वाहतो ही दुर्वांची जुडी

*!! ससून हॉस्पिटल !!*

आपल्याकडे असलेली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बऱ्याच वेळा नको त्या कारणांनी चर्चेत असते.  ही व्यवस्था सदोष आहे, सुधारणांना खूप वाव आहे यात काहीच शंका नाही.  अपुऱ्या निधीमुळे अडखळणारी,धडपडणारी सार्वजनिक आरोग्यव्यवस्था व कसलेही  नियंत्रण नसलेली खासगी व्यवस्था यांच्या कात्रीत  सर्वसामान्य नागरिक सापडले आहेत.  विमा कंपन्या व त्यांचा धुमाकूळ ही  एक नव्याने येऊ घातलेली आपत्ती आहे. असे असतानाही सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार करणाऱ्या  नामवंत सरकारी रुग्णालयांची साखळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे.  पुण्यातील ससून सर्वोपचार  रुग्णालय हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे.  अशा सार्वजनिक इस्पितळांमधून कसे काम चालते ते  वाचू या तेथे काम केलेल्या एका डॉक्टरांकडून…  संपादक. 

ससून हॉस्पिटलची ती भव्य इमारत – अवाढव्य म्हटली तरी चालेल. उभी व आडवी पसरलेली. चौफेर रुग्णांची व सोबत आलेल्या नातेवाइकांच्या ‘चिंताग्रस्त’ चेहऱ्यांची गर्दी. संपूर्ण इमारत, बाहेरील सर्व मोकळा भाग – कोपरा न् कोपरा – या गर्दीने पूर्णपणे व्यापलेला. 

गर्दीतूनही सराईतपणे आपापल्या विचारांत दंग असलेल्या, वाट काढणाऱ्या तरुण होतकरू, डोळ्यांत स्वप्न घेऊन आलेली, भावी डॉक्टर कम विद्यार्थ्यांची लगबग करणारी पिढी. त्यांतील काही पांढरे  एप्रन आणि गळ्यात स्टेथोस्कोप  लटकावून ‘जोडी-जोडीने’ फिरणारे – हाॅस्पिटलच्या रूक्ष वातावरणात हे  ‘काॅलेज’ही असल्याची जाणीव  करून देणारे.

त्यातच पुण्यातील असंख्य नामवंत डॉक्टर्स व त्यांच्या भोवतालच्या शिकाऊ डॉक्टरांच्या घोळक्यासह चालणारा त्यांचा तो राऊंड. सगळेच स्तिमित करणारे, सगळेच भारावून टाकणारे! 

एकीकडे या नामांकित डॉक्टरांच्या स्पर्शाने आपण बरे होऊ हा भाव ‘डोळ्यांत जागवणारे’ आशावादी रुग्ण तर दुसरीकडे कधीतरी  या नामांकित डॉक्टरांइतकेच आपलेही नाव होईल… त्यांच्या इतकीच प्रतिष्ठा आपल्यालाही मिळेल असा ‘आशावाद बाळगणाऱ्या’ तरुण शिकाऊ डॉक्टरांची स्वप्नाळू पिढी.

ससूनच्या संपूर्ण आसमंतात  गरिबी पसरून राहिलेली होती. या संपूर्ण परिसरात गरिबीचा दर्प दरवळत होता; परंतु हीच गरिबी व हेच अज्ञानी, दारिद्र्य रेषेखालील रुग्ण हाच ससूनचा ‘आत्मा’ होता आणि या सर्व रुग्णांना अत्यंत उत्तम उपचार मिळून ते बरे होऊन घरी जातील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी शिकाऊ डॉक्टरांची प्रचंड मेहनत – अर्थात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालीच – जागोजागी ठसठशीत दिसत होती.. अज्ञान-दारिद्रय असले तरी पेशंटची हेळसांड दिसत नव्हती; अगदी एखाद्या भिकाऱ्याच्या  अळ्यांनी भरलेल्या दुर्गंधियुक्त जखमेचेही तन्मयतेने ड्रेसिंग करून देणारे इंटर्न्स जागोजाग दिसायचे.

