माझ्याच बाबतीत . . .

    ‘माझ्याच बाबतीत असं का होतं…?’ असा  प्रश्न मला सतत पडतो.  तुम्हांला पडतो का ?  पडत असणार; कारण तो तसा अनेकांना पडतो; पण ते उघड बोलत नाहीत! 

मला इथे त्याविषयी लिहायची संधी मिळाल्याने मी त्याचे मला आलेले अनुभव सांगू शकतो.

मी भलताच पंक्च्युअल म्हणजे वक्तशीर माणूस आहे.

नाटकाच्या जाहिरातीत सूचना असते, ‘प्रेक्षकांनी पंधरा मिनिटे आधी स्थानापन्न व्हावे.’ मी बरोबर पंधरा मिनिटे आधी आसनस्थ होतो; पण त्यावेळी पडद्यामागून नाटकाचा सेट  लावण्याचे आवाज कानी पडतात. 

चार वाजताचं नाटक  साडेचारला सुरू होतं.  

माझ्या सारख्या काटेकोर माणसाला 

वक्तशीरपणे शोला हजर राहणं कधी कधी काही कारणांनं मला जमत नाही. त्यावेळी मात्र चारचं नाटक  ठीक चारलाच सुरू झालेलं असतं. नाटकाचा सुरुवातीचा वीस-पंचवीस मिनिटांचा भाग मी मिस् केलेला असतो.

आमच्या भागात बसचे स्टॉप एकमेकांपासून  अंतरावर आहेत. मी ज्या बससाठी उभा असतो तिचा वीस-पंचवीस मिनिटे – काही वेळा अर्धा पाऊण तास- पत्ता नसतो. त्या अवधीत शेजारच्या बस स्टॉपला पाच सहा बसेस येऊन गेल्या असतात. मला जेव्हा त्या स्टॉपवरची बस पकडून जायची पाळी येते तेव्हा माझ्या नेहमीच्या स्टॉपवर दर दोन मिनिटांनी गाड्या येत असतात.

हे झालं बसच्या फ्रीक्वेन्सीबद्दल! 

बस आल्यावर बस कंडक्टर मोजून प्रवासी आत घेतो. मी सहावा असतो. 

पाच प्रवासी झाले की तो मला हाताने अडवतो. ‘बस. पाचच प्रवासी बस.’

बस सुरू झाल्यावर एक प्रवासी धावती बस पकडतो. कंडक्टर हात देऊन त्याला आत घेतो. 

माझ्यासारखा लहानसा माणूस एवढ्या लहानशा अन्यायाविरुद्ध  हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात  दाद मागायला जाणार नाही हे त्या कंडक्टरला माहीत असतं.

माझ्याच बाबतीत असं का होतं असा प्रश्न अशावेळी पडणार नाही तर काय !

जवळच जायचं आहे आणि मस्त ऊन पडलंय अशा स्थितीत छत्री घेणं म्हणजे वेडेपणा म्हणून मी बाहेर पडलो की दोन तीन मिनिटे होत नाहीत तर एकदम अंधारून येतं आणि मुसळधार पाऊस कोसळायला लागतो. कुठे होते हे काळे मेघ दोन मिनिटांपूर्वी?  मी आडोसा शोधायला लागतो. 

पाऊस पडत असेल किंवा काळोख होऊन गडगडाट होत असेल  तर छत्री न घेता कोण बाहेर पडेल! पण मी अशा वातावरणात बाहेर पडलो की मिनिटाभरात वरुणराजा आपला खेळ आवरता घेतो. प्रवासात पावसाचा एक  थेंब अंगावर पडत नाही. नुसताच गडगडाट आणि काळोखी वातावरण. माझ्याचबाबतीत निसर्ग असा का वागतो ? 

निसर्गाचं जाऊ द्या. आपण निर्माण केलेली व्यवस्था आपल्याशी कसं वागते…

परवाची गोष्ट.

आम्ही जुन्या वळणाचे नागरिक रेल्वेचं तिकीट काढायला रांगा लावतो.

रेल्वे स्टेशनवर एकदा लहान क्यू निवडून मी एका रांगेत उभा राहिलो. बराच वेळ आमची रांग हलत नाही पाहून वैताग आला.  तिकीट खिडकीजवळ एक प्रवासी आतल्या तिकीटवाल्याशी हुज्जत घालत बसलेला. गंमत त्याहीपुढे आहे . काही वेळानं वाद  मिटून रांग हलायला लागली; पण नेमका माझा नंबर आल्यावर आतल्या तिकीटवाल्याने ‘बाजूच्या रांगेत जा’ म्हणून विंडो बंद केली.  दुसऱ्या रांगेत शेवटून पहिला नंबर लावताना

‘माझ्याच बाबतीत …’ असे शब्द ओठांवर येणं स्वाभाविक होतं.

