विद्याताईंशी माझा संबंध आला तो किर्लोस्करचे तेव्हाचे कार्यकारी संपादक ह.मो.मराठे यांच्यामार्फत. मी आयआयटीत असल्यापासून कविता लिहू लागलो होतो. सुट्टीत मी पुण्यात आलेलो असताना मराठे यांच्याकडे काही कविता दिल्या. माझी प्रकाशित झालेली पहिली कविता ‘मला एकदा पंख फुटले होते’ त्यांनीच किर्लोस्करच्या एका अंकात छापली. त्यानंतर हळूहळू मराठ्यांकडे माझ्या कविता देऊ लागलो. मी कूर्मगतीने कविता लिहीत होतो आणि त्या अधून मधून किर्लोस्कर मध्ये येऊ लागल्या. त्यातलीच एक कविता ‘त्याची इच्छा’ मराठ्यांनी किर्लोस्कर कचेरीतच त्यांच्या पलीकडच्या केबिनमध्ये असणाऱ्या ‘स्त्री’च्या कार्यकारी संपादक विद्या बाळ यांच्याकडे दिली. त्यांनी ती लगेच ‘स्त्री’च्या पुढच्याच अंकात छापली. त्यावेळी महाराष्ट्र टाइम्स मध्ये शंकर वैद्य दर महिन्याला, आदल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या कवितांतून त्यांना आवडलेल्या कविता देत असत; त्यांत त्यांनी ‘त्याची इच्छा’ कविता निवडली; त्यानंतर मी ‘स्त्री’ साठीही कविता पाठवू लागलो. त्यातली ‘खिडकी’ कविता विद्याताईंनी स्त्रीच्या दिवाळी अंकात दिली आणि मला ‘तुमच्या कवितेतील खिडकीची अनंत रूपे आवडली,’ असे स्वहस्ताक्षरातले पत्रही पाठवले; त्यानंतर मी स्त्री मासिकाजोगती कविता लिहिली की ती घेऊन विद्याताईंकडे जाऊ लागलो.
माझ्या कविता आता इतरत्रही प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. ‘राजस’चे कार्यकारी संपादक विजय हरी वाडेकर यांना मी ‘डोंबाऱ्याचा खेळ’ नावाची कविता दिली; ती त्यांनी राजसच्या दिवाळी अंकात छापली आणि ती अप्रतिम असल्याचा स्वतःचा अभिप्राय दिला. १९८१ च्या डिसेंबरमध्ये मुंबईत स्वाभिमान साहित्य संमेलन भरले होते. महाराष्ट्र राज्याच्या साहित्य पुरस्कार देणाऱ्या परीक्षक समितीने पारितोषिकासाठी निवडलेले विनय हर्डीकर यांचे ‘जनांचा प्रवाहो चालला’ हे पुस्तक डावलून दुसऱ्याच एका पुस्तकाला पारितोषिक देण्यात आले. याचा काही परीक्षकांनी जाहीर निषेध केला. ज्यांना पारितोषिक जाहीर केले होते अशा काही साहित्यिकांनी निषेध म्हणून सरकारने देऊ केलेले पारितोषिक नाकारले. अंतुले सरकारच्या या मनमानीवर अनेक साहित्यिकांनी निषेध व्यक्त केला. त्याच वेळी त्यानंतर रायपूर येथे भरणार असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (अभामसासं) अंतुल्यांसह काही मंत्र्यांना बोलावले गेले. त्यांनीही आमंत्रणाचा स्वीकार केल्याची बातमी आली. दुर्गा भागवत यांनीही ‘साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मंत्री नकोत,’ अशी भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर अभामसासंला समांतर म्हणून मुंबईत स्वाभिमान साहित्य संमेलन भरवायचे ठरले. या संमेलनातील कविसंमेलनासाठी मला बोलावणे आले. या वेगळ्या संमेलनासाठी वेगळी कविता म्हणून मी माझी ‘डोंबाऱ्याचा खेळ’ ही कविता वाचली. घर आणि नोकरी दोन्ही सांभाळणारी स्त्री तारेवरची कसरतच करीत असते. घरी आणि दारी दोन्ही ठिकाणी तिच्याकडे वैषयिक दृष्टीने पाहिले जाते. नवऱ्याच्या अपेक्षेला तर तिला बळी जावेच लागते – याचे चित्र त्या कवितेत होते. तिला स्वप्नात दिसणाऱ्या भासात आलेले थेट वर्णन (त्या काळात स्त्रीमुक्ती वगैरेची चर्चा अजून सुरू झाली नव्हती) कुणाकुणाला आवडले नाही. कवितावाचनानंतरही मला नाराजी जाणवली. केवळ निर्मला देशपांडे यांनी मला कवितावाचनानंतर त्यांना कविता आवडल्याचे सांगितले होते. या संमेलनाचा वृत्तांत पुण्याच्या तरुण भारतमध्ये शशिकला उपाध्ये यांनी लिहिला. त्यात त्यांनी लिहिले की, ‘हेमंत जोगळेकर या पुण्याच्या (हा कवी पुण्याचा आहे याचे आम्हां पुणेकरांना दुःख झाले.) कवीने अतिशय हिडीस आणि स्त्रियांचा अपमान करणारी कविता वाचली. त्यांची कविता मुंबईकरांनी ऐकून घेतली म्हणून त्याचाच आम्हांला निषेध करावासा वाटतो. त्यांचा हा लेख वाचून मला ओळखणाऱ्या अनेकांनी ‘हा काय प्रकार आहे?’ असे विचारले. मी अस्वस्थ झालो. वास्तविक ही स्त्रीचा कैवार घेणारी कविता होती. मी माझी प्रतिक्रिया तरुण भारतकडे दिली; पण त्यांनी ती छापली नाही. यावर कुणाला मत विचारावे असा मला प्रश्न पडला; मग मी विद्याताईंकडे गेलो. त्यांना त्या लेखाचे कात्रण आणि मी वाचलेली कविता दाखवली. त्यांनी दोन्ही गोष्टी वाचल्या. त्या मला म्हणाल्या, “ही चांगली कविता आहे. तारेवरून चालायला लागण्याची प्रतिमा एक मूलभूत अशी प्रतिमा आहे. ती तुमच्या कवितेत योग्य तऱ्हेने आली आहे. ही कविता स्त्रीचा अपमान करणारी हिडीस आहे असे म्हणणाऱ्या परीक्षणकर्तीला कविता समजत नाही एवढाच अर्थ तुम्ही घ्यायचा.” तेव्हा मी तरुण – अपरिपक्वच म्हणा ना – होतो. कुणी कवितेवर अशी टीका करावी हे मला सहन होत नव्हते; पण त्यांचे म्हणणे ऐकून मला दिलासा मिळाला; एवढेच नव्हे तर एक नवी दृष्टी मिळाली. माझी कविता मला योग्य वाटत असेल तर इतरेजन काय म्हणतात ते मनावर घेऊ नये. ‘त्यांना आपली कविता समजत नाही एवढेच,’ अशी समजूतदार भूमिका घ्यावी. ही स्थितप्रज्ञता आणि स्वतःच्या कवितेबद्दलचा विश्वास मी नंतर कायमच बाळगला. तो मला विद्याताईंनी दिला.
त्यानंतर मला ‘स्त्री’ दिवाळी अंकासाठी कविता पाठवण्याचे निमंत्रणही येऊ लागले. मी ‘स्त्री’चे अंक लहानपणापासून वाचत असे; कारण आमच्या घरी ‘स्त्री’ मासिक येत असे. असा मी लहानपणापासूनच ‘स्त्री’चा वाचक होतो, आता लेखकही झालो. स्त्री मासिकात विद्याताई ‘मैतरणी ग मैतरणी’ नावाचे पत्र दरमहा लिहीत असत. त्यात त्या स्त्रियांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलण्याची प्रेरणा देत. १९८१ मध्ये त्यांनी ‘नारी समता मंचा’ची स्थापना केली. ज्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत आहे अशा स्त्रियांनी या मंचाकडे यावे आणि मंचाकडून त्यांचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला जावा असा त्यांचा उद्देश होता. या संदर्भात एकदा अचानक विद्याताई (आणि मला वाटते गीतालीताईही) चक्क माझ्या घरी आल्या. आमच्या घराच्या तळमजल्यावर डॉक्टर पानसरे यांचा दवाखाना होता. त्यांचा दवाखाना सकाळ संध्याकाळ चालत असे आणि दुपारी बंद असे. ही जागा दुपारपुरती मंचाकडे दिली तर या स्त्रिया तिथे येऊ शकतील असे त्यांना वाटले होते. त्यांनी डॉक्टर पानसऱ्यांना विचारले. डॉक्टरांनी ‘तुम्ही मालकांना विचारा’ असे सांगितले होते; म्हणून त्या आमच्याकडे आल्या होत्या. आईला त्यांचे कार्य पटले व तिने ‘आमची काही हरकत नाही’असे सांगितले. नंतर रितीप्रमाणे माझ्या पत्नीने पाहुण्यांना चहाचे विचारले. विद्याताई म्हणाल्या,” नको हो. आमच्यासाठी चहा करायला तुम्हाला उठून जावे लागणार; त्यापेक्षा आपण इथेच गप्पा मारत बसू.” यावर वास्तविक ‘मी चहा करून आणतो’ असे मी म्हणायला हवे होते; पण मी तसे म्हणालो नाही. खरेतर आजी, आई आणि बायको यांनी तोवर माझ्यावर चहा करायची वेळच आणली नव्हती. नंतर मी डॉक्टर पानसऱ्यांनाही ‘आमची काही हरकत नाही’ असे सांगितले; तर ते म्हणाले, “नको हो! त्यांच्या बायका, मग त्यांचे दारू पिऊन त्रास देणारे नवरे – सगळेच इथे येतील!” खरे तर पानसऱ्यांना त्यांना नाही म्हणायचे होते; पण ते ती जबाबदारी माझ्यावर ढकलू पाहत होते. पुढे काय झाले माहीत नाही; पण नारी समता मंचाची पार्ट टाइम कचेरी त्यांच्या दवाखान्यात सुरू झाली नाही.
