सांबाराव, तुम्हांला ढोरं राखायला गुरखी पाहिजे होता नव्हं? ह्यो बघा ह्यो पोरगा. चुनचुनीत हाय. कामं बी आक्शी चटाचटा करतंय पोरगं. घ्या ठिऊन याला. कोंडराव मामाच्या बोलण्याचा विचार करत सांबारावांनी ८/९ वर्षांच्या त्या काळ्या-सावळ्या मुलाकडे निरखून पाहिलं. पोरगं काटक होतं. नजर स्वच्छ होती.
“काय नाव रे तुझं?”
“चिमा,” मुलाने उत्तर दिलं.
सांबारावांना मुलगा आवडला. ठेवून घेतला.
सांबराव पुराणिक माझे आजोबा. शंभर दीडशे एकरांचे मालक. गावावर दरारा राखून असलेले – उंच, सडसडीत,चपळ. बुद्धिमान असे की एका नजरेत माणसाची पारख करत. आजोबांच्या घराचा पसाराही मोठा. चुलतमालत नातेवाईक, गाईगुरं, पाहुणेरावळे यांनी वाडा गजबजलेला असे. गुराखी म्हणून लागलेला चिमा पाहता पाहता घरगडी म्हणून वाड्यात सामावून गेला. आजोबांचा वाडा भलाथोरल; पण दोन भागांत विभागलेला होता. दर्शनी भाग बैठकीचा… मुख्य दरवाजा, अंगण, व्हरांडा आणि भलीथोरली बैठक. बैठकीच्या एका बाजूला आजोबांचा स्प्रिंगचा पलंग, पलंगासमोर बसकं लाकडी टेबल, त्यावर लखलखीत पितळेचं देखणं पानदान आणि समोर पसरलेली बैठक. लालभडक जाजम, त्यावर दोन्ही बाजूंनी अरुंद पांढऱ्याशुभ्र गाद्या, त्यावर तसेच पांढरेधोप तक्क्ये आणि लोड. ऑईलपेंटने रंगवलेल्या भिंतींवर देशभक्तांच्या एकसारख्या टांगलेल्या तसबिरी. आतला भाग वाड्याचा…बायकांची ऊठबस असणारा. बैठक आणि वाड्याच्या मधोमध गुरांचा गोठा आणि धान्याच्या साठवणुकीचं भलंथोरलं बळद. एकेदिवशी आजोबा बैठकीतून आतल्या वाड्यात येत असताना बळदापाशी चिमा माळिणीशी हुज्जत घालताना दिसला. काय झालं विचारलं तर माळिणीने चिमाची तक्रार केली की चिमादादाने ‘माळवं’ म्हणजे भाजीपाला तर निवडून निवडून घेतला पण बदल्यातली जवारी मात्र गोंडर मिसळून दिली. पाहिलं तर खरंच जवारीत गोंडर मिसळलेलं. असं का? चिमाला विचारलं तर, ‘आपल्या घरची चांगली जवारी बाहेर जाया नगं म्हून गोंडर मिसळलं,’ असं पुटपुटत्या आवाजात उत्तर आलं. आजोबांना हसू आलं; पण त्याच्या या उत्तराने त्याची घराच्या नफा-नुकसानीची कळकळ आजोबांना जाणवली. त्या दिवसापासून चिमाच्या कमरेला कोठीघराच्या किल्ल्यांचा जुडगा लागला तो अगदी शेवटपर्यंत.
चिमाचा वावर वाढला तशी हळूहळू बैठकीची सगळी व्यवस्थाही चिमाकडे आली. चिमा बैठक नेहमी लखलखीत ठेवायचा. बैठक आजोबांची शान आहे, बैठकीवरूनच आजोबांचं गावातलं स्थान दिसून येतं असं त्याला वाटायचं. बैठकीत भेटायला आलेल्या पाहुण्यांच्या चहापाण्याची सारी व्यवस्था बैठकीजवळच्याच एका खोलीत केलेली असे. तिथे अखंड चहा उकळत असायचा. त्या खोलीवर राज्य असे चिमाचं. खोलीला नावही मिळालं होतं – चिमाची माडी. आम्हां मुलांना बैठकीचं आणि चिमाच्या माडीचं कोण अप्रूप! पण घरातल्या गोशा पद्धतीमुळे मुलांना आणि घरच्या बायकांना बैठकीत जायला मनाई होती. आणि चिमाही एखाद्या भुजंगासारखा बैठकीची राखण करे.
चिमा आजोबांना मालक म्हणे. मालक म्हणजे चिमाचं दैवतच जणू. मालकाच्या हिताची अखंड काळजी वाहणं हेच त्याचं जीवनध्येय होतं. संध्याकाळी शेतातून आलेल्या धान्याच्या पोत्यांची मोजदाद तो सुतळीला गाठी मारून करे. संध्याकाळी गाठी मारलेली सुतळी मालकाच्या हाती देईतो त्याला चैन पडायचं नाही. घरी आलेला माल, अडत्याकडे गेलेला माल, लादणीत ठेवलेला माल यांचा चोख ताळेबंद चिमाकडे असे. ठार निरक्षर चिमा उत्कृष्ट हिशेबनीस होता. मालकाचा एक एक रुपया म्हणजे त्याच्यासाठी लाखमोलाचा होता. चहा, साखर, तेल, सुपारी, मसाले, साबण यांच्या वापरावर चिमाची करडी नजर असे. त्याचा पराकोटीचा प्रामाणिकपणा हा गुण नसून दुर्गुण वाटायचा कधी कधी. वाड्यातून या साहित्याची मागणी वाढली तर प्रसंगी मालकिणीलाही दोन शब्द सुनवायला तो कमी करायचा नाही. सोन्यामोत्याने मढलेल्या मालकिणीलाही उधळमाधळ करायची चिमाकडून परवानगी नव्हती.