एका क्षणाचीही फुरसतसुद्धा कोणालाही नसायची. एवढ्या मोठ्या अवाढव्य हॉस्पिटलच्या परिसरात एखादा विभाग कुठे आहे हे समजायला जिथे अनेक तास लागू शकतात तिथे खेडोपाड्यांतून आलेले रुग्ण यांना तर त्यांचे ‘ईप्सित स्थळ/ विभाग’ गाठणे दिव्यच; मग त्यासाठी ‘अमुक नंबरला जा’ असा सुटसुटीत सल्ला दिला जायचा. प्रत्येक मजल्यावरच्या  द्वारपालाचे   हे तर रोजचेच काम.  नातेवाइकांना  अमका तमका नंबर कुठे आहे याचे  दिशादर्शन करण्यातच यांचा सगळा वेळ जायचा.

लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत, कुटुंबाने टाकलेले वृद्ध, ॲक्सिडेंटचे आलेले सर्व रुग्ण,  कुठे कॅंसरचे   पेशंट, कुठे जळीत पेशंट;  तर कुठे मनोरुग्ण! काही वाॅर्डांत तुरुंगातील आरोपी व  गुन्हेगार लोक; तर काही वाॅर्डांत महत्त्वाच्या सरकारी व्यक्ती – अधिकाऱ्यांपासून न्यायाधीशांपर्यंत सर्व एकाच छताखाली. 

पण ससूनचा सर्वांत मोठा आधार होता तो अत्यंत गोरगरीब पेशंट्सनाच. खेडोपाड्यांतून अनेक दुर्धर आजारांनी – व्याधींनी त्रस्त पेशंट्स ससूनमध्येच अत्यंत आशेने येत.

आमचा विभाग हा ‘स्त्री रोग व प्रसूतीचा.’ आमचा हा प्रसूतीचा विभाग बाळंतिणींच्या वेदनांनी पूर्ण आसमंत दणाणून सोडणारा. एकाच वेळेस कमीत कमी ८-१०  जणी ओरडत बाळंतपणाच्या प्रतीक्षेत असत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेले रुग्ण ‘ससून’मध्येच येत. ससूनचे दरवाजेही त्यांच्यासाठी २४ तास सतत सताड उघडे असायचे.  कोणताही रुग्ण असू दे, कितीही गंभीर असू दे, ससूनने त्यांच्यासाठी आपले  दरवाजे कायम उघडेच ठेवले. त्यांना दरवाजातून कधीही परत पाठवले नाही. कोणाचीही चिठ्ठी, कोणाचीही शिफारस  यांची कुठल्याही रुग्णाला गरजही कधीही पडली नाही. एकतर सर्व बिनापैशानेच होत असल्यामुळे  रुग्णांचा प्रचंड राबता असायचा. कोणालाही नाकारण्याचा प्रश्नच नसल्यामुळे बेडच्या संख्येपेक्षाही कधी कधी दुप्पट रुग्ण ॲडमिट असायचे; मग त्यांना ‘फ्लोअर बेड’ करून द्यावे लागायचे; पण त्यामुळे कोणाकडे दुर्लक्ष झाले  असेही झाले नाही. ना त्या पेशंटची कधी तक्रार;  ना  आमच्यासारख्या काम करणाऱ्या रेसिडेंटची, ना  इतर स्टाफ किंवा सिस्टरांची. नियमावरच बोट ठेवून जर बेडसंख्येएवढेच रुग्ण  घ्यायला लागलो; तर मग इतर रुग्णांचा ‘वाली’ कोण राहणार? नुसते नियमांवरच बोट न ठेवता नियम माणसांच्या सोयीसाठी काही ठिकाणी लवचीक कसे करावेत या तारतम्याचे   यासारखे  दुसरे  ढळढळीत उदाहरण नाही.

हालअपेष्टांत जगणारे, आर्थिक- शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत असणारे रुग्ण हा जरी ससूनचा ‘आत्मा’ होता तरीही त्यांच्यावर सतत २४ तासच काय तर अनेकदा सलग ७२-७२  तास एका मिनिटाचीही झोप न घेता जागे राहून उपचार करणारे आमच्यासारखे रेसिडेंट डॉक्टर हाही ससूनचा ‘प्राणच’ होता –  ससूनचा ‘कणाच’ होता.

