हल्ली कुठल्याही छोट्या गावात गेले तर गावातील तरुणांचे शिक्षण व रोजगारासाठी मोठ्या शहरांमधून स्थलांतर झाल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते. हे स्थलांतर, त्याची कारणे व परिणाम हा एक स्वतंत्र विषय आहे. नुकतेच पर्यटनासाठी कोल्हापूरजवळील अंबाघाटात गेलो होतो. घाट व कोकण यांच्या सीमारेषेवर असलेला हा प्रदेश निसर्गरम्य आहे. पन्हाळ्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरचा वेढा तोडून विशाळगडाकडे केलेली कूच हा एक अत्यंत ऐतिहासिक महत्त्वाचा क्षण या परिसरात घडलेला आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झालेली घोडखिंड याच परिसरात आहे.
स्थलदर्शनासाठी स्थानिक जाणकार वाटाड्या घेणे नेहमीच श्रेयस्कर असते. प्रमोद माळी हे नाव सुचवले गेले. आधीच त्याच्याशी संपर्क करून कुठे कसे कधी भेटायचे त्याचा तपशील ठरवला गेला. वक्तशीरपणे ठरलेल्या वेळेला तो हजर झाला. टी-शर्ट व फौजेतले लोक परिधान करतात त्याप्रकारची विजार परिधान केलेली काटक, सावळ्या रंगाची, चुणचुणीत व हसतमुख व्यक्ती समोर उभी राहिली. दीड दिवसाचा अवधी हाताशी होता. त्यातला एकच दिवस तो उपलब्ध होता; परंतु राहिलेल्या अर्ध्या दिवसात आम्ही काय करू शकतो त्याचे नेमके मार्गदर्शन त्याने आम्हांला केले. उपलब्ध वेळेचे गणित लक्षात घेऊन त्याने आमची एका दिवसाची कार्यक्रम पत्रिका ठरवली; त्यानुसार परिसरातील सर्व ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे आम्हांला दाखवली. त्याशिवाय कोल्हापूर परिक्षेत्राची जमीन मोजणी इंग्रजांनी ज्या स्थळापासून सुरुवात केली त्या स्थळाबद्दल सविस्तर माहिती दिली. गुंटर चेनचा शोध लावणारा एडमंड गुंटर याचा सविस्तर परिचय त्यांनी करून दिला. इंग्रजांना शिस्त आणि वक्तशीरपणा याची किती आवड होती त्याचे काही किस्से खास अंदाजात सांगितले. मानोली धरणात चाललेले कृत्रिम मत्स्योत्पादन दाखवले. मत्स्योत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या विदेशी प्रजातीच्या माशांमुळे स्थानिक प्रजातींवर आलेले संकट त्याने विस्ताराने समजावून सांगितले. धरण व जलसंचय पाटबंधारे खात्याचा; तर मत्स्योत्पादन प्रक्रिया मत्स्योत्पादन विकास विभागाची. या दोन्ही खात्यांत कधीच मेळ नसतो. त्यामुळे कोणत्या प्रजाती मत्स्योत्पादनासाठी वापराव्यात याचा काही ताळमेळ नसतो. सुरुवातीला मागूर(Magur) प्रजाती अशा उत्पादनासाठी वापरली गेली; परंतु हे मासे इतर स्थानिक प्रजातींची अंडी व पिले खाऊन टाकतात असे निदर्शनास आले आणि आता काहीसे उशिरा या प्रजातीच्या वापरावर बंधन घातले गेले आहे.
‘ सडा’ या नावाने प्रसिद्ध असलेले तिथले सुप्रसिद्ध पठार व त्याच्या आसपासचे छोटेसे जंगल आम्ही फिरलो. त्या भागात आढळणारे विविध प्रकारचे कोळी दाखवले. त्यांच्या अधिवासाची वैशिष्ट्ये समजावून सांगितली. शिवाय अनेक प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती दाखवल्या. विविध पक्ष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण हाका हा त्याचा आवडीचा विषय. त्याचे प्रात्यक्षिकदेखील त्याने दाखवले. प्राणी-पक्षी यांची शास्त्रीय नावे त्याला तोंडपाठ होती. ही जंगले आणि त्यांच्या परिसंस्था व शासन यांचे परस्पर संबंध कसे आहेत व कसे असावेत आणि या सगळ्याच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी काय केले पाहिजे असे त्याला विचारले असता त्यांने फॉरेस्ट डिपार्टमेंट हे ‘फॉर रेस्ट ओन्ली डिपार्टमेंट,’ आहे अशी त्याची व्याख्या करून त्याद्वारे या सर्वांच्या कामाबद्दलची त्याची निराशा व्यक्त केली. या जंगलातून होणारी वेगवेगळ्या प्रकारची तस्करी थांबवण्यासाठी स्थानिक लोकांनी एकत्र येऊन रात्रपहारा( Night Watch) सुरू केला होता. यादरम्यान एका औषधी गुणधर्म असलेल्या दुर्मीळ वनस्पतीची तस्करी त्यांनी पकडली. प्रकरण मिटवून घेण्यासाठी विविध पातळ्यांवर दबाव आला. आर्थिक आमिष दाखविण्यात आले. हे लोक बधले नाहीत. त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरून तसा गुन्हा दाखलही केला. नेहमीच्या पद्धतीने तपास