अकिंचनवरेण्योऽपि समर्थपदवीं गतः
दासोऽपि यः किलो स्वामी साधुः कोऽपि राजते||
समर्थशिष्य विठोबाअण्णांनी सुश्लोक राघवामध्ये समर्थांचं असं मजेदार वर्णन केलं आहे.
हा पुरुष भिक्षेकऱ्यांमधला श्रेष्ठ तरीही समर्थ पदवीला पोचला. हा दास… पण स्वामीपदालाही पोचला!
प्रतिभेचं वरदान लाभलेला हा साधू कवीही! कवित्व कसं असावं? रसाळ, निर्मळ, प्रांजळ, त्यात असावे भक्तिबळ, असावे छंदोबद्ध एवढंच सांगून हा कवी थांबला नाही – स्वतः सालंकृत काव्याची उदंड रचना केली. शहाणे करून सोडावे सकलजन ही आस्था मनीं होती. शहाणपण रुजवण्यासाठी
दासबोध, , आत्माराम, भूपाळ्या, आरत्या, अभंग, ओव्या स्तोत्रे अशा नाना रचनांमधून समाजाला शिकवण दिली. छंदवैभवाची चुणूक आपण पहिल्या भागात बघितलीच. या भागात आपण त्यांच्या विषयांचं, अलंकारांचं वैविध्य पाहणार आहोत.
१)मनुष्यस्वभावाचे बारकावे टिपत एखाद्या कुशल चित्रकाराप्रमाणे शब्दचित्र रेखाटणे हा कवी रामदासांचा मोठा विशेष.
मारुतीचा जन्म झाला आणि… ‘क्षुधाक्रान्त मी जाण अत्यंत माये,’ असं म्हणत त्यानं आईकडे खाऊची मागणी केली. आईनं सांगितलं, ‘ फळे भक्षि जे पक्व आरक्त कांते’ –पिकून लालचुटुक झालेलं फळ शोधायला हे नवजात बाळ निघालं.
‘तो देखे अरुणोदयी तरणी तो आरक्त तेहि दिशा|
लालचुटुक उगवता सूर्य त्यानं बघितला आणि
पावे वेगे धरिलें कपिवरे घालि मुखाभीतरी|
सूर्याच्या दाहामुळे तोंड पोळल्यामुळे… थुंकी क्षणाभितरी| हा मजेशीर प्रसंग समर्थ साकारतात.
लंकानाशाच्या वेळी राक्षसांच्या पायांभोवती हनुमान शेपूट गुंडाळून मागे ओढतो ‘पडों लागले दैत्य नेटें बदादा, कितीयेक ते दीर्घदेही भदादा (जाडेजुडे) पडताना अगदी डोळ्यांसमोर येतात, सभामंडपी शेपटीने ‘गुद्गुल्या तो करितो’ वाचताच खदखदून हसू येतं.
सिरे फोडिली मेंदू नीघे बरारां|
बहु घाय ते रक्त वाहे चरारां|
असं रौद्ररूप उभं राहतं आणि कितीयेक भूमीवर ओकायला लागले या वर्णनातून बीभत्स रसही निर्माण होतो. सीताशोधार्थ लंकेत गेलेला हनुमंत कसा?
बात फडफड फडित |
द्रुम कड कड कडित|
भडभड बिडारे|
कंठ गुरू गुरू गुरीत|
नेत्र गरगर गरित
बन मो दर दर दौरत|
सीताशोक हरत!
असा वीर!
माधुर्य गुणाचा परिपोष करत मुरलीधराचं रूपडं रेखाटताना समर्थ म्हणतात;
तनु सुनील निलालक नील|
नील मुकुट मोर छाला|
नवरस नागर शाम मनोहर |
सुंदर मुरत गुपाला|
भक्तांसाठी धावून येणाऱ्या जगदंबेचं दर्शन घडवताना म्हणतात;
अरिचमुमंडळ भडभड तव क्रोधें जळले|
चरणातळे महिषासुर घुंगुरडें मारले|
महिषासुर एखाद्या चिलटासारखा चिरडला!
उंदरावरी बैसोनि दुडदुडा येसी|
हाती मोदक लाडू घेउनिया खासी|
असं गोंडस गणपतीबाप्पाचं सुखावणारं बालरूप; तर
तटतटिला स्तंभ कडाडिल्या ज्वाळा| तडतडिल्या पडिल्या नक्षत्रमाळा
नृसिंहाचं हे रौद्ररूप आनंद देणारं!
