इथे आता बरेच साप आणि विंचू चावल्याचे रुग्ण येताहेत. चाव्याचे ठिकाण बधिर करण्याचे झायलोकेन नावाचे औषध असते. (दात काढताना हेच इंजेक्शन देतात.) विंचू चावलेल्या ठिकाणी वरचेवर त्वचेखाली ते द्यायचे म्हणजे वेदना कमी होत जातात; पण साप चावला तर तसे नसते. विषारी/ बिनविषारी असं ठरवून मग साप विषारी असला तर त्याची लस द्यावी लागते; पण साप विषारी आहे का नाही हे नक्की समजणे अवघड आणि कळीचा मुद्दा – त्यावरची लस उपलब्ध असणे! त्याचा साठा आहे / नाही पाहून इथे सर्व करावं लागणार; नाहीतर लोणावळा/ पुणे येथे जायचं. झुंडीने आलेले व घाबरलेले लोक, सोबत मारून आणलेला साप, नाग ,विंचू. कुठून कुठून आसपासच्या दुर्गम दऱ्या, डोंगर, वाड्या इथून येणारे लोक. हाती पैसा जवळपास नाही असे हे लोक! औषध नाही म्हणताना आपल्यालाच भयानक वाईट वाटणार अन् हे लोक आकाशाकडे अन् पूर्वेकडे बघून नमस्कार करणार आणि दीनपणे परतणार; मग मांत्रिक-तांत्रिक त्यांच्या असहायतेचा फायदा घेणार. औषध आहे/नाही हे सांगण्याचा वाईटपणा तिथल्या सिस्टर घ्यायच्या; पण यामध्ये मास्तर खोटं बोलायचा नाही हे मोठेच. फक्त गावातला कोणी पुढारी , श्रीमंत असला तर मास्तर कसनुसं तोंड करत औषध नाही हे सांगायला समोर येतो.
कामशेतपासून आतमध्ये अत्यंत दुर्गम असे भाग आहेत. काही ठिकाणी टमटम जाते, काही ठिकाणी बसच्या थांब्यावरून चालत आत-आत जावं लागतं. चढउतार, ओढे-ओहळ पार करत रानवाटा फिरत जावं तसं ५०-१०० वस्तीची छोटी छोटी ठिकाणे लागतात. इथे रस्ते नाहीत, वीज नाही, पाणी नाही. लोक आजूबाजूच्या शेतांवर काम करतात. यांच्या स्वतःच्या जमिनी नाहीत; शिक्षण नाहीच. दारूचे व्यसन खूप जणांना. इथे उत्तम प्रतीचा इंद्रायणी तांदूळ पिकतो. अगदी साधी साधी छोटीशी कच्ची घरं , झोपड्या यांतून लोक राहतात. जवळपास असलेल्या पाण्याच्या स्रोतातून बायका पाणी भरून आणतात. उन्हाळ्यात बापड्यांना दूरवर जावे लागते. उन्हाळ्यात पाणीही चांगले मिळत नाही; मग कावीळ आणि विषमज्वर डोकं वर काढतात. थंडीत विंचू साप अन् पावसाळ्यात मलेरिया, अतिसार डोकं वर काढतात.खायला काही नाही; तर औषधपाणी – डॉक्टर कुठून करणार हे लोक? सरकार काय करतं यांच्यासाठी?
आरोग्यकेंद्र जरा मोठ्या ठिकाणी! पण अशा दुर्गम भागांत अंगणवाडी सेविका नेमलेल्या असतात. लसीकरण, लोहाच्या गोळ्या, निरोध, क्लोरिनच्या गोळ्या, हिवतापाची औषधे, धनुर्वाताची औषधे हे सर्व वाड्या-वस्त्यांवरून फिरून वाटणाऱ्या या बायका…अवघड वाटा, डबकी , ऊनपाऊस, थंडी यांना तोंड देत या लोकांपर्यंत काहीतरी सोयी पुरवणाऱ्या या बायका.
