दि. १.११.२०२३
ऑक्टोबर महिना संपला आणि नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी गुलाबी थंडीची चाहूल लागली. गुलाबी थंडीच्या आगमनाबरोबर आइस्क्रीम क्रीपरच्या गुलाबी फुलांना बहर आला. त्रिकोणी पानांची ही वेल. तिच्यावर इवलीशी दोन ते तीन सेंटीमीटर व्यासाची पाच पाकळ्यांची गुलाबी रंगाची असंख्य फुलं आली आहेत. या फुलांच्या मध्यभागी इवले इवले पिवळ्या रंगाचे पुंकेसर दिसतात. आइस्क्रीम क्रीपरच्या फुलांवर असंख्य रंगीबेरंगी फुलपाखरं भिरभिरताना दिसतात. ही फुलं गुलाबी रंगामुळे चट्कन नजरेत भरतात; परंतु त्याच्याजवळच रानअबोलीची एक दीड फूट उंचीची असंख्य झुडपं पिस्ता रंगाच्या फुलांनी बहरून आलेली आहेत. हे झाड आपल्या नेहमीच्या अबोलीच्या झाडाप्रमाणेच आहे; फक्त फुलांचा रंग तेवढा वेगळा आहे. हिरव्या रोपट्यावर आलेली ही हिरवट पिस्ता रंगाची फुलं पट्कन दिसत नाहीत; परंतु जवळ जाऊन निरीक्षण केलं की झुडपावर तुऱ्यासारखी आलेली कोवळ्या पानांची मंदिराच्या घुमटाप्रमाणे त्रिकोणी दीपमाळ नजरेस पडते आणि त्यातून डोकावणाऱ्या ह्या हिरवट रंगाच्या एक पाकळीच्या फुलांची नजाकत लक्षात येते. निसर्ग तरलदृष्टीने पाहिला की खूप वेगवेगळे आकार आणि रंग दिसून येतात. बाजूलाच एक झाडाचं सुकलेलं खोड होतं. त्या खोडावर व्हिन्सेट व्हॅन गॉच्या ‘स्टारी नाईट’च्या चित्रातील आकाशगंगेसारखे वक्र आकार होते. मध्येच खोलवर गोलसर दोन आकार निर्माण झाले होते. सुकलेल्या खोडांकडे आणि फांद्यांकडे जरा नीट निरखून पाहिलं तर उद्यानात ठिकठिकाणी वेगवेगळे आकार नजरेस पडतात – एक पाच फुटी उंच आणि दहा ते पंधरा सेंटीमीटर खोडाचं टोक कुत्र्याच्या तोंडाच्या आकाराप्रमाणे झालं होतं. डोळ्यांच्या जागी छोट्या खोबण्या! नैसर्गिक काष्ठशिल्पांचे असे अनेक नमुने उद्यानात नजरेस पडतात.
दि. ५. ११ .२०२३
सकाळीच कांदिवलीच्या एका वसाहतीतून फोन आला, ‘एक माकड मंदिरात येऊन बसलं आहे.’ आमच्या रेस्क्यू पथकातील दिनेश गुप्ताला घेऊन मी निघाले. दिनेश गुप्ता हा रेस्क्यू टीमचा धडाडीचा सदस्य. कोणताही कॉल कधीही येओ…प्राण्याच्या सुटकेसाठी दिनेश निघालाच समजा! आम्ही वसाहतीत पोहोचलो. एक चाळवजा झोपडपट्टी होती. वस्तीतील मुलं आमची वाटच बघत होती. आम्ही आल्याबरोबर घरांच्या ओळींमध्ये असलेल्या चिंचोळ्या वाटेवरून ती मुलं आम्हांला घेऊन गेली. वाटेच्या शेवटी एक मंदिर लागलं. मंदिराच्या गाभाऱ्यात कोपऱ्यात एक बॉनेट जातीचं माकड बसलं होतं. त्याचं वजन सात ते आठ किलो असावं. दिनेशने सोबत स्नेअर आणला होता. स्नेअर म्हणजे लांब काठीच्या टोकाला धातूच्या वायरचा एक लूप लावलेला असतो. तो लूप लांबून प्राण्याच्या गळ्यात अडकवता येतो. लूपच्या विशिष्ट रचनेमुळे प्राणी त्यात अडकतो; परंतु त्याला फास बसत नाही. दिनेशने हातातील स्नेअर त्या माकडाच्या गळ्यात कौशल्याने अडकवला; तसं ते माकड दात विचकत गुरगुरू लागलं. दिनेशने एका हाताने त्याची शेपटी पकडली आणि दुसऱ्या हाताने त्याचे पुढचे पाय आणि मानेवरील कातडी घट्ट पकडली. त्याने त्या मुलांना त्याच्या मानेवर अडकवलेला लूप काढायला सांगितला. त्याने त्या माकडाला सोबत आणलेल्या पिंजऱ्यात टाकले. मी इस्पितळात येऊन त्या माकडाची तपासणी केली; तर त्या माकडाच्या डाव्या पायावर एक जखम झाली होती. जखमेचं ड्रेसिंग करून मी त्याला आमच्या इस्पितळात दाखल करून घेतलं .