ईशस्वरूपाबरोबरच मानवी स्वभावाचंही यथार्थ रेखाटन समर्थ करतात.
तमोगुणानं बरबटलेला माणूस कसा असतो?
बहु तामसी वृत्ती अत्यंत कर्डी
बळे झोंबती एकमेकांसी नर्डी
गचांड्या बुक्या ( मारिती) आणि लाथा…
फुगत गेलेला अहंकार साक्षात उभा करताना म्हणतात;
मी मी मी जीवभाव मी सकळ मी, मी दक्ष, मी धूर्त मी|
मी मी मी रुपवंत मी चतुर मी, मी बोलका धीर मी|
अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतातच नाही का; पण हे वर्णन आपलंच नाही ना? असंही वाटून जातं… वाचता वाचता अंतर्मुख करणं हा समर्थांच्या काव्याचा विशेष!
वृधापी विटंबे काया म्हणत वृद्धावस्था उभी करतात…
नासिकीं गळतें पाणी|
जिव्हेची बोबडी वळे|
दात ते सर्वहि गेले|
मान हाले निरंतरी|
जनस्वभाव रेखाटन ही या कुशल शब्दचित्रकाराची आवडी.
‘संसार करीतां म्हणती हा दोषी
न करीतां आळसी पोटपोसा|
बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ
नाही बोललं तर गर्विष्ठ|
भेटीस न जाता म्हणती हा निष्ठुर
गेला तर म्हणतात; ‘घर बुडवील’
खा खा खाणाऱ्यांचं वर्णन करताना अख्खी पंगतच दाखवतात…
शिखरिणी वरपती सरारा|
कढई वरपती फरारां|
ढेकर देती डरारां| सावकास||
एखादा इतका हिमटा असतो – ‘मुंगीमुखींचें सीतही वेचून’ खातो!
परदेशात पैसे कमावण्यासाठी गेलेला बाप परत येतो तेव्हा मुलांची आसन्नमरण अवस्था असते… बापाला बघताच,
‘अन्नालागीं मिडकलीं| झडा घालती|’
अशी भुकेली मुलं गाठोड्यातलं बकाबका खाऊ लागली, काही जेवितां जेवितां मेलीं असं करुण वर्णन करतात.
झोपाळलेल्या माणसाचं हुबेहूब चित्र समर्थ दाखवतात… कडकडां जांभया येती, डकडकां डुलक्या देती, एखादा टेकतो आणि घोरू लागतो, कोणी लोळतो कोणी दात खातो… आपलंच चित्र समोर रेखलेलं बघून अगदी मनापासून हसू येतं.
२)समर्थांच्या उपमाही अगदी चपखल!
उपमा ही नर्तकी असून ती अनेक भूमिका धारण करते आणि काव्यरूपी नाट्यगृहात नर्तन करते आणि आनंद देते असं म्हणतात.
सूक्ष्म निरीक्षणशक्तीमुळे समर्थांची उपमा नर्तकी अतिशय प्रभावी ठरते.
मराठी भाषेला ते नाना रत्ने ठेवलेली लोखंडी मांदूस ( पेटी) संबोधतात. तिच्या लोखंडी अंगामुळे आतल्या शब्दरत्नांची किंमत लोकांना कळत नाही असं समर्थ म्हणतात. हे आजही दुर्दैवाने तितकेच सत्य नाही का?
वरती करून दंताळी
स्वानपुत्र हाडे चघळी
तसा विषयी माणूस विषयसुखासाठी तळमळत असतो अशी पूर्णोपमा ते देतात.
ज्याचा क्रोध अति लाडका|
त्या सभेत विवेकाला स्थान नसतं असं सांगत ‘ जैसे बक, वायस (कावळा), उलूक ( घुबड) यांच्या सभेत राजबिंडा हंस एकटाच बापुडवाणा ठरतो — असं कटुसत्यदर्शी वर्णन करतात.
जसा चातक चोच वासून वरच्या वर पाण्याचा थेंब मुखात घेतो; तसा सघन शब्दवरुषाव होत असताना, श्रवणपुटांत तो सामावून मनन करावा असा उपदेश ते श्रवणभक्तांना करतात.
उपमेइतकीच समर्थांची रचना ३)रूपकश्रीमंत आहे.
गुणांचं एकरूपत्व दाखवणं म्हणजे रूपक!