एकदा OPD बघताना तीन अंगणवाडी सेविका आल्या. एका वाडीमध्ये लोकांना सारखा ताप येत होता आणि त्यांना साध्या औषधांनी फरक पडत नव्हता. त्यांच्या रक्ततपासणीचे नमुने घेणं, त्यांना तपासून बाकीची लक्षण बघणे हे गरजेचं असतं. एकीला जिल्हा परिषदेला जायचं आहे, तिथल्या बैठकीत अहवाल सादर करायचे आहेत. दुसरीला दुसऱ्या बाजूच्या वाडीमधील गरोदर बायकांची वयं आणि पत्ते पुण्यातल्या ऑफिसमध्ये द्यायचे आहेत आणि तिसरी तयार आहे; पण यासाठी तिला कोणी डॉक्टर सोबत असायला हवा आहे; कारण बाकीची लक्षणं अन् तपासणी कोण करणार ?
मास्तर वैतागलेला, ‘कोण जाणार बाई तुमच्यासोबत!’
मग मला,
“काय रे जातोस का ?”
“जाईन की सर.”
सरस्वती नावाच्या त्या बाईंना खूप बरे वाटले आहे.
बाई काय म्हणणार – खरं तर तरुण मुलगीच ती. माझ्यापेक्षाही २-३ वर्षांनी लहान असणार ती. सावळी, तरतरीत, मोठे डोळे असलेली, गळ्यात काळी पोत असलेली बाई.
सरस्वतीबाईंसोबत मी निघालो. नाक्यावरून टमटम करून जाऊ म्हणाली. बसलो.
सरस्वती बोलकी आहे.
“तुम्ही कुठले, किती दिवस आहात इथे? कधी फिरला आहात या वाड्यांवर?”
“नाही हो. तुमच्यामुळे योग आला.”
“माझ्यामुळे कसला डॉक्टर, कुणी बघायला येत नाही इथे.”
“का बरं?”
“बघालच आता.”
रिक्षातले लोक उतरत होते, नव्याने येत होते. काही जण तिला ओळखणारे पण होते. काय नरसाबाई, बरी हायेस ना म्हणणाऱ्या बाया, म्हाताऱ्याचा ताप राहिला बरं का, बरं झालं बाई तू होतीस म्हणून तर मावळण सुटली माझी – असं सांगणाऱ्या बाया बापड्या भेटल्या.
सरस्वती सगळ्यांशी हसूनखेळून बोलत होती. मध्येच उगाच खाकरून टक लावणारे पण भेटले. क्षणभर चेहऱ्यावर एक उदासीची छटा; पण पुढच्याच क्षणी ‘तर डॉक्टर, बरं झालं तुम्ही आलात,’ असं म्हणून ती अशांकडे लक्ष देत नव्हती.
एका फाट्याजवळ उतरलो आणि आता चालायचं आहे बरंच असं म्हणून सरस्वती निघाली. छोट्या टेकड्या, पायवाटा, एकाकी शेतं आणि एखादेच घर असं पार करत निघालो. अशा ठिकाणी कुत्री भुंकत मागे येत; पण तिला पाहून थांबत असत; तरीही एक वाळलेली फांदी उगारत चालत राहिलो. गप्पा थोड्या थोड्या होत होत्या. शेवटी ती वस्ती लागली. सर्वत्र धूळ, रस्त्याच्या कडेला दुपारी पडलेले काही बेवडे, धुळीने माखलेली नागडी मुलं, उकिरड्यातून फिरणाऱ्या कोंबड्या अन् पारावर पत्ते पिसणारे काही. तिथून जाताना खाकराखोकरा झाला अन् कोणीतरी बोललेच,
‘आमी काय कमी हाय का, भायेरचा धरते,’
सरस्वती ताड्कन फिरली आणि संतापाने ओरडली, “डॉक्टर आहेत ते, काहीतरी बोलू नका,”बोलता बोलता तिचा आवाज चिरकला, डोळे पाण्याने डबडबले. मी सुन्न. लोकही गप्प. मी लोकांकडे पाहिलं. काही तरणे काही रापलेले. मी त्यांच्याकडे जायला निघणार ( खरं तर मला नुसतंच म्हणायचं होतं, इथे कोणी पाटील, सरपंच असतो का?) एवढ्यात स्थिर होत ती बोलली, ‘चला डॉक्टर.’ काही न बोलता चालत राहिलो. वस्तीच्या टोकाकडे पोचल्यावर हाक मारत ती आत गेली, मलाही बोलावले. कुंद वातावरण, मळके कपडे , पांघरुणांत पडलेली माणसं.
