तो राजहंस एक… 

सन १९६६ पासून राजहंस प्रकाशनाशी दिलीप माजगावकर निगडित झाले. १९८४ सालापासून या प्रकाशन संस्थेची धुरा पूर्णपणे ‘दिगमा’ यांच्या हाती आली. नवे विषय आणि नवे लेखक यांबाबत ‘राजहंस प्रकाशन’ नेहमीच स्वागतशील राहिले आहे. ‘राजहंस प्रकाशना’ने वाचकांपुढे आणलेल्या अनेक लेखकांनी त्या त्या क्षेत्रांतील आपल्या कामाने आणि त्यासंबंधीच्या पुस्तकलेखनाने अत्यंत आगळीवेगळी कामगिरी उभी केली. ‘राजहंसी’ ग्रंथसूचीमध्ये सर्व वाङ्मयप्रकार आहेत; पण त्यांतही चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, समाजकारण, राजकारण आणि विज्ञान ही ‘राजहंस प्रकाशना’ची नाममुद्रा उमटलेली खास दालने आहेत. ‘राजहंस प्रकाशना’तर्फे आत्तापर्यंत शेकडो पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी दिलीप माजगावकरांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केली; त्यानिमित त्यांचे मित्र दत्तप्रसाद दाभोळकर यांनी त्यांच्या  चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध.  

 यशवंतराव चव्हाणांचे एक झकास वाक्य आहे – ‘मराठी माणसाने मनावर घेतले ना तर तो वाघ मारील; पण तो वाघ येऊन त्याला खाऊन गेला तरी तो मनावर घेणार नाही!’ मराठी माणसांनी एकांडे शिलेदार म्हणून, तर  कधी झुंडीने विविध क्षेत्रांत अनेक संस्था उभ्या केल्या. काही काळ या संस्था जोमाने वाढल्या आणि नंतर कळण्यापूर्वीच गाळात गेल्या! माणसे अफाट कर्तृत्वाची होती, जिद्दी आणि मेहनतीची होती; मग हे असे का झाले? अहंकार आडवा आला? संघवृत्ती कमी पडली? अव्यवहारीपणा नडला? की नियतीनेच अपयश पदरात टाकावयाचे ठरवले होते? एक मात्र खरे, त्यांच्या अपयशाचे महाराष्ट्राला वाईट वाटले; पण लोक त्यांना हसले नाहीत; कारण त्या स्वप्नवेडया माणसांचे अपयशही तुमच्या-माझ्या यशापेक्षा अधिक विलोभनीय आहे हे आपण जाणून होतो. ही अशी अपयशाची मालिका साहित्यक्षेत्रात तर विपुल आहे. ‘सत्यकथा’, ‘माणूस’, ‘मौज’, ‘ज्योत्स्ना’, ‘अभिरुची’, ‘छंद’ या सर्वांना पाहून ठणठणपाळ म्हणाला होता, ‘महाराष्ट्राच्या प्रकाशन व्यवसायात, व्याकरणात नसलेला एक नवा काळ आहे; तो म्हणजे ‘पडता काळ.’

पण अपवादाने नियम सिद्ध व्हावा म्हणून का असेना; एकदा एक नवल घडले. धडपडत, पडत, ठेचकाळत, खरेतर घटका-पळे मोजत वाटचाल करणाऱ्या राजहंस प्रकाशनाने अचानक एक दिवस राजपथावरची आपली डौलदार वाटचाल सुरू केली. गरुडपंखांचे बळ घेऊन साहित्यविश्वात भरारी मारायला सुरुवात केली… खेतान फॅनच्या जाहिरातीप्रमाणे ‘सिर्फ नाम ही काफी है’ असे काहीसे.

पण हे सारे आजचे. गेल्या दहा-बारा वर्षांतले. पन्नास वर्षांच्या वाटचालीमधील पहिली बारा-तेरा वर्षे पायाभरणीची; म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे पाया खणत जायचे आणि सावधपणे आपण यात गाडले जाणार की यावर इमारत उभारणार याचा अंदाज घेत बसायचे! पायाभरणीची पहिली बारा-तेरा वर्षे आणि यशोगाथेची सध्याची दहा-बारा वर्षे सोडली तर मधला पंचवीस वर्षांचा, म्हणजे १९६७ ते १९९२ पर्यंतचा काळ हा अथक धडपडीचा होता. म्हणजे, दिलीप मला त्या वेळी म्हणायचा तसा : ‘धडपणे धडाधड पडण्याचा होता.’ या पंचवीस वर्षांच्या काळात मी त्या धडपडीला साक्षी होतो किंवा नकळत ‘माणूस-राजहंस’ परिवारातला बनलो होतो. 

दिलीपच्या बहुतेक खेळी चुकत होत्या, फसत होत्या. काही वेळा यश हातात येता येता सहजपणे निसटत होते. फासे उलटे पडत होते. मजेची गोष्ट अशी की, भविष्यावर थोडाफार विश्वास असूनही दिलीप क्षणभरही नियतीला किंवा भविष्याला दोष न देता आपल्याला हा खेळ का खेळता येत नाही, याची मित्रांबरोबर चर्चा करीत होता. त्याच्या पटलेल्या व न पटलेल्या प्रत्येक प्रयत्नाला मनापासून प्रोत्साहन देत त्याच्या अपयशाकडे ममत्वाने पाहणारे श्रीभाऊ होते.  फसलेल्या प्रयत्नांच्या वेळी प्रयत्नांचे वेगळेपण ओळखून त्याचे कौतुक करीत, तुम्ही कुठे चुकलात हे बंधुत्वाच्या भावनेने ते सांगत. फारशी ओळखदेख नसताना जयंतराव साळगावकरांसारख्यांची सविस्तर पत्रे येत. मोठा मजेशीर आहे हा कालखंड. ‘यशाहूनही प्रयत्न सुंदर’ हे सांगणारा.

(१)

सुरुवातीचे दिवस

 माणूस नावाच्या प्राण्याचा स्वभाव मोठा मजेशीर आहे. भविष्यावर फारसा विश्वास नसला तरीसुद्धा एखाद्या संस्थेला अफाट यश मिळाले, तर ती कोणत्या मुहूर्तावर सुरू झाली हे जाणून घेण्याचा मोह भल्याभल्यांना टाळता येत नाही. गोष्ट अगदी खरी; पण विश्वास बसू नये अशी. ‘राजहंस’ची सुरुवात केव्हा झाली, याबाबत घटका-पळे राहू देत, तारीख आणि महिनासुद्धा माहीत नाही. इतिहासातील नोंद एवढीच की, १९५३ मध्ये केव्हातरी सुरुवात झाली. 

 हे अधिकच कोड्यात पाडणारे आहे. ‘राजहंस’ची सुरुवात एकहाती कुणी केली माहीत आहे? शिवचरित्रातील प्रत्येक तारीख आणि वार – पाढे, परवचे म्हटल्यासारखे धडाधड सांगणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी. मात्र ५३ साली कोणत्या तारखेला, कोणत्या महिन्यात आपण ही प्रकाशन संस्था सुरू केली हे त्यांना अजिबात आठवत नाही. संपूर्ण गोंधळलेल्या मन:स्थितीत ‘असेल, असू शकेल, तशीही शक्यता आहे,’ असे एखाद्या राजकीय पुढाऱ्यासारखे ते याबाबत  सांगतात. नशिबावर फार विश्वास असेल तर – एखाद्याच्या हातालाच यश असते, असे आपण म्हणू शकतो;   

 पण सुरुवातीच्या दिवसांत हे यश फारसे वाट्याला आले नव्हते. पुस्तकेपण एकहाती बाबासाहेबांचीच होती. ‘दख्खनची दौलत,’ ‘मुजऱ्याचे मानकरी’ इत्यादी. वितरणव्यवस्था वगैरे नव्हतीच; पण बाबासाहेब बेभान होऊन भाषण देत हिंडत. त्यानंतर थोडी थोडी पुस्तके, मराठी माणसांच्या स्वभावानुसार उचलली जात; मात्र मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे काही झाले होते. बाबासाहेबांचा स्वतःवर अफाट विश्वास असणार किंवा अमर्याद अव्यवहारीपणा अंगात मुरलेला असणार. संस्था सुरू करताना पुस्तके विकताना उपयोगी पडतील म्हणून त्यांनी एक हजार पावती-पुस्तके छापूनघेतली होती. तरी बरे, पावतीपुस्तके छापायला टाकायच्या आधी आचार्य अत्रेंना भेटून आलेले नव्हते; नाहीतर दहा हजार हा आकडाच मनात कायमचा बसलेला असायचा, आणि परिवारातील मुले पुढे अनेक वर्षे शाळा-कॉलेजात लिहिण्यास उपयोगी म्हणून ही पाठकोरी गुलाबी रंगाची पावतीपुस्तके वापरायची!

