मन केवढं केवढं…
खरं सांगा बरं, शाळा-कॉलेजांमध्ये मनाच्या मशागतीसाठी किती परिश्रम घेतले जातात? शरीराची आपण काळजी घेतो, ज्ञान वाढवतो; पण मनाच्या मशागतीची, मनाच्या वाढीची तसदी कोण घेतो? सध्यातरी उच्च शिक्षणाचा सगळा भर आणि भार विद्यार्थ्यांचं ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यावर असतो; म्हणजे मग मुलांना पदव्या मिळतात, नोकऱ्या मिळतात आणि ते त्यांच्या त्यांच्या मार्गी लागतात.
पण प्रश्न असा आहे की ते ‘कोणत्या’ मार्गी लागतात? की त्यांची पुरती वाट लागलेली असते? की त्यांना त्यांची वाट कोणती आहे हेच कळत नसतं? की कुठे जायचंय हे त्यांना माहीत असतं; पण त्या दिशेचा मार्ग कसा शोधावा हेच माहीत नसतं? की त्या दिशेने जाऊन त्यांना वाट शोधायची किंवा ती वाट अस्तित्वात नसेल तर स्वत:ची वेगळी वाट निर्माण करायची हिंमत होत नाही? की केवळ वहिवाटीने पडलेल्या चाकोरीतून चालण्यातच त्यांना सुरक्षित वाटत राहतं?
केवळ कुठलीतरी नोकरी मिळवून तरुण मुलं संसाराला लागली म्हणजे आपलं काम झालं हा एवढाच शिक्षणाचा संकुचित उद्देश आहे का? ह्यातून स्वत:पुरतं जीवन जगणारी लव्हाळी निर्माण होतील; पण माणूस नावाचा दुसऱ्यांना सावली, आधार आणि संरक्षण देणारा वटवृक्ष कसा निर्माण होणार? ह्यातून सरधोपट मार्गाने जाणारी जनता निर्माण होईल; पण नव्या दिशा, नव्या वाटा दाखवणारे पथदर्शक कसे निर्माण होणार? ह्यातून ‘आहे त्यात समाधान’ मानणारी, सर्व तऱ्हेच्या तडजोडी करणारी, मुकाट्याने सहन करणारी प्रजा निर्माण होईल; पण आहे त्यातल्या चुका शोधून त्यात सुधारणा करणारा, प्रगतिशील, कृतिशील, सुजाण, समृद्ध समाज कसा निर्माण होईल? वैयक्तिक सुखापासून ते समाजाच्या, देशाच्या आणि विश्वाच्या सुखाचा विचार जर करायचा असेल तर प्रत्येक माणसाचं मन मोठं झाल्याशिवाय ते होणे नाही.
‘मी! मी! मी!’ च्या अहंकाराची बंधनं तुटली पाहिजेत, ‘माझं! माझं! माझं!’ ह्या स्वार्थाचे चष्मे डोळ्यांवरून फेकले गेले पाहिजेत, ‘मला! मला! मला!’चा हव्यास सुटला पाहिजे; तर मग मन मोकळं होईल, विश्वाशी नातं जोडेल आणि मोठं होऊ लागेल. मला कधीकधी असं वाटतं की झाडांना जशी मुळं पोसतात तशी माणसांना त्यांची मनं पोसतात. जोपर्यंत मुळं वाढतात, निरोगी राहतात, त्यांचं काम करतात तोपर्यंतच झाडं वाढतात, फुलतात, फळतात; तसंच माणसांचंपण आहे; जोपर्यंत माणसाचं नातं माणसाशी आहे, निसर्गाशी आहे तोपर्यंत मन वाढतं , विस्तार पावतं आणि तोपर्यंतच खऱ्या शिक्षणाची कवाडं माणसासाठी उघडी राहतात.
