौद्ध ध्यान संगीत

हा नमुना ऐकल्यावर काही लोकांना हे धार्मिक संगीत आहे असं वाटेल; तर काहींना त्याची भौगोलिक जागा उत्तर पूर्व भारतात आहे असं वाटेल; तर काही त्याच्या रचनेतील सैल ध्वनि-मालिकेबद्दल विचार करतील.  हे खरंतर ‘बौद्ध ध्यानसंगीत’ आहे. लोकांनी ध्यानासाठी बसावे यासाठी हे संगीत तयार केलेलं आहे. बौद्ध ध्यानप्रक्रिया जर तुम्हाला माहीत असेल – ज्याला ‘विपश्यना’ म्हणतात – त्यात मुळात तुम्हांला डोळे मिटून एका जागी बसायचे असते आणि आपल्या मनात येणारे विचार पाहायचे असतात. डोळे मिटल्याबरोबर काय होतं याचा आपल्या सर्वांना अनुभव आहे. प्रचंड वेगाने आणखी जास्त विचार डोक्यात गर्दी करतात. ती गर्दी कमी व्हावी यासाठी आपण श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. ते कसं करायचं? कारण श्वास आपला सतत चालू असतो. आपला श्वास बंद पडलाय हे आपल्याला कळतच नाही. ते इतरांना कळतं! मग श्वासावर लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं? तर या संगीतात रचना अशी आहे की प्रत्येक स्वरवाक्य हे वरच्या सुरावर सुरू होऊन खालच्या स्वरावर संपतंय आणि आपण थोडं जरी गाणं शिकलो असू तर आपला हा अनुभव असतो की खर्जातले किंवा खालच्या सप्तकातले स्वर लावताना खूप लक्ष ठेवून स्वर लावावे लागतात.  जेव्हा तुम्ही खालचा स्वर असा नीट लावता तेव्हा तुमची एकाग्रता वाढलेली असते. एकाग्रता ही ध्यानासाठी अत्यावश्यक स्थिती! त्यामुळे एकाग्रता साधली की या संगीताची भूमिका संपते. संगीताचा हात धरून आपण हळूहळू ध्यानासाठी आवश्यक शारीर आणि मानसिक स्थितीत पोहोचू शकतो हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.  अशा प्रकारे आदिम संगीत आपल्या आसपास अनेक प्रकारे वावरत असतं. आदिम संगीताची प्रमुख लक्षणे किंवा वैशिष्ट्ये खालील प्रमाणे नोंदवून ठेवता येतील :-

१ आदिम संगीत त्या त्या समूहाच्या जीवनाशी आणि ऋतूंशी संबंधित संगीत आहे. रोजच्या जगण्यातील अनेक प्रसंग या संगीतात अभिव्यक्त होतात. संपूर्ण समूहाचं एक भारलेपण या आविष्कारात दिसतं. गणेशोत्सवात ढोलताशांच्या गजरात (अथवा डीजेच्या भिंतीसमोर) भान विसरून, तन्मयतेने नाचणारे समूह याचंच एक उदाहरण म्हणायला हवं. 

२ स्वर अथवा लय या दोन मूळतत्त्वांपैकी एकाचं प्राबल्य हा याचा आणखी एक विशेष; त्यामुळे अनेकदा वाद्यांचा – त्यातही तालवाद्यांचा जास्त वापर आदिम संगीत करतं. आपण एक पूर्ण ‘गीत’ ऐकतो आहोत असा अनुभव आदिम संगीतात येईलच असं नाही. 

३ कलाकार आणि श्रोता हा भेद आदिम संगीतात धूसर असतो. समूहातील प्रत्येक व्यक्ती कमी अधिक प्रमाणात या संगीत घटनेत सहभागी असते आणि त्यामुळे संगीतासाठी संगीत अशी भूमिका उरत नाही. 

४ स्वरधुनींच्या संदर्भाने विचार केल्यास आदिम संगीतात मर्यादित स्वरवाक्ये किंवा स्वरतुकडे वापरलेले दिसतात. भाषिक अथवा सांगीतिक अर्थ फारसा नसलेल्या रचना/ ध्वनिसमुच्चय  आदिम संगीतात सहजपणे वापरलेले दिसतात.

५ आदिम संगीतात संगीतरचनाकार हा सहसा अनामिक असतो.  मौखिक परंपरेत प्रचलित असलेल्या अनेक चाली समाजमनात रुंजी घालत असतात. त्यांच्या एकत्रित आणि सामूहिक कौशल्यातून जे रसायन तयार होतं त्यातून नवीन स्वर-ताल बंध तयार होतात. 

विविध आदिवासी समूह आपल्या जीवनचक्राच्या दरम्यान तयार करीत असलेले संगीत ते शहरी भागातील पबमधले डिस्को संगीत, ते गणेशोत्सवातले आणि अन्य उत्सवांतले ऐकू येणारे संगीत असा मोठा पट आदिम संगीतात पाहता येतो. रानडे सर म्हणत त्याप्रमाणे, ‘आदिम संगीत ही मानवी मनाची एक पातळी आहे;’ त्यामुळे आदिम संगीतांचं आदिमत्व हे त्याच्या रचनासूत्रामुळे निश्चित होतं हे आपण समजून घ्यायला हवं.

क्रमशः …

Author

Leave a Reply