 ‘एकसे दो भले,’ म्हणून श्रीभाऊ म्हणजे श्री.ग.मा. ‘राजहंस’मध्ये भागीदार म्हणून सामील झाले. दोघेही तसे ‘परिवारातले;’ पण बाबासाहेब म्हणजे ‘शिवाजी एके शिवाजी’ तर श्रीभाऊ तसे देवल, अप्पा पेंडसे अशा परिवारातील बंडखोर जमातीमधले. बाबासाहेबांचे लिखाण आणि श्रीभाऊंचे छपाई, वितरण असे काम सुरू झाले. लाल महाल, राजगड, प्रतापगड, शिवनेरी अशी छोटी-छोटी पुस्तके, किल्ला आणि इतिहास सांगणारी पुस्तके खपत होती; पण यातून प्रकाशनसंस्थेचे नाव वाचकांपर्यंत पोहोचण्यासारखे काही नव्हते. शिवशाहिरांची ही अव्यवहार्य पेशवाई खरेतर फार काळ चालावायचे काही कारण नव्हते. पुस्तके भाषणानंतर खपतात म्हणजे फार पैसे मिळत नाहीत… आणि चार चवल्या मिळाल्या; तरी प्रकाशनसंस्थेचे नाव चिल्लर-खुर्दा म्हणूनसुद्धा जाणकारांच्या ओठांवर येत नाही.

 पण या वेळी नियतीने काठोकाठ भरलेले एक माप ‘राजहंस’च्या पदरात टाकले. ५९ सालची गोष्ट. छोट्या माधुरीचा वाढदिवस होता. तिचे मित्र-मैत्रिणी जमलेले. बाबासाहेब भलतेच भारावलेले. मुलांत मिसळावयाचे, शुभेच्छा द्यावयाच्या, फराळ खावयाचा. खरेतर बाबासाहेबांना तेच करावयाचे होते; पण बाबासाहेब एका क्षणात शिवयुगात गेले. या छोट्या जीवांचे आपण फार मोठे देणे लागतो आहोत, असे बाबासाहेबांना वाटले. ते अस्वस्थ झाले. त्यांनी दोन प्रतिज्ञा केल्या – या मुलांना समजेल, आवडेल असे शिवचरित्र लिहीन आणि ते लिहून होईपर्यंत दाढी करणार नाही! बाबासाहेब वाढदिवसाचा समारंभ विसरले. पलीकडच्या खोलीत गेले. खोली बंद केली आणि एका बैठकीत शिवचरित्रातले ते आवतन लिहिले. ६१ साली हे पुस्तक प्रसिद्ध झाले. भाषेतला नवेपणा, दमदारपणा, शाहिरी ढंग आणि नाट्य यांमुळे या पुस्तकाने इतिहास घडविला. आचार्य अत्रेंनी पुस्तकावर दोन अग्रलेख लिहिले. पुस्तक वाचून लतादीदी आणि पु.ल. भारावले. पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचावे; म्हणून ‘राजहंस’ने दहा खंडांत, प्रत्येक खंड तीन रुपये – असे हे शिवचरित्र प्रसिद्ध केले. प्रथमच ठेव योजना सुरू केली. ‘शंभर रुपये ठेव ठेवा. दहाही खंड घेऊन जा आणि पाच वर्षांनी शंभर रुपये परत.’ या पुस्तकामुळे बाबासाहेबांचे आधीच गाजणारे नाव सर्वदूर गेले. ‘राजहंस’ हे नावही वाचकांच्या थोडेफार लक्षात आले; पण खरे तर हा एका विषयावर आणि एका व्यक्तीवर उभा असलेला तंबू होता.

 ६१ साली आणखी एक गोष्ट घडली. श्रीभाऊ अस्वस्थ असणार! त्यांचा पिंड पत्रकाराचा होता. त्याहीपेक्षा ते स्वतःला परिवर्तनाच्या चळवळीतले एक कार्यकर्ता समजत. त्यातपण एक तिढा होता. ते त्या परिवारातले होते – तसे मानले जात, हे प्रथमच सांगितलेय. अप्पा पेंडसे यांच्याप्रमाणे ते बंडखोर होते, हेपण सांगितलेय.  पण त्यांचे वैचारिक बंड व्यापक होते. परिवाराचे ऋण मान्य करून; साम्यवाद, नक्षलवाद, समाजवाद, सर्वोदयवाद या सर्वांत ते मनाने गुंतलेले होते. ते समन्वय शोधत होते. समन्वयावर आधारलेली परिवर्तनाची चळवळ सुरू करण्यामधले एक साधन म्हणून ते पत्रकारितेकडे पाहत होते. ६१ साली ‘माणूस’ सुरू झाले. पहिली अडीच वर्षे ‘माणूस’ मासिकाच्या स्वरूपात होते; नंतर अडीच वर्षे पाक्षिक आणि ६६ पासून साप्ताहिक  म्हणून सुरू झाले. ‘माणूस’ची सुरुवात ‘राजहंस’चा छोटा भाऊ म्हणून सुरू झाली; पण लवकरच ‘राजहंस’मागचा म्हणून त्याने स्वतःची ओळख पटवली. नवे विषय, नवी मांडणी, नवी कल्पना आणि त्याहीपेक्षा विचारधारांमधील समन्वय शोधण्याची आंतरिक तळमळ आणि प्रामाणिक धडपड ही श्रीभाऊंची वृत्ती ‘माणूस’ची ओळख ठरली.

(२)

  १ जून, १९६६ला ‘माणूस’ आणि ‘राजहंस’ची अगदी नकळत पुढे एका नव्या दिशेने होणाऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. त्या दिवशी अरुण साधू आणि श्री.ग.मा. यांचा भाऊ दिलीप हे ‘माणूस’मध्ये पूर्णवेळ साहाय्यक म्हणून सामील झाले. व्यक्तीच्या आणि संस्थेच्या जीवनात काळानुसार घडणाऱ्या घटना घडत होत्याच. ७७मध्ये बाबासाहेब पुरंदरे आपली सर्व पुस्तके घेऊन ‘राजहंस’मधून बाहेर पडले. ७७ ते ८२ फक्त श्री. ग. माजगावकर ‘राजहंस’चे मालक होते. ८२मध्ये दिलीप त्यांना भागीदार म्हणून सामील झाला आणि गेली काही वर्षे फक्त दिलीप ‘राजहंस’चा मालक आहे. 

 पण या रुक्ष आकडेवारीबरोबरच काही महत्त्वाचे बदल होत होते. श्रीभाऊ, दिलीप आणि अरुण साधू यांच्या चर्चेमधून नवे लेखक, नवे विषय पुढे येत होते. ‘माणूस’च्या लेखमाला आणि विशेषांक काही काळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक साहित्यिक चर्चेचा केंद्रबिंदू बनले होते. ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, ‘व्होल्गा जेव्हा लाल होते’, ‘आणि ड्रॅगन जागा झाला’, ६६च्या दिवाळी अंकात हंसा वाडकरांनी सांगितलेली आणि अरुण साधूंनी समर्थपणे पण संयमाने पेललेली ‘सांगत्ये ऐका’ असे एक ना अनेक विषय त्यात आले. विषय, लेखक, मांडणी, भाषा, तसेच लेखमालेचे व विशेषांकाचे नाव या सर्वांत एक आल्हाददायक नवेपण असे.