दि.६ .११.२०२३
संध्याकाळी साडेसातचा सुमार. ठाण्याच्या एका सेवाभावी संस्थेच्या स्वयंसेवकांचा फोन होता. एक आंधळं माकड इस्पितळात दाखल करण्यासाठी घेऊन येत होते. मला थोडी काळजी वाटू लागली; कारण आमच्याकडे माकडांसाठी तात्पुरते उपचार केंद्र आहे; परंतु अपंग माकडांना कायमस्वरूपी ठेवण्यासाठी सोय नाही; मग या आंधळ्या माकडाला कुठे ठेवावं याचा मी विचार करू लागले; परंतु तरीही त्या माकडाला दाखल तर करून घेऊ! पुढचं पुढे बघू असा विचार केला. प्राणिरक्षक झिरवेला ते माकड ताब्यात घेण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पहिल्यांदा त्या माकडाच्या पिंजऱ्याकडे गेले तर त्या माकडाच्या कपाळापासून खाली नाकापर्यंत गडद काळा थर होता. त्याला अजिबात दिसत नव्हते. आम्ही त्याला खाण्यासाठी केळं ठेवलेलंही त्याला कळायचं नाही; मग आमच्या इस्पितळात दाखल प्राण्यांची काळजी घेणारा प्रशांत टोकरे त्या केळ्याने त्याच्या हाताला स्पर्श करायचा; मग ते माकड केळं हातात घ्यायचं. त्याला पाणी ठेवलेलंही दिसायचं नाही; मग भांड्याचा आवाज करावा लागायचा… मग ते अंदाजाने भांड्यात तोंड घालून पाणी प्यायचं. आमच्या अस्तित्वाची चाहूल लागली तर गुरगुरू लागायचं. तो दिवस मी त्याचं नुसतं निरीक्षण केलं. त्याच्या कपाळावर आणि डोळ्यांवर कोणीतरी काळा द्रव फेकला होता. तो द्रव डोळ्यांत गेल्याने त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हते. माकडाबाबतचा हा माझा निष्कर्ष मी त्याच्या केसपेपरवर नोंदवला. घरी जाताना ठरवलं की उद्या त्याच्या या समोर दिसणाऱ्या काळ्याकुट्ट जखमांवर उपचार तर करू! उपचारासाठी त्याला बेशुद्ध करणे आवश्यक होते .
