बेंगलोर डायरी ३

   बेंगलोर ही कर्नाटक राज्याची राजधानी असली तरी हे तुलनेने नवीन शहर. जरी मी मागच्या लेखात ९०० वर्षांपूर्वीच्या शिळालेखाचा उल्लेख केला असला; तरी ही हे दुय्यम महत्त्वाचेच शहर होते. आधी विजयनगर साम्राज्य म्हणजे हंपी आणि नंतर मैसूर या शहरांचे स्थानमाहात्म्य जास्त होते; त्यामुळेच की काय भाषावार प्रांतरचना होईपर्यंत हा सगळा इलाखा मैसूर प्रांत म्हणूनच ओळखला जायचा. त्यामुळेच की काय मैसूरकडे आजही कर्नाटकाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनच बघितले जाते. आजचा कर्नाटक पूर्वी चार वेगवेगळ्या प्रांतांत विभागला गेला होता. मैसूर प्रांत, मद्रास प्रांत, मुंबई प्रांत आणि निजाम; त्यामुळे इथल्या कन्नडवर या चारही प्रांतांच्या भाषांचा प्रभाव तर आहेच; पण या प्रांतांतल्या मूलभाषक लोकांचे प्रमाण आजही मोठ्या प्रमाणावर बेंगलोरमध्ये जाणवते. दक्षिण भारतातील melting pot म्हणून कायम बेंगलोरकडे बघितले जाते. 

 चिकपेटे मधील विठ्ठल मंदिर.

  

  सतराव्या शतकात शहाजीराजे भोसले २० वर्षांहून अधिक काळ बेंगलोरमध्ये वास्तव्यास होते; त्यामुळे त्यांच्यासोबत आलेले अनेकजण इथेच राहिले. त्यांनी त्यांचं मराठीदेखील जपलं आहे. गमतीची गोष्ट म्हणजे त्या मराठीला ते ‘शिवाजी मराठी’ म्हणतात. शिवाजी राजांनी थेट राज्य केले नसले तरीही नाम माहात्म्यामुळे शहाजी मराठी न म्हणता शिवाजी मराठी म्हटले जाते. मागच्या शतकापर्यंत रोटी बेटी व्यवहार काटेकोरपणे आपापसांतच केले जायचे. इथे आजही जाधव, भोसले, पवार  आडनावांचे कन्नडिगा आहेत. त्यांचे आडनाव कळेपर्यंत त्यांच्या मराठी असण्याची काहीच खूण जाणवत नाही इतके ते इथले होऊन गेले आहेत. त्यांनी भाषा जपली आहे; पण त्यात काळानुरूप स्थानिक शब्द, व्याकरणसुद्धा आले आहे; त्यामुळे त्यांना आपलं मराठी समजतं; पण आपल्याला त्यांचं मराठी समजून घेण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. 

 जसं मराठी इथल्या मातीत रुळलं  आहे तसंच काहीसं आहे तेलगू आणि तमीळ या दोन भाषांचंदेखील. बेंगलोरपासून जेमतेम ५० किमीच्या अंतरावर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांच्या सीमा आहेत. दक्षिण बेंगलोरमध्ये काम करणारे अनेक जण चक्क रोज राज्याच्या सीमेपलीकडून येतात. बेंगलोर शहर महानगरपालिकेची उत्तर-दक्षिण सीमा ही जवळ जवळ ५० किमी आहे आणि पूर्व-पश्चिमसुद्धा साधारण तेवढीच; त्यामुळे मी कायम म्हणते या एका शहरात ४ शहरे वसलेली आहेत. दक्षिण बेंगलोरमध्येच प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक सिटी – जे आय .टी. चे हब मानले जाते – ते आहे; तर बेंगलोरचे विमानतळ बेंगलोरच्या उत्तरेकडे आहे जिथून अवघ्या २० किमीवर आंध्र प्रदेशाची सीमा आहे. विमानतळाजवळच एक मोठे एरो पार्क सुरू होत आहे. विमानतळ आणि या पार्कमध्ये कामाला येणाऱ्यांमध्ये तेलगू भाषकांचे प्रमाण लक्षणीय आहे. 

सेंट मार्क कॅथेड्रल 

   बेंगलोर हे शहर मोठे करण्यात इंग्रजांचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात येथे इंग्रजांची मोठी छावणी होती. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मद्रास (आताचे चेन्नई) आणि बाँबे (मुंबई) या दोन बंदरांच्या वाहतुकीच्या रस्त्यात हे शहर येत होते. त्याचबरोबर या शहरावर ताबा ठेवला तर आपोआप मैसूर राज्यावर वचक बसत होता. या शहराच्या अशा मोक्याच्या स्थानामुळे इथे रेल्वे लाइन तर आली होतीच; पण त्याचबरोबर मोठे छावणी केंद्रदेखील होते. इथली हवा  त्यांना मानवणारी असल्यामुळे इथे त्यांनी डेरा टाकला. बेंगलोर कॅंटॉन्मेंट आणि बेंगलोर शहर यांच्यात आजही सांस्कृतिक फरक जाणवतो; याचे कारण त्या भागात वसलेले लोक आहेत. कॅंटॉन्मेंटजवळच्या भागात आजही तमीळ भाषक मोठ्या संख्येने आहेत. गमतीत असेही म्हटले जाते, ‘या भागात तुम्ही राहत असाल आणि तुम्हांला तमीळ येत असेल; तर तुम्हांला कन्नड शिकायची गरजही नाही.’ ( मुंबईत जसे काही भागांमधील गुजराती प्रभावामुळे म्हटले जाते तसेच काहीसे.)  