 दिलीप आणि श्रीभाऊ यांच्यात कामाची वाटणी झालेली होती. निर्मला पुरंदरेपण मदतीला होत्या. श्रीभाऊ पुण्याची कचेरी, पुण्याचे लेखक, विक्रीव्यवस्था यांत लक्ष देत. दिलीपच्या दर आठवड्याच्या मुंबईच्या वाऱ्या सुरू होत्या. मुंबईत लेखकांना भेटणे, नव्या विषयांची चर्चा करणे, मुंबईचे लेखक व विषय ठरवणे, जाहिराती मिळवणे आणि महत्त्वाचे म्हणजे पुण्यात संगम प्रेसमधून अंकाची वेळेवर छपाई करून घेणे. कामाची वाटणी अशी व्यवस्थित होती. दोघेही एकमेकांत मनाने गुंतलेले होते; पण दोघे दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करीत होते; त्यामुळे नकळत एक अंतर्विरोध होता. दोघांनाही समाजाची, भोवतालच्या वास्तवाची, लोकांच्या प्रश्नांची नेमकी आणि भेदक जाण होती; पण श्रीभाऊ हे या सर्वांत सर्वस्व ओतून, झोकून देऊन, जमेल तसे समस्येचे उत्तर शोधू पाहणारे फकीर होते. विकलेल्या प्रत्येक अंकामागचे काही पैसे दुष्काळी विभागात विहिरी खणावयास द्यायचे असा उपक्रम किंवा जनमानस ढवळून काढणारी ‘कैलास ते सिंधुसागर’ अशा पदयात्रा यात त्यांना खरा रस होता. दिलीपचे नेमके याच्या उलट होते. समोरची समस्या, जनमानस, समोरचा माणूस वाचून समजून घ्यावयास त्यास आवडे. हे सारे समाजासमोर नेमके आणि भेदकपणे मांडावे; मात्र हे सारे करताना व्यवहारावरची पकड सुटून उपयोगी नाही हे त्याच्या मनात पक्के होते.

 दिलीपची आणि माझी पहिली भेट मला स्पष्ट आठवते. गोष्ट तीस-पस्तीस वर्षांपूर्वीची. मी संशोधक म्हणून ‘सीबा संशोधन केंद्रात’ नुकताच शिक्षण संपवून नोकरीला लागलो होतो. आवड किंवा न आवरता येणारी ओढ म्हणून ‘किर्लोस्कर’मध्ये लिहायचो. ‘डॉ. बी. डी. टिळकांचा विस्तृत परिचय’, ‘कबड्डी आमचा राष्ट्रीय खेळ होईल का?’ असा एखादा वेगळा विस्तृत लेख वगैरे वगैरे. दिलीपच्या त्या वेळी मुंबईच्या वाऱ्या सुरू झाल्या होत्या. तो बोरीबंदरजवळ कुठल्यातरी सर्वसामान्य हॉटेलात उतरायचा. संपादक पत्र पाठवून, ओळख नसताना भेटीला बोलावतात; याचेच मला अप्रूप होते. त्या वेळी सर्वसामान्यपणे घरी फोन नसत. असले तरी विश्वासार्ह नसत. पत्रापत्रीतून त्याने पुढाकार घेऊन भेट ठरवली होती. ‘न्यू हिंदू एम्पायर’ का अशा कुठल्यातरी हॉटेलात आम्ही भेटणार होतो. एकमेकांना त्या हॉटेलात कसे ओळखायचे वगैरे सिनेमात असतात तसे संकेत होते.

 पहिल्याच भेटीत आमच्या ‘लहरी’ जुळल्या. अनेक वर्षांचे दोस्त असल्यासारखे आम्ही मित्र बनलो. दोघेही पंचविशीतले, पार अनभिज्ञ. प्रचंड उत्साह, समोरचा माणूस आणि समाज समजून घेण्याची अनिवार ओढ; पण पहिल्याच भेटीत आमची मैत्री पक्की झाली याचे कारण कविता. स्वतःला आवडलेली दुसऱ्या व्यक्तीची एक एक कविता एकमेकांना आपल्या आवाजात ऐकवत आमच्या बैठकीला सुरुवात झाली; त्यानंतर आमच्या अगणित भेटी झाल्या; पण हा क्रम कधी चुकला नाही. ‘तुमच्या आवाजातील आपल्या कविता ऐकल्या; तर हे कवी कविता करावयाचे थांबतील!’ असे जवळच्या मित्रांनी पुनःपुन्हा सांगूनसुद्धा तो क्रम सुरूच राहिला. 

 पण समोरच्या माणसाची नस ओळखणे, विषय ठरवणे आणि त्याला ‘माणूस’साठी लिहिण्यास प्रवृत्त करणे, हे दिलीपचे खास कसब होते. ‘माणूस’साठी त्यांनी मला ‘विज्ञानेश्वरी’ हे  सदर चालवायला लावले. परदेशात राहिल्यामुळे हरविंदर सिंग खोरानांना ‘नोबेल प्राइज’ मिळाले, त्या वेळी भारतातल्या प्रमुख शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेत, हे भारतात का घडत नाही याचा शोध घेत आम्ही दोघे अस्वस्थपणे हिंडलो आणि ‘माणूस’चा एक वर्षांरंभ विशेषांक संपूर्णपणे ‘खोराना प्रकरणाच्या निमित्ताने’ म्हणून काढला. प्रा. अ. भि. शहा यांनी ६८ साली ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ची स्थापना केली. त्याच्या उद्घाटनाचा समारंभ मी ‘माणूस’मध्ये पूर्णपणे शब्दांकित केला आणि यातली महत्त्वाची गोष्ट अशी की, परिवारातला म्हणून शिक्का बसत असताना, ते वादळी भाषण श्रीभाऊंनी संपूर्ण छापले आणि दिलीपने मुखपृष्ठावर प्रा. शहांचे, त्या वेळी न पटणारे; पण आज पटलेले वाक्य… ‘Before it is too late, before Guru Golvalkar becomes the spiritual dictator of India  -‘ हे ठळकपणे छापले.

 सांगायचा मुद्दा वेगळा – अशी वेगवेगळी माणसे हेरत, त्यांना योग्य विषयावर बोलते करीत, दर आठवड्याला दोन-तीन दिवस दिलीप मुंबईत हिंडत असे आणि स्वतः काही फार लिहिण्यापेक्षा मुंबईत लोकलच्या तृतीय श्रेणीच्या डब्यातून धक्के खात प्रवास करीत, त्याच्याबरोबर लेखकांना आणि इतर माणसांना भेटण्यात मला अधिक रस होता. एखादा दिवस फारच चांगला गेला म्हणजे एखादा विषय वा एखादा नवा माणूस हाताशी लागला की चैन म्हणून रात्रीचा नऊचा सिनेमा पाहावयाचा, परत जाताना सिनेमागृहासमोरच्या ढकलगाडीवर काहीतरी चमचमीत खायचे आणि फारच चैन करावी असे वाटले तर एखादे वेळी ‘चायनीज’ला जायचे. सारे कसे मंतरलेले होते. 

 श्रीभाऊ आणि दिलीप यांच्या अथक प्रयत्नांमधून ‘राजहंस’चे म्हणून लेखक आणि विषय तयार होत होते. त्याच वेळी त्या कालखंडात दिलीपवर एक वेगळी व्यावसायिक जबाबदारी होती. काम तसे पाहिले तर पाट्या टाकण्याचेच होते – पुण्याला असताना ‘माणूस’ची वेळच्या वेळी योग्य छपाई करून घेण्याचे; पण नियतीने त्याच्या पदरात एक विलक्षण दान टाकले होते. तो नकळत घडत होता. त्याचा त्याला आणि ‘राजहंस’ला पुढे अमर्याद फायदा होणार होता. त्याचे असे झाले होते की, छपाई पटवर्धनांच्या संगम प्रेसमध्ये चाले. माधवराव पटवर्धन संगम प्रेसचे प्रमुख होते. रावसाहेब पटवर्धनांचे रक्त त्यांच्याही धमन्यांत होते. हेवा वाटावा अशी सौंदर्यदृष्टी त्यांच्याकडे होती. सर्वस्व ओतून कोणतेही छोटे-मोठे काम करावे आणि नकळत समोरच्या माणसालापण आपला मानून आपल्यासारखे घडवावे हा त्यांचा स्वभावधर्म होता. आलेले छोटे कामही आपल्या घरचे महत्त्वाचे कार्य समजून करावे आणि ते करताना साधनसामग्री कमी आहे असे मानू नये, आहे ती कल्पकतेने वापरावी; ही त्यांची वृत्ती होती.