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात किशोरी आमोणकरांचं स्थान नंबर एकचं. त्या फुल फॉर्मात असताना, त्यांच्या मैफिली गाजत असतानाची घटना.

मी त्यांना  प्रत्यक्ष  ऐकलं नव्हतं. डिसेंबरचा महिना. मैफिलीची तिकिटं भारी किंमतीची होती. 

पण किशोरीचे स्वर  प्रत्यक्ष ऐकायला मिळणार या दैवदुर्लभ अनुभवापुढे पैशाचं काय! 

रात्री उशिराची वेळ होती. त्यात किशोरीबाई उशिरा येतात वगैरे ऐकलं होतं; पण शेवटची भैरवी ऐकल्याशिवाय आसनावरून उठायचं नाही असा मी मनाशी निश्चय केला होता. 

बाई पाचच मिनिटे उशिरा आल्या. विशेष म्हणजे सुरुवातीला थोडा उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करून गायन सुरू केलं.

पहिल्या आलापीतच जाणवलं, का कोण जाणे त्यांचा सूर आज नेहमीसारखा लागत नाही आहे. प्रेक्षकांत चुळबुळ सुरू झाली; पण नंतरच्या स्वरप्रवासात त्यांना त्यांचा सूर सापडेल आणि मैफिलीत रंग निर्माण होईल अशी आशा सर्वांनाच वाटत राहिली; पण तसं झालं नाही. निराशा वाढत गेली.  आज आपल्या आवाजाचं काही खरं नाही हे किशोरीच्याही लक्षात आलं. तिनं स्वतःहून गाणं थांबवलं. प्रेक्षकांची आणि संयोजकांची माफी मागितली. किशोरीताईंच्या बिदागीची रक्कम मोठी असते. 

माईक हातात घेऊन किशोरीताईंनी अनाउन्समेंट केली, “मी पुन्हा इथे येणार आहे.  पुढल्या आठवड्यात याच सभागृहात मी कार्यक्रम करणार आहे आणि त्यासाठी मी  कोणतंही मानधन घेणार नाही.” 

मला कल्पना नाही, किशोरीची मैफील रद्द होण्याचा   प्रसंग हा पहिलाच होता की या आधीदेखील असं घडलं होतं! 

पण मला विचाराल तर  मला  स्वतःला हे नवीन नाही.

आणि दुर्दैवाचा एवढा पाढा वाचल्यावर  आता तुम्हांलाही माझ्या बाबतीत हे घडण्याचं  नवल वाटणार नाही.

असो! 

माझ्याच बाबतीत असं का होतं? … ही मालिका चांगलीच  मोठी आहे. तुमच्या त्या टीव्ही मालिकांपेक्षा मोठी.

अगदी अलीकडची गोष्ट. रशियाची सहल करायला हवी असं वाटायला लागलं; पण ‘सध्या तिथे जाऊ नका- युक्रेन रशिया युद्ध चालू आहे!’  असे सल्ले मित्रांकडून आले. कॅनडा माझा सेकंड चॉईस होता.

कॅनडाला जायचं यावर हाऊस संसदेत एकमत झालं.

 नायगारा पाहायचा तर कॅनडामधून अशी वर्णने ऐकत होतो.  वेळ न घालवता कामाला लागलो.  एका मराठी सहल  कंपनीची जाहिरात पेपरात आली होती. कॅनडा सहलीचा त्यात ठळक उल्लेख होता. त्या मराठमोळ्या कंपनीशी संपर्क साधून रक्कमही भरून टाकली. कॅनडाचा मॅप आणि रंगीत कॅटलॉग कंपनीनं दिला. दोन-चार दिवसांनी निवांतपणे तो कॅटलॉग चाळत असता सहल कंपनीकडून फोन आला.

” माफ करा, सर, कॅनडाची सहल आपण रद्द करत आहोत.  खलिस्तान प्रकरणामुळे  कॅनडा देश आता आपला शत्रू बनला आहे.   शत्रुराष्ट्रात सहलीसाठी जाणं धोक्याचं तर आहेच; पण  आजच्या परिस्थितीत तो देशद्रोह नाही का ठरणार? असा विचार करून  देशाच्या धोरणाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी ही सहल आम्ही रद्द करत आहोत. एनी वे, तुमच्यापुढे आता दोन पर्याय आहेत, सर : तुमची रक्कम आमच्या दुसऱ्या देशातील सहलीसाठी वापरणं किंवा  पूर्ण रक्कम परत घेणं, कृपया आपला पर्याय कळवा.”

त्या निवेदिकेला सांगावंसं वाटलं, 

‘मॅडम, आणखी एक पर्याय मला दिसतो आहे… 

कपाळावर हात मारून म्हणणे,

” माझ्याच बाबतीत असं का होतं ?”

//////////////////////////////////////////////////////////

Author

Leave a Reply