तारुण्य,कितीही काम करायची तयारी, अवघडातल्या अवघड – गुंतागुंतीच्या  केसेस हाताळण्यासाठीची चढाओढ, सुईणीं कडून, दायांकडूनबाळंतपण  करता करता  मोठी गुंतागुंत होऊन शेवटच्या स्टेजपर्यंत पोहोचलेल्या  बाळंतिणी. या सर्व रुग्णांवर खाण्यापिण्याची – झोपेची पर्वा न करता अहोरात्र काम करणारे आम्ही सर्व रेसिडेंट्स… काय वातावरण असायचे! काय तो भारलेला काळ!! मंतरलेले दिवस.

एकाच दिवशी तीस – तीस बाळंतपणे, कुठे सुइणींकडून  बाळंतपण करून घेता घेता गर्भपिशवी फाटलेली, तर कोणाचा ट्यूबमध्येच गर्भ फुटलेला-ectopic pregnancy-  तर कुठे बाळंतपणामुळे होणारा  आणि न थांबणारा अतिरक्तस्राव  होऊन येणारे पेशंट्स; तर कुठे नको असलेला गर्भ काढून टाकण्यासाठी केलेले अघोरी उपचार व त्यांतून गुंतागुंत होऊन मोठ्या प्रमाणावर जंतुसंसर्ग होऊन शेवटच्या स्टेजला येणारे रुग्ण – किती प्रकारचे पेशंट्स असायचे!! गणतीच नाही.

खेडोपाडी नको असलेला गर्भ (अर्थात  कुमारीमाता अथवा तत्सम) पाडण्यासाठी कुठलीही साधने नसताना गर्भाशयाच्या पिशवीत कुणीतरी झाडांच्या काड्या टाकायच्या – गर्भपात होण्यासाठी. अशा अघोरी उपचारांनी जे जे व्हायला नको तेच होणार!! प्रचंड इन्फेक्शन – जंतुसंसर्ग व त्यामुळे होणारा septicemia!!  हे सर्व रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेतच ससूनमध्ये अर्थात ‘ससूनमध्येच’  यायचे कारण यांचा वाली शेवटी ‘ससूनच.’

आमच्या दर इमर्जन्सीला अशी हमखास एकतरी पेशंट येणारच येणार.

भरीस भर म्हणून पावसाळा सुरू झाला की गर्भवती स्त्रिया हमखास ‘झटके’ घेऊन येणार. गर्भावस्थेत या स्त्रिया त्यांच्या परिस्थितीमुळे म्हणा अथवा प्रचलित सामाजिक जाणिवांमुळे म्हणा कधीही डॉक्टरांकडे गर्भावस्थेत जायच्या नाही. त्यामुळे त्यांचे बीपी वाढलेले आहे का नाही याचा कधीही थांगपत्ता त्यांना लागायचा नाही. ‘झटके’ (fits) सुरू झाल्या की मात्र घाबरून मग आमच्याकडे नातेवाईक घेऊन यायचे. ससूनपर्यंतचा त्यांचा प्रवास हा अशा अनेक ‘फिट्स’मध्ये झालेला असायचा. पेशंटसमोर पाहिल्या पाहिल्या कळायचे की ‘Eclampsia’चा पेशंट आहे.

नातेवाइकांशी  काहीही बोलायच्या आतच – वेळच नसायचा बोलायला – आमची ट्रीटमेंट चालू झालेली असायची – म्हणजे अगदी मॅनेजमेंटच्या प्रचलित शब्दांत सांगायचे झाले; तर  आमचा QRT- Quick Response Time-  ‘अक्षरशः शून्य मिनिट’ असायचा – आम्हांला  कोणतेही मॅनेजमेंटचे प्रशिक्षण नसतानाही –  कारण-  प्रसंगाचे गांभीर्य हे आम्हांला पेशंटला पाहताक्षणीच लक्षात यायचे – काहीही सांगायची गरजच नसायची.