 दोन रंगांच्या त्या जमान्यात कल्पकतेने त्यांनी रंगपंचमीचे ‘माणूस’चे मुखपृष्ठ अनेकरंगी करून दाखवले. महत्त्वाचा नवा विषय याच अंकात गेला पाहिजे म्हणून रात्री खिळे जोडले! खरेतर संगमच्या कामात ‘माणूस’ नगण्य होते; पण मराठीत एक वेगळे साप्ताहिक उभे राहत होते,घडवता येण्यासारखा एक तरुण समोर होता. दिलीप त्यांचे ऋण मुक्तपणे मान्य करतो. त्यांनी दिलीपला आणि ‘राजहंस’ला सौंदर्यदृष्टी दिली. दृष्ट लागावी अशी ‘राजहंस’ची मुखपृष्ठे पुढे यातून तयार होणार होती.हे सारे असे मजेत चालले होते. देविदास  बागूलपण तेथे जवळपास होते. तेवढ्यात संगम प्रेस कोथरूडला हलला. आता सायकल मारीत कोथरूडच्या फेऱ्या मारणे आले. अंकाच्या गरजेप्रमाणे दिवसा, दुपारी, रात्री – त्यातही मजा होती; पण त्याच वेळी दुसरी एक महत्त्वाची जबाबदारी अंगावर आल्याने माधवराव संगम प्रेस सोडून गेले. फार मोठी पोकळी आमच्या आयुष्यात निर्माण होते आहे असे दिलीपला काही काळ वाटले; पण काही काळाने समजले की, यांनी तर आपल्याला खूप काही शिकवले आहे! रंगसंगती, सौंदर्यदृष्टी आणि मुद्रणकलेचे काहीही शिक्षणक्रम कधी केले नसताना, त्यांनी आणि देविदास बागूल यांनी आपणाला मुद्रणकलाही शिकवलीय. महत्त्वाचे म्हणजे कामगाराला आपले मानून, त्यांना समजून घेऊन, संघवृत्तीने त्यांच्याकडून काम कसे करून घ्यावे याचे वस्तुपाठ दिलेत. 

 अगदी त्याच वेळी एक वेगळी गोष्ट घडली. पुन्हा स्वप्नातील घटना वाटावी अशी, किंवा बाबासाहेबांचा लोकविलक्षण आवाका जाणवावा अशी गोष्ट! सदाशिव पेठेत बुधगावकरांचा एक प्रशस्त वाडा होता. बुधगाव हे मिरजेचे उपसंस्थान. त्या वाड्यात ‘माणूस’चे इतर सामान ठेवण्यासाठी एखादी खोली मिळाली तर पाहावयाचे होते. दिलीप बाबासाहेबांना बरोबर घेऊन गेला. बुधगावकर बाबासाहेबांना चांगले ओळखत हे तर आलेच. बाबासाहेबांनी खोलीची गोष्ट करताच, बुधगावकर म्हणाले, “खरे तर हा वाडाच विकायचा आता विचार आहे.” झाले! एक वेळ एक हजार पावतीपुस्तके छापून घेणाऱ्या बाबासाहेबांच्या समोर ‘माणूस’ आणि ‘राजहंस’चा उद्या वाढणारा पसारा आला आणि राजहंस प्रकाशनसंस्थेने तो वाडा विकत घेतला. ही गोष्ट १९६८ मधली.

 त्याच वेळी माधवराव संगम प्रेस सोडून गेले होते. एवढ्या मोठ्या वाड्याचे काय करावयाचे, हापण एक प्रश्नच होता. वाड्यामधील काही जागेत प्रेस सुरू करण्यात आला. मुद्रणकला समजली म्हणजे मुद्रणयंत्रे समजली असे नव्हे. हे दिलीपच्या लक्षात यावयास तसा वेळच लागला. खरे तर ६९ ते ७५ पर्यंत प्रेस तोट्यात होता; पण ‘माणूस’ दमदारपणे खपत होता. ‘माणूस’चे पैसे प्रेसमध्ये घालूनही प्रेस सुधारला नाही. याउलट संगमने दिलेला दर्जा आपल्याच प्रेसवर अवलंबून राहिल्याने घसरला. १९७३ च्या अखेरीस ‘माणूस’ आणि प्रेस दोन्ही डबघाईला आले होते. ७७ साली दिलीपने ‘माणूस’मधून लक्ष काढून पूर्णपणे छापखाना बघावयाचा, असे ठरले. ८१ पर्यंत छापखाना स्थिर झाला होता; पण बदलत्या कालखंडात ‘माणूस’ डबघाईला होता. छापखाना ही ‘राजहंस’ व ‘माणूस’ यांची आवड नव्हती; तर गरज होती. नंतर त्यात प्राप्ती झाली. थोडे; पण उत्तम दर्जाचे काम करील अशी ‘साप्ताहिक मुद्रण’ची ख्याती झाली; पण या सर्वांतून ‘राजहंस’ आणि दिलीप एक महत्त्वाचा धडा शिकले – छापखाना, साप्ताहिक, पुस्तकप्रकाशन हे तीन वेगवेगळे व्यवसाय आहेत; या तिघांचे एकत्रीकरण केले;तर ती तीन पायांची शर्यत ठरते. एकाचा तोटा दुसऱ्याच्या नफ्यात घालून पहिला सुधारत नाही. दुसरा मात्र गाळात जातो.  

 व्यवसाय म्हणून यांतला एक चालत नसेल तर तो सुधारणे किंवा बंद करणे एवढाच पर्याय तुमच्यासमोर असतो. खरेतर हा व्यवसायशास्त्रातील पहिला नियम असणार; पण कोणतेही व्यावसायिक शिक्षण न घेता, आवड आणि निष्ठा म्हणून व्यवसायात उतरलेले गेल्या पिढीतील हे तरुण धडपडत, ठेचा खात शिकत होते. ‘माणूस’ बदलत्या परिस्थितीत योग्य  वेळी बंद न केल्याने श्रीभाऊंना झालेला मानसिक त्रास आणि ‘राजहंस’ला बसलेला आर्थिक फटकापण बघावा लागला. ‘माणूस’ ८९ मध्ये बंद झाले. छापखाना स्वाश्रयी बनून चालत होता. ‘साप्ताहिक मुद्रण’ला नाव होते; पण दिलीपच्या मुलाने अमेरिकेत जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. सावध बनलेल्या दिलीपने छापखाना आणि प्रकाशन या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करून दोन्हीचेही नुकसान करण्याऐवजी इसवी सन दोन हजारमध्ये छापखाना बंद केला. ‘राजहंसचे दिवस’ पाहताना आपण तसे झपाट्याने, वेगळ्या वाटेने पुढे आलोय. दिलीपच्या आणि ‘राजहंस’च्या घडणीमधील माधवराव पटवर्धन, बुधगावकरांचा वाडा आणि छापखाना ही वेगळी व महत्त्वाची प्रकरणे आहेत. फार मजेशीर! आणि त्यावर सविस्तर, खरेतर दिलीपनेच, पुढे-मागे लिहावयास हवे.

(३)

 आपण पुन्हा मागे जाऊ. ६५ ते ९० या कालखंडात ‘राजहंस’चे लेखक पुढे येत होते. वेगळी पुस्तके येत होती; मात्र ‘शिवचरित्र’, ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, ‘व्होल्गा जेव्हा लाल होते’ ही सारी एका छापातील पुस्तके होती. ‘सांगत्ये ऐका’मध्ये एक वेगळेपण होते; पण पुन्हा ते ‘माणूस दिवाळी अंका’तील लेखावर होते. वेगळ्या प्रकारची दोन पुस्तके म्हणजे सुमती देवस्थळेंचे ‘टॉलस्टॉय एक माणूस’ (७२-७३) आणि ‘एक होता कार्व्हर’ हे वीणा गवाणकरांचे. महत्त्वाचे म्हणजे दोघीही ‘राजहंस’च्या लेखिका होत्या. विषय निवडणे, लेखक शोधणे, मित्रमंडळीत चर्चा करणे आणि पुस्तकाची निर्मिती या सर्व विभागांत जीव ओतून काम होत होते. ‘राजहंस’चे मुखपृष्ठ ही ‘राजहंस’ची एक वेगळी ओळख ठरली होती; पण यासाठी दिलीप अस्वस्थ होऊन काम कसे करीत होता, हे थोडे समजून घ्यावयास हवे. 

