ये है बॉंबे मेरी जान… भाग ३ 

मुंबईचा इतिहास भाग ३

(पोर्तुगीज शासनाचा काळ इ.स. १५०० ते १६६१)

 वरील शीर्षकात लिहिल्याप्रमाणे आपण मुंबई म्हणजे कुलाबा ते माहीम व बृहन्मुंबई म्हणजे वांद्रे ते दहिसर या भागांवरील पोर्तुगीज शासन काळातील इतिहासाचा विचार करणार आहोत. हा इतिहास बघण्याआधी १५व्या आणि १६व्या शतकांत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून होणारा व्यापार बघितल्यास भारत किती संपन्न होता याची कल्पना येईल. पश्चिम किनारपट्टीवरील कोचीन, कारवार, दाभोळ, चौल  म्हणजे हल्लीचे रेवदंडा व खंबायत ही खूप प्रसिद्ध बंदरे होती. पोर्तुगीज इतिहासकार व निकितीन हा रशियन प्रवासी दाभोळ व चौल बंदरांविषयी म्हणतो की, हा भाग अतिशय संपन्न असून येथे सुंदर घरे, मंदिरे व मशिदी आहेत. या बंदरांत अनेक परदेशी व्यापारी दिसतात. फ्रॅंकोझ पिरार्ड या फ्रेंच प्रवाशाने इ.स. १६०१ मध्ये असे लिहून ठेवले आहे की, भारतातून त्यावेळी नीळ (Indigo), अफू, लाख, नारळ व मसाल्याचे पदार्थ निर्यात केले जात. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, पश्चिम किनाऱ्यावरील गावांतून रेशमी कापड तयार केले जात असे व हे कापड संपूर्ण भारतात वितरित केले जात होते. गोव्यामधील पोर्तुगीज भारतीय सिल्कला चिनी सिल्कपेक्षा जास्त किंमत देत होते; असे पिरार्ड लिहून ठेवतो. हे रेशमी कापड बनविण्याचा कच्चा माल चीनमधूनच आयात केला जात असे. १४व्या शतकात ठाण्यामध्ये आलेल्या एका इटालियन प्रवाशाचा हवाला देऊन कर्नल यूल म्हणतो की, ‘१४व्या शतकात ठाणे शहर हे उद्ध्वस्त झालेले वैभवसंपन्न शहर,’ या स्वरूपात होते; तरीसुद्धा तिथे व्हेलव्हेटचे कापड तयार करणारे पाच हजार विणकर होते व १०००पेक्षा जास्त सिल्क लूम्स होते. दुसरी आश्चर्य करण्यासारखी गोष्ट म्हणजे जहाजबांधणीचे कौशल्य. इ.स. १५४०मध्ये वसईच्या पोर्तुगिजांनी आगाशीवर छापा मारून समुद्रात उतरविण्यासाठी तयार झालेले एक जहाज पळवले. या जहाजाने पुढील काळात पोर्तुगालच्या अनेक सफरी केल्या. इ.स. १६१२ मध्ये सर एच मिडल्टन (Middleton) तांबड्या समुद्रात आला असताना त्याने १५३ फूट लांब ४२ बिम्स  असलेले पस्तीस फूट खोल असलेले एक भारतीय जहाज बघितले. त्यात १५०० टन माल मावत असे. तसेच त्याने त्याच सुमारास दाभोळ बंदरातून आलेले  १२०० टनांचे जहाज बघितले. ही सविस्तर माहिती देण्यामागे उद्देश हा आहे की, भारतीय कौशल्य व भारतातून किती मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती याची वाचकांना कल्पना यावी.  पोर्तुगीज भारतात येण्याआधीपासून जहाज बांधणीचे एवढे उत्तम तंत्रज्ञान भारतीयांना असताना पुढील ५० ते ६० वर्षांनंतर छत्रपती  शिवाजी महाराजांना स्वतःचे आरमार उभे करण्यासाठी पोर्तुगीज कारागिरांची मदत का घ्यावी लागली हे एक गूढ आहे. इंग्रजांनी ढाक्यातील विणकरांचे हात तोडून भारतीय वस्त्रोद्योगाचे खच्चीकरण केले तसेच पोर्तुगिजांनी जहाजबांधणी तंत्रज्ञानाचे केले असावे का, याचा शोध घेणे जरुरीचे आहे. मी वर जी माहिती दिली आहे ती अलेक्झांडर कीड नैर्न (Nairne) लिखित हिस्ट्री ऑफ कोकण या पुस्तकातून घेतली आहे.