ससूनच्या सर्वच विभागांतील वरिष्ठ आणि तज्ज्ञ डॉक्टर्स  नामवंत व पंचक्रोशीत  प्रसिद्ध होते.  त्यांच्या नावाला एक प्रकारची प्रतिष्ठा व वजन होते . अगदी पॅथॉलॉजीपासून (ससूनमधल्या काही पॅथॉलॉजी तज्ञांचे  निदान हे ‘अंतिम सत्य’ मानले  जायचे – इतकी त्यांची  त्यावर  हुकमत होती)  ईनटीपासून ,पेडियाट्रिक्स पर्यंत.  एवढेच काय ज्या विषयाला आम्ही फारसे गांभीर्याने घेत नव्हतो असा विषय म्हणजे ‘न्यायवैद्यकशास्त्र’ अथवा ‘फॉरेन्सिक मेडिसिन.’या विषयाच्या प्राध्यापक जोडीचाही त्यांच्या क्षेत्रात इतका प्रचंड दबदबा होता की पोलीस अधिकारीदेखील त्यांच्या धारदार नजरेला नजर देऊ शकत नव्हते. त्या  काळी प्रचंड गाजलेल्या एका ‘सायनाईड ( विषबाधा)’ खून खटल्याच्या निकालात फॉरेंसिक मेडिसिनच्या सरांनी शवविच्छेदनातून  काढलेले निष्कर्ष व त्यावर दिलेला त्यांचा अभिप्राय यांचा प्रचंड मोठा प्रभाव व योगदान होते.

नुसते नामवंत डॉक्टर्सच नाहीत;  तर काही विद्यार्थीही इतके प्रखर बुद्धिवान व प्रतिभावान होते की त्यांचे ‘केस विवेचन’ व  सरांचे गुगली प्रश्न ही जुगलबंदी पाहावी, कान देऊन ऐकावी अशी. विशेषकरून मेडिसिन विभागातील!  काही जण तर पैजेवरच पेशंट ‘पाहिल्या पाहिल्या’ त्यांचे निदान करायचे.

माझाच एक अनुभव सांगतो. आम्ही राहतो त्या गावी आईच्या पोटात एका गाठीचे निदान झाल्यानंतर ती कॅंसर असण्याच्या शक्यतेने तपासण्या करून घेतल्या. त्या काळची प्रचलित तपासणी म्हणजे ‘बेरियम मिल.’ तीही केली; मग मी आईला घेऊन पुण्यात ससूनमध्ये आलो. ससूनमधील नामांकित सर्जनला दाखवून ऑपरेशनची तारीख ठरवली. सगळ्यांनाच कॅंसरचीच शक्यता वाटत असल्यामुळे सगळी तशी तयारीसुद्धा करून ठेवली. सरांच्या संमतीने मी ‘बेरियम फिल्म’ घेऊन आमच्या ससूनच्या ‘क्ष-किरण’ विभागात  पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका डॉक्टर विद्यार्थ्याचा ज्याचा प्रचंड बोलबाला होता –  त्याच्याकडे गेलो. त्याने त्या फिल्ममधली एक फिल्म निवडली व ती X – ray viewer वर  हाताने अडकवली. 

मग तो एका खुर्चीवर जरा रेलून बसला. हळूच खिशातील एक सिगरेट काढून शिलगावली. धुराचे एक वलय हवेत सोडले.  फक्त एकच मिनीट – हो –  एकच मिनीट त्याने त्या एक्स-रे कडे निरखून पाहिले. त्या काळी सोनोग्राफी मशीन आलेले नव्हते. अतिशय आत्मविश्वासाने माझ्याकडे वळला व म्हणाला, ‘सुख्या,’  कागद आणि पेन घे आणि लिही –  मी जे सांगतो ते लिही, ‘शंभर टक्के तेच निघणार!’

 It’s  ileocaecal   Koch’s. Take it from me.

ऑपरेशन झाल्यावर मला भेट.

  आणखी दोन-तीन  गोष्टी तुला सांगतो ज्या तुला कोणी अजून सांगितल्या नसतील.  आईची गर्भाशयाची पिशवी खूप मोठी आहे( निव्वळ Ba meal मधील shadow वरून) तिला ब्लीडिंग चा त्रास होत असेल, ( हो होतच होता )ते काढून टाक आणि तिसरी त्या पित्ताशयाच्या पिशवीत खडे आहेत, काढून टाक आणि त्याचे निदान अक्षरशः खरे ठरले.पोट उघडल्यावर  koch’s चे निदान झाले. आणि गाॅल स्टोन व गर्भपिशवीचे ऑपरेशनही करावे लागले. त्याच्यामुळेच आमच्या स्त्रीरोगविभागाच्या सरांना आधीच बोलावून ठेवले होते.

असा हा अवलिया ! 

निव्वळ एका एक्सरेवरून पोटाच्या आत काय दडले असेल ते तंतोतंत निदान करणारा !!! पोट न उघडताच आपल्या चित्तचक्षुंनी पाहणारा !!!