 ’रोश विरुद्ध स्टॅनले ॲडॅम्स’चे मुखपृष्ठ घेऊ. एका बलाढ्य औषधकंपनीविरुद्ध एका माणसाने एकाकीपणे दिलेला हा लढा. त्या कंपनीत काय होते, हे कळल्यावर नोकरी सोडून दिलेला. हा संघर्ष हा हेमिंग्वे यांच्या ‘ओल्ड मॅन अँड द सी’पेक्षा वेगळा आणि अधिक भेदक आहे, हे चर्चेत लक्षात आले. कोंडी सुभाष अवचटने सोडवली. पुण्याच्या औषधांच्या दुकानातून हिंडून मिळतील तेवढी कॅप्सूल्स मिळवली. रात्रभर बसून ती फेविकॉलने एका कार्डबोर्डावर चिकटवली. त्या रंगीबेरंगी कॅप्सूलच्या भिंतीमधील एक कॅप्सूल काढून खाली फेकले आणि फोटो घेतला. चिरेबंदी व्यवस्थेमधील एक दगड कोसळला होता.

 हे फार महत्त्वाचे होते; पण फार अपुरेही… पु. ल. समग्रदर्शन म्हणजे ‘अमृतसिद्धी’ पुस्तकाचे मुखपृष्ठ करताना त्यात पु.ल. यांचा फोटो न देता, त्यांची मराठी मनातील प्रसन्न, प्रेरक प्रतिभा दाखवायची होती. बालगंधर्व रंगमंदिरातून एक सुंदर पडदा मिळवला. त्याच्यापुढे पु.लं.ची पुस्तके, त्याच्यावर ठेवण्यासाठी प्रयत्नपूर्वक मिळवलेला जुना ग्रामोफोन, मोरपिसांची लेखणी या सर्वांची रचना करून फोटो काढण्यात आला. चॅप्लिनवरचे पुस्तक ‘हसरे दुःख’ घ्या. बूट, टोपी, पॅंट, काठी या त्याच्या फार ओळखीच्या झालेल्या खुणा न वापरता, फोटो न वापरता मुखपृष्ठ बनवावयाचे होते. त्याचे दोन डोळे – हसणारे आणि रडणारे दाखवून बनवलेले मुखपृष्ठ पु.लं.ना फार आवडले; मग त्याची मोठी प्रतिकृती बनवून त्यांच्या दिवाणखान्यात लावण्यासाठी ते भेट म्हणून दिले.

 विजयाराजे सिंदिया यांच्या आत्मचरित्रावरील ‘राजमाता’ पुस्तकावरील मुखपृष्ठ असेच प्रयत्नपूर्वक बनवले. सुभाष अवचट यांनी ‘राजमाता’ हे जाड पितळी अक्षरात हवे, असे ठरवले. बोहरी आळीतून ती मिळवण्यात आली. त्याचा फोटो भीमसेनचा मुलगा जयंत घेणार होता. आखाती देशातील राजाने भीमसेन यांना भेट दिलेला एक फार उंची गालिचा होता. त्याच्यावर ती अक्षरे मांडण्यात आली. त्यात जयंत जोशी यांनी आणखी एक कल्पना दिली : राजमाता आता राजवस्त्रे – त्यागून फक्त पांढरी वस्त्रे घालत; त्यामुळे प्रवृत्ती – निवृत्तीचे प्रतीक म्हणून गालिच्यावर मोत्यांची एक माळ सहजपणे टाकण्यात आली. जाणकार, रसिक या कल्पकतेला दाद देत होते. मला आठवतेय, ‘राजमाता’ पुस्तकाचे प्रकाशन ग्वाल्हेरला केले. आमची राहण्याची व्यवस्था राजवाड्यात. संघ्याकाळी प्रकाशनसभेला प्रचंड गर्दी. दिलीप, वि. स. वाळिंबे, राजमाता आणि प्रमुख वक्ता म्हणून मला उभा केलेले! पण ग्वाल्हेरच्या मराठी रसिकांचे यात कशातच लक्ष नव्हते. ते प्रचंड संख्येने पुस्तक विकत घेत होते आणि पुस्तक न उघडता मुखपृष्ठावर खिळून त्याचेच कौतुक करीत होते. 

दिलीपचा चेहरा समाधानाने तृप्त झालेला होता. केलेला खर्च आणि घेतलेले श्रम या मानाने व्यावहारिक यश फारच कमी असायचे; पण त्या धुंदीत त्याची चिंता नसायची. जे मुखपृष्ठाचे, तेच मलपृष्ठावरील मजकुराचे आणि जाहिरातीचे. प्रत्येक वेळी नव्या मित्राला गाठून नवे मनपसंत लिहून घेण्याचा ध्यास होता. ‘बाराला दहा कमी’ या पुस्तकासाठी हा मजकूर आणि जाहिरात दिलीपच्या मनासारखी होत नव्हती. मी दिल्लीहून काही कामासाठी पुण्याला आलो होतो. विमान सुटायला दोन-तीन तास असताना त्याने मला एका खोलीत बंद केले आणि तो मजकूर पुरा झाल्यावर मला विमानतळावर सोडले. लेखिका पद्मजा फाटक यांना हा मजकूर फार म्हणजे फारच आवडला म्हणून त्यांनी सांगितले, त्या वेळी सारे काही पावले, असे आम्हां दोघांनाही वाटले.

हे सारे छान होते. मनापासून आवडत होते. भारावून काही कामे होत होती; पण यात व्यवहार बसत नव्हता. हे लाखाचे बारा हजार करण्याचे उद्योग होते. दिलीपला श्रीभाऊंनी नजर आणि सामाजिक बांधिलकी दिली होती. व्यवहार दिला नव्हता. तो त्यांच्या वृत्तीतच नव्हता. हे सारे दिलीपला स्वतः शिकावयाचे होते. उद्या उपयोगी पडतील असे त्याचे ठोकताळे तयार होत होते. ‘नाझी भस्मासुरा’पासून ‘सांगत्ये ऐका’पर्यंतच्या ‘माणूस’च्या गाजलेल्या लेखमाला वा लेख पुस्तकरूपाने आले. त्यांना यश मिळाले; पण ते मर्यादित होते. दिलीपच्या मते लेखमाला संपल्यावर दोन-एक वर्षांनी पुस्तके छापली – हे त्याचे प्रमुख कारण होते. तवा तापला असताना लगेच हे करावयास हवे होते. हा विचार तसा समजण्यासारखा होता; दुसरे काही विचार समजायला कठीण असत. बाबासाहेबांच्या शिवचरित्राचे यश ‘निर्विवाद’ होते. दिलीपपण बाबासाहेबांच्या आणि त्यांच्या लेखणीच्या प्रेमात होता; पण त्याच्या मते पुस्तकाच्या अमाप यशाचे श्रेय प्रामुख्याने त्या वेळेला होते. ५१ साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. महाराष्ट्राची अस्मिता दुखावली होती. त्याला आधार देणारी, तिचा गौरव करणारी कलाकृती त्या वेळी जनमानसाला हवी होती; म्हणजे पुस्तकाच्या यशात विषय, लेखक, शैली यांपेक्षा थोडे अधिक महत्त्व वेळेला (टायमिंगला) असते.

 हे असे नियम तो मनाशी तयार करीत होता. त्याला माणसे आणि समाज वाचता येत होता. आता व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी अशा खेळी खेळणे कठीण नाही असे वाटत होते; मात्र हे सारे इतके सोपे, गणितात बसण्यासारखे नसते हे फार मोठी किंमत देऊन त्याला शिकावयाचे होते. हे धडपडत शिकणे काय असते हे तीन-चार अनुभवांतून समजावून घ्यावयास हवे. पहिल्या पिढीत कोणत्याही व्यवसायात उतरून यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांनी हे समजून घ्यावयास हवे. निराश व्हावयाचे नाही ही दिलीपची वृत्ती आणि त्याला प्रेमाने समजून घेत, त्याला आधार देत उभे असलेले श्रीभाऊ यामुळे आपण या वेळी बाहेर आलो, असे दिलीप आजही सांगतो. 