 इ.स. १४९८ मध्ये वास्को द गामा प्रथम कालिकत येथे आला. त्यानंतर पोर्तुगिजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर हातपाय पसरण्यास सुरुवात केली. इ.स. १५५० मध्ये अफान्सो डी अल्बुकर्क याने आदिलशाहीकडून गोवा जिंकून घेतले. गोवा अल्बुकर्कने जिंकावे ही कल्पना थिमय्या नावाच्या एका हिंदू माणसाने अल्बुकर्कला दिली; कारण गोव्यातील जनता मुस्लीम अत्याचाराने त्रस्त झाली होती; परंतु नंतर मुसलमान परवडले इतके अत्याचार व धर्मांतरण पोर्तुगिजांनी केले. असो. २३ डिसेंबर १५३४ मध्ये गुजरातचा सुलतान बहादूरशहा याने पोर्तुगीज गव्हर्नर नुनो डी कुन्हा याच्याशी तह करून मुंबईची सात बेटे साष्टी (बृहन्मुंबई) व वसई व त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाचा ताबा पोर्तुगिजांना दिला. मुंबईची सात बेटे कोणती? 

१) कुलाबा २) ओल्ड वुमन्स आयलंड किंवा लिटिल आयलंड ३) मुंबई हे मुख्य बेट ४) माझगाव ५) परळ ६) माहीम ७) वरळी. 

  या सर्व बेटांवर कोळी, कुणबी व भंडारी लोकांची वस्ती होती. मासेमारी, भातशेती व नारळ ही ह्या लोकांची उत्पन्नाची साधने होती. या बेटांच्या मालकीचा राज्यकर्त्यांना फारसा फायदा होत नसल्याने ती तशी दुर्लक्षित होती. राज्यकर्त्यांना फायदा मिळवून देणारा भाग म्हणजे साष्टी तालुका. ही बेटे ताब्यात आल्यावर पोर्तुगिजांनी ही बेटे निरनिराळ्या पोर्तुगीज व्यापाऱ्यांना भाड्याने दिली. इ.स. १५५४ मध्ये ही सर्व बेटे पोर्तुगिजांच्या राजाने गार्सिया डी ओर्टा या पोर्तुगीज माणसाला या बेटांचा विकास  करण्याच्या अटीवरती भाड्याने दिली. गार्सिया डी ओर्टा हा डॉक्टर व औषधी व इतर वनस्पतींचा जाणकार होता. याने हल्लीच्या टाऊन हॉलच्या मागच्या बाजूला स्वतःसाठी मॅनोर हाउस बांधले व त्याच्याभोवती मोठी औषधी वनस्पती, फळझाडे यांची बाग केली होती. असो.

 मला येथे पोर्तुगीज व इंग्रज यांच्या मुंबईविषयीच्या दृष्टिकोनातील फरक दाखवून द्यावयाचा आहे. दोघंही दर्यावर्दी होते. दोघांनाही मुंबई हे एक चांगले बंदर होऊ शकते याची कल्पना होती. इ.स. १५३४ ते १६६५ पर्यंत म्हणजे सुमारे १३० वर्षं मुंबईच्या सर्व बेटांचा ताबा पोर्तुगिजांकडे होता; परंतु या १३० वर्षांत पोर्तुगिजांनी या बेटांचा बंदर म्हणून विकास करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत नाही. त्यांनी फक्त माहीम, वांद्रे, मढ, वरळी येथे किल्ले बांधून संरक्षण व जकात वसुली करणे एवढेच काम केले. 

 पोर्तुगीज भारतात मसाल्याचा व्यापार करण्यासाठी जरी आले असले तरी रोमन कॅथलिक धर्माचा प्रसार करणे हासुद्धा त्यांचा महत्त्वाचा उद्देश होता. पुढे पुढे व्यापाराला दुय्यम स्थान मिळून धर्मप्रसार करणे यावरच जास्त भर दिला गेला. याच्याउलट इंग्रज हे पक्के व्यापारी होते. इंग्रजांचे मुख्य ठाणे जे सुरत – या बंदराला नैसर्गिक संरक्षण नव्हते. कोणीही जमिनीवरून या बंदरावर हल्ला करू शकतो – इंग्रजांचा हा समज छत्रपती  शिवाजी महाराजांनी जानेवारी १६६४ मध्ये सुरत लुटून खरा ठरविला. इंग्रजांच्या दूरदृष्टीचे आपण कौतुक केले पाहिजे व अनुकरणही करायला हवे; कारण सुरतेचा गव्हर्नर १६५२ पासून इंग्लंडच्या राजाला पत्र लिहून कळवत होता की, पोर्तुगिजांकडून मुंबईचा ताबा मिळविण्याची खटपट करा. ब्रिटिशांनी मुंबई कशी मिळविली याची कथा पुढील लेखात येणार आहे. असो.

