अभिवाचन :‘नव्या जगाची सुरुवात’ 

मंडळी नमस्कार,

    ‘ सामाजिक संस्कारांची पखरण करणारी बोधमालिका’ असे ज्या उपक्रमाचे सार्थ वर्णन केले गेले व ज्याने  संपादक भानू काळे यांना भरीव समाधान मिळवून दिले अशी ‘नव्या जगाची सुरवात’  ही  ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात मालिका.” Be the Change You Want “ असे वाचकांना हसत खेळत सोप्या शब्दात व नित्याच्या अनुभवांमधून सांगणारी ही मालिका खूप गाजली.  या लिखाणाचे संकलन कालांतराने एका छोट्या पुस्तिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले. 

   या पुस्तिकेतील काही भागांचे अभिवाचन या अंकापासून सादर करीत आहोत. 

   अभिवाचक आहेत उमा खोलगडे. 

नव्या जगाची सुरुवात .. पार्श्वभूमी

   अंतर्नादने आपल्या एकूण वाटचालीत जे अनेक उपक्रम राबवले त्यातला एक म्हणजे ‘नव्या जगाची सुरुवात स्वतःपासून होते’ ही अभिनव जाहिरात-मालिका. पूर्वी कमिन्स कंपनीचे चेअरमन असलेले अरुण किर्लोस्कर हे अंतर्नादचे प्रथमपासूनचे एक हितचिंतक होते. (त्यांचा आणि विख्यात उद्योगपती किर्लोस्कर कुटुंबाचा काही संबंध नव्हता.) त्यांच्याशी निगडीत असलेल्या तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहिराती ते अंतर्नादसाठी देत असत. केवळ अंतर्नादला आर्थिक मदत करायची ह्या हेतूने. जाहिरातींचा मजकूर तयार करायची जबाबदारी त्यांनी माझ्यावरच सोपवली होती. त्यानुसार त्यांच्या जाहिराती वेळोवेळी प्रकाशितही होत गेल्या. त्यातलीच एक कंपनी होती फ्लीटगार्ड. “तुम्हाला योग्य वाटेल असा कुठलाही मजकूर छापा, जाहिरात म्हणून मी त्या पानाचे पैसे देत जाईन” असे ते मला म्हणाले. पण तसे न करता यांच्या सल्ल्याने काहीतरी करावे असे माझे मत होते. पूर्वी त्यांनी अमेरिकेतील The Wall Street Journal ह्या प्रसिध्द बिझनेस विकलीमध्ये मलपृष्ठावर सलग ७५ आठवडे आलेल्या एका जाहिरात-मालिकेबद्दल मला सांगितले होते. त्या जाहिरातींच्या त्यांच्या संग्रही असलेल्या काही छायाप्रतीही दाखवल्या होत्या.  त्या प्रकाशित झाल्या तेव्हा निनावी असायच्या; म्हणजे कुठल्याच कंपनीचे वा व्यक्तीचे नाव त्यावर नसायचे. तशा पंच्याहत्तर जाहिराती प्रकाशित झाल्यानंतर वाचकांना वॉल स्ट्रीट जर्नलकडूनच समजले, की युनायटेड टेक्नॉलॉजिस ह्या ओटिस एलेव्हेटर आणि कॅरिअर एअर-कंडीशनर बनवणाऱ्या बडया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅरी ग्रे हे स्वतः त्या लिहीत असत. अगदी साधे पण त्यांच्या दृष्टीने अमेरिकन समाजासाठी महत्त्वाचे ठरतील असे काही विचार त्यातून कमीत कमी शब्दांत व्यक्त केले जात. उजव्या बाजूला फक्त एका छोटया स्तंभाचा उभा मजकूर आणि उर्वरित पूर्ण पान कोरे अशी त्या मलपृष्ठांची आगळी मांडणी असे. साहजिकच १९७९ व १९८० या प्रकाशनकाळात ह्यांतील प्रत्येक जाहिरात वाचकांचे लक्ष लगेच वेधून घेई. How we perform as individuals will determine how we perform as a nation अशी त्या सर्व जाहिरातींची टॅग-लाइन होती. वॉल स्ट्रीटचा वाचक म्हणजे अमेरिकन उद्योगजगताचा अगदी अर्क. पण त्यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद या जाहिरातींना मिळाला. अमेरिकन उद्योगजगतातील सर्वांत प्रभावी १०० जाहिरात-मोहिमांमध्ये या जाहिरात-मालिकेचा समावेश केला गेला. Gray Matter ह्या नावाने पुढे या जाहिरातींचे एक संकलनही हॅरी ग्रे यांनी प्रसिध्द केले होते. 

