श्रीपाद रा. टिकेकर यांनी १९३० साली लिहिलेल्या ‘सिंहाला शह’ या पुस्तकाच्या निर्मितीची हकिकत, आधीच्या लेखातून मी आपल्यापुढे मांडली. या लेखातून वरील पुस्तकात अफगाणिस्तानची जी ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक व राजकीय माहिती दिली आहे तिचा गोषवारा मी आपल्यापुढे मांडणार आहे. या माहितीच्या आधारे आजपासून मागील तीस वर्षांत घडलेल्या घटनांमागील सूत्र लक्षात येईल व पुढे घडणार्या घटनांचा अंदाजही करता येईल.
भौगोलिक परिस्थिती: हिंदूकुशपर्वताच्या रांगा अफगाणिस्तानात सर्वत्र पसरलेल्या आहेत. त्यामुळे बराचसा भाग दर्याखोर्यांनी भरलेला आहे. दक्षिणेकडील जो भाग बलुचिस्तानला लागून आहे तो सखल असला तरी वाळवंटी आहे. अफगाणिस्तानात चार मुख्य नद्या आहेत. १) हरीरूद २) हेलमंद ३)काबूल ४) ऑक्सस किंवा अमुदर्या.
या नद्यांना उन्हाळ्यात बर्फ वितळल्याने पाणी असते व त्यावर थोडीफार शेती होते; परंतु शेतीच्या उत्पन्नावर जगता येईल अशी परिस्थिती नाही. वरील भौगोलिक परिस्थितीमुळे लोक दर्याखोर्यांतून टोळ्या करून स्वतंत्र वृत्तीने राहतात; परंतु हिंदुस्थानातून मध्यआशिया व इराणकडे जाण्यासाठी अनुक्रमे १) खैबर खिंड व २) बोलन खिंड या मार्गांनी अफगाणिस्तानात उतरल्याशिवाय पुढे जाता येत नाही; त्यामुळे अफगाणिस्तान हा व्यापारी मार्गावरील महत्त्वाचा देश ठरतो. त्याचा परिणाम असा झाला की, व्यापार्यांना लुटणे किंवा खंडणी वसूल करणे हाच अफगाणी टोळ्यांचा मुख्य धंदा व पर्यायाने संस्कृतीचाच भाग बनला. खून, मारामारी व दगाबाजी या गुणांशिवाय लुटीच्या धंद्यात बरकत येणे शक्य नसल्याने हे तीन गुण अफगाणी माणसाचे स्वभावविशेष बनले आहेत. भूगोल समाजजीवनावर कसा परिणाम करतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे; तसेच भारतावर अफगाणिस्तानमार्गे आक्रमणे होण्यामागे भूगोलच कारणीभूत आहे हेही आपल्या लक्षात येईल.