संसार म्हणजे महापूर|
माजी जळचरें अपार|
डंखूं धावती विखार|काळसर्प|
अहंकाराची मगर, आशेची बेडी, काममगराची मिठी, वासनाधामीण या रूपकांमुळे दुःखमूळ संसाराची भयावहता स्पष्ट होते. अशा संसार-सासरात का पाठवणी केलीस असा रामाचा धावा, माहेरचा आठव व्याकूळ करतो.
विवेकाचे पाय गेल्यामुळे ‘वैभवहिण’ झालेला पांगुळ व्यथित करतो; पण मीपणाचे पाय गेलेला पांगुळ प्रेमफडके पसरून कृपादान मागतो, नवविधा दुभत्याची आस धरतो.
सुखें वाढिती ते मुखें संतसाधु
असे तोंडाने ज्ञानबोधपक्वान्न भरवणारे संत आणि
महायोग्य ते जेविती श्रोत्रद्वारे
कानांनी जेवणारी सभा!
जेवायला वाढलंय काय…
सूक्ष्माचा भात, रायत्यांच्या तीर्थावळी, कथेचा दहीभात असा फक्कड बेत!
‘द्वा सुपर्णा सयुजा’ चं सुंदर रूपांतर करत आत्मा आणि परमात्म्याचं झालेलं अनोळखीपण सांगताना
समर्थ म्हणतात,
सेजारि बैसले दोनि पक्षी|
गाये कि येक वृक्षी|’
अज्ञाननिशा सरल्यावर अनुभवकमळ उमलतानाचाही आनंद निजसारिका कुंजती म्हणून व्यक्त करतात.
रूपकातून अतिशय गोड नातंही समर्थ फुलवतात.
श्रीकृष्णाचे वदनी कन्या जन्मली, भगवद्गीता म्हणोनि नाम पावली|
श्रीकृष्णाच्या मुखातून जन्मलेली म्हणून ती त्याची कन्या ही कल्पना वाचताना आठवतं समर्थांनी केलेलं ४)अष्टाविध सृष्टीचं वर्णन! कल्पनासृष्टी, शब्दसृष्टी, प्रत्यक्ष सृष्टी, चित्रसृष्टी, स्वप्नसृष्टी, गंधर्वसृष्टी, ज्वरसृष्टी आणि दृष्टिबंध!
कल्पना आणि शब्दसृष्टीच्या साह्याने त्यांनी कृष्ण आणि भगवद्गीता यांना पितापुत्रीच्या नात्यात ओवलं.
५)वरवर पाहता स्तुती पण आतून निंदा हा व्याजस्तुती अलंकारही समर्थ रोकडेपणे वापरतात.
रानडुकराचे केश|त्यांचा महिमा विशेष|
उद्वर्चनें मूर्तीस| पापा न राहे लेश|
सोमयागाने गती मिळते हाही विश्वास दर्शवून, शेवटी परखडपणे सांगतात;
ज्ञानेंविण तो पशू|
जेथें तेथें विश्वासु|
केला वयाचा नाशु|
ठायी न पडे जगदीशु||
हा विश्वास बुद्धिभ्रमातून आलेल्या ज्वरसृष्टीचा परिणाम असावा का?
६)एखादी न्यूनगुण असलेली वस्तू शेजारच्याच वस्तूच्या उत्तम गुणाचा स्वीकार करत नाही अशा वर्णनाला अतद्गुण अलंकार म्हणतात. समर्थ किती बहारदार उदाहरणे देतात…
देखता निशापती चकोर तृप्त होती
वायेसांची पंगती न घडे तेथे|
रत्नांचे परिक्षण डोळसासीच लाहाणे
जाती अंधार पाहाणे न घडे तेथें||
७)समर्थांची दृष्टान्तांची लड म्हणजे बिंबप्रतिबिंब! एका छोट्याशा दृष्टान्तातून दुनियेच्या आचारांचं दर्शन घडतं.
दुदगा चालला इंद्रवना भेटी|
काळकुट पोटी भरूनियां|
सेबी सागरगोटी निवडंग वाघांटी
कांटी आली भेटी दास ह्मणे
या कडू, विषारी वनस्पती एकमेकींना भेटणं ‘ दुर्जना दुर्जना’ परस्परभेटीच्या समाधानासारखंच आहे.
ब्रह्मज्ञान काय होय बावळ्याला|
पिकले अंबे काय होये कावळ्याला|
बावळ्याला ब्रह्मज्ञान तसेच कावळ्याला आंबे… गाढवाला गुळाची चव काय!
