आपले काय चुकते?

खरेतर अशा लेखाच्या शीर्षकाखाली मुलांचे- नवीन पिढीचे काय चुकते? मोठ्यांचे म्हणजे पालकांचे काय चुकते? संसारात नवरा-बायकोंचे काय चुकते? असे वेगवेगळे उपशीर्षक असायला हवे.

 यात नेत्यांचे,सरकारचे काय चुकते हेही जोडता येईल; कारण अवतीभवतीची कौटुंबिक,सामाजिक,राजकीय परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाचे काही ना काही चुकते आहे.अवतीभवतीच्या गोंधळाला,अराजकाला,अस्थिर परिस्थितीला आपण सारेच जबाबदार आहोत. गोम अशी आहे की कळते; पण वळत नाही. आपल्या चुका आपल्याला मान्य नाहीत, कबूल करायच्या नाहीत. हे काही आजचे, नवे नाही; पण करोनानंतर देशातच नव्हे तर जगात आमूलाग्र बदल झाले आहेत.

आर्थिक,राजकीय,सामाजिक,कौटुंबिक घडीच विस्कटली आहे. काही परिणाम दृश्य स्वरूपात दिसताहेत; तर काही अदृश्य स्वरूपात जाणवत आहेत.

आत्महत्या वाढल्या आहेत. कौटुंबिक कलह वाढले एवढेच नाही; तर त्यांनी नवे वळण घेतले आहे – मग नवराबायकोंतले तणाव असोत की बापलेकांतले की इतर नात्यांतले किंवा नोकरीच्या सहकाऱ्यांतले! 

संवादाचा अभाव,अविश्वासाचा प्रादुर्भाव वाढलाय. ‘एकमेकांची एकमेकांना गरज नाही,’ हा भाव आहे. संताप, चीड,मत्सर, बेपर्वाई यांच्यात वाढ झाली आहे.

I am ok,you’re ok ऐवजी I am only ok,you are not ok ही हेकेखोर वृत्ती वाढली आहे. तडजोड करायचीच नाही. मी म्हणेन तीच पूर्व दिशा हा अट्टाहास आहे.

नव्या तंत्रयुगाने सुबत्ता आली. शिक्षणाचा प्रसार झाल्याने पुरुषाबरोबर स्त्रीदेखील खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रांत आपली चमक,योग्यता दाखवायला लागली. आकाश मोकळे झाले दोघांसाठीही. त्यातून स्पर्धा वाढली. ‘हम भी कुछ  कम नहीं,’ या आविर्भावात ‘तू तू मैं मैं’ वाढली. पैसा ही अशी एक गोष्ट आहे जिच्या मोहाने प्रेम, नाते, लळा, जिव्हाळा सारे विसरले जाते. संघर्षाची ठिणगी पेटते. बघता बघता भडका उडतो. त्यात आगीत तेल ओतायला पालक पुढे आले की विचारायलाच नको. सामंजस्याने समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न नसतो; तर दरी अधिकाधिक वाढविण्यासाठी असतो! जखमा बुजवायच्या नसतात; त्या चिघळत ठेवण्यात गंमत वाटते – नवराबायकोंना अन् कधी कधी पालकांना देखील! तटस्थ राहणारे पालक मूर्ख ठरतात. विवेकाला खुंटीला टांगून ठेवले की हाती चिंध्या उरतात. 

स्वप्नं बघायची ‘शाली पैठणीची’ अन् कोर्टाची पायरी चढून हाती आलेला घटस्फोटाचा कागद चुरगाळत नक्राश्रू ढाळायचे, यात तरुण पिढीला धन्यता वाटते! 

त्यांना वाढत चाललेल्या आपल्या पोटच्या मुलांचीदेखील चिंता नसते! घरातील आपल्या मुलावर आपल्या वागण्याच्या,भांडण्याच्या होणाऱ्या परिणामांची चिंतादेखील या हेकेखोर आईवडिलांना नसते. आपल्या या अशा वागण्याने आपल्याच वृद्ध आईवडिलांना किती दुःख होते याची या स्वार्थी तरुण पिढीला पर्वाच नसते! इतके जग स्वार्थी अन् कठोर झाले आहे. ही मंडळी असे का वागतात? आहे उत्तर?

