एक सामान्य आठवण माझ्या मनात का बरं जपून ठेवली गेली असावी? मी आणि माझी आई एका बसची वाट पाहत होतो. बस दुरून येताना दिसत होती; पण तिचा वेग अतिशय कमी आहे असं भासत होतं. ते वाट पाहणं सहनशीलतेची परीक्षा पाहणारं होतं. शेवटी ती बस जेव्हा आमच्या थांब्यावर पोचली तेव्हा मात्र ती अगदी कमी वेळ थांबली आणि आम्ही ती बस पकडू शकलो नाही. आमच्या दोघींच्याही हातात बरंच सामान होतं आणि माझ्या हातातलं सामान नेमकं मी खाली ठेवलं होतं. ते उचलायला मला वेळ लागल्यामुळे बस चुकली. मागे वळून पाहताना लक्षात येत आहे की ही घटना तिच्या आयुष्यात पुढे होणाऱ्या प्रदीर्घ आजाराचं प्रतीक होती. शेवटची दोन-अडीच वर्षं तिला जेवू घालावं लागायचं; त्या वेळी मला ही घटना आठवे. या वेळी मात्र आईनं बस चुकू दिली नाही. तिनं मृत्युपत्र, आर्थिक कागद -पत्रं तयार ठेवली होती. मृत्यूची ती वाट पाहत होती. भरल्या घरात, पणतीचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचा आनंदसोहळा चालू असताना तिला शांतपणे मृत्यू आला. या बसची वाट पाहताना तिच्याबरोबर घालवलेला काळ नेहमीच आठवत राहील. तिचं जेवण अर्धा पाऊण तास तरी चाले. तेव्हा आम्ही ओप्रा विनफ्रीने घेतलेल्या माया अँजेलु, टोनी मॉरिसन यांच्या मुलाखती, उत्तम वक्त्यांची भाषणं, कवितांचे कार्यक्रम असं बरंच काही ऐकत असू. हे सगळं आईनं ठरवलेलं. तिच्या आयपॅडवर (मायपॅड!) तिच्या उजव्या हाताच्या एका बोटाने ती यू ट्यूब सुरू करू शकत असे. त्या अवस्थेतही आई म्हणून ती पन्नाशीतल्या मला समृद्ध करीत राहिली. तिच्याबरोबर कितीदातरी खदखदून हसल्याचं आठवतं आहे.
तिचं शरीर निकामी होत होतं; पण मन कोमेजलं नव्हतं. तिच्यात परत परत फुलण्याची शक्ती होती. तिच्या चेहऱ्यावरच्या तरतरीत सदैव एक हसू लपलेलं असायचं. ते हास्य आमच्या घराचा आधार होतं. या हास्यानं अनेक फटी लिंपल्या गेल्या, मार्गावरचे काटे मृदू झाले, चढ असलेली वाट तेवढी कठीण भासली नाही. अशा माझ्या चिरउत्साही आईचं मन आणि शरीर यांच्यातील चैतन्यांची सांगड निसर्गाला घालता आली नाही. तिला याचे फार आश्चर्य वाटायचे. तिचे स्नायू हळूहळू निकामी होत गेले – दिवाळीत लावलेल्या दिवलाण्या (पणत्या) एकामागून एक ज्योती मंद होत विझत जाव्या तसे! तिला एक असाध्य, लाखांत एकाला होणारा दुर्मीळ आणि दुर्धर असा आजार झाला- Multisystem atrophy – ह्या नावावरूनच कळतं की हा रोग किती व्यापक आहे ते! ह्या आजारात चेतापेशी आणि मज्जातंतूंच्या जाळ्यातील हालचाल नियंत्रित करणारी केंद्रं वाळवी लागून घराचा लाकडी सांगाडा पोखरला जावा तशी क्षतभरित होतात. ही प्रक्रिया प्रदीर्घ असते, माणसाच्या आयुष्याची एक-दीड दशके चालत राहावी इतकी वेदनादायकरित्या प्रदीर्घ असते. ही वाळवी का लागते? ह्याचे परिपूर्ण उत्तर वैद्यकीय विज्ञान देऊ शकत नसले तरी त्याबाबत जो थोडाफार अभ्यास झाला आहे त्यानुसार चेतापेशींच्या विविध अंतर्गत प्रक्रियांचे नियंत्रण करणारी व त्यांत समतोल राखणारी फॉस्फोरिलेशन नावाची एक महत्त्वाची रासायनिक प्रक्रिया असते. या आजारात ही प्रक्रिया गरजेपेक्षा जास्त काम करू लागते आणि त्यामुळे चेतापेशींचा समतोल बिघडतो. त्यामुळे पेशींच्या आतमध्ये बरीच घडामोड, तोडमोड होते, नको असलेले पदार्थ बाहेर फेकले जात नाहीत, हवे असलेले आत यायला जागा उरत नाही. ही आतूनच लागलेली वाळवी असते.