 ८१ सालीची गोष्ट. काही लाख आंबेडकरप्रेमी मराठी माणसांचा मेळावा नागपूरला जमणार होता. बाबुराव बागूल यांनी कथारूप आंबेडकर-चरित्र सांगावे आणि ‘आंबेडकर भारत’ हे पुस्तक पाच भागांत प्रसिद्ध करावे, दीडशे-दोनशे पानांच्या प्रत्येक पुस्तकाची वीस रुपये किंमत असे ठरले. एक हजार प्रतींची आवृत्ती काढावी हा नेहमीचा नियम. पुस्तक सुंदर तयार होत होते. एवढी प्रचंड गर्दी असणार, आवृत्ती मोठी पाहिजे असे दिलीपच्या मनाने घेतले. ‘पॉप्युलर प्रकाशन’ही त्या वेळी ‘आंबडेकर चित्र आणि चरित्र’ म्हणून चित्ररूप आंबेडकर पुस्तक काढत होते. लोकांना पटवण्यात दिलीपचा हातखंडा. त्याने रामदास भटकळांना या पुस्तकांच्या तीन हजार प्रती तेथे खपतील, हे पटवून दिले.

 येथवरही ठीक होते. समारंभाची तारीख जवळ येऊ लागली. त्याच्या भव्यतेची वर्णने सर्वत्र येऊ लागली. दहा हजारांची आवृत्ती काढली पाहिजे, हे त्याच्या मनात पक्के झाले. श्रीभाऊंना फारसे काही पटत नव्हते; पण त्यांचा या उत्साहाला पाठिंबा होता. नागपूरचा समारंभ दोन दिवसांवर आलेला. पुस्तके तर चार हजारच छापून झालेली. श्रीभाऊंनी पुण्याहून टेंपोने ती पुस्तके घेऊन पुढे नागपूरला जायचे. समारंभाच्या ठिकाणी पॉप्युलर, राजहंसचे भव्य विक्रय दालन. तेथे बसून पुस्तके विकायची. उरलेली सहा हजार होतील, तशी घेऊन दिलीपने नागपूर गाठायचे. दिलीप श्रीभाऊंच्या दूरध्वनीची वाट पाहत होता. त्यांनी सांगितले, ‘येऊ नकोस. आपली २५-३० पुस्तके खपलीत. आपल्याला लागूनच महाराष्ट्र शासनाचे दालन आहे. मोठे आंबेडकर चरित्र तेथे एक रुपयाला विकताहेत!’बसलेला फार मोठा आर्थिक फटका थोडा भरून निघावा म्हणून ८२-८३ साली सावरकर जन्मशताब्दीला कल्पक अशी ‘सावरकर दिनदर्शिका’ काढली. कल्पनेचे स्वागत झाले. तीन हजार प्रती दोन महिन्यांत संपल्या. थोडे कर्ज फिटले, थोडा आत्मविश्वास वाढला. ८४ साली आम्ही ‘विद्यार्थी दिनदर्शिका’ काढायचे ठरवले. ही विद्यार्थी दैनंदिनी मी एकटाकी लिहिली. दैनंदिनी संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेली होती. मी त्या वेळी नोकरीसाठी दिल्लीत होतो. एक फार मोठी पोटाची शस्त्रक्रिया झाल्याने दिलीप पुण्यात रुग्णालयात होता; पण त्याने निर्मिती उत्कृष्ट केली. माझा मजकूरपण चांगला असावा; कारण त्याच मजकुरावर दिलीपने  नंतर ‘तुम्हांला विज्ञान युगात जगायचंय’ आणि ‘विज्ञानेश्वरी’ ही माझी दोन पुस्तके काढली. दोन्ही पुस्तकांच्या सहा-सात आवृत्त्या निघाल्या; पण दैनंदिनी पार कोसळली. पुन्हा गाळात घालणारा एक प्रकल्प!

 मात्र दिलीपला आजही आश्वासक आधार वाटतो अशी कौतुकाची एक थाप त्या वेळी त्याच्या पाठीवर पडली. त्या वेळी त्याला फारसे नाव नव्हते. त्याची आणि जयंतराव साळगावकरांची फारशी ओळखपण नव्हती; मात्र दिलीप हा त्यांच्या दृष्टीने एक धडपडणारा मराठी तरुण होता. त्यांनी फार विस्तृत पत्र लिहिले होते, ‘तुम्हांला फार चांगली, उपयुक्त कल्पना सुचली होती. फार समर्थपणे तुम्ही ती पेललीत; पण खालील काही चुका केल्याने तुम्हांला व्यावहारिक यश मिळणार नाही; पण अजिबात नाउमेद होऊ नका.’ जयंतरावांचे ते पत्र, मनापासून शिकवणारे माधवराव पटवर्धन अशी माणसे भोवताली होती म्हणून दिलीप आणि ‘राजहंस’ रुजले हे तर खरेच; आणि अशा प्रवृत्तीची मान्यवर माणसे महाराष्ट्रात जेवढी जास्त असतील त्या प्रमाणात अनेक प्रकल्प महाराष्ट्रात वाढीला लागू शकतील. 

 मात्र त्या पत्राने आणि भोवतालच्या परिस्थितीने दिलीपचा उत्साह आणखीनच वाढला. ही १९८८ सालची गोष्ट. ते नेहरू जन्मशताब्दीचे वर्ष होते. ८८च्या एप्रिलमध्ये दूरदर्शनवर ‘या वर्षी सरकारी आणि खासगी प्रयत्नांतून, नेहरू अभिनवपणे आणि समर्थपणे सर्वदूर पसरवले पाहिजेत,’ म्हणून आवाहन करण्यात आले. आपण हे ‘नेहरू डायरी’ या माध्यमातून फार छानपणे करू, असे दिलीपला जाणवले. वि. स. वाळिंबे आणि मंगेश पाडगावकर यांनाही कल्पना आवडली. संपादनाचे काम या दोघांनी स्वीकारले. काम फार वेगाने आणि कल्पकतेने सुरू झाले. इंग्रजी भाषांतर, छपाई, निर्मिती हे सारे भरत दाभोळकरांनी स्वीकारले. दिल्लीतील ‘नेहरू जन्मशताब्दी समिती’चे वसंतराव साठे अध्यक्ष होते. त्यांना ही कल्पना फार आवडली. साऱ्या भारतात फक्त एकच खासगी संस्था असे काही करते आहे ते महाराष्ट्राला भूषणावह आहे, असे त्यांनी सांगितले.

 समितीच्या सभासदांसाठी ३२ पानांची डमी प्रत काढून वाटण्यात आली. समितीच्या सर्व सभासदांना एकमताने हे आवडले. देशभरच्या बँका, आयुर्विमा संस्था, बाकी अनेक सरकारी संस्था यांसाठी सरकारच २५ ते ३० हजार प्रती घेणार हे जवळजवळ नक्की झाले. प्रत्येक प्रतीचा निर्मितीखर्चच मुळी १५० रुपये येत होता. सारा प्रकल्प पन्नास लाख रुपयांच्या थोडा पुढे. दिल्लीत कागद हलवायचे म्हणून राजहंस प्रतिनिधींच्या दररोजच्या विमानफेऱ्या सुरू झालेल्या. सारे संपूर्णपणे  व्यवस्थित सुरू होते; पण निर्णय घेण्याची समितीची सभा भरली त्या वेळी आजारी पडल्याने साठे आले नाहीत. शीला दीक्षित सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. एवढी चांगली योजना खासगी माध्यमातून न करता सरकारी माध्यमातून करावी असे त्यांनी सुचवले आणि सर्वांनी मान्य केले. 

 चार महिन्यांची अथक सांघिक धडपड, काही लाखांचा खर्च; एवढे करून शेवटी तीनएक हजार प्रती खपल्या. उमेद पूर्णपणे संपावी असे भरभक्कम कर्ज बरोबर होते. मला आठवतेय, दिलीपला नेहमी हसतमुखाने साथ देणाऱ्या रेखावाहिनीपण रागावल्या होत्या – वैतागल्या होत्या असे म्हणता येईल. त्या म्हणाल्या, “तुम्हां दोन ‘डीं’ ना सांगून ठेवते. यांच्या तोंडात जर पुन्हा डायरीतला ‘डी’ कधी आला; तर माझा ‘डायव्होर्स’ मधला ‘डी’ लिहून ठेवा.”जेवणखाण आटोपून घरातून बाहेर पडल्यावर दिलीप मला म्हणाला, “रेखाला जाऊन सांग. ‘वसंतसेना’ सिनेमात प्रचंड कर्ज झाल्यावर आचार्य अत्रे म्हणाले होते, ‘कर्ज फेडण्याचा आता एकच मार्ग आहे. पुन्हा सिनेमा काढला पाहिजे. सिनेमाच्या धंद्यातील कर्ज कोपऱ्यावर पानपट्टीचे दुकान काढून फेडता येत नाही!’ आणि ह. वि. मोटे म्हणालेत, ‘ज्या विहिरीत आपले पैसे बुडालेत, त्याच विहिरीत बुडी मारून ते पैसे बाहेर काढावे लागतात. दुसऱ्या विहिरीत बुड्या मारून काही फायदा नसतो.’ मी आता ‘पानिपत’ कादंबरीचा भलामोठा प्रकल्प घेणार आहे.”