स्वानाचिये पुत्रे कोल्हाळ मांडीला…
वरती थोबाडें करूनीया…
दास म्हणे (तशीच) गती निंदकाची||
८)काव्यातील न्यायांची पेरणी हाही समर्थांच्या ‘शिक्षकवी’चा आयाम आहे.
दोरीकरितां भुजंग|जळाकरिता तरंग| मार्तंडाकरिता चांग |मृगजळ वाहे|
परब्रह्मच खरं बाकी मिथ्याभास! हे सांगताना समर्थ असा रज्जूसर्प न्याय मांडतात.
ज्ञात्याचं विषयबीज जळून जातं हे सांगताना दग्धबीज न्यायाचा आधार घेतात.
बीज अग्नीनें भाजलें|
त्याचें वाढणें खुंटलें|
शाखाचंद्र न्यायामधून सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारी वाट स्पष्ट करतात.
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो|
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो|
द्वितीयेची चंद्रकोर दिसत नाही म्हणून सगुण अशा फांदीचा आधार घेऊन तिच्यापर्यंत जावं… आधार प्रत्यक्ष सृष्टीतील उदाहरणाचा, पण नेत आहेत ईश्वराच्या रूपाकडे!
विषकृमी विषातच राहतो या न्यायाप्रमाणे करंटा माणूस चावट सोबती, कुकर्मी मित्र, चोरटे अशाच लोकांच्या संगतीत राहतो हे दासबोधात तपशीलवार वर्णन करून समर्थ सांगतात.
९)पेरिले ते उगवते, ऊस गोड लागला म्हणून काय मुळापासून खावा? शहाणे करून सोडावे सकलजन, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, आधी केले मग सांगितले अशी समर्थांची कितीतरी वाक्ये सुभाषिते, म्हणींसारखी वापरली जातात.
१०)प्रहेलिका किंवा कूट काव्य हा ज्ञानाची परीक्षा बघणारा विलक्षण काव्यप्रकार! बोधप्रद काव्यात तोचतोचपणा येऊ नये म्हणून वेगवेगळ्या बांधणीतून भरलेलं अध्यात्मगुपित! आपल्याला कल्पनासृष्टीतून हळूहळू चिरसत्याकडे वळवणारा व्यायाम! कूटांची उत्तरे आपण स्वतःच शोधून काढायची आहेत.
पीतापासून कृष्ण जालें. महीसुत सरसावला, द्विधा केला, उभयेतां मिळोन चालला कार्यभाग…
पिवळ्या ज्योतीतून निर्माण झालेलं काजळ आणि त्याची शाई, महीसुत म्हणजे बोरू. त्याचं टोक मध्ये चिरलं. काळी शाई आणि पांढरा कागद — स्वेत अस्वेत अशा संगमातून (लेखनामुळे) इहलोकीच्या जीवनाची सार्थकता घडते अशी या कोड्याची उकल.
‘नवरी दिसे जैसी माता’ अशा बाईचे लग्न लागले आणि पाच – तीन वऱ्हाडी जेवायला आले. ही नवरी म्हणजे मूळ माया आणि पंचमहाभूते आणि सत्त्व रज तम हे त्रिगुण तिच्याबरोबर आले… मायेनं हा शरीरांचा कारखाना उघडला; येकली नवरी मिरविते… (मायाच दिसते) नवरा मिरविता दिसेना ( मूळ परब्रह्म गुप्त राहतं) अशी उकल.
पंडित कवींच्या विदग्ध काव्याला आव्हान म्हणून १६ वेळा फक्त कमळा असा शब्द असलेली चमत्कृतीपूर्ण कविता लिहिली. त्याचा अर्थ १४ चक्रपर १४ कमळे आणि जाणीव आणि तुर्यावस्था अशा सोळा देहात्मदशा!
सत्ताविसीं जे तेरावें|त्याचे श्रीमुक बरवें|
पांचां अक्षरी उच्चार | त्यासी माझा नमस्कार |
२७ नक्षत्रांतील तेरावं हस्त, त्याचं मुख — हत्तीचं मुख : पाच अक्षरी नाव म्हणजे गजवदन! त्याला नमस्कार!