ऐतिहासिक परिस्थिती : टोळी संस्कृतीचा स्वभाव असा असतो की, टोळ्या स्वतंत्र वृत्तीच्या असतात व टोळी प्रमुखाशिवाय ते कोणाचेच वर्चस्व मान्य करीत नाहीत. त्यामुळे अफगाणिस्तानात राष्ट्रीय भावनेच्या अभावामुळे ते एक राष्ट्र म्हणून पुढे आले नाही असे निरीक्षण टिकेकर या पुस्तकात नोंदवतात. इ.स.१००० पासून अफगाणिस्तानच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास असे दिसून येईल की इ.स. १००० ते इ.स. १२०६ हा महंमद गझनी व महंमद घोरी यांचा काळ सोडला तर अफगाणिस्तानवर कोणाचाच एकछत्री अंमल राहिला नाही. चेंगीझ खान, तैमूरलंग यांनी स्वार्या करून अफगाणिस्तानच्या काही भागावर राज्य केले. दिल्लीच्या मुघल बादशहांनी काबूल-कंदहार घेतले. इराणच्या शहांनी इराणच्या सीमेला लागून असलेला ‘हिरात’ हा प्रांत बळकावला. गंमत अशी की, वर वर्णन केलेले सर्व राज्यकर्ते मंगोल (चंगीझखान),इराणी किंवा तुर्क होते. पठाण कोणीच नव्हते. इ.स. १७४७ मध्ये प्रथमच पानिपतच्या लढाईमुळे आपल्याला माहिती झालेला अहमदशहा अब्दाली किंवा दुराणी हा अफगाणिस्तानवर शासन करणारा पहिला पठाणी शासक ठरतो. दुराणी ही एक पठाणी टोळी आहे. अब्दालीविषयीची पुस्तकात नसलेली थोडी माहिती वाचकांना अफगाणी स्वभाव कळण्यासाठी देतो. अहमदशहा अब्दाली हा इराणच्या प्रसिद्ध नादिरशहाचा अंगरक्षक म्हणून काम करीत होता; परंतु नादिरशहावरती खुनी हल्ला झाला तेव्हा त्याने त्याचे रक्षण न करता त्याच्या मुगुटात लपविलेला कोहिनूर हिरा घेऊन तो अफगाणिस्तानात पळून आला. जुलै १७४७ मध्ये त्याने स्वतंत्र राज्य स्थापन केले. असो. अफगाणिस्तानच्या दृष्टिकोनातून अब्दाली महत्त्वाचा आहे; कारण त्याने प्रथमच संपूर्ण अफगाणिस्तानात एकछत्री अंमल आणला. (इ.स. १७४७ ते १७७३) त्यानंतर त्याचा मुलगा तिमूर गादीवर आला. याला अकरा बायका होत्या, तिमूरला तेवीस मुलगे व सोळा मुली होत्या. याने वीस वर्षे म्हणजे १७९३ पर्यंत राज्य केले. तिमूरच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये युद्धे होऊन अमीरपदासाठी संगीत खुर्चीचा खेळ सुरू झाला. याचा फायदा घेऊन इंग्रजांनी अफगाणिस्तानात नाक खुपसले. त्यातून इ.स. १८४० ते १८८० च्या दरम्यान दोन अँग्लो-अफगाण युद्धे झाली. याच सुमारास रशियाच्या झारने मध्य आशियातील तुर्कमेनिस्तान, उझबेगीस्तान, ताझाकिस्तान हा अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भाग गिळंकृत केला. त्यामुळे रशियन अस्वल व इंग्रजी सिंह एकमेकांसमोर आले. हा सर्व इतिहास टिकेकरांनी विस्तृतपणे दिला आहे. त्यांच्या लिखाणाचे हे वैशिष्ट्य आहे की, ते इंग्रज व अमीर यांच्यात झालेले तह, इंग्रजांचे अफगाणिस्तानबाबतचे धरसोडीचे धोरण यांचे अगदी मार्मिक विश्लेषण करतात. वरील दोन युद्धांचा प्रचंड खर्च हिंदुस्तानच्या तिजोरीतून करण्याची इंग्रजांची लबाडी टिकेकर नीट उलगडून दाखवतात.
या युद्धातून इंग्रजांनी मिळवले काय? तर १)अफगाणिस्तान व हल्लीच्या पाकिस्तानच्या सरहद्दीवरील अत्यंत डोंगराळ व रानटी टोळ्यांचा मुलूख जो हल्ली ‘खैबर परव्तुनख्वा’ म्हणून ओळखला जातो.
२) अफगाणिस्तान व तेव्हाचा हिंदुस्थान यांच्यातील सीमा कायम केली जी ड्युरांट लाइन या नावाने प्रसिद्ध आहे. अफगाणिस्तानचा अमीर अब्दुल रेहमान याच्या अडचणीचा फायदा घेऊन व त्याला वाढीव वार्षिक तनखा देऊन ड्युरांट लाइन या अनैसर्गिक सीमेला त्याच्याकडून मान्यता मिळवली. हल्लीचे तालिबानी शासन ही सीमा मान्य करीत नाही.