आपले आरोग्य हे जर आपल्या मनाचे प्रतिबिंब असेल तर तिला ओळखणाऱ्या व्यक्तींना तिच्या आजाराच्या स्वरूपाचे आश्चर्य वाटायला नको. माझ्या आईच्या बाबतीत तिच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असे. प्रत्येक जुन्या ओळखीला जोडून ठेवत नव्यांशी जुळण्याचा प्रयत्न करायचा, असे तिचे जगण्याचे तंत्र होते. तिने आयुष्य कधी edit केले नाही. आयुष्याकडे वस्तुनिष्ठपणे (objectively) पाहिले नाही. नकारात्मक व्यक्ती, गोष्टी आजूबाजूला वारुळासारख्या वाढू दिल्या. वास्तवाचे परीक्षण करण्याची ताकद तिच्याजवळ नक्कीच होती; पण तेवढा मानसिक वेळ तिनं स्वतःला दिला नाही. आयुष्याचा प्रवास सुरू करताना इष्ट स्थळी पोचण्यासाठी तिच्याजवळ सगळी सामग्री होती, उत्साहाचं इंधन होतं; त्यामुळे ती अनेक चढ-उतार सोसू शकली; पण प्रत्येक चांगल्या-वाईट घटनेतून जो ताण निर्माण होतो तो तिला झटकता आला नाही. तो जमत गेला – अगदी पेशीय पातळीवर पोहचेपर्यंत !
डोंगरमाथ्यावरून एकीकडचा चढ आणि दुसरीकडची उतरण स्पष्ट दिसावी तसे मला आयुष्याच्या या टप्प्यावर अनेक अंधुक दिसणाऱ्या, अस्पष्टपणे जाणवणाऱ्या गोष्टी कळायला लागल्या आहेत. हे कळणे समृद्ध करणारे आहे. शेवटी आईवडिलांचे आयुष्य हेच खरे पहिले पाठ्यपुस्तक असते ना! पण ते वाचायला धैर्य लागते. अनेक उत्तरं मिळत जातात – संपूर्ण, अपूर्ण अशी ! त्या त्या वेळी तिने किंवा आईबाबांनी मिळून घेतले गेलेले निर्णय आयुष्याचे कोडे सोडवणारे तुकडे होते की उलट त्यामुळे आयुष्य अधिकच गुंतागुंतीचे झाले, हे अलिप्तपणे आता पाहता येतं. आई-वडील ह्या कोणे एके काळी वयाने लहान, अननुभवी व्यक्ती होत्या, त्या एका विशिष्ट प्रकृतीच्या समाजाचा भाग होत्या, हे चित्र त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या अस्तित्वाने फुटणारे धुमारे नाहीसे झाल्यानंतर, त्यांचे नसणे स्वीकारल्यानंतर काही काळाने स्पष्ट झाले. ही कदाचित सर्वांच्याच मनात घडणारी नैसर्गिक प्रक्रिया असावी.
माझी आई महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या चंद्रपूर (चांदा) या गावी १९३९ साली जन्मली आणि वाढली. शैक्षणिक आणि क्रीडाक्षेत्रात आघाडीवर असलेले, पुरोगामी विचारांचे देवईकर कुटुंब हे तिचे माहेर. या कुटुंबाचा एक जुना कृष्ण-धवल फोटो आहे. त्यात एकत्र कुटुंबात वाढणारी सर्व भावंडे आहेत. ह्यांपैकी सर्वात थोरली मुलगी शोभा मोरेश्वर देवईकर या मुलीच्या पोटी मी जन्म घेणार हे विधिलिखित होते. हा फोटो पाहणे फार गमतीचे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे आहे. तिचे बालपण ज्या वाड्यात गेले त्या वाड्यात जाणतेपणी मी राहिले नाही; पण तिथला तिचा काळ लाडाकोडात गेला असावा असे तिच्या बोलण्यात वेळोवेळी येणाऱ्या उल्लेखांवरून कळायचे. लहान मुलाने सुरक्षित वाटावे म्हणून आपले छोटेसे ब्लॅंकेट घेऊन फिरावे तसे ती या आठवणी घेऊन तिच्या सासरचा सुरुवातीचा काळ जगली असावी. तिला तिच्या माहेरच्या समृद्धीचा, पुरोगामित्वाचा अभिमान होता आणि तो तिच्या वागण्या-बोलण्यात डोकवायचा – आजूबाजूच्या व्यक्तींवर काय परिणाम होतो आहे, याचा विचार न करता ! आता मला वाटतं की (सासरी) असे वागणे-बोलणे हा तिचा (किंवा कोणाचाही) एक स्वसंरक्षणाचा पवित्रा असावा.
