झुलला गं झुलला गं
अधांतरी झोका…
झुलला गं झुलला गं
अधांतरी झोका…
दूर दूर जाते बघ गावाची ही शीव
तरी तिथे रेंगाळतो वेडावला जीव
वळण हे मागे पाही वळून वळून
पळभर विसावला क्षण पळून पळून
झुलला गं झुलला गं
अधांतरी झोका…
चुकला गं चुकला गं
काळजाचा ठोका…
सरावली होती कधी रोजची ही वाट
आज तिथे आठवांचे रान घनदाट
सारे सारे पुढे पळे पिसाट सुसाट
तरी राही मागे मन अफाट अफाट
झुलला गं झुलला गं
अधांतरी झोका…
भुलला गं भुलला गं
जीव ओकाबोका…
जरा जड होई श्वास थबके पाऊल
भासातून उसासते चाफ्याची चाहूल
तुझ्या कळ्या मोगऱ्याच्या माझा मात्र चाफा
नकळत दरवळे मंद बकुळीचा वाफा
झुलला गं झुलला गं
अधांतरी झोका…
फुलला गं फुलला गं
मनाचा झरोका…