ज्या क्षणी माणूस संकुचित झाला, घमेंडखोर झाला, अहंकारी झाला, स्वार्थी झाला, मदांध झाला तिथे त्याच्या उच्च शिक्षणाची सीमारेषा आली. त्याच्यापुढे प्रगती करणं त्याला अशक्य होऊन बसतं; म्हणूनच अशा बंधनांतून मानवी मनाला मुक्त करणे आणि मनाच्या कक्षा विस्तारित करणे हा उच्च शिक्षणाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे!
जोपर्यंत आपली मनं आपल्या साहित्याला, संस्कृतीला, धर्माला, कलेला, समाजाला, कुटुंबाला धरून राहतील आणि जोपर्यंत आपण आपल्या मनाचं पोषण, शिक्षण करत राहू तोपर्यंत ‘माणूस’ म्हणून आपली वाढ होत राहील; नाहीतर बाह्यजगात आपण कितीही मोठे झालो तरी आपली मनं कोती, छोटीच राहतील. मनाच्या आरोग्याचा, वाढीचा हा प्रश्न सोपा नाही. हा मोठमोठ्या संतांनाही पडलेला प्रश्न आहे:
अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा।।
कधी अणुरेणूहूनही लहान तर कधी आकाशाहून मोठं होणारं संत तुकारामांचं मन आणि त्या मनाशी चाललेला त्यांचा अखंड संवाद; तर कधी रात्रंदिवस त्याच्याशी ठाकलेला युद्धाचा प्रसंग! न संपणारा अंतर्गत संघर्ष!
महाकवी कुसुमाग्रजांनीही देवाकडे काय मागितलं असेल :
सुजनत्व द्या, द्या आर्यता
अनुदारिता दुरिता हरा!
कोती-क्षुद्रबुद्धी – अनुदारिता नाहीशी करण्याची गळ कुसुमाग्रज त्या परमेश्वराला घालतात.
भूमिकन्या बहिणाबाईंना वाटतं :
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना!
बहिणाबाईंचं मनाचं बाकीचं वर्णनही तितकंच चपखल आहे. ह्या कवितेतल्या प्रत्येक द्विपदी विचार करत बसण्यासारख्या आहेत, प्रत्येकाच्या अनुभवाच्या आहेत : ओढाळ मन, मोकाट मन, खाली-वर गोते खाणारं मन, महाजहरी मन :
मन वढाय वढाय, उभ्या पीकांतलं ढोर
किती हांकला हांकला, फिरी येतं पिकांवर.
मन मोकाट मोकाट, याच्या ठाई ठाई वाटा
जशा वार्यानं चालल्या, पान्यावर्हल्या रे लाटा
मन पांखरूं पांखरूं, त्याची काय सांगूं मात?
आतां व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायांत.
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर,
आरे, इचू, साप बरा, त्याले उतारे मंतर!
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनीं तुले, आसं सपन पडलं!
काय सुंदर कल्पना आहे! मन म्हणजे देवाला जागेपणी पडलेलं स्वप्न – म्हणजे मनाच्या निर्मितीच्यावेळी देवही जागेपणी स्वप्नं पाहत होता तर! त्यालाही वाटत होतं, ‘माणसाला मन दिलं की त्याचं भलं होईल, त्याचं कल्याण होईल, तो सुखी होईल!’
पण ह्या मनाची ताकद अशी की बरोब्बर त्याच्या उलटही मनाला सहज करता येतं आणि तेही क्षणार्धात! तर मग ह्या निर्गुण, निराकार मनाला शिकवायचं कसं, वाढवायचं कसं, दिशा द्यायची कशी आणि नियंत्रित करायचं कसं?
आणि हाच एक उच्च शिक्षणाचा गाभा आहे – त्याच्यासमोरचं एक महान आव्हान आहे!
रॉबर्ट कीगन नावाच्या हार्वर्ड विद्यापीठातल्या शिक्षणतज्ज्ञाच्या मते जन्मल्यापासून मोठेपणापर्यंत मनाच्या विकासाच्या सहा अवस्था असतात :
लहानपणीच्या तीन अवस्था :
पहिली पायरी : अर्भक असताना – एकत्रित अवस्था (incorporative stage) : मी-तूपणाची भावना जागी झालेली नसते; फक्त संवेदना (sensory) आणि प्रतिक्षिप्त क्रिया (reflexes) ह्यांमार्फत जगाचं ज्ञान होत असतं.