हेच ससूनचे  वैभव.

अशा डाॅक्टरांमुळेच ससूनची कीर्ती पंचक्रोशीत  पसरायची. त्याच्यामुळेच इतका अव्याहत रुग्णांचा ओघ – ते ही – गंभीर अवस्थेतील – तरीही आमच्या पूर्ण तीन वर्षांच्या शिक्षणाच्या काळात एकही पेशंट दगावली नाही! यावरूनच परत आधुनिक भाषेत सांगायचे झाले तर ससूनची  काय ‘क्वाॅलिटी ऑफ ट्रीटमेंट’ असणार!!

काही दुमत? कोई शक ?

 सतत उणिवा शोधणाऱ्यांनी  जरा ही बाजूही बघावी… हीच तर सर्वांत महत्त्वाची.

तेही अतिशय मर्यादित साधनसामग्रीत व जास्तीत जास्त गंभीर अवस्थेतील रुग्ण असूनही.

याच देही याची डोळा पाहिलेले आम्ही सर्व साक्षीदार असल्यामुळे ससूनसारख्या सरकारी हाॅस्पिटल्सना कमी लेखणाऱ्यांना ससूनचे वैद्यकीय योगदान काय समजणार?

Hats Off !!  खरंच धन्य ते दिवस! धन्य ती मातृसंस्था !

या सर्व यातायातीत पेशंट बरी होणं हेच आमच्या केलेल्या श्रमाचे चीज असायचे! यात सर्व ससूनच्या स्टाफच्या मेहनतीचे व ‘सपोर्ट सिस्टीम’ म्हणून केल्या जाणाऱ्या मेहनतीचेसुद्धा योगदान आहेच. ससूनच्या सिस्टर तर  इतक्या पारंगत असायच्या की त्या एखाद्या नवीन शिकाऊ डॉक्टरांपेक्षाही अनुभवाने किंचित सरसच! त्यातून ‘ब्लू बेल्ट’ आणि ‘ रेड बेल्ट’ वाले सिस्टर.  करारी व अत्यंत अनुभवी. ‘रेड बेल्ट’ सिस्टर अत्यंत शिस्तप्रिय असायच्या. त्यांचा भलताच धाक असायचा. आमच्या युनिट हेडच्या  प्राध्यापकांच्या राऊंडला  या सर्व सिस्टर जातीने हजर राहायच्या. ती एक शिस्तच होती. रिवाजच होता. एक सिस्टर एक ‘बाऊल’ घेऊन सरांच्या बाजूला उभी असायची. त्यात डेटॉलचे पाणी असायचे. सरांनी पेशंट तपासला की ती बाऊल पुढे करणार – सर त्यात हात बुडणार. दुसरी सिस्टर लगेच एक स्वच्छ नॅपकिन हात पुसायला देणार. असा हा प्रचंड प्रेक्षणीय सोहळा राउंडभर चालायचा. आम्हांला या गोष्टींचे अतिशय ‘अप्रूप’ वाटायचे. या  गोष्टींमुळे सरांबद्दलचा आदर दुणावयाचा व सरांची पत/ मान यांची जाणीव व्हायची. आम्हां विद्यार्थ्यांना मात्र ही चैन नव्हती… 

‘बेसिन’ गाठावे लागायचे – हात धुण्यासाठी… बहुतेक सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये चालणारी ही पद्धत शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची. जंतुसंसर्ग प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाची. कोविडच्या आधीही काही युरोपियन व अमेरिकन जर्नलमध्ये; एवढेच काय प्रसिद्ध डॉक्टर व लेखक अतुल गवांदे यांनीही त्यांच्या पुस्तकात ‘हात धुण्याचे’ महत्त्व ठाशीवपणे अधोरेखित केलेले  आहे, २०१० च्या आसपास.जगाने २०१० साली अधोरेखित केलेली हीच पद्धत  अत्यंत सुंदर रितीने व dignity ने  – कुठलाही बडेजाव न मिरवता –  ससूनमध्ये आम्ही ८० सालापासून पाहत  आलो होतो व  ती आम्ही ससूनमध्ये येण्याच्या कित्येक वर्षे आधीही अस्तित्वात होती. 

