बंगला पूर्णत्वाला गेला,
नावाची पाटी लागली,
छाती किंचित फुगली.
खूप विचारपूर्वक केलेले बंगल्याचे ते महाद्वार,
बाहेर जाळी, त्याच्यात भक्कम दार,
टेहळणीसाठी असणारे ते सुरक्षित भोक
आत नामांकित कंपनीचे भले भक्कम लॅच,
त्याचे अनेक दातरे, वगैरे वगैरे.
तो नतद्रष्ट दिवस,
बायको माहेरी,
गॅसवर उतू गेलेले दूध,
मांजराने आडवी केलेली कचऱ्याची बादली,
मांजराच्या दिशेने त्वेषाने घेतलेली ती धाव…
मागे धडाडकन आपटून बंद झालेले दार
आत राहिलेली लॅचची किल्ली नि डोळ्यांसमोर ते असंख्य काजवे !
देवासारखा धावून आलेला कुलूपवाला,
त्याने खिशातून काढलेली प्लास्टिकची पट्टी
त्याचे हस्तलाघव व क्षणार्धात ‘आ ‘वासलेले कुलूप व दार…
खाली गळून पडलेली सुरक्षिततेची जाणीव
घराच्या दाराबरोबरच उघडलेले मनाचे कवाड
दृश्यमान झालेले कुलपापलीकडचे ब्रम्हांड !!
भासमान भानू

सोपे फारच होत जात असते, काव्यात सांगावया |
जेव्हा कोणिहि छंद मुक्त निवडी, शब्दांस मांडावया ||
शंका येइ मनी कदाचित असे, आलस्य बौद्धीक ते |
गेयत्वा अथवा महत्त्व नसते, त्यांच्या मनाच्या मधे ||
वृत्तांच्या नियमांत जोखड तयां, वाटे प्रतीभेवरी |
की नाही पुरती ‘कमांड’हि खरी त्यांचीच भाषेवरी ||