दुसरी पायरी : लहान मूल असताना – उत्स्फूर्त अवस्था (impulsive stage) : आपल्याला काय हवंय (अन्न, झोप) ते माहीत असतं आणि ते मिळवण्यासाठी काय करावं लागतं ह्याची कल्पना आलेली असते. बाकीच्या व्यक्तींची इतकी माहिती झालेली नसते.
तिसरी पायरी : राजेशाही अवस्था (imperial stage): तिसरं-विसरं! एक छोटा हुकूमशहा! स्वत्वाची जाणीव पूर्णपणे झालेली असते, दुसऱ्यांच्या गरजांची फिकीर नसते, फक्त स्वत:च्या गरजा पुरवण्याकडे लक्ष असतं (काही लोक अजूनही ह्याच अवस्थेत अडकून राहिलेले तुम्ही पाहिले असतील कदाचित!)
आता मोठेपणीच्या तीन अवस्था :
चौथी पायरी : सामाजिक मन (socialized stage) : दुसऱ्या माणसांची दखल घेतली जाते, समाजातले नीती-नियम ह्यांची कल्पना येते, वागण्या-बोलण्याच्या रिती कळतात
पाचवी पायरी : स्वतंत्र मन (self-authoring stage) : वेगवेगळ्या विचारांचे, प्रथांचे एकत्रीकरण करून, त्यातलं भलं-बुरं ठरवून, स्वत:चा वेगळा विचार तयार करता येण्याची कुवत येते.
सहावी पायरी : बदल घडवता येणारं मन (self-transforming stage) : ह्या अत्युच्च पातळीवर कुठल्याही रूढी, प्रथा, कथा-कल्पना, विरोधात्मक विचार, सवयी ह्यांच्या जाळ्यात न अडकता, स्वत:कडे, समाजाकडे आणि सर्व जगाकडे पाहण्याचा एक एकसंध, निरोगी दृष्टिकोन तयार करता येणारं मन! स्वत:ला आणि इतरांना बदलता येण्याची शक्ती असलेलं मन!
मनाच्या मोठेपणाचे हे महामंत्र! कीगनच्या म्हणण्याप्रमाणे ह्या शेवटच्या तीन अवस्थांचं शिक्षण देणं हे उच्च शिक्षणाचं ध्येय असलं पाहिजे; म्हणजे चांगली मनं, चांगली माणसं समाजात निर्माण होऊन ती वाढतील आणि संपूर्ण समाज यशस्वी होईल, सुखी होईल! शुभं भवतु!

उच्च शिक्षणाच्या गाभ्यात मन आणि तन या दोन्हीवर त्या त्या क्षेत्राच्या अनुशंगाने परिपक्वता आणण्यावर भर असतो, किंबहुना असला पाहिजे. रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे – क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. ऊ.दा. शल्यचिकित्सेत मनाबरोबरच तंत्रातही पारंगतता होणे आवश्यक आहे. योग्य तंत्र आत्मसात केल्याशिवाय विकसित झालेलं शल्यचिकित्सकाचं मन अधुरं आहे. तीच गोष्ट एखाद्या मैदानी खेळातील उच्च शिक्षणासही लागू होऊ शकते.
माझ्या मते उच्च शिक्षणाचा सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे चिकाटी गुण विकसित करणे. २-४ वर्षे, सर्व अडचणींवर मात करून, अंतिम रेषा पार करणे, यावरून माणसाबद्दल काही निकष लावता येऊ शकतात, आणि ही गोष्ट महत्वाची आहे.
बाकी अजून काही गोष्टींबद्दल थोडे मतभेद आहेत, ऊ.दा. अहंकाराचे असलेले महत्व, नेमकी बंधनं कुठली, ई., पण त्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल.
बाकी लेख आवडला, आणि कीगनचा संदर्भ ऊत्तम !