’स्त्री’मध्ये आणि इतरत्रही प्रसिद्ध झालेल्या माझ्या स्त्रीविषयक कवितांमुळे माझ्यावर ‘स्त्रीवादी’ कवी असा शिक्का बसला होता. एसएनडीटी महाविद्यालयाने त्यांच्या विद्यार्थिनींसाठी स्त्रीवादी कवितांच्या वाचनाची स्पर्धा ठेवली होती. परीक्षक म्हणून त्यांनी बोलावले होते विद्याताई, अरुणा ढेरे आणि मला. बऱ्याच मुलींनी माझ्याच कविता सादर केल्या होत्या. आम्ही परीक्षकांनी पारितोषिकांसाठी निवड करून निकाल जाहीर केला. परीक्षकांच्या वतीने विद्याताई बोलतील असे मला वाटले होते पण विद्याताई आणि अरुणाने ठरवून मलाच पुढे केले. अशी आयत्या वेळी बोलण्याची मला सवय नव्हती; पण त्यांनी माझ्यावर आणलेली वेळ मी निभावून नेली.
पुन्हा विद्याताईंकडे मला पडलेला प्रश्न घेऊन जायची वेळ एकदा आली. माझे कारखान्यातले एक सहकारी दगडू हलवाई दत्तापुढे होणाऱ्या वसंतोत्सवात एका कला-कार्यक्रमाला गेले होते. ते म्हणाले, “तेथे बुधवार पेठेत एका पोरगेल्याशा मुलीला बळजबरीने रिक्षेत बसवून कुणी मध्यस्थ नेत होता. ती तिला सोडण्यासाठी ओरडत होती आणि इतरांची मदत मागत होती; पण कोणीच पुढे आले नाही आणि तिला घेऊन जाण्यात आले. मी त्यांना, “तुम्ही का हटकले नाहीत किंवा पोलिसांकडे का गेला नाहीत?” असे विचारले. ते म्हणाले, “अशा बाबतीत आपण काही करू शकत नाही.” हा प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिला नव्हता; पण ‘असे मुलींना बळजबरीने वेश्याव्यवसाय ढकलण्यात येत असेल तर समाज हे थांबवत का नाही?’ असा प्रश्न मला पडला. मी हे सांगायला विद्याताईंकडे गेलो. त्यांच्याबरोबर आणखीही कोणी कार्यकर्ती होती. विद्याताईंनी माझे म्हणणे ऐकून घेतले आणि त्या बरोबरच्या स्त्रीला म्हणाल्या, “या स्त्रियांच्याच प्रश्नाकडे आपण कधी वळलो नाही आहोत. विचार करायला पाहिजे.” पण पुढे काहीच झाले नाही. प्रखर स्त्रीवादीही या प्रश्नांपुढे आजही दुर्लक्ष करतात किंवा अगतिक आहेत.