   आज बहुतेक मध्यमवर्गातील मुले आधी शिक्षण अन् मग नोकरीसाठी परदेशात चालली आहेत. हैदराबाद, बंगलोर, पुणे,नागपूर दिल्ली अशा शहरांत ही संख्या वाढतच आहे. मुलांना आपले शिक्षण, करीयर,भविष्य हे महत्त्वाचे आहे यात शंकाच नाही; पण परतीचे दोर कापून तिथे नवी पिढी कायमची स्थिरावते आहे. यामागे तिकडची सुबत्ता,तिथली आधुनिकता, डॉलर, युरोमध्ये मिळणारा पगार ,तिथल्या समाजाचे, संस्कृतीचे आकर्षण, आपल्याकडील भ्रष्टाचाराचा, राजकीय गोंधळाचा तिटकारा अशी अनेक कारणे आहेत. प्रत्येकाची स्वतंत्र कार,अल्पावधीत कर्ज काढून घेतलेले आलिशान घर, वीक एंडच्या पार्ट्या यांचे आकर्षण असते; पण इकडे वय वाढलेल्या पालकांच्या एकाकीपणाचे काय? मुलं गेली तिकडे तेव्हा पालक धडधाकट होते. सुदृढ होते. त्यांनी प्रसंगी कर्ज काढून मुलाला, मुलीला तिकडे पाठवलेले असते. मुलाच्या भविष्यासाठी काहीही करण्याची त्यांची उमेदीच्या काळात तयारी असते; पण वय वाढल्यावर , सत्तरी पार केल्यावर उसना उत्साह कुठून आणायचा? आनंदाचे खोटे नाटक कसे वठवायचे ? तिकडची मुलं आईवडिलांचा  इथला महागडा मेडिकलचा खर्च करायला तयार असतात. नर्सची महागडी सोयदेखील करतात; पण वृद्ध आईबापांना हवा असतो विचारपूस करणारा जिव्हाळ्याचा मायेचा आवाज. जिव्हाळ्याचा स्पर्श! त्यांना भोवती हवी असते नातवाची कुजबुज. 

या एकाकी वृद्धांच्या समस्या, कहाण्या गंभीर आहेत. 

   अर्थात याची दुसरी बाजूदेखील आहे – तरुण पिढीला तिकडे मिळालेली सुवर्णसंधी सोडायची नाहीये. त्यांची तिकडे जुळलेली नाळ तोडायची नाहीये. आता इकडेदेखील तत्सम संधी वाढल्या असल्या; तरी तिकडे स्थिरावलेली, तिथल्या सवयीची गुलाम झालेली तरुण पिढी परतायला तयार नाही. त्यांची मुलं म्हणजे तिसरी पिढी जसजशी मोठी होत चालली, तसतशी ते न परतण्याची शक्यता बळावत चालली आहे. या तिसऱ्या पिढीला तर इकडचे फारसे काही आवडतच नाही. त्यांच्या खाण्यापिण्याच्या ,पोशाखाच्या सवयी वेगळ्या आहेत; शिवाय भाषेचाही प्रॉब्लेम येतोच. त्यांचेही बरोबर आहे. त्यांचे आयुष्य त्यांच्या मर्जीने जगण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यांना तसे स्वातंत्र्य आहे. इकडच्या वृद्धांना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर समाधान मानावे लागणार आहे. कॉलदेखील त्यांच्या मर्जीने,सोयीने! काही काळासाठी तिथे जायचे; तर त्यांच्या नियमाने, मर्जीने वागावे लागते. इकडचा सवयीचा मोकळेपणा तिकडे नसतो. बंधन जाणवते. वृद्ध आईवडील तिकडे जास्त काळ राहायला कंटाळतात.