   मैसूरचा राजा कृष्णराज – चौथे हे दूरदृष्टी असलेले शासक होते. कृष्णराज यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले : जसे  बालविवाह प्रतिबंधक कायदा, स्त्री शिक्षणाला चालना देणारे निर्णय, स्वदेशी उत्पादनांना दिलेला पाठिंबा याचबरोबर त्यांनी मैसूर विद्यापीठ आणि बेंगलोरमध्ये टाटा यांना इंडियन इस्टिट्यूट ऑफ सायन्स सुरू करण्यासाठी स्वतःची जागा दिली आणि आर्थिक मदतदेखील केली. (आज हीच संस्था जगातील शंभर  उत्तम शिक्षण संस्थांमध्ये आपले स्थान टिकवून आहे.) यांच्याच कृपेने १९०५  साली बेंगलोरमध्ये रस्त्यांवर विजेचे दिवे लागले आणि बेंगलोर आशिया खंडातील विजेचे दिवे लावणारे पहिले शहर ठरले. त्यांच्या कारकिर्दीवर एक पूर्ण लेख लिहिला तरी कमीच आहे; त्यामुळे मी त्यांनी घेतलेले असे निर्णय ज्यांचा बेंगलोर शहरावर थेट परिणाम झाला अशा काही संस्थांचा फक्त उल्लेख करत आहे. त्यांनी १९३४  साली डॉ. सी व्ही रामन यांना दहा  एकर जागा दिली ज्यावर आज रामन रिसर्च इंस्टीट्यूट आहे. त्यांच्याच काळात १९३९  मध्ये ग्लास आणि पोर्सेलिनचा कारखाना सुरू केला; जो पुढे BHEL चा भाग झाला. १९४० मध्ये वालचंद आणि मैसूर राजा यांच्या सहकार्याने हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड सुरू केले, HAL चे वायुसेनेतील योगदान आजही तेवढेच मोलाचे आहे; याचबरोबर १९५४ साली स्थापना झालेले भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड म्हणजेच (BEL)  चे मुख्यालय आणि कारखाना बेंगलोरमध्येच आहे. ISRO, BHEL, NAL, HMT यांसारख्या अनेक सरकारी कंपन्यांची कार्यालये बेंगलोरमध्येच असल्याने भारताच्या विविध भागांतील नागरिक नोकरीसाठी म्हणून या शहरात आले आणि येताना आपली भाषा घेऊन आले. 

 ‘आय. टी. हब’ अशी ओळख व्हायच्या आधीपासून बेंगलोर बहुभाषक होते.  मल्याळी आणि बंगाली लोकांनी पटकावलेल्या सरकारी नोकरीच्या संधीमुळे इथली बंगाली आणि मल्याळम भाषक लोकसंख्या आजही लक्षणीय आहे. (इथली अनेक किराणा मालाची दुकाने ही मल्याळी लोकांनी सुरू केलेली आहेत.) दिवसेंदिवस वाढणारी  ‘दुर्गा पूजा पंडाल’ संख्या  इथल्याच होऊन गेलेल्या बंगाली लोकांचे निदर्शक आहे असे म्हटले तर चूक ठरणार नाही. गेल्या काही दशकांत राजस्थानमधून आलेल्या लोकांची संख्यादेखील वाढल्यामुळे बेंगलोरमध्ये चक्क ‘राजस्थान पत्रिका’ हे वर्तमानपत्र मिळते. 

    इथले महाराष्ट्र मंडळ शंभर वर्षे जुने आहे. गेल्या दोन-तीन दशकांत मराठी भाषकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उर्दूदेखील इथे मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा आहे. याचबरोबर घरी तुळू, कोडगू, कोंकणी बोलणारे; पण बाहेर कन्नड बोलणारे लोक मोठ्या प्रमाणात  बेंगलोरमध्ये आहेत.   

महाराष्ट्र मंडळाची इमारत  

   चेन्नईपेक्षा कमी अभिमानी; पण मुंबईपेक्षा जास्त अभिमानी असणारे स्थानिक कन्नडिगा इतर भाषा ऐकून थोडे त्रस्त होतात, हिंदीत, इंग्रजीत संवाद साधतात; पण त्यात एक खंत असते की इथे येऊनही तुम्ही इथली भाषा, संस्कृती परकी समजलात तर आम्ही कसे काय तुम्हांला आपले म्हणायचे?  स्थानिक भाषा समजली तर खूप मोठा खजिना हाती लागतो आणि आपण ज्या शहरात राहतो त्याची वेगळी बाजू दिसायला लागते हा माझा अनुभव आहे. भाषा माणसांमध्ये संवाद घडवून आणते. संवाद माणसे समजायला मदत करतात, माणसे समजली की समाजात साहचर्य निर्माण होते. भाषा जपली की आपसूक नाती तयार होतात – जसे माझे या शहराशी इथल्या लोकांशी झाले आहे. 

(ही एक त्रयस्थाच्या नजरेतून केलेली मुशाफिरी आहे. शहर, माणसे समजून घेताना मी सामान्य व्यक्ती म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.)

Author

Leave a Reply