 ’पानिपत’ म्हटल्यावर नाही म्हटले तरी साऱ्या मराठी मनांचा ठोका थोडा चुकतोच; मात्र नावापलीकडेही अस्वस्थ व्हावे असे बरेच काही होते. लेखकाचे नाव फारसे माहीत नव्हते. संहिता फारच मोठी होती. मला स्वतःला साहित्यातले फारसे कळते असे नव्हे; पण मला कादंबरी आवडली नव्हती. निम्म्याच्यापलीकडे मी ती वाचूच शकलो नव्हतो. साहित्याची विलक्षण जाण असलेले, वेगवेगळ्या चष्म्यांमधून साहित्य पाहणारे माझे जवळचेच मित्र आहेत. मी त्यांना साळगावकर – तेंडुलकर दृष्टिकोन म्हणतो. त्या दोघांना किंवा त्या पठडीतील कोण्या वाचकांना; पण मला वाटते त्या दोघांनाच त्या कादंबरीबद्दल असेच काही वाटले होते. इकडे दिलीप मात्र निवांत होता. त्याच्या दृष्टीने हा विषय त्या वेळी महत्त्वाचा होता. त्याने ज्यांना लेखक बनवले होते, अशा मित्रांना डिवचत या अशा विषयावर तुम्ही एखादी मोठी कादंबरी लिहा म्हणून तो त्यापूर्वी दीड-दोन वर्षे पत्रे पाठवत होता. माझ्या स्वतःच्या संग्रहात, ‘तू १८५७ या तुझ्या आवडत्या विषयावर मोठी कादंबरी मला लिहून दे,’ म्हणून सांगणारी ४०-५० पत्रे आहेत. ही पत्रे आणि माझ्याकडचे त्या विषयावरचे विपुल साहित्य व माझे त्यावरचे वाचन पाहून विजय तेंडुलकरांनी तुम्ही खरेच ती कादंबरी का लिहीत नाही म्हणून विचारलेसुद्धा होते…

 इकडे दिलीप ‘पानिपत’च्या हस्तलिखितावर खूश होता. त्या वेळी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात अस्वस्थपणे जे भिरभिरे फिरत होते; त्यात पौरुषाचे गुणगान करीत महाराष्ट्राने खेळलेली प्रचंड खेळी, त्यातले आभाळाएवढे यश आणि अपयश, त्या अपयशाची कारणे धूसरपणे, तरलपणे दाखवणारी प्रचंड कादंबरी ही समाजाची गरज होती. लेखक व संहिता त्याच्या दृष्टीने फारशा महत्त्वाच्या नव्हत्या. विषय हा त्याच्या दृष्टीने संघामधला ‘सचिन’ होता. बाकीचे खेळाडू संघ अकरा जणांचा व्हावा म्हणून हवेत असे काहीसे! 

 दिलीपला या वेळी, या खेळीत अपार यश मिळेल अशी आशा  नव्हे – खात्री त्या वेळी फक्त एक व्यक्ती बाळगून होती. दिलीपची वाटचाल, त्याची धडपड, त्याचे यश-अपयश प्रेमाने, आपुलकीने पाहत, त्याला आधार देत, त्याला समजून घेणाऱ्या, त्याला नकळत त्याचा मुक्त विकास करावयास देत असतानाच, आपुलकीने घडविणाऱ्या श्रीभाऊंचा या प्रकल्पावर पूर्ण विश्वास होता. यश, अपयश, प्रकल्प यांवर फारसे न बोलणाऱ्या श्रीभाऊंनी या वेळी अगदी प्रथमच दिलीपची बहीण अलका आणि मी यांना, ‘दिलीप आणि ‘राजहंस’ यातून फार मोठे होऊन बाहेर पडतील,’ असे अगदी सहजपणे आणि पूर्ण विश्वासाने सांगितले होते. समाज, विषय, लेखक, संहिता, निर्मिती, विक्री हे सारे एकत्रितपणे समजून घेतले तर काय होते, त्याचा ‘पानिपत’ हा एक छान वस्तुपाठ आहे.’पानिपत’चे यश हा मराठी साहित्यविश्वातला आता इतिहास आहे. ‘पानिपत’ने एक ‘महानायक’ लेखक निर्माण केला. ‘पानिपत’ने मरगळलेल्या मराठी साहित्यविश्वाला संजीवनी दिली. ‘पानिपत’, ‘महानायक’ हे आज ज्ञानपीठाचे दार ठोठावत उभे आहेत. ‘पानिपत’ ने राजहंसला, ‘मॅजेस्टिक’, ‘पॉप्युलर’ अशा प्रमुख प्रकाशकांच्या रांगेत आणून उभे केले. ‘पानिपत’ ने राजहंसला नाव दिले; पण पैसा फारसा दिला नाही. बहुधा जाहिराती आणि प्रकाशनसमारंभ यांत तो खर्च झाला असणार! पण हे आर्थिक स्थैर्यही लवकरच वेगळ्या प्रकारे मिळाले. ते मिळवून दिले  राजहंस परिवारातले, माझे आणि दिलीपचे जवळचे मित्र अशोक जैन यांनी. दिलीप आणि अशोक यांची कुंडली एक आहे. भोवतालचा समाज, भोवतालच्या घटना वाचायला, समजून घ्यायला दोघांनाही आवडते; यामुळे समाजाची नाडी हातात येते. ही हातात आल्यावर जे द्यावयाचे आहे, ते सोप्या आकर्षक भाषाशैलीत पुढे कसे मांडावयाचे, हे जैन जाणतात. वाचकांना हवे तसे पुस्तकरूपात कसे सादर करावयाचे हे दिलीप जाणतो. अशोक जैन यांनी भाषांतर केलेले इंदिरा गांधींचे चरित्र आणि इतर पुस्तके ‘राजहंस’ला आवश्यक ते आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात यशस्वी झाली. 

 त्या काळातील ‘राजहंस’चा इतिहास हा ‘जय नावाचा इतिहास’ आहे. तो मराठी वाचकांना माहीत आहे. खरेतर मलाच तो कालखंड कमी माहीत आहे; कारण मैत्री अभेद्य राहूनही मी या कालखंडात ‘राजहंस’पासून थोडा दूर होतो किंवा माझा आणि दिलीपचा थोडाफार भविष्यावर आणि पायगुणावर विश्वास असल्याने मी ‘राजहंस’च्या कुंडलीतून बाजूला झालो आणि ‘राजहंस’चा भाग्योदय सुरू झाला, असे आम्ही म्हणतो!!