टिकेकर इ.स. १८७६ नंतर सत्तेवरती आलेल्या हबीबूर रहमान, हबीबुल्लाखान, अमानुल्ला वगैरे अफगाणिस्तानच्या अमिरांचे स्वभावविशेष, त्यांचे इंग्रज व रशिया यांच्याशी असलेले संबंध व धोरण यांचे तपशीलवार विवेचन करतात. इंग्रज नेहमीच रशियाशी थेट संघर्ष करण्यास कचरत असल्याने इंग्रजांना त्यांच्या कलाने वागणार्या अमिराची जरुरी असे; परंतु आपला अमीर इंग्रजांच्या आहारी गेलेला अफगाणांना आवडत नसल्याने इंग्रजांना फार जपून वागावे लागे. अमीरसुद्धा इंग्रजांना इराण व रशिया यांचा बागूलबुवा दाखवून तनखे,शस्त्रास्त्रे,तार-टपाल यांसारख्या सोई पदरात पाडून घेत असत. हा सगळा बुद्धिबळाचा खेळ म्हणजेच ‘ग्रेट गेम’ टिकेकरांनी विशद करून सांगितला आहे. इ.स. १९२८ च्या सुमारास राजसंन्यास घेतलेला (पदच्युत?) अमीर अमानुल्ला याने सामाजिक, शैक्षणिक बाबी व करप्रणाली यांच्यात धडाक्यात सुधारणा करून अफगाणिस्तानला आधुनिक बनविण्याचा जो घाट घातला त्यामुळे टिकेकर प्रभावित झाल्याचे त्यांच्या लिखाणावरून वाटते; परंतु याच सुधारणा अमानुल्लाला घातक ठरल्या हे पण टिकेकर नमूद करतात.
या पुस्तकात लेखकाने अफगाणिस्तानचा सर्वांगांनी परिचय करून दिला आहे. त्या सर्वांचा आढावा या लेखात घेणे शक्य नाही. परंतु अफगाणी लोकांच्या धार्मिक समजुती व स्वभावविशेष यांबद्दल टिकेकरांनी केलेले विवेचन मनोरंजक; पण धक्कादायक आहे. परंतु या विवेचनातून हल्लीच्या तालिबानी राज्यकर्त्यांच्या मनोवृत्तीचा वेध घेता येतो.
धार्मिक समजुती : अफगाणिस्तानातील हजारा टोळी सोडून सर्व टोळ्या सुन्नी पंथाच्या आहेत. हजारा शियापंथी आहेत. अफगाणी समाजावर मुल्ला व काझी लोकांचा प्रचंड पगडा आहे. पैगंबरापेक्षा मुल्ला किंवा काझी श्रेष्ठ आहे असे हे लोक मानतात. मुल्लाच्या दैवी सामर्थ्यांवर त्याचा प्रचंड विश्वास असतो. साधारणपणे प्रत्येक गावात ‘पिरा’ चे थडगे असतेच. तसे नसेल तर गावकर्यांना ती गोष्ट खूप कमीपणाची वाटते. पिराच्या थडग्याच्या आजूबाजूची माती, तेथील झाडांचा पाला यांत सर्व रोग बरे करण्याची शक्ती असते अशी त्यांची श्रद्धा असते. त्यांच्या दृष्टीने धर्माचरण म्हणजे कुराणाची मिरवणूक काढणे, कुराण उशाखाली घेऊन झोपणे, अल्ला अल्ला असा दिवसभर गिल्ला करणे व नियमित पाच वेळा नमाज पढणेे ऐवढ्यापुरते सीमित आहे. धर्माचरणात नीतिबंधने मुळीच येत नाहीत. खोटे बोलणे, फसविणे, दगाबाजी करणे, दरोडा घालणे, चोरी करणे या सर्व गोष्टी पूर्णपणे ‘शिष्टसंमत’ आहेत. एखाद्या झाडाचे पान तोडावे इतक्या सहजपणे अफगाणी माणूस दुसर्या माणसाचा वध करू शकतो. पाहुण्याचे आदरातिथ्य करण्यात अफगाणांची कोणी बरोबरी करू शकणार नाही; परंतु हाच पाहुणा त्यांच्या टोळीच्या हद्दीच्या बाहेर गेल्यावर त्याला लुटण्यास ते कमी करणार नाहीत.
