गृहिणी ते विख्यात गायिका (उत्तरार्ध)
लग्नानंतर मालिनीताईंनी गाणं केलं पाहिजे, ही वसंतरावांची प्रेमळ अटच होती. अनेक गुणवान भारतीय स्त्री कलावंतांना आपली कला अपेक्षेप्रमाणे वाढवता येत नाही; मग ते गाणं असो, वाद्य वादन असो किंवा इतर कुठलीही कला. केवळ कलाच नव्हे; तर अनेक स्त्रियांना अर्धवट राहून गेलेलं शिक्षणही पूर्ण करता येत नाही. या पार्श्वभूमीवर वसंतरावांचे विचार किती वेगळे होते, काळाच्या पुढे होते याचं आश्चर्य वाटतं. त्यांच्या ‘रेट्या’मुळेच, मालिनीताईंनी गाण्याचा गांभीर्यानं विचार केला – त्यांचं गाणं होऊ शकलं आणि हजारो रसिकांना ते ऐकायला मिळालं. आपण खरोखरच भाग्यवान!
वसंतरावांचा कितीही पाठिंबा असला; तरी ताईंना सहजासहजी गाणं साध्य झालं, असं मात्र नाही. ताईंच्या शब्दांत, “माझा पहिला ‘प्रेफरन्स’ माझा संसार आणि तोही तुमच्या पुण्या-मुंबईप्रमाणे आटोपशीर नाही. संसार डिस्टर्ब करून मला करियर करायचं नव्हतं. ह्यांना तर त्या काळात गाण्याशिवाय इतर काही दिसतच नव्हतं. मी स्वयंपाक करताना हे म्हणायचे, ‘दोन बंदिशी पाठ कर. जन्माचं कल्याण होईल.’ मला काही उमगायचं नाही. हे संतापत; पण मी पडतं घेई. स्वयंपाक, धुणीभांडी, निवड-टिपण या साऱ्यात मी अगदी कंटाळून जात असे. गळा तयार असूनही एनर्जी नसेल; तर काय उपयोग? पण मी करत राहिले. यांच्या वेडामुळे माझं गाणं टिकलं. नाहीतर कधीच ते सुटलं असतं.”
हैदराबादला गेल्यावर मालिनीताईंना गाणं खूप ऐकायला मिळालं. संसार सांभाळून उपलब्ध वेळेत रियाज, गाण्याचा विचार कसा करायचा ते साध्य होत गेलं. त्यांच्या मते, “माझं गाणं मर्यादित वेळेतच होत राहिलं. संगीतविद्या अथांग आहे त्यामुळे ती कधीच पूर्णतः साध्य होत नाही. या जन्मात जे साध्य करता आलं नाही, ते पुढील जन्मात…” परंतु या जन्मातच त्यांना खूप काही साध्य झालं. अगदी पहिल्या ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’तच! ते साल होतं १९६६. त्याचं असं झालं, हैदराबादला स्वतःच्या लग्नाच्या स्वागत-समारंभ प्रसंगी ताईंचं गाणं झालं. ते इतकं रंगलं, की पंडिता गंगूबाई हनगलांपर्यंत ही बातमी पोहोचली. त्यांनी हुबळीत मालिनीताईंचं गाणं ठेवलं. एवढ्यावरच गंगूबाई थांबल्या नाहीत. त्यांनी पुण्यात पं. भीमसेन जोशींना कळवलं आणि पंडितजींनी ‘सवाई’त मालिनीताईंचं गाणं ठरवूनही टाकलं. ‘सवाई’त गायची संधी मिळणार याचा आनंद तर होताच; पण प्रचंड दडपणही होतं, कारण त्या नुकत्याच बाळंतपणातून उठल्या होत्या. मुलगी संगीता दोन महिन्यांची होती; पण वसंतरावांनी निर्णय घेतला आणि संगीतासह ताई पुण्यात हजर झाल्या. वसंतराव म्हणाले, “इकडच्या लोकांना गाणं आवडलं तर चालू ठेवू; नाहीतर तंबोरा आयुष्यभर बंद ठेवू. छान तालासुरात गा. उगीच करामत करायला जाऊ नकोस.” पं. भीमसेनजी आणि डॉ. वसंतराव देशपांड्यांनीही धीर दिला, प्रोत्साहन दिलं. त्या दोघांना नमस्कार करून ताई व्यासपीठावर बसल्या. समोर अक्षरशः जनसागर! एवढ्या मोठ्या श्रोतृसमुदायासमोर त्या प्रथमच गात होत्या. त्यांच्या आधी पं. शंभूमहाराजांचं नृत्य झालं होतं. माहोल त्यानं भारावलेला होता; पण ताईंनी गायला सुरुवात केल्यावर रसिकांची दाद येऊ लागली – तीही पुणेकरांची! गाणं छान झालं. त्या पहिली लढाई जिंकल्या. तिथूनच पुढे त्यांचा विख्यात गायिकेच्या दिशेनं प्रवास सुरू झाला होता असं म्हणता येईल.