त्यांची नाडी, रक्तदाब, तापाचा प्रकार, पुरळ उठलंय का, घसा दुखतो का – असे तक्त्यानुसार लिहीत गेलो. सरस्वती हुशार आहे. पटपट गोष्टी करत होती. जवळपास दहा रुग्णांची माहिती तयार केली, प्रत्येकाचे रक्त गोळा केले.
दुपारचे साडेतीन वाजले. स्पिरीटने हात साफ केले. बाहेर पडताना एक चांगलेसे घर दिसले.
बाहेर बैलजोडी होती, चारा होता. सरस्वतीला बघून डोक्यावर पदर असलेली एक बाई आली. तिला आत घेऊन गेली; लगेच सरस्वती परत येऊन म्हणाली,
“डॉक्टर चहा घेऊयात?”
“कोण आहेत?”
“इथले देशमुख आहेत, चांगले लोक.”
देशमुखबाईंची खूप जमीन, तांदळाचा व्यापार आणि विहिरी ! चहाबरोबर आग्रहाने दिलेली तांदळाची भाकरी अन् लाल चटणी भराभर खाल्ली गेली – भूकच इतकी लागली होती!
सरस्वती पटपट रस्ता कापत होती. जवळपास वाहन मिळेल असे ठिकाण म्हणजे २५-३० मिनिटांचे चालणे होते. मध्येच मी विचारलं,
“तुम्ही राहता कुठे?”
“मळवलीला.”
“कोण कोण असतं घरी?”
“माझी दोन मुलं अन् सासूबाई.”
बोलताना तिच्या आवाजात सूक्ष्म कापरेपणा ऐकून मी गप्प बसलो. अखेर फाटा आला, टमटम मिळाली. मी परतलो अन् ती तिच्या वाटेने गेली.
खोलीत शिरणार एवढ्यात सोन्या मोन्या भांडत आले. मला बघून सोन्या,
“काय डॉक्टर, आज कुठून ?”
सोन्याला प्यायचे पाणी दे म्हणालो आणि कपडे बदलून बसलो; मग पाणी प्यालो आणि सोन्याला कुठं गेलो ते सांगितलं.
सोन्याला विचारलं, “अरे तुला सरस्वती माहिती आहे का? तिचा काही प्रॉब्लेम आहे का ?”
सोन्या फिसकन हसला तेव्हा चुकीच्या माणसाला विचारलं हे मला कळलं; तरी त्याला हाकलता हाकलता तो म्हणला,
“काय डॉक्टर, मस्त सामान है ना?”
शांत बसलो आणि दिवसाचा एकेक क्षण आठवत राहिलो. कुठून कसं आयुष्य वाहत असतं आणि आपण आपल्या कोषातून बाहेर येऊन ते नीट बघतो का? असं वाटलं. असाच बराच वेळ गेला. अचानक लाईट गेले. धडपडत मेणबत्ती शोधली ती पेटवून मग त्यावरच सिगरेट पेटवली.
रेडियो लावला तर…
शमा कहे परवाने से, परे चला जा
मेरी तरह जल जायेगा, यहाँ नहीं आ
वो नहीं सुनता उस को जल जाना होता है
हर खुशी से, हर ग़म से, बेगाना होता है…
एकदम बसवेनासे झाले तसा उठलो आणि बाहेर आलो. सर्वत्र सुन्न अंधार, सिस्टरांच्या घरी मिणमिणता कंदील, रस्त्यावरचे तुरळक आवाज, अंधार कापणारा बाईकचा उजेड यांतून चालत, धडपडत दिलबहारला आलो. तिथे मात्र चक्क पेट्रोमॅक्सच्या बत्तीचा प्रकाश. बाबूने ओळखून वरची कोपऱ्याची जागा दिली. आमची ओल्ड मंक आणि थम्स अप, उकडलेले शेंगदाणे आले; पण का कोण जाणे प्यावेसे वाटे ना .
उकडलेले शेंगदाणे खात बाबूला सांगून मी निघालो. बाबूने समंजसपणे मान डोलवत बाटली ठेवून दिली .
परत निघालो आणि वीज आली. एकदम आसपासची कळाहीन घरं , त्यांतले पिवळे दिवे – सगळं अंगावर आलं. भराभर येऊन खोलीत शिरलो. भिंतीला टेकून गादीवर बसलो आणि तसाच झोपून गेलो. कधीतरी जाग आल्यावर सरळ झालो आणि झोपून राहिलो. सकाळी जाग आली तेव्हा बराच वेळ झालेला होता. पटापट आवरलं. नेहमीप्रमाणे तेव्हा दिसलं अरे आज तरी पेस्ट आणायला हवी! आता दाबून दाबून ट्यूब संपली आहे . पावडरचा चहा दोन कप, ब्रेड खाऊन मी कामाला पोचलो. मास्तर सर्वज्ञासारखा विचारता झाला,
“का रे गेला होतास ना ?”