   ह्याच कल्पनेपासून प्रेरणा घेऊन अंतर्नादमधील त्या जाहिरात-मालिकेसाठी मजकूर लिहायचे मी ठरवले. मजकूर काय असावा याचे पूर्ण स्वातंत्र्य मला किर्लोस्करांनी दिलेच होते. मार्च २००४ ते डिसेंबर २००६ ह्या कालावधीत त्या मलपृष्ठावर प्रकाशित होत गेल्या. ‘नव्या जगाची सुरुवात स्वतःपासून होते’ हे आशयसूत्र (टॅग-लाइन) असलेल्या या जाहिरातींची ही पार्श्वभूमी आम्ही स्वतः कधी उघड केली नव्हती; पण पुढे ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी लोकसत्तेच्या एका अंकात (शनिवार, ४ जून २००५) या जाहिरात-मालिकेवरच ‘नव्या जगाची सुरुवात…’ या शीर्षकाचा एक मोठा अर्धे पान व्यापणारा लेख लिहिला व त्यामुळे ही पार्श्वभूमी लोकांना कळली. ‘सामाजिक संस्कारांची पखरण करणारी बोधमालिका’ अशा शब्दांत जोगळेकरांनी ह्या जाहिरातींचा गौरव केला होता. एका मोठया वृत्तपत्राने एखादया मासिकातील जाहिरातींवर एवढा विस्तृत लेख लिहिल्याचे हे बहुधा एकमेव उदाहरण असावे. एका अर्थाने माझे जीवनविषयक तत्त्वज्ञानच मी या जाहिरातींतून मांडले होते. अंतर्नादमधल्या कुठल्याही लेखनापेक्षा जास्त प्रतिसाद या जाहिरातींना मिळाला. ‘ह्या जाहिराती मोठया करून आम्ही आमच्या नोटीस बोर्डावर लावत असू’, ‘यातून मला जगण्याचे बळ मिळाले’, ‘आम्ही यापासून हे-हे शिकलो’, ‘असा एक अनुभव आम्हांलाही आला होता’ अशा प्रकारच्या असंख्य प्रतिक्रिया वाचकांकडून आल्या. नमुना म्हणून त्यातील दिवाळी २००६ अंकातल्या जाहिरातीमधला मजकूर पुढे उद्धृत करतो –   

       धागा तोडू नका, फुली मारू नका

एकही डाग नसलेली सफरचंदं सापडणं कठीण आहे,

तशी ती नसतातच. 

पण थोडेफार डाग असलेली, टाकून द्यायची नसतात

जरा साल काढून घेतली,

तर आतून ती चांगलीच असतात.


माणसांचंही तसंच असतं

थोडंफार वगळलं तर, बरचसं चालण्यातलं असतं.

एवढ्यातेवढ्यावरून फुली नसते मारायची,

इतरांवर, वा स्वत:वरही. 

तोडून नसतं टाकायचं

इतरांपासून आपल्याला

वा आपल्यापासून आपल्याला.

तोडणं सोपं असतं,

पण पुन्हा जोडणं कठीण असतं. 

आणि मग कितीही जोडलं,

जखम भरली, खपली धरली

तरी व्रण कायमच राहतो. 

तुटलेला धागा जोडला

तरी गाठ कायमच राहते.

रोज-रोजच्या जगरहाटीत

तुमच्या आमच्या दिवसरातीत

जास्तीत जास्त ताण-ताप

चलनवाढ आणि तेलटंचाई

जिहाद आणि जंगलकटाई

यातून नाही येत.

तो येतो, तू-तू, मी-मीतून

नात्यागोत्यांतल्याच गाठींतून

त्यावरच ठरतो आपला खरा मूड.

तो चांगला असेल

तर भोवतालचं जगही

अधिक चांगलं दिसायला लागतं.

दृष्टी बदलली की सृष्टीही बदलते.

आधी आपण बदलतो,

मग जग बदलतं.

   सतरा-अठरा वर्षांपूर्वी जेव्हा या जाहिराती प्रथम प्रसिध्द झाल्या, तेव्हा WhatsApp, फेसबुक वगैरे प्रकार आपल्याकडे फारसे प्रचलित नव्हते. आज त्या माध्यमांतून सुविचारांचा सगळीकडे नुसता पाऊस पडत असतो. पण अशा परिस्थितीतही एखादे विशिष्ट सूत्र असलेले, सोप्या शब्दांत मांडलेले आणि सहज आचरणात आणता येतील असे हे विचार आजही वाचकांना महत्त्वाचे असे काहीतरी देऊ शकतात. मुख्य म्हणजे नव्या जगाची सुरुवात करण्यासाठी कोणा महात्म्याची वाट बघत न बसता, स्वतःपासून सुरुवात करून, आपणही त्या निर्माणप्रक्रियेत अगदी खारीचा म्हणता येईल असा थोडासातरी वाटा उचलू शकतो, ही श्रद्धा त्यांच्या मनात ह्या वाचनातून बळावू शकते. या जाहिरात-मालिकेविषयी भरभरून बोलणारे कितीतरी वाचक आजही भेटतात, या जाहिरातींचे आम्ही काढलेले संकलन मागतात. आपल्या हातून काही चांगले भरीव काम झाल्याचे समाधान या जाहिरात-मालिकेने मला दिले. 

+++++

अभिवाचन : उमा खोलगडे 

Author

One thought on “अभिवाचन :‘नव्या जगाची सुरुवात’ 

  1. भानूंजीचे मौलीक विचार आणि तुमचे स्पष्ट अभिवाचन 👍👍👍

Leave a Reply