नंतरच्या काळात याच ‘सवाई’ महोत्सवात रसिकांच्या आग्रहाखातर त्या अनेक वेळा गायल्या. सदतीसाव्या ‘सवाई’ महोत्सवात त्यांच्या आधी पं. रविशंकरांच्या सतारीचा कार्यक्रम झाला होता. माहोल रविशंकरमय होऊन गेला होता. त्यानंतर ताईंचं गाणं होतं. साहजिकच त्यांच्या मनावर ताण होता. पहाटेचे चार वाजले होते. ताई व्यासपीठावर आसनस्थ झाल्या. रागाचं नाव जाहीर झालं, ‘नटभैरव’. टाळ्यांचा अक्षरशः कडकडाट झाला. ताईंनी गायला सुरूवात केली आणि पहिल्या षड्जाला अशी काही उस्फूर्त दाद आली, की त्यांनी मैफलीचा ताबा घेतला.
पहिल्या ‘सवाई’तल्या गाण्यानंतर कार्यक्रमांची निमंत्रणं येऊ लागली. त्यातून गाण्यात परिवर्तन येत गेलं. मालिनीताईंचं सुरुवातीचं शिक्षण हे विद्यालयीन शिक्षण होतं. ते ग्वाल्हेर घराण्यापुरतं मर्यादित होतं. आता आपल्या गाण्याचा त्या स्वतंत्र विचार करू लागल्या, ‘मैफलीत गाणं मांडण्यासाठी आपण वेगळं काय करू शकतो?’ यातून वेगवेगळ्या शक्यतांचा विचार झाला. वसंतरावांनीही मालिनीताईंच्या या विचाराला पाठिंबा दिला. कुणाचंही अनुकरण न करता, त्यांनी इतरांच्या गायकीतील काही वैशिष्ट्यं आपल्या गायकीत शोभतील व परंपराही जपली जाईल अशा पद्धतीनं घोळवून घेतली. अनेक मोठ्या गायकांच्या गायकीचा त्यांच्यावर प्रभाव होता. ताईंच्या शब्दांत सांगायचं तर, “किशोरी आमोणकरांच्या गाण्यातली अनपेक्षितता मला आवडे. कुमार गंधर्वांच्या स्वरलगावांचा माझ्यावर प्रभाव होता. पं. अभिषेकीबुवांकडून गाण्याची व्यापकता मी घेतली. त्यानं बाळबोधपणा कमी झाला. ते हैदराबादला यायचे तेव्हा भरपूर नवं, अनवट ऐकवायचे. त्यातून शास्त्र सांभाळून राग मोठा करणं, हा विचार सुरू झाला.” हळूहळू मालिनीताईंचं गाणं बहुस्पर्शी होत गेलं; तरीही परंपरेतले राग गाण्याकडेच त्यांचा स्वाभाविक कल होता. अनवट राग आवडायचे; पण मैफलीत मांडावेत असं फारसं कधी त्यांना वाटलं नाही. त्या म्हणत असत, “नेहमीचीच गोष्ट अधिकाधिक चांगली जमली, की मला जास्त आनंद होतो.”
हळूहळू देश-परदेशांत ताईंचा चाहता वर्ग वाढत गेला. बरोबरीनं मानसन्मान, पुरस्कारही मिळाले. सततच्या कार्यक्रमांतून गाणंही वाढत गेलं. त्यातून त्यांची स्वतंत्र गायकी प्रस्थापित झाली. ‘टप्पा’गायन ही त्यांची खासियत बनली. त्याविषयी त्या म्हणाल्या होत्या, “टप्पा एका आवर्तनात गाणं ही ग्वाल्हेर घराण्याची पद्धत आहे. तेव्हा तानेचा स्वर अन् स्वर दाणेदार हवा. टप्प्याच्या बांधणीत, प्रत्येक स्वरावलीत स्वतःचं असं वजन असतं, लय असते. टप्पा गाण्यासाठी गळा स्वराधीनच हवा.” अनेक वर्षं अस्थम्याचा त्रास सहन करूनही मालिनीताईंनी प्रयत्नपूर्वक गळा स्वराधीन ठेवला, हे विशेष.
गाणं हा व्यवसाय म्हणून या पतिपत्नींनी कधी केला नाही. गडगंज पैसा मिळावा, नावलौकिक मिळावा अशी ईर्षा बाळगली नाही. गाणं ही दोघांचीही जीवननिष्ठा होती. मालिनीताई म्हणत असत, ‘गाणं फक्त लोकांसाठी नसतं, तर ती एक पूजा आहे. त्यात आनंदानं साऱ्यांनी एकत्र यायचं असतं.’ कदाचित म्हणूनच या पूजेत त्यांनी रसिकांना सामावून घेत, आपल्या संगतकारांना सन्मानानं वागवत, त्यांच्याही आर्थिक, मानसिक स्थितीचा विचार करत संगीताची पूजा केली, असं निर्विवादपणे म्हणावंसं वाटतं.
उत्तरार्ध