जिवाजी पाटलाची साडेतीन हात माडी, त्याला सावध करा… मनाजी कुळकर्णी गांव बुडविल सारा, डोळसवाडीचा पूर निघून जाईल, कानपुर ओस पडेल, नाकपूर थबथबेल… असं रेखाटन,
पत्रातून शिवरायांना दिलेला गुप्त संदेश
विवेके करावे कार्यसाधन
जाणार नरतनु हे जाणोन
पुढील भविष्यार्थी मन
रहाटोचि नये||१||
चालो नये असन्मार्गी|
सत्यता बाणल्या आंगीं|
रघुवीर कृपा ते प्रसंगीं|
दास माहात्म्य वाढवी||२||
रजनीनाथ आणि दिवाकर|
नित्यनेमे करिती संचार|
घालीताती येरझार|
लाविले भ्रमण जगदिशें||३||
आदिमाया मूळ भवानी|
हेचि जगताचि स्वामिनी|
एकांतीं विवेकें धरूनी|
इष्ट योजना करावी||४||
अशा अनेक रचना विचार करायला प्रवृत्त करतात, गुंगवून ठेवतात.
दिवटा,बाळसंतोष,सौरी,वासुदेव, सरवटासारखी लोकगीतं, हिंदुस्थानी रचना, हिंदी रचनांतही
जटामुगुटसे बहती गंगा चंद्रमा जीके अपारे|
गले भुजंग की माल बिराजे रूप बना है अधीक करे|
असा प्रियलोचना छंदाचा सुरेल वापर,
फुल्ल में फुल्ल जो गुल्ल के कुल्ल हेअशी हरावर्तनी मात्रा वृत्त वरमंगलामधली रचना, १०२९गावांची नावं, विटा कशा कराव्यात,कारखाने प्रकरण, बागेविषयी मार्गदर्शन, भाज्या – फळांची नावं, प्राणिपक्ष्यांची नावं, वाद्यांची नावं हे कमीच म्हणून आसावरी, पहाडी,हमीर, देसी, रामकली, अव्हेटा, धनाश्री, गौडी अशा विविध रागांमध्ये बांधलेल्या रचना त्याचबरोबर स्वयंपाक कसा करावा-अगदी मसाल्याचे ताक कसं करावं याचं वर्णन असं हे वैविध्यपूर्ण साहित्य आणि सगळ्याचं सार भगवद्भजनी लागावे!
समर्थांच्या साहित्याचा हा पट आणि त्यातले हे निरनिराळे धागे!
समर्थ म्हणतात,
नका करू वटवट|पाहा माझा ग्रंथपट|
तेणें सायोज्यतेची वाट |ठाईं पडे||
सायुज्यतेचा विचार मांडायची शक्ती नाही; पण ग्रंथपट पाहताना जाणवतं; कवितेची उभारणी ज्ञान, कल्पना आणि भावना या पायांवर होते. ज्ञानाची अभिव्यक्ती उपदेशात होते, कल्पनेतून नवसृष्टी निर्माण होते आणि भावनेतून रसनिर्मिती होते. संतकाव्याचा झरा या त्रिवेणीसंगमातून निघून कधी गंभीरपणे, कधी खळाळत वाहत तीरांवरच्या ज्ञानार्थी, मोक्षार्थी आणि रसिकजनांना आनंद देत असतो.
संत पंत तंत काव्यविषयक लेखमालेतील संतकवींमधला हा शेवटचा भाग. या लेखांतून केवळ काव्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला आहे. संत कवींची रचना आध्यात्मिक आहे; पण त्यांनी उपदेश करताना विविध अलंकार, रसांच्या माध्यमातून उपदेशाची कडू गोळी मधुर,रसाळ करून दिली.
संतसाहित्यात अलंकार, न्याय, म्हणी, शब्दचित्रे आणि रस यांचं अकृत्रिम उपयोजन असलं तरी शृंगाराचा अभाव असतो म्हणून ते संपूर्ण काव्य नाही असा एक सूर दिसतो; पण तो टीकेसाठी टीका या प्रकारचा वाटतो.
हे म्हणजे
घटानां निर्मातुः त्रिभुवनविधातुश्च कलहः —
भांडी घडवणाऱ्या कुंभाराची त्रिभुवन घडवणाऱ्या विधात्याबरोबर तुलना करण्यासारखं!
शृंगाराच्या माथा पाय देणारी रचना संतांची आहे. संत शब्दसृष्टीचे ईश्वर, अध्यात्मग्रंथांची खाण आहेत. त्यांच्या रचना म्हणजे :
नाना कामधेनूंची दुभणीं
वोळली श्रोतयांसी!
परमसमाधान देणारं संतकाव्य वाचकांपुढे ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न.