त्याला तक्ता दिला आणि बाकीचं सर्व सरस्वतीबाई आज पोचवतील म्हटल्यावर तो काहीच बोलला नाही. पलीकडे सिस्टर ड्रेसिंग करत होत्या. आज काही गर्दी दिसत नव्हती. थंडीही बरीच होती. निघालो तसं सिस्टर येऊन म्हणाल्या,
“डॉक्टर आज जेवा माझ्याकडेच. मुलं पण घरी आहेत त्यांना सांगा जरा अजिबात अभ्यास करत नाहीत.”
मला नाही म्हणवेना आणि खरंतर मिसळ पाव आणि फाफडे खाऊन जीवावर येतच होतं . त्यांच्याकडे गेलो. सोन्या मोन्या काहीतरी खल करत होते. आईसमोर माझ्याशी आज धड बोलले . त्यांना मी अभ्यास करा,लक्ष द्या, पुढचा विचार करा, आई-बापाचा विचार करा, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे वगैरे काहीबाही सांगत बसलो. सिस्टरांनी तेवढ्यात ताटे वाढून आणली. शेवग्याची आमटी,पोळी,चटणी , इंद्रायणीचा भात… इतके छान वाटले. मुलांनी आईवर उपकार करत खाल्लं, अंडं, चिकन का नाही असं विचारलं आणि ती बाहेर पडलीदेखील. सिस्टरांना म्हटलं,
“तुमचं जेवण?”
“माझा उपास आहे मंगळवारचा!”
अचानक आठवलं आणि मी विचारलं सिस्टर, “सरस्वतीबाईंचं काय झालं होतं ?”
त्यांच्या चेहऱ्यावर एक दुःखाची छाया सरकून गेली.
“जाऊ द्यात हो! तुम्ही थोड्या दिवसांसाठी आहात कशाला डोकं घालता? फक्त सांगते की सरस्वती खूप चांगली बाई आहे.”
“मग सांगा की लोक असं का वागतात आणि त्या का सहन करतात ?”
थोडा वेळ त्या काहीच बोलल्या नाहीत. नंतर त्यांनी सांगितले, ‘सरस्वतीचे आईबाप लहानपणीच गेले . कोकणातून तिच्या मामाने इथे आणले आणि सांभाळले. त्याच्याकडेदेखील गरिबी. मामीच्या जाचाखाली सरस्वती वाढली. त्यांची दोन मुले, त्यांचं आवरणं, स्वयंपाकात मदत करणं, मामाला भाजी विकायला मदत करत एका बाजूला शिकत राहिली. हुशार होती. सातवीपर्यंत शिकल्यावर कुणाच्या सल्ल्याने अंगणवाडीचा कोर्स केला. नाकीडोळी नीटस, उफाड्याची मुलगी म्हणजे गरिबाला मोठे संकट! पण तिला जवळपासच्या गावातूनच स्थळ सांगून आलं. मुंबईला फॅक्टरीत कामाला असलेला मुलगा आणि घरी त्याची आई . लग्न झालं आणि सरस्वती मळवलीला गेली. नवरा शनिवार-रविवार यायचा. नंतर कळले तो पक्का बेवडा आणि जुगारी. पटापट दोन मुले झाली आणि अचानक नवरा कुठल्याशा भांडणात वर्मी घाव लागून गेला. या मुलीने हिंमत सोडली नाही. आरोग्यसेविका म्हणून प्रशिक्षण घेऊन काम करू लागली. सासू आणि मुलांचा भार उचलून परत जगण्याचा प्रयत्न करू लागली; पण तरणीताठी, नाकीडोळी नीटस आणि विधवा निराधार बाईला व्हायचे ते सर्व त्रास तिला झाले. त्यातून ती बधत नाही म्हटल्यावर तिच्याबद्दल कंड्या पिकवण्याचं काम गावगुंडांनी नेटानं केलं; तरीही न डगमगता चालणाऱ्या सरस्वतीवर शेवटी एका गावातल्याच गुंड पुढाऱ्याने अतिप्रसंग केला तेव्हा जीवाच्या कराराने आरडा ओरडा करून त्याला वर्मी लाथ घालून ती बाहेर पडली. खूप बदनामी झाली . पोलिसांनी आधी तक्रार नोंदवायला चालढकल केली; पण ही बहाद्दर बाई कलेक्टरपर्यंत पोचली, स्त्रीसंघटनांकडे गेली तेव्हा गुंडांचे धाबे दणाणले. शेवटी ते प्रकरण मिटले पण तिच्या आयुष्यावर न पुसणारा चरा उठला तो उठलाच. बिचारीचे आयुष्य करपलेच. प्रत्येकाच्या तोंडाला कसे लागणार ? लोकांचे टोमणे, विविध वावड्या यांना तोंड देत जगणाऱ्या या बाईवर भलेबुरे प्रसंग येत राहिले. इतरही लोक दबून वागत, तिला घाबरत; पण तिच्याबद्दल अचकट, विचकट बोलत असत. त्यातून अशी कायमची उदासी आलेली बाई तयार झाली.’