 पोर्तुगिजांचा दृष्टिकोन व्यापारापेक्षा धर्मप्रसाराचा असल्याने त्यांनी मुंबईत अनेक चर्चेस बांधली. आज मुंबईत जेवढी चर्चेस आहेत त्यांपैकी ८० टक्के चर्चेस पोर्तुगिजांनी बांधलेली आहेत, त्यांपैकी काही प्रसिद्ध चर्चेसची यादी व त्यांचे सन पुढे देत आहे. १) सेंट मायकेल चर्च माहीम इ.स. १५३४, २) सेंट जॉन बापटिस्ट चर्च अंधेरी, इ.स. १५७९, ३) सेंट अँड्र्यू  चर्च वांद्रे, ४) माउंट मेरी चर्च वांद्रे, ५) ग्लोरिया चर्च भायखळा इ.स. १६३२, ६) पोर्तुगीज चर्च दादर इ.स. १५९६.

 पोर्तुगीज जरी इंग्रजांच्या आधी भारतात आले तरी त्यांना आपली सत्ता वाढवता आली नाही कारण त्यांच्या धर्मप्रसाराच्या हट्टापायी त्यांनी स्थानिक जनतेवर अनन्वित अत्याचार केले व त्यामुळे त्यांनी स्थानिक जनतेची जी काही थोडीफार सहानुभूती होती ती  गमावली.  चिमाजीअप्पाने वसईवरती स्वारी करण्यामागे हेच कारण आहे.

 माझ्या मते पोर्तुगिजांचा राज्यविस्तार न होण्यामागे एक भौगोलिक कारणसुद्धा आहे – ते म्हणजे शेती. पोर्तुगाल हा शेतीप्रधान देश नसला तरी तिथे शेती हा एक महत्त्वाचा उपजीविकेचा धंदा आहे. अनेक तऱ्हांची फळे, द्राक्षे, ऑलिव्ह, कडधान्ये, भाजीपाला आजसुद्धा तिथे पिकविला जातो. असे नेहमीच दिसून आले आहे की, जिथे शेती नीट होत नाही त्या भागातील माणसेच स्थलांतर करतात. पोर्तुगालमध्ये शेती चांगली असल्याने भारतातील पोर्तुगीज वसाहतींना पोर्तुगीज माणसांचा तुटवडा पडू लागला; त्यामुळे अल्बुकर्कने वसाहतीतील पोर्तुगीज तरुणांना स्थानिक बायकांशी विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. अशा तरुणांना जमिनी दिल्या जेणेकरून आपल्याशी एकनिष्ठ राहणारी माणसे मिळतील व धर्मप्रसारही होईल. इंग्रजांना ही समस्या आली नाही; कारण इंग्लंडमध्ये शेतीला महत्त्व नाही.पोर्तुगिजांचे शेतीप्रेम अनेक बाबतींत दिसून येते. १) शहरांचे टाऊन प्लॅनिंग गोव्यातील प्रत्येक घराभोवती बाग असावी असा त्यांचा दंडक होता. २) त्यांनी भारतातील अनेक झाडे, मसाल्याच्या वनस्पती ब्राझीलला नेल्या तसेच पपया, चिकू, सीताफळ, अननस, पेरू, काजू ही फळझाडे ब्राझीलहून भारतात आणली. टोमॅटो, बटाटा व मिरची या आपल्या रोजच्या जेवणातील भाज्या ब्राझीलहून भारतात आणल्या. असो. भूगोल इतिहासावर कसा परिणाम करतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

इतिहासातील घटनांचे विश्लेषण करणे हा या लेखमालेचा उद्देश असल्याने मी वरील विवेचन केले आहे ते आपल्याला आवडेल अशी आशा आहे. यापुढील लेखात इंग्रजांच्या मुंबईवरील राजवटीचा आपण विचार करणार आहोत.

     

A c. 1540 illustration of Portuguese nobles in India. The Portuguese had many coastal colonies in India, part of the Estado da India. From the Códice Casanatense (Biblioteca Casanatense, Rome)

A c. 1900 painting by Alfredo Roque Gameiro showing the arrival of the Portuguese navigator Vasco da Gama (c. 1469-1525) at Calicut in India. He was the first European to sail directly from Europe to India via the Cape of Good Hope, a voyage taken in 1497-9. (National Library of Portugal, Lisbon)

Author

Leave a Reply