या राऊंडमध्ये – नुसत्या राऊंड मध्येच नाही; तर सतत २४ तास मार्गदर्शन करणारे आमचे वरिष्ठ, लेक्चरर, त्यांचे वरिष्ठ, प्रोफेसर व युनिट हेड अशी ही साखळी. कुठलाही कच्चा दुवा राहण्याची अथवा सुटून जाण्याची शक्यताच दुरापास्त. 

या सर्वांना प्रत्येक पेशंटची इत्थंभूत माहिती रात्री अपरात्री फोनवरून दिली जायची – हो हो त्या वेळेस Landline फोन होते – मोबाईल फोनचा जमाना नव्हता व आमचे बाॅसेससुद्धा  रात्री अपरात्री कधीही कुठल्याही  वेळेला फोन घेऊन आम्हांला योग्य ते मार्गदर्शन करायचेच;

कमतरता असायची ती फक्त एकाच गोष्टीत – ती म्हणजे कामाच्या प्रचंड रेट्यामुळे नातेवाइकांशी बोलायला आम्हांला कोणालाही फार वेळच मिळायचा नाही! अशक्यच होते ते! अशक्यच नाही – असंभवच होते.

या ससूननेच आम्हांला ‘संवेदनशीलता’ शिकवली.

प्रचंड ‘अलक्ष्मी’ ससूनमध्ये आम्ही आमच्या  उघड्या डोळ्यांनी पाहिली – अनुभवली. ढेकणांनी भरलेल्या घोंगड्या घेऊन फाटके तुटके कपडे घातलेले, ठिगळं लावलेली, सोबत भाकरीचे तुकडे – कापडात गुंडाळलेले रुग्णांचे नातेवाईक, परिस्थितीमुळे अंगावरच आजार काढण्याची वृत्ती व तशी मानसिकता, गावातील ‘भगतां’कडूनच उपचार (अघोरी ) करून घेण्याकडे त्यांचा कल, कुठेही वेदनांनी जीव कळवळत असला तरी डॉक्टरांकडे न जाता अशा भगतांकडूनच इलाज करून घेणारे रुग्ण, प्रसंगी अशा भगतांकडून  अंगावर दिले जाणारे – तापलेल्या लोखंडी सळीचे चटके. चटके देण्याचीही  अघोरी पद्धत – कुठल्याही वेदनांसाठी वापरली जाणारी ही पद्धत जी रोगापेक्षाही भयंकर… 

अंगावर असे असंख्य व्रण घेऊनच येणारे अनेक पेशंट्स. काय पाहिले नसेल ?? काय अनुभवले नसेल?

म्हणूनच मी म्हणेन ससूनमध्ये आम्ही  वैद्यकीय शास्त्र , वैद्यकीय ज्ञान ,कौशल्य, शल्य -कौशल्य, निदान आणि उपचार हे शिकलोच शिकलो तरीही त्याबरोबरच अशा या रुग्णांमुळे येणारे सामाजिक वास्तवाचे भान व जाणिवा या आपोआपच टीपकागदासारख्या शोषल्या गेल्या.

ससूनच्या या आसमंतात आम्ही इतकी प्रामाणिक,  निरागस गरीबी पाहिली आहे की ससूनने आम्हांला वेगळे काय दिले; तर ती दिली ‘संवेदनशीलता’ आणि मला खातरी आहे की  ससूनमधून बाहेर पडणारा  प्रत्येक डॉक्टर त्याच्याकडे कधीही एखादा गरीब पेशंट आला तरी त्याला कधीही नाडणार/ अडवणार नाही आणि आपल्या आवाक्यात असेल तर उपचारही करणारच आणि त्याला सूट दिली म्हणून त्याचे भांडवलही करणार नाही. व्रतस्थ म्हणून काम करतच राहणार. त्यात त्याला आपण काही फार मोठे सामाजिक कार्य करत आहोत अथवा उपकार करत आहोत, ही भावनाही शिवणार नाही.

हीच  तर ससूनची  सर्वात मोठी मौल्यवान शिकवणूक!! जी नकळतपणे आपोआपच आमच्याच झिरपली गेली आहे, कोरली गेली आहे.

Pune hospital tells a tale of the night when Gandhi went under the knife .

https://www.indiatvnews.com/news/india/sassoon-hospital-pune-tells-tale-of-night-when-gandhi-went-under-knife-1924-operation-appendix-553682

Author

Leave a Reply