रेंगाळला व कालांतराने हवेत विरला. या सगळ्या धामधुमीत रात्र पहारा मात्र शासकीय आदेशाद्वारे बंद केला गेला. आजही जंगल खात्याचा प्रमोद व त्याच्या विचारसरणीचे इतर लोक यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक कटकट असाच आहे. एखाद्या दुर्मीळ प्रजातीचे जनावर जखमी अवस्थेत सापडले तर प्रमोद व त्याचे मित्र त्याच्यावर उपचार करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. यासंदर्भात महाराष्ट्रात वन्यजीव संरक्षण कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यांतर्गत वन्य जीवांना वाचवण्यासाठी एक विहित प्रक्रिया आहे. असे जनावर सापडल्याची वर्दी जंगल खात्याला दिली जाते. त्यांच्यामार्फत या जनावराचा पंचनामा केला जातो. तज्ज्ञ डॉक्टरकडून त्याची तपासणी व उपचार होतात. उपचारांनी ते जनावर बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा जंगलात सोडतेवेळी त्याची अधिकृत नोंद होते. अर्थात यामुळे या सर्व गोष्टीला एक शिस्त येते व जनावरांचे उपचार नीट होत आहेत हे सुनिश्चित होते. यासाठी मोजून दोन ते तीन कागद लिहावे लागतात; पण ते देखील या लोकांना होत नाही. कशाला पाहिजे ती कागदपत्रांची कटकट? तुमचे तुम्ही उपचार करा आणि द्या सोडून परत जंगलात त्याला असे त्यांचे म्हणणे असते.
प्रमोदसोबतची ही अंब्याची भटकंती कशी संपली ते कळलेच नाही. जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी अशी सर्वांगांनी ही भटकंती झाली. दरम्यान प्रमोदशी बऱ्याच गप्पाटप्पा झाल्या. त्याने हॉटेल मॅनेजमेंटमधला डिप्लोमा केलाय. मुंबईतील एका चांगल्या हॉटेलमध्ये नोकरीदेखील होती; परंतु तिथे करमत नव्हते. अंब्याचा निसर्ग खुणावत होता. धाडस करून नोकरी सोडली, येऊन हा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी आवश्यक ते वाचन केले. संदर्भ गोळा केले. विवेचन करताना ते तथ्यावरती आधारित आहे याची मी शक्यतोवर खात्री करतो असे त्याने आवर्जून सांगितले. निसर्गाच्या संवर्धन व संरक्षणासाठी त्याने स्वतःची वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्था नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन करून त्याची रीतसर नोंदणी केली आहे. लोकांना मदतीसाठी आवाहन करायचे व त्यातून या संस्थेमार्फत परिसरातील निसर्ग व दुर्मीळ प्रजाती यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी जमतील तेवढे प्रयत्न करायचे असे धोरण. वर्षभरात यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जातात. जंगलातील जनावरांसाठी पाणवठ्यांची निर्मिती करणे, जंगलात लागणारे वणवे नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणे, जंगलात केलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांखाली सापडून जनावरांचे मृत्यू होतात त्याबाबत पर्यटकांत जागृती निर्माण करणे, दुर्मीळ देशी झाडांची रोपवाटिका निर्माण करणे, दुर्मीळ वनस्पतींचे बीज संकलन करणे यांसारखे विषय ही संस्था हाताळते.
सर्वजण शहराकडे धाव घेत असताना बऱ्यापैकी नोकरी सोडून आपल्या मूळ गावाकडे परत यायचे, आपला स्वतःचा रोजगार हिमतीवर हुडकायचा आणि आपली माती आपली माणसं आणि आपले पर्यावरण यांसाठी धडपड करत राहायची. प्रमोदचं हे उलट विस्थापन दुर्मीळ आहे. तरुण पिढी या सर्वाचा विचार करेल अशी आशा करू या.


उलटे विस्थापन कौतुकास्पद. शहरात काम शोधित निराश हिंडणारे तरूण पाहिले की खिन्न वाटते. प्रमोद यांनी घेतलेला निर्णय वाचून त्यांचे अभिनंदन करावे असे वाटते. आणि अंबा घाटातले जैव वोविध्य पहायला आवडेल. त्यासाठी प्रमोद यांच्याशी संपर्क कसा साधता येईल? कृपया कळवावे.
+91 79-72646260 Pramod Mali
Liked the above article on nature and the for its preservation and conservation for creation of natural environment. This is like spreading awareness among the people at large. Thanks for the article.
उलटे विस्थापन, काटेरी वाटा … लेख सुरेख आणि माळी यांचे काम तर अतिशय कौतुकास्पद. आपला (मामबो) अमित गद्रे आंब्यातच राहून स्पृहणीय शेती-कार्य करत आहे.