अफगाणी माणसाची स्वभाव वैशिष्ट्ये : एकाच विषयाचा जास्त वेळ विचार ते करू शकत नाहीत. चंचल वृत्ती, कांचनाचे विलक्षण वेड, खुनाची हौस, बंदुका रायफल्स वगैरे शस्त्रांवर मनस्वी प्रेम, सूड घेण्याची विलक्षण तृष्णा, पहिल्या दर्जाचे धैर्य, कमालीचे धाडस व पराकाष्ठेचे शौर्य परंतु थोड्याशा अपयशाने ते हातपाय गाळतात. अफगाणांना सत्यासत्याची चाड नाही. स्वदेश, स्वबंधुत्व इ. भावना नाहीत. तत्त्वनिष्ठेचे किंवा कोणत्याच प्रकारचे बंधन त्यांना आवडत नाही.
अफगाणी आपल्या कुटुंबाच्या बाबतीत हळवे असतात. बायकामुलांवर त्याचे प्रेम असते. स्वस्थ बसून चकाट्या पिटणे त्यांना फार आवडते. हसतमुख माणूस पाहिला की त्यावर ते एकदम खूष होतात. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की १९२८ च्या काळात खेडेगावातील स्त्रिया बुरखा घेत नसत. स्त्री एकटी प्रवास करीत असेल तर अफगाणी तिच्या वाटेस जाणार नाही. एवढेच काय कोणी तिला त्रास देऊ लागला त्याचा प्रतिकार करतील. हे जरी असले तरी घरगुती जीवनात अफगाण स्त्रीचे खूप हाल होतात; कारण पत्नीला बाजारभावाप्रमाणे असलेली किंमत देऊन विकत घेतली असल्याने तिला नवर्याचे गुलाम होऊनच राहावे लागते. अफगाणिस्तानात पाण्याची समस्या असल्याने बाई अगदी हैराण होते; कारण पाणी आणणे हे बाईचेच काम आहे अशी ठाम समजूत आहे. अफगाण ‘इज्जत’ राखण्यासाठी कोणतेही अमानुष कृत्य करतील. त्यावेळी त्यांना कसलीच ‘शरम’ वाटत नाही; परंतु रूढी-चालीविरुद्ध कर्म करण्यास त्यांना ‘शरम’ वाटते. विचाराचा अभाव हेच याचे कारण आहे. हे सर्व वर्णन सर्वसामान्य अफगाणी माणसाचे आहे. उच्चभ्रू वर्गाला ते संपूर्णपणे लागू नाही. तिथेही अल्प प्रमाणात सुशिक्षित वर्ग आहे. असो.
या वर्णनावरून हल्लीच्या तालिबानी सरकारमध्ये मुल्लांचे वर्चस्व का आहे ते कळेल. तसेच त्यांच्या कारभारात ते पाकिस्तानला हस्तक्षेप का करून देत नाहीत हे लक्षात येईल. तालिबानी ड्युरांट लाइन का मानत नाहीत हे ही समजेल असो. नेहमी आपसात भांडणारे अफगाणी परदेशी शत्रुविरुद्ध एक होतात ही गोष्ट इ.स. १८९७ साली इंग्रज, १९७९ साली रशियन्स, इ.स. २००० साली अमेरिकन्स विसरले आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला. अफगाणी स्वभावाचे चपखल वर्णन करणारे एक इंग्रजी वाक्य उद्धृत करून हा लेख संपवतो.
They are never at peace, unless they are at war.




