राम दिखाया पत्थरोंने : १

रामकथा ही भारतीय संस्कृती आणि धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. रामायण महाकाव्यातील कथानकावर आधारित अनेक कलाकृती निर्माण केल्या गेल्या आहेत.त्यामध्ये  शिल्पकला हा  ही  एक महत्त्वाचा प्रकार आहे.रामकथेचे शिल्पांकन हे अनेक रूपात आढळते. मंदिरे, स्तूप, गुंफा, आणि इतर   अनेक  वास्तूंवर रामायणा मधील विविध प्रसंगांचे शिल्पांकन पहायला मिळते .  या शिल्पांमध्ये रामायणातील प्रमुख प्रसंग आणि पात्रे यांचे  चित्रण आहे . या आगळ्या रामकथेचे निरूपण करताहेत नीलिमा थत्ते . 

सगळं काही राममय झालंय् सध्या. असं वाटलं की यानिमित्ताने शिल्पांतून दिसणारी रामकथा पहावी. कांचनमृग, सीताहरण, वालीवध, सेतुबंधन वगैरे प्रसंग खूपदा कोरलेले दिसतात. पण नेहमी न दिसणारी काही शिल्पं होयसळ मंदिरांच्या दौऱ्यात दिसली. मग आजपर्यंत विविध मंदिरांतून पाहिलेली शिल्पं एकत्र केली आणि तयार झाली ही पाषाणांतली रामकथा. यासाठी जवागल, होसहोललु, बसरलु, बेलूर, हळेबीडु, सोमनाथपूर, हंपी, पट्टडकल, पळसदेव आणि मार्कंडा येथील मंदिरांतील शिल्पांचा विचार केला आहे.

अगदी सुरुवात म्हणजे रामजन्माआधीची श्रावणबाळाची गोष्ट. ती बसरलुला मल्लिकार्जुन मंदिरावर बघायला मिळाली. खांद्यावर कावड घेतलेला श्रावण, त्याचे मातापिता, बाणाने घायाळ झालेला श्रावण नि त्यामुळे त्याच्याऐवजी पाणी पाजणारा राजा. अतिशय छोट्या आकारात हे कोरले आहे.

No photo description available.

पुत्रशोकाने मृत्यू येणार असा शाप मिळाला म्हणून दुःखी होण्याऐवजी निदान पुत्रप्राप्ती होणार म्हणून सुखावून अपत्यहीन दशरथ राजा अयोध्येला परततो.

“शल्य एक ते कौसल्येसी, दिसे सुमित्रा सदा उदासी..कैक कैकयी करी नवसासी..

दशरथासही व्यथा एक ती छळिते अभ्यंतरी…” 

सर्व काही छान असलं तरी अयोध्या राजपुत्रासाठी आसुललेली होती. यावर उपाय म्हणून केलेला पुत्रकामेष्टी यज्ञ आणि मिळालेले पायसदान याचे शिल्पांकन पट्टडकलच्या पापनाथ मंदिरावर आणि हंपीला हजारराम मंदिरात आहे. पायसदानाच्या कृपेने अयोध्येला एक नव्हे चार राजपुत्र मिळाले.

कौसल्येचा राम, कैकयीचा भरत आणि सुमित्रेचे लक्ष्मण-शत्रुघ्न…महाराज दशरथ, तिन्ही राण्या आणि चारही बाळं अशी सोमनाथपूरच्या मंदिरावर दिसली. बाळं अगदी आपापल्या आईच्या मांडीवर… शेजारीच पाळण्यांचं शिल्पांकनही बघायला मिळालं.

दिसामासांनी चौघे वाढू लागले, त्यांचं रांगणारं रूप शिल्पबद्ध केलंय सोमनाथपूरच्या चेन्नकेशव मंदिरावर.
मग यथावकाश त्यांचं राजपुत्र म्हणून गदा, तलवार यांचं प्रशिक्षणही सुरू झालं.

क्रमश: 

Author

One thought on “राम दिखाया पत्थरोंने : १

  1. खूप सुंदर वर्णन आहे . पाषाणातील मूर्तींचे फोटो सुरेख आहेत. अजून वाचायला आवडेल.अगदी पहिली राम सीतेची शिल्प अप्रतिम!

Leave a Reply