ज्या घरात तिचे लग्नापूर्वीचे आयुष्य गेले ते घर म्हणजे माझे अतिशय आवडीचे ठिकाण, माझे आजोळ. ‘जानकी, चुंगी करनाका, चांदा’ असा त्याचा पत्ता होता. जानकी हे तिच्या आजीचे नाव, जी तिच्या प्रेमळपणाबद्दल प्रसिद्ध होती. तो प्रेमळपणा आपल्या अबोल आणि व्यवहारी स्वभावामुळे संतुलित करणारे तिचे आजोबा म्हणजे दादाजी. या दोघांच्या सहवासातून मिळालेल्या उबेमुळे तिच्यातही तोच गुण निर्माण झाला असावा… म्हणूनच की काय तिची सगळीच चुलत-आते-मावस भावंडं तिला सख्खीच मानत.
ती धरून सख्खी पाच भावंडं – दोन-तीन वर्षांच्या कालांतराने झालेली. सर्वांची विद्यालयीन शिक्षणं आणि गरजा पुरवताना आजी-आजोबांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांना पहिले अपत्य म्हणून तिने अनुभवले. तेव्हाच तिने कळत-नकळत काटकसरीपणा अंगी बाणला. एखादी वस्तू सुवासिक डब्यातून काढली तरी तिला सुवास येत राहावा त्याप्रमाणे हा तिचा गुण शेवटपर्यंत टिकला. तिच्या दृष्टीने वस्तू साचवणे हा दुर्गुण ! ती कमीतकमी साड्या आणि वस्तू घरात ठेवी. हे तिला कसं जमलं असेल असं आता स्वतःचा संसार करताना वाटतं.
त्याकाळात बरंच अंतर ती चालत कॉलेजात जात असे, ट्युशन्स घेत असे. हा काळ पण तिच्या बोलण्यात एखादी मजेदार किंवा हृद्य आठवण सांगावी असा येत असे. त्या कोवळ्या वयात केलेल्या त्यागाचे किंवा घेतलेल्या कष्टांचे भांडवल तिने कधीही केल्याचे स्मरत नाही. पुढे तिचे ठरलेले लग्न मोडले; पण नंतर डॉ. मल्हार कावळे या देखण्या, हसतमुख, सुस्वभावी मुलाने होकार दिला आणि ते लग्न सुरळीत पार पडले. ही आठवण मागच्या सगळ्या जखमांवरचे मलम होती. त्या लग्नाचा एक काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारा कृष्ण-धवल फोटो आहे. या फोटोतील नवरा-नवरी किती निरागस दिसतात !
कृष्ण-धवल फोटोंमध्ये स्मृतीच्या विवरात जाऊन प्रकाश पाडण्याची अद्भुत शक्ती आहे. त्या प्रकाशात ‘विशाखा मल्हार कावळे’ हे नवीन नाव पेलू पाहणारी तरुण मुलगी तिच्या वयाच्या पतीबरोबर उत्साहानं संसार करायला हिंगणघाट नावाच्या गावाला आलेली दिसते. हिंगणघाट हे कुठल्याही इतर गावांप्रमाणे स्वतःचे जातीयता, धार्मिकपणा, श्रीमंत-गरीब असे कंगोरे घेऊन जगणारं गाव. फक्त हे गाव छोटं असल्यामुळे हे कंगोरे जास्त बोचायचे. ‘बम्मन का लडका’ म्हणून माझ्या बाबांना घर भाड्याने मिळालं नाही; पण पुढे त्यांच्या प्रॅक्टिसचा जम बसल्यावर आणि आईचा उत्तम शिक्षिका म्हणून लौकिक वाढल्यावर मात्र त्यांच्या गुणांवर खूश होऊन समाजाने त्यांना ब्राह्मण असणं माफ केलं.