 ’राजहंस’चे नाव आज महाराष्ट्रात सर्वत्र आदराने घेतले जाते. ‘राजहंस’ने घडवलेले लेखक म्हणून विश्वास पाटीलपासून मेघना पेठेपर्यंतच्या अनेक मान्यवर साहित्यकारांना महाराष्ट्र ओळखतो. ‘गार्गी अजून जिवंत आहे’ आणि ‘एका रानवेड्याची कथा’ अशी महत्त्वाची वेगळी पुस्तके ‘राजहंस’ मधून बाहेर येताहेत. एकच विषय अनेक अंगांनी उलगडून दाखवणारे, ‘राजहंस’ने घडवलेले शेषराव मोरेंसारखे अनेक ताकदीचे लेखक जवळ आहेत. भारतातील इतर भाषक प्रकाशकांनी असूयेने पाहावे अशी निर्मितिमूल्ये असलेली ‘एका रानवेड्याची कथा’ आणि ‘आकाशाशी जडले नाते’ यांसारखी पुस्तके आहेत. हे सारे घडतेय; कारण पडत-धडपडत शिकलेले व्यवहारज्ञान ‘राजहंस’जवळ आहे. प्रत्येक पुस्तकात ‘प्रकाशक दिसला पाहिजे,’ हे ‘राजहंस’ मानते. पुस्तकात विषय, लेखक, भाषा, मांडणी, निर्मिती हे महत्त्वाचे आहे; पण पुस्तकाच्या व्यावसायिक यशात याचा एकत्रित वाटा फक्त ४९ टक्के असतो. ५१ टक्के वाटा तुमच्या विक्रयकौशल्याचा आहे हे वास्तव ‘राजहंस’चे प्रत्येक पुस्तक बाहेर आणताना पक्के मनात असते. पुस्तके विकण्यासाठी म्हणजे वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘राजहंस’ने स्वतः शोधलेले अनेक अभिनव उपक्रम अव्याहत कार्यरत असतात. यात खाजगी किंवा गुप्त ठेवण्यासारखे काही नाही. खरेतर हे साऱ्या प्रकाशकांनी करावे असे ‘राजहंस’ला मनापासून वाटते; पण तो स्वतंत्र लेखाचा विषय होतो आणि स्वतः दिलीप त्यावर लिहिण्यास तयार आहे. 

 आज ‘राजहंस’जवळ फार मोठे आर्थिक स्थैर्य आहे. लेखकांना लिहिताना स्वास्थ्य मिळावे; म्हणून पुस्तक लिहिताना होणारा खर्च, पुस्तके, भटकणे वगैरेसाठी लेखन-शिष्यवृत्ती देणे, मानधन आधी देणे, पुस्तक लिहिण्याच्या कालखंडात दरमहा पगार देणे किंवा निळू दामलेंना सरळ इस्रायलला पाठवणे  असे अनेक उपक्रम आहेत. ‘राजहंस’च्या भल्यामोठ्या वातानुकूलित गाड्या आहेत. पुण्याला आलेल्या आपल्या लेखकाच्या गरजेप्रमाणे त्या त्याच्या दिमतीला असतात. 

 नाही म्हटले तरी कधी एकत्र बसलो, तर मला आणि दिलीपला जुने धडपडीचे दिवस आठवतात. एकदा आम्ही रविवारी सकाळी दहा वाजता गंगाधर गाडगीळांची भेट ठरवली होती. ते सांताक्रूझला कॉलेजच्या आवारात राहत. वेळेवर पोचणे गरजेचे म्हणून दादरला वेळेवर लोकलमध्ये चढून उभ्याने आम्ही निघालो. ती गाडी वाटेत थांबली नाही, हे पाहिलेच नाही. सरळ अंधेरी. हे ठीक आहे; पण पुन्हा अंधेरीला गाडी पकडली – ती वांद्र्याला थांबणारी! शेवटी तेथून टॅक्सी करून दुपारी बारा वाजता त्यांच्या घरी. ते वैतागलेले; पण उशीर का झाला हे सांगण्याची आमची हिंमत नाही – कारण यांचा पुढचा लेख ‘बंडू लेखकाला भेटावयास जातो’ असा असावयाचा!

 अशीच एक ६८ सालची गोष्ट. नेहमीप्रमाणेच ‘माणूस’, ‘राजहंस’ पैशाच्या तद्दन अडचणीत होते. दादरच्या वा. वि. गोखलेंनी केवळ नावावर दहा हजार रुपये उसने दिले. दहा हजार एकरकमी आम्ही दोघेही प्रथमच पाहत होतो. समोरच्या इराण्याच्या हॉटेलात बसून चहा घेताना, हे पैसे कोणी चोरले तर काय होईल, यावरची आमची चर्चा एवढी रंगली होती की त्याच्यावर एखादा ललित लेख तयार झाला असता किंवा खरे तर गप्पांत एवढे रंगलेल्या आम्हांला पाहून आमचे सामान पळविण्याचा किंवा खिसा कापावयाचा मोह एखाद्या चोराला नक्कीच झाला असता! 

एक अगदी कायम बरोबर असलेली आठवण : आचार्य अत्रेंचे शेवटचे दिवस होते. प्रकृती पार ढासळलेली. आम्ही त्यांना भेटावयास गेलो. प्रकृतीचे विचारणे-सांगणे बाजूलाच राहिले; थोडी जमवाजमव पार पडली की आपण लवकरच एक तडाखेबंद खपाचे इंग्रजी दैनिक सुरू करणार आहोत, महाराष्ट्राची ती गरज आहे; असे सांगण्यात जिंदादिल, चिरतरुण आचार्य अत्रे रंगून गेलेले!

 हे सारे पचवले असल्याने मिळालेल्या यशाने ‘राजहंस’च्या अंगावर चरबी चढलेली नाही. समोरची आव्हाने संपली, प्रयोगशीलतेला मर्यादा पडल्या तर व्यक्ती आणि संस्था दोघेही संपतात; म्हणून दरवर्षी २० टक्के पुस्तके तरी अशी- प्रयोगशीलतेवर आधारलेली काढण्याचा ‘राजहंस’चा उपक्रम सुरू आहे. भारतीय शास्त्रीय संगीतावरची दर्जेदार पुस्तके व्यावसायिक यश देत नसली; तरी दरवर्षी त्या विभागात एकतरी दर्जेदार पुस्तक बाहेर पडतेय. महाराष्ट्रीय जनमानसाला बायबल, कुराण, सावरकरांचा हिंदुत्ववाद हे सोप्या शब्दांत नेमके समजावे; म्हणून पुस्तके लिहिली जाताहेत. फादर दिब्रिटोंनी लिहिलेले बायबलवरचे पुस्तक तर पुरे होत आलेय. अनेक उपक्रम आहेत; पण माझी आणि दिलीपची पहिली आवड असलेली कविता अजून थोडी मागे आहे; मात्र दरवर्षी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्ध होणाऱ्या कवितांमधून शंभरएक चांगल्या कविता निवडून त्यांचा एक दर्जेदार संग्रह प्रसिद्ध करावयाचा आणि दरवर्षी एका नव्या कवीचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध करावयाचा अशा प्रकारच्या योजना जवळ आहेत. 

 पंजाबी आणि फ्रेंच भाषांत एक साम्य आहे. दोन्ही भाषांत फक्त जिंदादिल, चिरतरुण माणसांनी म्हणावी अशी एक म्हण आहे. एखाद्या ८०-९० वर्षांच्या फ्रेंच व पंजाबी म्हाताऱ्या माणसाचा जन्मदिवस असेल आणि आपण त्याला विचारले , ‘आता उद्या काय करणार?’ तर तो सांगतो, ‘जिंदगी कल चालू होनेवाली है…! Life is going to start tomorrow. अरे, आयुष्य तर खरे उद्यापासून सुरू होणार आहे. आतापर्यंत केली ती तर फक्त पूर्वतयारी होती!’ 

 मराठी माणसाला हे कधी जमेल ते मला माहीत नाही; पण जमावे असे मात्र मनापासून वाटते आणि एका प्रकाशनसंस्थेला हे जमलेय, हे मला नक्की माहीत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही; ‘पण १८५७च्या कादंबरीचे काय?’ म्हणून मला टोचणी देणारी दिलीपची पत्रे पुन्हा यावयास लागली आहेत. मी असे काही लिहिणार नाही, हे मला माहीत आहे. दिलीपलापण माहीत असणार; मात्र विश्वास पाटलांसारखा, गरुडभरारीची ताकद पंखांत घेऊन, अस्वस्थपणे अवकाशाचा वेध घेणारा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कुणीतरी नवा लेखक हे ऐकतोय; असा माझा विश्वास आहे. 

पूर्वप्रसिद्धी  : ‘कालनिर्णय’, सांस्कृतिक दिवाळी २००३

Author

One thought on “तो राजहंस एक… 

  1. राजहंस वरील लेख जुना असला तरी अप्रतिम.आता लेखकाला मानधन न देणारे संपादक,प्रकाशक अगणित आहेत.त्यामुळे लेखकाला अगाऊ मानधन,मासिक पगार,फिरायला गाडी देणारेही प्रकाशक होऊन गेले,होते हे वाचून गंमत वाटली.आता तर लेखकाकदून पैसे घेऊन मोजक्या प्रती छापतात असे कळते!

Leave a Reply