दास्यभक्तीचा उत्तम नमुना असणाऱ्या चिमाने एके दिवशी कहर केला… आजोबांना अधूनमधून सिगारेटची तल्लफ यायची. त्या दिवशी तशी ती आली. पाहतात तर पाकीट रिकामे. बरं गावात बिडीकाडीचं दुकानही नव्हतं. शेजारच्या गावी जावं लागे. तल्लफ तर आलेली – सिगारेट तर नाही… काय करावे? प्रभु रामचंद्रांचा हनुमान समोरच होता. हनुमानाने धोतर वर खोचलं, पायात वहाणा सरकवल्या अन् तीरासारखा तो धावत सुटला. वहाणांमुळे नीट पळता येत नाही हे पाहून चपला चक्क हातात घेऊन तो धावू लागला. सिगारेटचं पाकीट घेतलं आणि उलट्या पावली परत आला… धावत पळत. पाच- सहा कोसांवर असलेल्या गावी धावत जाऊन सिगरेट आणणारा चिमा, त्याचं भक्तीच्या थराला जाणारं हे प्रेम आजही आम्हाला अचंबित करतं.
चिमाच्या लग्नाचं वय झालं तसं आजोबांनी त्याचं लग्न लावून दिलं. एक मुलगीही झाली; पण चिमाचं संसारात लक्षच नसायचं. आजोबांनी परोपरीने समजावूनही ऐकत नाही असे पाहून तिनेही नाईलाजाने दुसरा पाट लावला. चिमाला त्याने काडीचा फरक पडला नाही. मालकाच्या सेवेत बाधा नको म्हणून संसार पणाला लावणाऱ्या या चिमाला काय म्हणावे?
माझी आई, मामा, मावश्या यांना आजोबांचा जेवढा धाक होता त्यापेक्षा काकणभर जास्तच चिमाचा होता. या सगळ्यांच्या लग्नात सगळ्यात जास्त महत्त्वाचा होता तो चिमा. सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, देण्याघेण्याचा आहेर, रोकड… सगळं सगळं त्याच्या हवाली. सुतळीचा तोडाही जो इकडे तिकडे होऊ देत नसे तर अशा मौल्यवान ऐवजाची राखण तर पाहायलाच नको.
असा हा चिमा …चिमा म्हणजे अपरंपार विश्वास. चिमा म्हणजे संपूर्ण समर्पित जीवन.
चिमा म्हणजे आजोबांच्या गडाचा मजबूत चिरेबंदी कोट; पण आजोबा आजारी पडले नि हा चिरेबंदी कोट ढासळला. खांद्यात वाकला. सैरभैर झाला.जणू जगण्याचं प्रयोजनच संपलं. पोरांना बघ, लेकरांना सांभाळ असं मालकांनी सांगितलं… जात्या जिवाला वचन दिलं त्याप्रमाणे चिमा तिथंच राहिला. थकलेल्या हातांनी पुढच्या पिढ्याही सांभाळल्या.
मालकाची मुलं, मालकाची नातवंडं, अगदी पतवंडंही याने उरापोटी जपली. मालकिणीनेच नव्हे तर पुढच्या सुनांनीही त्याचं खाणंपिणं सांभाळलं. चिमाला पिठलं नको बरं का गं! आवडत नाही त्याला… चिमापुरती वांग्याची भाजी टाक बाई फोडणीला, त्याच्यापुरत्या दोन भाकरी ठेव गं बाजूला…पोळी खात नाही तो … सासवांनी दिलेल्या या सूचना सुनाही विनातक्रार पाळत गेल्या. मामाच्या थोरल्याचं लग्न ठरलं, मानपानाची बोलणी निघाली तसं मामाने व्याह्यांना एकच मान मागितला… आमच्या चिमाचा मांडवात मान करा बाकी नारळ आणि मुलगी द्या. उमद्या व्याह्यांनीही बँड लावून फेटा बांधून चिमाचा मानपान केला. मोतीबिंदूने धूसर झालेली चिमाची दृष्टी त्यादिवशी अधिकच धूसर झाली होती. काळ सरकत गेला तसा चिमाही थकत गेला. त्याचं औषधपाणी, हवं नको सगळं सगळेच पाहत होतं. संध्याकाळ झाली तसं चिमाचंही जास्त झालं. सगळ्या मुलांना बोलावून घेतलं. चिमाने थरथरत्या हाताने आपले स्वतःचे असे सहा हजार रुपये थोरल्याच्या हाती दिले. तीन भाऊ वाटून घ्या सांगितलं आणि डोळे मिटले. शेवटची तयारी करताना त्याच्या खिशात मधल्याच्या बाईकची किल्ली सापडली ….नवव्या वर्षापासून ते नव्वदीपर्यंत एका घरासाठी आपलं उभं आयुष्य देणारा, शेवटच्या श्वासापर्यंत घराची काळजी वाहणारा असा माणूस आज मिळणं अशक्य! केवळ अशक्य!

सुंदर व्यक्तिचित्र