काय बोलणार ? मी सरळ खोलीत निघून गेलो आणि शांत बसलो. एखाद्याच्या नशिबी देव इतका खडतर रस्ता का ठेवत असेल? अन् आपलं सर्व धड असून आपण का तडफडतो पाण्यातून काढलेल्या मासोळीसारखे ?
दिवस रांगत खुरडत पुढे चाललेले. त्यात आता सरस्वती दिसली की मनात लक्कन हलायचं.
तिच्याशी आवर्जून मी बोलायचो. एक दिवस काय झालं कळलं नाही पण सरस्वती एकदम गप्प गप्प होती. मी शेवटी सर्व तक्ते तपासल्यावर म्हटलं, “तुम्ही काहीच बोलत नाही आज?”
सरसरून तिचे डोळे भरून आले आणि निग्रहाने अश्रू थांबवत ती म्हणाली, “डॉक्टर तुम्ही माझ्याशी हसून आता बोलू नका.”
मी सुन्न,
“माझं काही चुकलंय का?”
“नाही,तुम्ही चांगले अन् सरळ आहात. दुनिया अशी नसते. मोठे व्हा,स्वतःला जपा.”
हे काय असतं ? आपलं मन आपल्या वागण्यावर ताबा मिळवून जगाला काही वेगळं दाखवतं? की आपला कुठलातरी अनाम कप्पा जो आपल्यालाही नीट परिचित नाही तो अशा स्त्रीवर ताबा मिळवू बघतो? काय व्यक्त झाले असेल? …प्रेम? आकर्षण? कीव?लालसा?
परत परत मनाला विचारलं तरी उत्तर मिळाले नाही. परत परत संभाषणे आठवली तरी कोणता धागा उमजला नाही अन् अंगावर भीषण करडे ढग चाल करून आले. काम नाही, असले तर औषधे नाहीत, बोलायला मित्र नाहीत, बघायला सिनेमा नाही, चांगले अन्न नाही, आयुष्याला अर्थच नाही. ते दिलबहार, तिथली दारू, बाबूच्या गप्पा, अंडा दाल फ्राय नावाचा पदार्थ, मगनलालचा तेलकट फाफडा,चोरून पैसे कमावणारा मास्तर अन् एखाद्या धगधगत्या जखमेसारखी सरस्वती…
नको! नको मला इथं. मला आजूबाजूला लोक हवेत, कोणी नसलं तरी उदंड पुस्तके हवीत, भांडायला मित्र हवेत, पॅरासाईट म्हणून का होई ना होस्टेल हवे, भरपूर पाणी, स्वच्छ अंघोळ, इराण्याचा चहा, आवडत्या पण मनातच राहिलेल्या मुलींचे दर्शन हवे. मास्तरा, ‘मी हरलो रे. मी नाही राहणार इथे.’
मास्तरला बरेच वाटले. महिन्यातून ये एकदा!
एका भल्या पहाटे सर्व आवरलेले सामान घेऊन मी लोकलने पुण्याला निघून आलो तेव्हा झाडाला पाणी घालणाऱ्या सिस्टर म्हणाल्या,
“जपून रहा डॉक्टर, फार विचार करू नये माणसाने!”
अलविदा कामशेत… अलविदा.

समाप्त .