पुढे विद्याताईंनी स्त्री मासिक सोडले आणि आपले ‘मिळून साऱ्याजणी’ (मिसा) सुरू केले. त्यात माझ्या स्त्रीवादी तसेच इतरही कविता येत राहिल्या. विद्याताई त्यांना दाद देत राहिल्या. माझ्या कवितांतून येणारे स्वयंपाक घरातल्या गोष्टींचे संदर्भ त्यांना विशेष वाटत असत. याचदरम्यान केव्हातरी गौरी देशपांडे यांनी ‘मिळून सार्याजणी’ ला एक पत्र दिले. त्यात त्या लिहितात, ‘हेमंत जोगळेकर आणि माझ्यासारख्या लेखिका ‘मिळून साऱ्याजणी’त निखळ साहित्यिक लिखाण करतात; पण इतर असाहित्यिक लेखनही त्यात साहित्य म्हणून येते.’ त्यांच्यासारख्या मोठ्या लेखिकेने साहित्यिक म्हणून स्वतःबरोबर माझाही उल्लेख केल्याने मला अर्थातच आनंद झाला. गौरी देशपांडे यांचे पत्रही ‘मिसा’ने छापले आणि गौरी देशपांडे आणि विद्याताईंच्या स्नेहभावात या पत्रामुळे कुठलाही अंतराय आला नाही. ‘मिसा’च्या दशकपूर्ती निमित्त पुष्पा भावे यांनी ‘मिसा’तल्या उत्कृष्ट साहित्याची निवड केली होती. त्यात माझ्या ‘नातिचरामि’ या कवितेचा अंतर्भाव झाल्याचा आनंद विद्याताईंनी माझ्याजवळ व्यक्त केला होता. मी ‘आय. आय. सी. एच. इ,’ च्या पुणे विभागाचा अध्यक्ष झाल्याचे वृत्तपत्रात वाचून त्याबद्दल त्यांनी माझे अभिनंदनही केले होते.
विद्याताईंची आणि माझी काहीशी निवांत भेट ‘अक्षर मानव’ने आयोजित केलेल्या एका निवासी शिबिरात झाली. त्या वेळी त्यांनी माझी घरगुती चौकशीही केली होती. त्या काळात आईच्या वृद्धत्वाचे संदर्भ माझ्या कवितांतून येत असत . विद्याताई मला म्हणाल्या, “माणूस विकल झाला की त्याला जगवत ठेवण्यात अर्थ नाही.” माझे म्हणणे होते की हा निर्णय त्या व्यक्तीने घ्यायचा आहे. माझ्या आईची शक्ती कमी कमी होत चालली होती, विस्मरणही होत असे; पण तिची जीवनेच्छा कायम होती. अंथरुणाबाहेरही पडता येत नसताना ती येणाऱ्या जाणाऱ्यांना मी अजून रोज खाली बागेत फुले आणायला जाते असे सांगायची . आपण सर्व गोष्टी करू शकतो अशा कल्पनाविश्वातच ती असायची आणि आनंदात असायची. ती ९९ व्या वर्षी गेली.
विद्याताईंनी स्वतःला पटणाऱ्या गोष्टी निष्ठेने केल्या. निरामय जीवन ट्रस्टमार्फत स्वेच्छामरणाचा पुरस्कार करत राहिल्या. स्वतःला कोणत्याही जीवरक्षक प्रणाली लावण्यात येऊ नयेत अशी त्यांची स्पष्ट लिखित सूचना होती आणि ३० जानेवारी २०२० रोजी त्यांची प्राणज्योत मालवली .
आपण स्त्रियांना ‘बोलत्या व्हा’ सांगतो, बोलते करतो; पण स्वतःच्या वैवाहिक विसंवादावर बोलत नाही असे वाटल्यावर, तो त्यांनी कधी झाकून ठेवला नाही. आपले विचार तत्त्वे पटत नाहीत असे वाटल्यावर पतीपासून वेगळ्या एकट्या राहू लागल्या. आपला स्त्रीवाद शहरी मध्यमवर्गीय स्त्रियांपुरता मर्यादित राहू नये म्हणून त्या गावोगावी गेल्या. तळागाळातल्या स्त्रियांशी बोलत राहिल्या. ‘स्त्री म्हणून जन्माला आल्यावर आपल्याला कमी लेखले जाणारच’ असे मानणाऱ्या स्त्रियांना ‘असे चालू देऊ नका’ अशी प्रेरणा देत राहिल्या. ‘अक्षरस्पर्श’ सारखी वाचणाऱ्यांसाठीची चळवळ, साथ-साथ सारखी विवाहामध्ये काय हवे सांगणारी विवाह संस्था, स्त्रियांप्रमाणेच पुरुषांचेही प्रबोधन व्हायला हवे; म्हणून घेतले जाणारे पुरुष अभ्यासवर्ग असे अनेक उपक्रम त्यांच्या पुढाकाराने चालू झाले. स्त्रीवादी कार्यकर्त्यांसाठी त्या दीपस्तंभासारख्या होत्या. कार्यकर्त्यांची एक फळी त्यांनी घडवली. त्यांचे कार्य त्यांच्यामागेही चालूच राहिले आहे.