७.११.२०२३
सकाळीच त्या माकडाच्या पिंजऱ्याजवळ गेले. हातात बेशुद्धीचे इंजेक्शन होते. एका बाजूने मी प्रशांतला आवाज करायला सांगितला. त्या आवाजाने माकड पिंजऱ्याच्या दुसऱ्या टोकाला गेले. आता त्याचा मांडीचा भाग माझ्या समोर होता. मी चटकन इंजेक्शनची सुई त्याच्या मांडीवरील मांसात खुपसली. त्याला कळायच्या अगोदर औषध मांसात गेले; मग मी सगळ्यांना थोडं दूर व्हायला सांगितलं. पाचच मिनिटांत माकड पेंगायला लागलं. ते गाढ झोपी गेल्यावर आम्ही त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. प्राणिरक्षक मोरेंना मी त्याच्या जखमांचे ड्रेसिंग करायला सांगितलं. त्याच्या तोंडावरील काळ्या थरावर मोरेंनी हायड्रोजन पेरोक्साईड घासून लावले. त्यावर मलम लावले. मी पाठीमागून प्रतिजैविकाचे इंजेक्शन दिले. त्याला पुन्हा पिंजऱ्यात ठेवले . प्रशांतला त्याच्या डोळ्यांवरील जखमेवर डोळ्यांचे ड्रॅाप्स सिरींजने रोज फवारायला सांगितले. मी आता दहा-बारा दिवस सुट्टीवर जाणार होते; त्यामुळे प्रशांतला त्याची काळजी घेण्यास सांगितले.
२०.११.२०२३
सुट्टी संपवून मी ऑफिसमध्ये हजर झाले . ताबडतोब इस्पितळात दाखल असलेल्या प्राण्यांच्या पिंजऱ्याकडे गेले. इस्पितळात एक कपाळावर लाल जखम असलेलं माकड दाखल झालेलं दिसत होतं. मी प्रशांतला विचारलं, “आपलं ते काळ्या जखमेचं आंधळं माकड कुठे आहे?” प्रशांत म्हणाला, “हे बघा हेच ते माकड!” मी विस्फारून त्या माकडाकडे बघतच राहिले. त्याच्या कपाळावरील काळा रंग पूर्णपणे नाहीसा झाला होता. कपाळावरील जखम गुलाबी लालसर दिसत होती. ती जखम बरी होत होती; कारण बाजूने नवी गुलाबी त्वचा आलेली दिसत होती आणि मुख्य म्हणजे त्या माकडाला आता स्पष्ट दिसत होते. मी प्रशांतकडे पाहिले. तो म्हणाला, “मॅडम, तुम्ही उपचार केल्याच्या दुसऱ्या दिवसानंतर त्याच्या जखमेवरील काळी त्वचा गळून पडू लागली. डोळ्यांवरील काळा भाग पूर्णपणे निघून गेला आणि हळूहळू त्याला दिसू लागलं.” माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. बारा-तेरा दिवसांपूर्वी पूर्णपणे आंधळ्या असलेल्या माकडाला पुन्हा दिसू लागल होतं . जर ते आंधळं राहिलं असतं तर त्याला कायमच पिंजऱ्यात ठेवावं लागलं असतं. आता त्याला पुन्हा निसर्गात मुक्त करता येणार होतं. मला एक वाक्य आठवलं, “ डॉक्टर फक्त आजारावर उपचार करतो, बरं तर तो वर बसलेला परमेश्वर करतो.” या माकडाच्या नशिबात पुन्हा निसर्गातील मुक्तता होती म्हणून तर परमेश्वराने त्याला बरं केलं होतं. मी प्रशांतला शाबासकी दिली. त्याने एवढे दिवस मनापासून त्या माकडाची शुश्रूषा केली होती त्याचं हे फळ होतं. पशुवैद्य म्हणून आयुष्यात असे काही सार्थकतेचे क्षण येतात की त्या वेळी मन भरून येतं. मी भरलेल्या मनाने आणि डोळ्यांनी त्या माकडाकडे बघतच राहिले. तेही आता ओळखीच्या नजरेने माझ्याकडे बघत होतं. जणू मी केलेले उपचार त्याला कळले होते. नोव्हेंबर महिन्यात बहरलेल्या आइस्क्रीम क्रीपरचा गुलाबी रंग आणि या माकडाच्या जखमेचा आता दिसत असलेला लाल गुलाबी रंग दोन्ही मला तितकेच सुंदर दिसत होते; कारण ते निसर्गातील चैतन्याचे प्रतीक होते!