   लहान मुलं मोठी होत असतानाच्या समस्या वेगळ्याच आहेत. इकडे पालक आपल्याला ज्या सुखसोयी मिळाल्या नाहीत त्या मुलांना मिळाव्या म्हणून धडपडत आहेत. लाखोंची फी असलेली शाळा, कॉलेज, ट्यूशन, महागडे कपडे, आधुनिक खाणे पिणे, महागडे छंद,अन् काय काय! इतके करूनही ही मुलं समाधानी नाहीत. अपेक्षा, हट्ट वाढतच आहेत. त्यात आग्रह, हट्टीपणा आहे. रीबेल वृत्ती आहे. मुजोरी आहे. वायफळ वादविवाद आहेत. प्रसंगी हिंसक प्रवृत्तीदेखील आहे. एकीकडे नोकरीच्या चक्कीत पिसली जाणारी, अक्षरशः तारेवरची कसरत करणारी जोडपी मुलाच्या वागण्याने त्रस्त,हतबल झालेली दिसतात. मानसिक विकार वाढले आहेत. आत्महत्येचे प्रमाणदेखील!

   ही घरची,कुटुंबाची परिस्थिती. दारची म्हणजे समाजातली परिस्थिती आलबेल आहे असे नाही. जातिधर्मातील तेढ वाढतेच आहे. राजकारण कधी नव्हे इतके गोंधळले आहे. चिखलाने बरबटले आहे. कुणाला काय हवे,कोण कशासाठी लढतोय हे त्याचे त्यालाच कळत नाही… इतरांना कळणे राहिले दूर! ठरावीक स्वार्थी व्यक्तींभोवतीच सारे राजकारण फिरते आहे. त्यात समाजकारण कुठे दिसत नाही. सगळा भुलभुलैय्या आहे. खोटी आश्वासने,खोट्या आशा, विकासाचे खोटे नाटक, सर्वसामान्यांचा विचारच नाही. गरिबी हटता हटत नाही. मूठभर पुढारी,व्यावसायिक, उद्योजक यांच्याच हातात सत्ता,संपत्ती फिरते आहे. गरीब,अन्नदाता शेतकरी आहे तिथेच! 

   एकीकडे आय टी इंडस्ट्रीच्या टोलेजंग,गगनचुंबी इमारती, मॉल्स अन् दुसरीकडे मैलोन् मैल पसरलेल्या दारिद्र्यात खितपत,गंजत चाललेल्या गरिबाच्या झोपडपट्ट्या! निवडक राजकारणी पुढाऱ्यांनी  देशाला दिलेली ही देणगी आहे. ही मंडळी अशी का वागतात? आहे उत्तर?

   घरात, घराबाहेर वाढत चाललेले हे अस्थैर्य काळजी वाढविणारे आहे. इंटरनेट,सोशल मीडिया, ए आय, अशा नवतंत्रज्ञानाचं मायाजाल एकीकडे अन् मानवी मनाची दुभंग, अगतिक स्थिती दुसरीकडे, असा हा पेच आहे. बुद्धी अन् भावना यांतला हा संघर्ष आहे. हे द्वंद्व आपली पाठ सोडणार नाही. 

If you have a problem,you have to live with the problem or leave the problem!

काय करायचे ते आपले आपल्यालाच ठरवायचे आहे. दुसरे कुणी तुमची समस्या सोडविणार नाही; हे आता समजून घेतले पाहिजे; कारण या समस्या/ प्रश्न सोडविण्याचे गुण/ लाभ ज्याचे त्यालाच मिळणार आहेत.

कोण कसे वागते यापेक्षा आपण कसे वागतो,हे आधी तपासणे म्हणूनच महत्त्वाचे!आपण सुधारले की बाकीचे आपोआप सुधारतील.जग सुधारेल.अंधार आहे ही तक्रार करत,रडत बसण्यात अर्थ नाही. पहिला दिवा आपणच लावायला हवा… अंधार आपोआप उजळेल..

Author

One thought on “आपले काय चुकते?

  1. पैसा हे सर्वश्रेष्ठ मूल्य ठरल्याने हे सर्व झाले आहे.पापपुण्य कालबाह्य झाले ,टाकून दिले त्याची जागा घेणारी नवी मूल्ये रुजवली नाहीत एवढी एक चूक पुरेशी ठरली ,र्‍हासाची सुरुवात झाली.

Leave a Reply