आजूबाजूच्या लोकांमध्ये आम्ही आमच्या भाषेमुळे, राहणीमानामुळे आणि आई-बाबांना मिळणाऱ्या मानामुळे वेगळे दिसत असू. आई कन्याशाळेत संस्कृत व मराठी शिकवत असे. तिला दिल्या गेलेल्या निरोप प्रसंगी ह्याच गावात वाढलेली एक मुलगी म्हणाली, “कावळे मॅडम जेव्हा आमच्या घरासमोरच्या रस्त्यावरून शाळेत जायच्या तेव्हा आम्ही त्यांना पाहायला खिडकीत जमायचो. त्यांचे लांब केस, त्यांनी माळलेलं फूल आणि हसतमुख चेहरा हे पाहून आनंद व्हायचा. त्या आमच्यासाठी आदर्श होत्या.” माझी आई किती छान, साधी आणि प्रसन्न दिसायची हे तिच्या वेगवेगळ्या सामाजिकप्रसंगी काढलेल्या फोटोंवरून दिसून येतं. लहानपणी (आणि अजूनही ) मला माझी आई जगातली सगळ्यात सुंदर बाई वाटे. आमच्याकडे एक फ्रेम केलेले मोहक चित्र होते. एक सुंदर स्त्री शुभ्र वस्त्रे लेऊन फुले तोडते आहे असे ते चित्र होते. त्या स्त्रीच्या पेहरावावरून ते युरोपियन असावे. ते माझ्या आईचेच चित्र आहे असा माझा समज होता. आईला मी हे कॉलेजवयात असताना सांगितले होते तेव्हा ती खूप हसली होती. आमचं घर अखंड राबतं असायचं. विविध प्रकारचे आणि जाती-जमातीचे लोक येत असत अगदी स्वयंपाकघरापर्यंत. आई सर्वांचे हसतमुखाने स्वागत करी; पण आम्हांला घरात कधीच प्रायव्हसी मिळाली नाही. बाबांचा दवाखाना हा घराचाच एक भाग असल्यामुळे काही पेशंट्स आमच्या दिवाणखान्यात येऊन बसत. त्यांच्याशी आम्हांला बोलावं लागे आणि आईला त्यांचं चहापाणी करावं लागे. तिच्या माहेरचे लोकपण मधूनमधून येत. अशावेळी बाबा तिला थट्टेने शोभाक्काताई म्हणत असत. शोभा हे तिचे माहेरचे नाव आणि तिची भावंडे तिला आक्का किंवा ताई म्हणत असत.
आईबाबांचे अनेक गोष्टींवर मतभेद होते; पण एका गोष्टीवर मात्र त्यांचं जमायचं – ती गोष्ट म्हणजे नाटक! त्या काळी आईबाबांनी काढलेल्या ‘अभिव्यक्ती’ या संस्थेमुळे हिंगणघाटमध्ये सांस्कृतिक चैतन्य होतं. आम्ही तिघी बहिणींनी या संस्थेने केलेल्या नाटकांसाठी प्रॉंप्टिंग केलेलं आहे, नाटकांत कामं केलेली आहे. ‘तुझे आहे तुजपाशी’मधली गीता एंट्री घ्यायला कशी विसरली, ‘प्रेमा तुझा रंग कसा’मध्ये निळूभाऊंची मिशी कशी पडली, ‘घरोघरी हीच बोंब’ मध्ये संवादांची गडबड कशी झाली, एका नाटकात माझ्या मधल्या बहिणीने – अनघाने – स्टेजवरील सोफ्याच्या खाली लपून प्रॉंप्टिंग कसे केले आणि अर्थात या सर्व नाटकांच्या तालमीची मजा… ह्या सगळ्या आमच्या कुटुंबाच्या हृद्य आठवणी आहेत. आईने ह्या सर्व आनंदोत्सवात समरसून भाग घेतला. ‘तुझे आहे तुजपाशी’ मधली उषा म्हणून ती मला नेहमीच आठवत राहील. (आणि बाबा डॉक्टर सुभाष!)हे पात्र तिच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी योग्य होतं. तिला समाजसेवेची अत्यंत कळकळ होती आणि तिच्यात उषेचा तेजस्वीपणादेखील होता.
तिने त्या छोट्या, उदासीन गावात महिलांना रोजगार मिळावा म्हणून तिनेच निर्माण केलेल्या महिला मंडळातर्फे एक दुकान चालवले होते. दर वर्षी तिच्या पुढाकाराने शारदा उत्सव गावात होत असे. त्यात सर्व वयाच्या महिला भाग घेत. दोरीवरच्या उड्या, रांगोळी,सुगम संगीत यांच्या स्पर्धा तसेच एकांकिका, समूहगायन, शेवटी काला खाणे असा जल्लोष असे. एकदा या उत्सवात राम-रावणाचे नाटुकले केले होते. त्यात रावणाच्या ऐवजी राम खाली पडल्यामुळे हास्यकल्लोळ उसळला आणि तो उत्सव गावासाठी अविस्मरणीय ठरला. रामाचे हे पतन म्हणजे त्या काळच्या स्त्रियांच्या अवस्थेचे जणू एक प्रतीकच होते त्याची साक्ष म्हणजे या गावातले सूतिकागृह – कमलाबाई होस्पेट यांनी नागपूरला सुरू केलेल्या मातृसेवा संघ या संस्थेची शाखा! या संस्थेत परित्यक्ता स्त्रियांना आसरा मिळे. आई या संस्थेशी तन-मन-धन या सर्व पातळ्यांवर निगडित होती. तिचे आणि बाबांचे ते खरे देऊळ होते. आम्ही कुटुंब म्हणून क्वचितच देवळात गेल्याचं आठवतं; पण सूतिकागृहाच्या प्रत्येक समारंभाला आमचं कुटुंब हजर असे. या संस्थेतील स्त्रिया तिच्याशी मनाने बांधलेल्या होत्या.
माझी आजी – थोर समाजसेविका शकुंतलाबाई देवईकर आणि माझी आई या जेव्हा बोलत असायच्या तेव्हा ते बोलणे फक्त पदार्थांच्या कृती, नातेवाइकांमधील नवीन घडामोडी इत्यादी केवळ सांसारिक बाबींवर नसून बहुतांशी गरजू स्त्रियांविषयी असायचे. ही पोकळ तात्त्विक चर्चा नसे; तर नवऱ्याने टाकून दिलेली स्त्री, नडलेली स्त्री, बलात्कारातून गर्भार राहिलेली स्त्री अशा खऱ्याखुऱ्या, हाडामांसाच्या व्यक्तींविषयी असे. या स्त्रिया जवळपासच्या खेड्यातल्या किंवा गावातल्यापण असत. त्यांना योग्य ती मदत या दोघींमुळे लगेच मिळत असे. माझ्या आईने तिच्या आईकडून हा जो वसा घेतला होता त्याला समाजकार्य असे मोठ्ठे नाव नव्हते. त्यांनी कित्येकींसाठी जे केले त्याची कधी बातमी व्हावी असे त्यांना वाटलं नाही; कारण त्या स्त्रियांच्या वेदनांमधून भारतीय स्त्रियांच्या भूतकाळाची आठवण ताजी राहत असावी. बरेचदा रात्री माझ्या आईला बालविधवा, परित्यक्ता, कुचंबणा झालेल्या स्त्रियांची आठवण येऊन झोप येत नसे, असे तिने मला सांगितल्याचे आठवते. भूतकाळ आपण बदलू शकत नाही पण वर्तमानकाळात तरी आपण नक्कीच अबलांना सबला करू शकतो असा आशावाद आणि आत्मविश्वास त्या दोघींमध्ये होता आणि हे काम म्हणजे अप्रिय सामाजिक इतिहासाने केलेल्या जखमेवरचं मलम होतं.
सूतिकागृहाचे काम, महिलामंडळाचे काम, राबतं घर, साहित्यिकांची बडदास्त, तीन मुली, अतिशय व्यग्र असलेला डॉक्टर नवरा असं आयुष्य दुथडी भरून वाहणाऱ्या नदीसारखं भरधाव वेगानं चालू होतं. नदीच्या पात्रात दगड-धोंडे, काटक्या -फांद्या वाहत येऊन प्रवाहाला अडथळा निर्माण व्हावा, भोवरे निर्माण व्हावे असं व्हायला लागलं. अनेक गंभीर आणि अस्तित्वविदारक घटनांना वारंवार तोंड द्यावं लागलं. आम्ही तिघी परदेशी निघून गेलो. ती फार एकटी पडली; तरी पण मोठी मुलगी म्हणून मला कधी तू परत ये, आमच्यासाठी काहीतरी कर असं तिने म्हटल्याचं स्मरत नाही. आईबाबा दोघेही जेव्हा नागपूरला नवीन अपार्टमेंटमध्ये राहायला आले तेव्हा तिला लहान मुलासारखा आनंद झाल्याचा आठवतो; कारण तिची भावंडं तिला सहज भेटू शकणार होती – हिंगणघाटसारख्या आडगावी येण्याऐवजी! तिथे स्थिरावल्यानंतर माझ्या मधल्या बहिणीला, अनघाला न्यूझीलंडला भेटायला ते जाऊन आले. तिथला तिचा संसार, तिनं निर्माण केलेलं विश्व, तिचं समुद्राकाठचं अतिशय सुंदर घर या सर्व गोष्टी पाहून त्यांच्या जगण्याला एक नवीन झिलई आली यात काही शंका नाही.
बाबांचं हार्ट फेल्युअर आणि नंतर मोठ्ठी शस्त्रक्रिया या काळ्या बोगद्यातून गेल्यानंतर आईच्या हाताचा कंप, बोलण्याचा व गिळण्याचा त्रास, वारंवार पडणे ह्या सर्व समस्या वाढतच गेल्या आणि तिला व्हिलचेअरशिवाय पर्याय उरला नाही. त्या काळातसुद्धा तिच्या न कळणाऱ्या बोलण्याविषयी खिन्न होण्याऐवजी आईबाबा दोघंही खूप हसायचे. त्यातून त्यांना विनोद निर्माण झालेला दिसायचा. आयुष्याकडे मला एवढे अलिप्तपणे पाहता येईल का?
अनेक वर्षं आग्रह करूनही त्यांनी अमेरिकेचे ग्रीन कार्ड घेतले नाही. शेवटी माझ्या जबाबदाऱ्या संपल्यावर त्यांना मी काही एक पर्याय न देता घेऊन आले. बाबा गेल्यानंतर ती जवळपास अडीच वर्षे जगली. त्यात अर्धाकाळ माझ्या धाकट्या बहिणीकडे, राधाकडे होती. तेव्हा तिचा ऐंशीवा वाढदिवस राधाने अगदी आईला आवडेल अशा पद्धतीने साजरा केला – तिला देवानंदचा सिनेमा दाखवून, तिच्या भावंडांच्या फोटोंची चित्रफीत दाखवून, तिच्या आवडत्या लोकांना फोन करून… आईला अंघोळ घालायला येणाऱ्या हॉस्पिसच्या नर्सेससुद्धा कुटुंबीयांप्रमाणे तिच्या या आनंदात सहभागी झाल्या होत्या.
माझ्या आईचा देवावर विश्वास होता; पण त्याचा कोलाहल नव्हता. जीवनात अतिशय कठीण प्रसंग येऊनही ती कधी बुवा-महाराज-साधू इत्यादींच्या मागे लागली नाही. तिच्यात एक अंतर्भूत असे स्थिर अधिष्ठान होते. ते कधी हलले नाही. तिला कुठल्याही घटनेची व्यावहारिक बाजू प्रथम दिसायची. माझी एक आतेबहीण मूल झाल्यावर लगेच दुर्दैवाने वारली. ते मूलही दगावलं. तेव्हा आई म्हणाली होती की बरं झालं मूल तिच्यामागे जगलं नाही. त्यावेळी मला एक नवीन दृष्टी प्राप्त झाली, जी आता पॅलिएटिव्ह केयरच्या कामात उपयोगी पडते आहे. दुसरी आठवण अशी की गावातली एक मुलगी वेश्याव्यवसाय करते असे बोलले जायचे. आईच्या मते तिचा हा व्यवसाय असेलच तर दारुड्या बापाचा संसार करण्यासाठी केलेली ती एक मोठ्ठी तडजोड होती. तिच्या तारुण्याचा भर ओसरल्यावर तिला अर्थार्जनाचा काहीही मार्ग उरणार नाही. अशा बायकांसाठीच तर कमलाबाई होस्पेट यांनी सूतिकागृह निर्माण केलं आहे, याची जाणीव तिने सूतिकागृहाच्या कार्यकारी मंडळाला करून दिली आणि त्या मुलीला तिथे काम दिलं.माझ्या शाळकरी वयात ती गजानन महाराजांची पोथी वाचत असे. (त्यातील लोकमान्य टिळक आणि गजानन महाराज एका नावेत बसले आहेत असं चित्र मला पाहायला आवडत असे.) पण त्या पलीकडे ती कुठलेही धार्मिक किंवा आध्यात्मिक वाचन करताना दिसली नाही. धार्मिक उहापोहापेक्षा तिने देवानंद-मधुबालाच्या चित्रपट पाहणे कधीही पसंत केले असते.
वाचन तिला अतिशय प्रिय होते. तिला कधीही वेळ मिळाला तर ती वाचताना दिसत असे. तिच्या आयुष्यातील ताण कमी करायचा असला तर ती पुलंची पुस्तके वाचत असे. एकदा अंथरुणाला खिळल्यावर तर तिला वेळच वेळ होता; पण ती कधी निराश आणि दुःखी दिसली नाही. सर्वात शेवटी तिने वाचलेले आणि तिला आवडलेले पुस्तक म्हणजे श्रीनिवास कुलकर्णी यांचे ‘डोह.’ अस्वस्थतेवर औषधे पेपरमिंटसारखी सहज घेणाऱ्या समाजात अनेक दशके डॉक्टर म्हणून काम केल्यावर माझी आई या बाबतीत मला महान वाटते. तिने स्वतःच्या अस्वस्थतेवर उपाय स्वतःच शोधला होता. हे बुद्धिमत्तेचे आणि अंतर्गत स्थैर्याचे लक्षण आहे.
तिला एकदा मी कार्डिओलॉजिस्टकडे नेले होते. सगळ्या चाचण्या झाल्यावर तो म्हणाला, ” She has a good heart,” आणि मी माझ्या व्हिलचेअरमध्ये बसलेल्या आईचा वाकडातिकडा झालेला हात, ज्या हातांनी अनेकांची आयुष्यं उजळवली तो हात, हातात घेऊन म्हटले, “Of course, I know that.” त्यावेळी आई गोड हसली. तिचं हास्य म्हणजे आयुष्यातील सर्व युद्धांत जय मिळवल्याची पावती होती.


फारच सुंदर लेख ! आईंचे व्यक्तिमत्व आणि भाग्यश्री यांचे लेखन दोन्हीही आवडले .माझ्या मनात माझ्या आईच्या अनेक स्मृती जागृत झाल्या. त्यांच्या आईच्या आजारपणा वरचा भाग वाचताना माझ्या पत्नीचा घास घेणाऱ्या मोटर न्यूरॉन डिसीज ची आठवण झाली .त्यावरचा माझा लेख अंतर्नाद मध्येच 2018 च्या दिवाळी अंकात आला होता. असो .
पुन्हा एकदा भाग्यश्री बारलिंगे यांचे आभार आणि अंतर्नादचेअभिनंदन !
भाग्यश्री,
तुमच्या आईवरचा अंतर्नादमधला “सहृदयी” हा लेख आणि तुमच्या वडिलांवर तुम्ही चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्समधे लिहिलेला “चक्र आणि आरे” (https://marathi.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/thank-you/cycle-life-story/articleshow/68269448.cms#google_vignette) हा लेख, हे दोन्ही लेख वाचून माझ्या मनात विचार आला तो “भाग्यं श्रियं यस्या सा” ह्या बहुव्रीहि समासाधिष्ठित “भाग्यश्री” ह्या तुमच्या नावाचा.
तुमच्या आईची आणि वडिलांची, दोघांचीही आयुष्यं असामान्यपणे कमालीची समृद्ध होती.
त्या दोघांची तुम्ही रेखाटलेली दोन्ही व्यक्तिचित्रं त्यांमधल्या माहितीमुळे आणि लेखनकला ह्या दृष्टिकोनातून, अशा दोन्ही प्रकारांनी उत्कृष्ट दर्जाची आहेत.
तेव्हा तुमच्या असामान्य आईवडिलांबद्दलचा माझा अतिशय आदर आणि लेखिका म्हणून तुमच्याबद्दलचे माझे खूप कौतुक मी इथे नमूद करतो.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः।
निनाद